सहाय्यक आयुक्तांच्या बदलीला आयुक्तांची स्थगिती; पालिकेतील वादग्रस्त अधिकारी स्थावर विभागातच

स्थावर मालमत्ता विभागातील गैरकारभाराचे आरोप झालेले आणि दिवा प्रभाग समितीमधील वादग्रस्त कारभारामुळे टीकेचे धनी झालेले दिव्याचे सहाय्यक आयुक्त अक्षय गुडदे यांच्या बदलीच्या आदेशाला स्वतः महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी स्थगिती दिली आहे.
सहाय्यक आयुक्तांच्या बदलीला आयुक्तांची स्थगिती; पालिकेतील वादग्रस्त अधिकारी स्थावर विभागातच
Published on

ठाणे : स्थावर मालमत्ता विभागातील गैरकारभाराचे आरोप झालेले आणि दिवा प्रभाग समितीमधील वादग्रस्त कारभारामुळे टीकेचे धनी झालेले दिव्याचे सहाय्यक आयुक्त अक्षय गुडदे यांच्या बदलीच्या आदेशाला स्वतः महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी स्थगिती दिली आहे.

महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांनी अक्षय गुडदे यांची स्थावर मालमत्ता आणि दिव्याच्या सहाय्यक आयुक्त पदावरून उचलबांगडी करून त्यांची कळवा प्रभाग समितीच्या सहाय्यक आयुक्तपदी बदली केली होती. तर कळव्याचे सहाय्यक आयुक्त सचिन बोरसे यांना स्थावर आणि दिव्याच्या सहाय्यक आयुक्तपदाचा पदभार देण्यात आला होता; मात्र स्वतःच पालिका आयुक्तांनी या बदलीच्या आदेशाला स्थगिती दिल्याने दोन्ही अधिकाऱ्यांनी आपला पदभार अद्याप सोडलेला नाही.

सदनिका हस्तांतरासाठी अक्षय गुडदे यांनी आपल्या स्वीय सहाय्यकाकडून ५ लाख रुपये मागितले असल्याचा आरोप माजी महापौर अशोक वैती यांनी केला होता. विशेष म्हणजे, यासंदर्भात वैती यांनी पालिका आयुक्त सौरभ राव यांच्याकडे सत्य प्रतिज्ञापत्र देखील सादर केले होते. यावर पालिका आयुक्तांनी अक्षय गुडदे यांच्याकडे यासंदर्भात खुलासा देखील मागवला होता; मात्र गुडदे यांनी त्यांच्यावर करण्यात आलेले आरोप मान्य केले नव्हते. स्थावर मालमत्ता विभागातील त्यांचा कारभार देखील वादग्रस्त ठरला होता, तर दुसरीकडे दिवा प्रभाग समितीमध्ये होत असलेल्या अनाधिकृत बांधकामांबाबत अक्षय गुडदे यांच्या विरोधात मोठ्या प्रमाणात तक्रारी पालिका प्रशासनाकडे प्राप्त झाल्या होत्या. दिव्याचे सहाय्यक आयुक्त हे अनधिकृत बांधकामांना संरक्षण देत असल्याचा आरोप देखील उबाठा पक्षाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आला होता.या सर्व प्राश्वभूमीवर पालिका आयुक्तांनी अक्षय गुडदे यांच्याकडून खुलासा देखील मागवला होता.

दोन्ही सहाय्यक आयुक्तांनी पदभार स्वीकारला नाही

महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रशांत यांनी रोडे ९ जुलै रोजी अक्षय गुडदे यांच्या बदलीचे आदेश काढले होते. हे आदेश काढल्यानंतरही दोन्ही सहाय्यक आयुक्तांनी आदेशाप्रमाणे पदभार स्वीकारला नाही. अतिरिक्त आयुक्तांनी काढलेल्या बदलीच्या आदेशाला स्वतः पालिका आयुक्त सौरभ राव यांनीच स्थगिती दिल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. जोपर्यंत स्थगिती आदेश उठत नाही तोपर्यंत दोन्ही अधिकारी आपल्या जुन्याच पदावर कार्यरत असणार असल्याची माहिती पालिकेच्या सूत्रांनी दिली आहे.

logo
marathi.freepressjournal.in