
डॉ.सविता महाडीक, ज्योतिष भूषण
मेष रास
वास्तुयोग
मेष राशीचे चिन्ह मेंढा आहे. धडक देणे, टक्कर देणे अशी वृत्ती असते. मेंढ्याप्रमाणे धडक देण्याचे त्यांच्याकडे धाडस असते. वसंत संपतानाची सुरुवात होणारी पहिली रास आहे. या राशीचे वर्चस्व डोक्यावर आहे. मेष राशीच्या व्यक्ती डोक्याचा जास्त वापर करतात. त्यांच्यात साहस-धाडस हा गुण प्रामुख्याने दिसतो. या व्यक्ती अन्याय सहन करत नाहीत. त्यांचा स्वतःवर व स्वतःच्या प्रयत्नांवर जास्त विश्वास असतो. कोणतेही कार्य धडक देऊन करण्याचा प्रयत्न असतो किंवा धडक कार्य करतात. त्यातून त्याचे काय परिणाम होतील याचा विचार करत नाहीत. भावनांचा जास्त विचार करत नाहीत. परिस्थितीचा सक्षमपणे सामना करणारे असतात. शिक्षण :- स्वप्रयत्नांना चांगले यश मिळेल, मात्र त्यामध्ये आळस नको. परिश्रमामध्ये सातत्य पाहिजे, शिवाय वेळेचे नियोजन उपयोगी पडू शकते. सातत्याने अभ्यासामध्ये मग्न राहिल्याने उज्ज्वल यश मिळू शकते. अभ्यासात खंड पडू देऊ नका. केलेला अभ्यास लक्षात ठेवण्यासाठी जास्त प्रयत्न करावे लागणार आहे. प्रयत्नलाही यश मिळेल. परदेशातूनही आपणास संधी मिळण्यासाठी योग्य दिशेने प्रयत्न करावे लागतील. त्यामध्ये यश मिळू शकते, शिवाय कुटुंबातील सदस्यांची मदत मिळेल गुरुजनांचे मार्गदर्शन मिळेल.
पारिवारिक : आर्थिक दृष्टीने हा काळ आपणास चांगला आहे. आपण आपल्या कुटुंबाप्रति सर्व जबाबदाऱ्या सक्षमपणे पूर्ण करणार आहात. काही चांगल्या अनपेक्षित घटना घडू शकतात. कुटुंबात खेळीमेळीचे वातावरण असेल, तसेच कुटुंबात एखाद्या धार्मिक अथवा मंगलकार्याचे नियोजन होऊ शकते अथवा प्रत्यक्षात कार्य होऊ शकते. कौटुंबिक कार्यक्रमही होतील. आनंदाचे क्षण उपभोगण्यासाठी मिळतील. कुटुंबातील तरुण-तरुणींच्या विवाहातील अडचणी दूर होतील.
नोकरी-व्यापार-व्यवसाय : नोकरी व्यवसाय-धंद्यात अर्थात आपल्या कार्यक्षेत्रात स्त्रीवर्गाकडून सहाय्य मिळू शकते. साडेसातीचा काळ असल्याने पावले उचलताना सावधपणे उचलावीत. लहान-मोठ्या आर्थिक व्यवहारात सावध असणे जरुरी आहे. कोणताही लहान-मोठा आर्थिक व्यवहार शांत व विचारपूर्वक करणे आवश्यक आहे. कोणत्याही कामात जास्त प्रयत्न करावे लागेल. तरीसुद्धा काम पूर्ण होते का नाही याबाबत शंका निर्माण होऊ शकते. निराश न होता अविरत प्रयत्नांची गरज आहे. यश नक्की लाभेल. कामाचा ताण जाणवू शकतो. पण तुमचा स्वतःवर स्वतःच्या प्रयत्नांवर विश्वास ठेवून काम करण्याचा स्वभाव आहे. आत्मविश्वास व सकारात्मक विचाराने पुढची वाटचाल चांगली ठरणार आहे. त्याचप्रमाणे इतर ग्रहांची साथ आपणास चांगली लाभेल. कठीण परिस्थितीत शांत व हुशारीने निर्णय घेतल्याने त्याचे सकारात्मक परिणाम आपल्या कार्यावर उठावदारपणे दिसून येतील. कोणत्याही लहानमोठ्या कार्यात घाईगर्दी करू नका, शिवाय इतरांवर अवलंबून राहू नका. धाडस व आपल्या योग्य निर्णयावर कायम राहा. त्यामुळे यश मिळण्यास सहाय्य लाभू शकते. नोकरीत वातावरणपूरक काम केल्याने आपल्यासाठी अनुकूल ठरणार आहे. आपल्या कामाचा आपणास हवा तसा परिणाम मिळणार आहे, परंतु काही कुयोग होत असल्याने सर्व स्तरांवर सांभाळून राहावे लागेल. शत्रुत्व व ताणतणाव निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आरोग्य सांभाळा. गर्भवती महिलांनी आपल्या प्रकृतीची काळजी घेणे अपरिहार्य आहे. तरुणांच्या नोकरी तसेच विवाहविषयक प्रश्न अथवा समस्या संपुष्टात येतील. राहत्या घराबद्दलचे प्रश्न सुटतील. सुखसुविधा वाढविण्यासाठी मुक्तहस्ते खर्च कराल. जमीनजुमला, स्थायी संपत्तीत पूर्वी केलेल्या गुंतवणुकीतून आर्थिक फायदा होईल. वाद असल्यास त्याचा निकाल आपल्या बाजूने लागणार आहे. व्यवसाय-धंद्यामध्ये वादग्रस्त उधारी वसूल होईल. त्यामुळे आर्थिक बाजू भक्कम होण्यास मदत मिळेल. चालू नोकरीत प्रगतीबराेबरच अपेक्षित घटना घडतील. त्यामुळे नोकरीच्या कामांमध्ये विशेष स्वारस्य घेऊन आपले काम पूर्ण करणार आहात. वरिष्ठांशी संबंध सुधारतील. आपण आपले निर्णय आत्मविश्वासपूर्वक व सकारात्मकतेने घेणार आहात. कार्यामध्ये चांगली प्रगती होईल. आपल्या कामाचा दर्जा उत्तम असेल. सर्व सहकाऱ्यांना सहयोग देणार आहात. त्यांना चांगला सल्ला द्याल. त्यांच्या सहाय्याने कार्य पूर्णत्वास मिळणार आहात.
शुभ दिनांक : ६, ७, ९, १०, ११, १४,१७,१९,२४,२८
अशुभ दिनांक : २,१३,१६,१८,२१,२२,२३,३०,३१
वृषभ रास
शुभ ग्रहांची साथ संगत
वृषभ राशी असलेल्या व्यक्ती शांत स्वभावाच्या असतात. मात्र त्यांना चिडवल्यास त्यांचा राग सिमीत राहत नाही. एखादी चाल करावयाची असल्यास शांतपणे करतील. आपण भरपूर परिश्रम घ्याल, आपल्या अस्तित्वाने वातावरण चांगले राहील. दुसऱ्या व्यक्तीला आपलेसे करण्याची कला आपल्यात आहे. कोणतेही कठीण काम आपल्या परिश्रमाने पूर्णत्वास न्याल. परंतु आपलेच म्हणणे खरे असे ज्यांना वाटते ते थोडे आळशी असतात. काही प्रमाणात इतरांवर अवलंबून राहण्याची सवय त्यांना असते. ते लवकर विश्वास ठेवतात. त्यामुळे त्यांना कधी कधी नुकसान सोसावे लागते, तसेच फसवणुकीचा सामनाही करावा लागतो. परंतु शत्रूवर मात करण्याची विशेष शक्ती असते.
शिक्षण : शैक्षणिक क्षेत्रातील जातकांनी तसेच विद्यार्थी-विद्यार्थिनींनी जास्त कष्ट घेणे अपेक्षित आहे. न कंटाळता परिश्रम घेणे गरजेचे आहे. त्यामुळे उद्याची भविष्य उज्ज्वल होऊ शकते. विद्यार्थ्यांनी अभ्यास करताना एका जागी स्थिर बसणे आवश्यक आहे, तसेच अभ्यासामध्ये सातत्य हवे. एवढी काळजी घेणे आवश्यक आहे. त्यामुळे अभ्यास चांगला होऊन त्यात चांगले यश मिळू शकते. ज्यांना स्पर्धापरीक्षा द्यायच्या आहेत त्यांनी हे सूत्र लक्षात ठेवावे. परदेशातील शिक्षण घेणाऱ्यांना हेच सूत्र उपयोगी पडेल. त्यात चांगली यश प्राप्त करू शकाल.
पारिवारिक : कुटुंबात चांगले वातावरण असेल. घरातील सर्व सदस्यांच्या इच्छापूर्तीचा कालावधी आहे. तरुण-तरुणींचे नोकरीविषयक प्रश्न संपुष्टात येतील तसेच विवाहयोग्य तरुण-तरुणींचे विवाह ठरतील. काहींचे ओळखीतून विवाह होतील किंवा ठरतील. कुटुंबात एखाद्या मंगलकार्याचे आयोजन अथवा नियोजन होऊ शकेल. नातेवाईकांच्या भेटीगाठी होतील. त्यामुळे वातावरण चांगले राहील. परिवारात खेळीमेळीचे उत्साहवर्धक वातावरण राहून सर्व सदस्यांत सहकार्याची भावना असेल. नोकरी-व्यापार- व्यवसाय :- या कालावधीच्या सुरुवातीला काहीसे मिश्र फळे प्रतिपादित होतील. हाती घेतलेल्या कामांचा पाठपुरावा करावा लागेल. काही वेळेस पुन्हा पुन्हा तीच तीच कामे करावी लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे न कंटाळता आपल्या प्रयत्नांमध्ये सातत्य ठेवा म्हणजे आपले कार्य पूर्ण होईल. विशेषतः सरकारी कामांच्या बाबतीमध्ये आर्थिक आणि वेळ खर्च करावा लागेल. काही वेळेस ओळखीचा उपयोग होईल. त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे सरकारी कामे करताना कोणाशीही वाद घालू नका. आपले म्हणणे अथवा मत कितीही बरोबर असले तरी सरकारी कार्य करणाऱ्या व्यक्तीला मान द्या. सरकारी व्यक्तीला, त्याच्या म्हणण्याला अथवा त्याच्या मताला प्राधान्य द्या. म्हणजे आपले काम सुकर होईल. जमीनजुमला, स्थायी संपत्ती इत्यादी क्षेत्रातील व्यवहार जे आतापर्यंत काही कारणास्तव रखडलेले होते अथवा लांबणीवर पडलेले होते असे व्यवहार गतिमान होऊन पूर्णत्वाकडे वाटचाल करतील. त्याचा आपल्याला फायदा होईल.
वडिलोपार्जित संपत्तीविषयीचे वादविवाद संपुष्टात येतील. मात्र आपण समजुतीचे धोरण स्वीकारणे जरुरीचे राहील. त्यामुळे सर्वमान्य तोडगा निघून समस्या सुटतील. चर्चेने व कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तींच्या मार्गदर्शनाने समस्या संपुष्टात येतील. काही वेळेस कुटुंबातील सदस्यांबरोबर लहानसहान कारणांवरून वादविवाद घटित होण्याची शक्यता आहे. त्यामुळे वादविवाद ज्या प्रसंगांमुळे तयार होतील अशा प्रसंगांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करणे हिताचे ठरेल.
व्यवसाय, धंद्यात काही वेळेस जास्त खर्च करावा लागू शकतो. अशा समस्यांकडे चिडचिड न करता सकारात्मकतेने बघा. त्यामुळे समस्या सुटण्यास मदत होईल. व्यवसाय, धंद्यात कोणतेही लहान-मोठे आर्थिक व्यवहार करताना जागरूक राहा. अन्यथा फसगत होण्याची किंवा नुकसानीला सोमोरे जावे लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याचप्रमाणे सट्टा बाजार, शेअर बाजार इत्यादींमध्ये नवीन गुंतवणूक करू नका. त्याचप्रमाणे आर्थिक जुगार नको. कोणावरही अंधविश्वास ठेवणे धाडसाचे ठरेल. व्यवसाय-धंद्यातील कार्य नियोजनपूर्वक पूर्ण होतील. विद्यार्थ्यांनी आपल्या अभ्यासात अधिक दक्ष राहावे. इतरत्र वेळ घालवू नये तसेच कुसंगत टाळावी. तेच हिताचे ठरेल. महिलांनी आपल्या प्रकृतीकडे लक्ष द्यावे. घरातील ज्येष्ठांची तसेच आई-वडिलांच्या प्रकृतीची काळजी घेणे आवश्यक आहे.
शुभ दिनांक : ९, १०, ११, १७, १९, २०, २४,२६
अशुभ दिनांक : २,१३, १६,१८, २१, २२, २३, ३०, ३१