ठाणे जिल्हा परिषदेत बदली प्रक्रिया सुरू

ठाणे जिल्हा परिषदेत बदली प्रक्रिया सुरू

जिल्हा परिषदेच्या विविध विभागांतील आणि विविध संवर्गातील गट क पदावर कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या सर्वसाधारण बदल्यांची प्रक्रिया मंगळवारपासून सुरू झाली आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भाऊसाहेब दांगडे यांच्या अध्यक्षतेखाली ही बदली प्रक्रिया समुपदेशनाद्वारे करण्यात येत आहे.

१५ मे २०१४ च्या शासन निर्णयानुसार दरवर्षी जिल्हा परिषदेत सर्वसाधारण बदली प्रक्रिया राबवली जाते. त्यानुसार यंदाची बदली प्रक्रिया सुरू आहे. मंगळवारी जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात आणि बुधवारी एन.के.टी महाविद्यालयाच्या सभागृहात संपन्न झालेल्या बदली प्रक्रियेच्या कार्यवाही दरम्यान जिल्हा परिषद अध्यक्ष पुष्पा पाटील, उपाध्यक्ष सुभाष पवार, अतिरीक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. रुपाली सातपुते, सामान्य प्रशासन विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश फडतरे आणि विविध विभागाचे विभागप्रमुख उपस्थित होते.

मंगळवारी ग्रामीण पाणीपुरवठा विभाग, बांधकाम विभाग, पशुसंवर्धन विभाग, अर्थ विभाग, महिला व बाल विकास विभाग, कृषि विभाग, सामान्य प्रशासन आदी विभागांतील कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. तर बुधवारी आरोग्य विभाग आणि ग्रामपंचायत विभागातील कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. शासन नियमानुसार बदली प्रकिया राबवताना आदिवासी, बिगर आदिवासी, सेवाज्येष्ठता, विनंती, आपसी आदी टप्प्यानुसार कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात येत आहेत. या बदल्या करताना प्रत्येक तालुक्यात कर्मचाऱ्यांचे समानीकरण करून कामकाजाला गतिमानता आणण्याचे उद्दिष्टे जिल्हा परिषदेचे असल्याचे सामान्य प्रशासन विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश फडतरे यांनी सांगितले.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in