शिवसैनिकांची वेट अँड वॉच ची भूमिका, निष्ठावंत शिवसैनिकांचा लवकरच मेळावा आयोजित होणार

एकनाथ शिंदे यांचे एकहाती नेतृत्व असून गेले काही वर्षांपासून खासदार राजन विचारे यांनी शिंदे यांच्याशी जुळवून घेतले
 शिवसैनिकांची वेट अँड वॉच ची भूमिका, निष्ठावंत शिवसैनिकांचा लवकरच मेळावा आयोजित होणार

एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेचे ४० हून अधिक आमदार घेऊन गुवाहाटी गाठल्याने शिवसेनेत उभी फूट पडली. याचा सर्वात मोठा फटका शिवसेनेला ठाणे जिल्ह्यात बसला आहे. शिंदे समर्थकांनी ठिकठिकाणी शक्तिप्रदर्शन करत आपला पाठिंबा शिवसेनेला असल्याचे उघडपणे जाहीर केले आहे, मात्र दुसरीकडे निष्ठावंत शिवसैनिकांनी मात्र अद्याप वेट अँड वॉच ची भूमिका घेतली आहे. दरम्यान ठाण्यात खासदार राजन विचारे यांनी उघडपणे आपली भूमिका जाहीर केली नसली तरी ते उद्धव ठाकरे यांच्या संपर्कात असल्याचे सांगण्यात येत असून जिल्ह्यात इतरत्रही बरेच निष्ठावंत मातोश्रीच्या आदेशाची वाट पाहत असल्याचे सांगितले जात आहे. शिवसेनेकडूनही जिल्ह्यात नव्या नेतृर्त्वाचा शोध घेण्यात येत असून त्यासाठी लवकरच मेळावा आयोजित करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

सध्या जिल्ह्यावर एकनाथ शिंदे यांचे एकहाती नेतृत्व असून गेले काही वर्षांपासून खासदार राजन विचारे यांनी शिंदे यांच्याशी जुळवून घेतले आहे. मात्र काही वर्षांपूर्वी या दोघातून विस्तवही जात नव्हता, विचारे ज्यावेळी महापौर होते त्यावेळी देखिल त्यांनी आपल्या बॅनर पोस्टरवर एकनाथ शिंदे यांचा फोटो लावायला टाळाटाळ करत असे, त्यानंतर शिवसेना नेतृत्वाने दोघांमध्ये मध्यस्थी करत मतभेद दूर केले होते. त्यानंतर विचारे यांनी शिंदेंचे नेतृत्व स्वीकारल्याचे चित्र पहायला मिळत होते, तेच गेल्या आठवड्यात एकनाथ शिंदे यांनी पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात बंडखोरी करत शिवसेनेत खळबळ उडवून टाकली. या बंडखोरीमुळे निष्ठावंत शिवसैनिकांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली आहे. ठाण्यामध्ये शिंदे गटात मोठ्या प्रमाणात शिवसैनिक असल्याचे उघड झाले असले तरी राजन विचारे मात्र अद्याप पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या संपर्कात असल्याचे सांगण्यात येत आहे.

ठाणे लोकसभेत शिवसेनेचे राजन विचारे हे प्रतिनिधित्व करत आहेत. २०१९ साली त्यांच्या उमेदवाराला भाजपमधून मोठ्या प्रमाणात विरोध झाला होता. ठाणे विधानसभेत भाजपचे संजय केळकर हे निवडून आले आहेत तर ठाणे शहरात सर्वाधिक नगरसेवक भाजपचे आहेत. विशेष म्हणजे ठाणे लोकसभा मतदारघात संजय केळकर, बेलापूर विधानसभा मतदारसंघातून मंदा म्हात्रे , ऐरोलीमधून गणेश नाईक हे आमदार आहेत तर शिवसेनेकडून पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि ओवळा माजिवडा मतदारसंघातून प्रताप सरनाईक हे शिवसेनेचे फक्त दोन आमदार आहेत. लोकसभा मतदारसंघात आमचे आमदार जास्त आहेत त्यामुळे ठाणे लोकसभेची जागा ही भाजपसाठी सोडण्यात यावी अशी मागणी भाजप नगरसेवकांनी गेल्या लोकसभा निवडणुकीपूर्वी केली होती. तसेच जर अपरहार्यता असल्यास शिवसेनेचा उमेदवार बदलण्यात यावा असेही स्पष्ट करत राजन विचारे यांच्या उमेदवारीला उघडपणे विरोध करण्यात आला होता दरम्यान भाजप नगरसेवकांना अशी मागणी करण्यासाठी शिवसेनेतीलच काही पदाधिकाऱ्यांनी रसद पुरवली असल्याची जोरदार चर्चा असून यावरून शिवसेनेतील गटबाजी चव्हाट्यावर आली होती.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in