वीटभट्टीमुळे जव्हार तालुक्यातील कुटुंबाना मिळणार रोजगार

वीटभट्टीमुळे जव्हार तालुक्यातील कुटुंबाना मिळणार रोजगार

कमी शिक्षण आणि तांत्रिक रोजगार अभावामुळे जव्हार तालुक्यातील मजूर हा वीटभट्टीच्या कामावर जायला अधिक पसंती देत आहे, त्यामुळे मजुरला स्थानिक ठिकाणी रोजगार मिळत असून कुटुंबासोबत काम करणे सोयीचे झाले आहे, शिवाय मजुरी देखील चांगली व परवडणारी मिळते आहे.

जव्हार तालुक्यात अल्पभूधारक शेतकऱ्यांची संख्या मोठी आहे. काही शेतकरी हे जेमतेम पारंपरिक शेतीवर आपला उदरनिर्वाह करीत आहेत. याउलट ज्यांच्याकडे शेतजमीन आहे, त्यांना पारंपरिक शेतीतून मिळणारे उत्पन्न हे केवळ पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे. त्यामुळे उरलेले ८ महिने आदिवासींना रोजगारासाठी स्थलांतरित करण्याशिवाय पर्याय नाही. परंतु या सगळ्या गोष्टींवर मात करण्यासाठी स्थानिक आदिवासी कुटुंबांना गाव-पाड्यावर वीटभट्टीवर काम करणे हा रोजगार उपलब्ध झाल्याने कुटुंबाचे लालन-पालन होत आहे.

जव्हार तालुक्‍यात एकूण ४८ ग्रामपंचायत व २ ग्रामदान मंडळ इत्यादींचा समावेश आहे. प्रत्येक ग्रामपंचायत भागात वीटभट्टी सुरू असल्याचे चित्र देखील आहे. या व्यवसायामुळे तालुक्यातील अनेक कुटुंबांना रोजगार उपलब्ध होत आहे. वीटभट्टीमुळे गावातील अनेक कुटुंबांना काम मिळाल्याने गावातच रोजगार प्राप्त करण्याची संधी उपलब्ध झाली आहे.

सन २०२२ पर्यंत प्रत्येक कुटुंबाला पक्के घर आणि प्रत्येक घरी वीज व पाण्याची मूलभूत सोय उपलब्ध व्हावी, यासाठी केंद्र शासन सतत प्रयत्नशील असून दारिद्रय रेषखालील प्रत्येक गरजू आदिवासी कुटुंबांना प्रधानमंत्री आवास योजना व राज्य शासनाच्या इतर योजनेतून घरकुल देण्याचे काम वेगाने सुरू आहे. शिवाय  येणाऱ्या काळात प्रत्येक कुटुंबाकडे पक्के घर असणार आहे.

घर म्हटले की महत्त्वाचा घटक म्हणजे विटा आहेत आणि विटांची गरज प्रत्येक बांधकामाला लागणार असल्याने विटांची मागणी वाढतच राहणार आहे. अशातच विटा निर्मितीचे उद्योग चालविणारे व्यावसायिक याची वेळेवर पूर्तता करत नाहीत. शासनाकडून घरकुलासाठी मिळणारा निधी दीड लाख रुपये पर्यंत असून संपूर्ण घराची उभारणी करण्यासाठी रक्कम कमी पडते आहे.

अनेक कुटुंबांनी आपल्या स्वतः वीटा निर्मिती करून आपल्या घराचे बांधकाम करण्याचा पुढाकार घेऊन करून बचत करण्याचा मार्ग सुद्धा शोधला आहे. जर एखाद्या कुटुंबाला ८ हजार विटांची गरज असेल तर तो एकूण १३ ते १५ हजार विटांची भट्टी तयार करतो त्यातून उरलेल्या विटांची विक्री करून घरासाठी लावणाऱ्या इतर आवश्यक वस्तूंची खरेदी करतो व शासनाकडून मिळालेल्या निधीचा योग्य उपयोग करून आपल्या पसंतीच्या सोयीनुसार घर तयार करतो. कुटुंबीय वाढीव स्वरूपात विटा व इतर साहित्याचा वापर करून दोन पेक्षा अधिक खोल्यांचे घर तयार करीत आहे.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in