
ठाणे : पावसाळ्यात ठाणे शहरातील धोकादायक इमारतीचा प्रश्न ऐरणीवर येतो. पावसाळा सुरू होण्यापूर्वीच महापालिका अनधिकृत इमारतींची यादी प्रसिद्ध करून त्यावर कारवाई करत असल्याचे दर पावसाळ्यात पहावयास मिळते. यामध्ये धोकादायक इमारती रिकाम्या केल्या जातात मात्र यंदा शहरात असलेल्या ९० अतिधोकादायक इमारतींपैकी महापालिकेने ४१ इमारती रिकाम्या करून त्यांच्यावर तोडक कारवाई केल्याचे दिसून येत आहे. परंतु अद्यापही ४९ इमारतींमधील २१७ कुटुंब आणि वाणिज्यमधील ५१ कुटुंबे धोक्याच्या सावटाखाली वावरत आहे. या इमारतींमधील रहिवाशांनी इमारती रिकाम्या करण्यास नकार दिल्याने महापालिकेची चिंता वाढली आहे.
ठाणे महापालिका क्षेत्रामध्ये पावसाळ्यात अतिधोकादायक तसेच धोकादायक इमारती कोसळून जीवितहानी होऊ नये, यासाठी ठाणे महापालिका प्रशासनाकडून दरवर्षी शहरात सर्वेक्षण करून अशा इमारतींची यादी जाहीर करण्यात येते. यंदा करण्यात आलेल्या सर्वेक्षणात पूर्वी शहरात ४४०७ इमारती या धोकादायक होत्या. तर अतिधोकादायक इमारतींची संख्या ही ९० एवढी झाली आहे. यात सर्वाधिक अतिधोकादायक इमारतींची संख्या ही नौपाडा भागात असून हा आकडा ३८ एवढा आहे. तर सर्वात कमी इमारती या मुंब्य्रात असून येथील आकडा हा केवळ एक आहे.
पावसाळ्यापूर्वी महापालिकेने प्रभाग समितीनिहाय धोकादायक आणि अतिधोकादायक इमारतींचा सर्व्हे केला होता. परंतु ज्या इमारती अतिधोकादायक घोषीत करण्यात आल्या. त्यावरून मागील काही महिन्यापासून वादंग सुरू आहे. काही इमारतींचे जे काही स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात आले आहे. त्यावरून काहीसा वांदग निर्माण झाला आहे. महापालिकेने केलेले स्ट्रक्चरल ऑडिट आणि संबंधित इमारतधारकांनी केलेल्या ऑडिटमध्ये तफावत आढळून आली आहे. यावरूनच काही रहिवाशांनी इमारती रिकाम्या करण्यास नकार दिल्याची माहिती महापालिका सूत्रांनी दिली.
एकूण पालिकेने आतापर्यंत ९० पैकी ४१ इमारती रिकाम्या करून त्यावर तोडक कारवाई केली आहे. मात्र ४९ व्याप्त इमारतींवर अद्यापही कारवाई करता आलेली नाही. या इमारतींमध्ये २१७ रहिवासी कुटुंब आणि ५१ वाणिज्य कुटुंबांचे वास्तव्य आहे, तर या ठिकाणी ८८३ रहिवासी वास्तव्यास असल्याची माहिती महापालिकेने दिली.
जागा मालक आणि भाडेकरू यांच्यातील वादाचा फटका
दुसरीकडे काही ठिकाणी जागा मालक आणि भाडेकरू यांच्यातील वादाचा फटका देखील या इमारतींना बसला असून त्यामुळे देखील इमारती रिकाम्या होतांना दिसत नसल्याचे चित्र आहे. या इमारती रिकाम्या करण्यासाठी महापालिकेच्या अतिक्रमण विभागाचे शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत. त्यातही कोपरीतील एकाच ठिकाणी १२ इमारती या पालिकेने अतिधोकादायक घोषित केल्या आहेत. परंतु त्यातही आज काही कुटुंबांचे वास्तव्य असल्याने त्या इमारती रिकाम्या करणे पालिकेला शक्य झालेले नाही.