मुंबई-गोवा महामार्गावर खड्डे बुजविण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू

काही वर्ष दुरावस्थेच्या गर्तेत अडकलेल्या मुंबई- गोवा महामार्गाची व्यथा, वनवास काही केल्या संपत नाही
मुंबई-गोवा महामार्गावर खड्डे बुजविण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू

कोकणातील महत्वाचा सण म्हणून ओळख असलेला गणेशोत्सव अवघ्या पाच दिवसांवर आला आहे. प्रत्येकाच्या घरी लाडक्या बाप्पाचे आगमन होणार आहे. मात्र ज्या मुंबई-गोवा महामार्गावरून कोकणवासी गणेशोत्सवासाठी आपल्या घरी जात असतात त्या महामार्गावर मोठमोठे खड्डे पडलेले होते. मात्र पेण पत्रकार, सह्याद्री प्रतिष्ठान व सोबती संस्थेने पुकारलेल्या जन आक्रोश आंदोलनाने प्रशासनाला जाग आली असून मुंबई-गोवा महामार्गावरील पळस्पे ते इंदापूर येथील खड्डे बुजविण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू झाले आहे.

काही वर्ष दुरावस्थेच्या गर्तेत अडकलेल्या मुंबई- गोवा महामार्गाची व्यथा, वनवास काही केल्या संपत नाही. दरम्यान दरवर्षी कोकणात गौरी-गणपती सणासाठी चाकरमान्यांना या खड्डेमय मार्गावरूनच प्रवास करावा लागतो.

कोकणवासियांचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधीकरणामार्फत हे खड्डे तातडीने बुजवणे गरजेचे होते. मात्र कासू ते इंदापूर हा ४२ किलोमीटरचा रस्ता उच्च न्यायालयात न्याय प्रविष्ठ असल्यामुळे हे काम बरेच महिने रखडले गेले. त्यामुळे प्रवाशांना या महामार्गावरील खड्ड्यांचा सामना करावा लागत आहे. तरीही १ जुलैपासून आत्तापर्यंत जेसीबी व इतर मशनरी वापरून तात्पुरती डागडूजी करण्यात आली होती. तरीही पावसाळ्यात ही डागडुजी कधी पाण्यासेबत वाहून गेली हे कळलेच नाही त्यामुळे जनतेला नाहक या खड्ड्यांना सामोरे जावे लागत होते. पेण पत्रकार, सह्याद्री प्रतिष्ठान व सोबती संस्था यांनी घेऊन पेण महामार्गावर स्वखर्चाने व श्रमदान करून खड्डे भरण्यासाठी जनआक्रोश आंदोलन पुकारले आहे. याच जन आक्रोश आंदोलनाची दखल घेत प्रशासनाने महामार्गावरील पळस्पे ते इंदापूर मार्गावरील खड्डे बुजविण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू केले आहे. आजपर्यंत अंदाजे पेण ते नागोठणे तसेच भिरा फाटा ते इंदापूर पर्यंतचे काम पूर्ण झाले आहे.

आगामी गणेशोत्सव सण व पेण पत्रकार, सह्याद्री, सोबती संस्थांच्या जन आक्रोश आंदोलनामुळेच खऱ्या अर्थाने प्रशासन नमले असून त्यांनी सदर परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन तातडीने खड्डे भरण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू केल्याचे आम्ही काल केलेल्या सर्व्हेत निदर्शनात आले असून त्यामुळे प्रवाशांना दिलासा मिळणार असल्याचे समीर म्हात्रे यांनी सांगितले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in