
२७ गावांतील पाणीप्रश्न पेटला असून नागरिकांनी प्रशासनावर तोशेरे ओढले आहेत. अशातच डोंबिवलीतील कारखानदारही आक्रमक झाल्याचे पहायला मिळत आहे. येथील जवळपास ४५० कारखान्यांना गेल्या तीन महिन्यांपासून कमी दाबाने पाणीपुरवठा सुरू आहे. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी)च्या डोंबिवली विभागीय कार्यालयात गुरुवारी कारखानदारांनी कामा संघटनेच्या नेतृत्त्वाखाली मोर्चा काढला. यावेळी कारखान्यांना मुबलक पाणीपुरवठा करा अन्यथा सर्व कारखान्यांच्या चाव्या आपल्या कार्यालयाच्या टेबलावर टाकू, असा इशारा संघटनेने दिला. मात्र लवकरच योग्य दाबाने पाणी पुरवठा सुरळीत करू असे आश्वासन कार्यकारी अभियंता आर.पी. पाटील यांनी शिष्टमंडळाला दिला.
डोंबिवली फेज-१ आणि फेज -२ मध्ये ४५० कारखाने आहेत. गेल्या तीन महिन्यांपासून या सर्व कारखान्यांना कमी दाबाने पाणीपुरवठा केला जात आहे. कामा संघटनेने यावर एमआयडीसी कार्यालयात कारखान्यांच्या या समस्येवर पत्रव्यवहार केले होते. अखेर याबाबत जाब विचारण्यासाठी कारखानदारांनी एमआयडीसी कार्यालयावर मोर्चा काढला. पाणी लवकरात मिळाले नाही तर सर्व कारखान्यांच्या चाव्या आपल्या कार्यालयाच्या टेबलावर टाकू, असे कामा संघटनेचे अध्यक्ष डॉ. देवेन सोनी यांनी सांगितले.