
डॉ.सविता महाडीक, ज्योतिष भूषण
सिंह रास
मानसन्मानाचे योग
सिंह राशीच्या व्यक्ती आपले कार्य जबाबदारीने पूर्ण करणाऱ्या आणि कार्यतत्पर असतात. कार्य यशस्वी करणे हे उद्दिष्ट ठेवतात. आवाज दमदार असतो, नेतृत्वगुण प्रामुख्याने जाणवतो. इतर सर्वांचे लक्ष या व्यक्तीवर केंद्रित असते. या व्यक्ती स्वतःच्या मनाचे राजे असतात. सर्वांना बरोबर घेऊन पुढे जाणे हा गुण मूळ स्वभावातच असतो. बोलणे स्पष्ट असते. त्यांच्याविषयी लोकांमध्ये आदरयुक्त भावना असते. कर्माने व कर्तृत्वाने राजे असतात. या राशीला राज राशीच म्हणतात. या व्यक्ती आपल्या कर्तृत्वाने ऐश्वर्य मिळवतात. सिंह राशीचा अंमल हृदयावर असतो. स्थिरता, नेतृत्व शक्ती, इमानदार, निष्ठावान, विश्वासू, उच्च अवलोकन शक्ती असणारे, दुसऱ्या व्यक्तीचा सन्मान करणारे, निर्भयता, उदारता इत्यादी गुण त्यांच्यात आढळतात. किमान महत्त्वाकांक्षी व राज योगी असतात. स्वतःच्या गुणांनी चांगले कर्म करतात व यश मिळवतात, त्यामुळे अहंकारी असतात. ज्ञानी व्यक्ती जागृत झाल्यावर अहंकाराचा त्याग करतात. यशाने हुरळून जात नाहीत. पण अज्ञानी व्यक्ती छोट्याशा यशाने जास्तच अहंकार बाळगत असतात. या राशीमध्ये अहंकार व अत्यंत स्वाभिमान असतो. पण या गुणांचा अतिरेक होऊन ते दुर्गुणात परावर्तित होऊ शकतात.
शिक्षण :- शिक्षणासाठी हा कालावधी अत्यंत चांगला आहे, मात्र प्रामाणिकपणे कष्ट केल्यास व अभ्यासात चांगले लक्ष घातल्यास चौफेर यश मिळेल. कला, क्रीडा क्षेत्रातील व्यक्तींना सुद्धा अत्यंत अनुकूल कालावधी आहे. परदेशी शिक्षण किंवा परदेशात शिक्षण घेत असलेल्या व्यक्तींना अनुकूल कालावधी आहे. जे स्पर्धा परीक्षा देणार आहेत त्यांना त्यात चांगले यश मिळेल, परंतु अभ्यासात सातत्य हवे. स्पर्धात्मक यश मिळेल.
पारिवारिक :- परिवारात काहीवेळा मतभेद होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सामंजस्याचे वातावरण निर्माण करण्यासाठी तुम्हाला जास्तीचे प्रयत्न करावे लागतील. तसेच परिवारात जास्त खर्च होण्याची शक्यता असल्याने खर्चाचे नियोजन करावे लागणार आहे. त्याचप्रमाणे खर्चावर नियंत्रण ठेवणे गरजेचे राहणार आहे. परिवारातील ज्येष्ठ व्यक्तींच्या वैद्यकीय बाबींवर खर्च करावा लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे धावपळ होऊ शकते. जास्त भावनेच्या आहारी न जाता व्यावहारिकदृष्ट्या निर्णय घेतल्यास प्रश्न लवकर सुटतील व योग्य मार्ग मिळेल शांत राहून विचारपूर्वक निर्णय घ्या.
नोकरी-व्यापार - व्यवसाय :- थोड्याच प्रयत्नांनी आपल्या कार्यात यश मिळत आहे हे अनुभवून आश्चर्य वाटेल. हातातील कार्य वेगाने पूर्ण करून नवीन कार्य उत्साहाने, मोठ्या उमेदीने व आत्मविश्वासाने हाती घ्याल. रखडलेली अथवा अर्धवट राहिलेली कार्य पूर्ण होतील, विशेषतः जमीन-जुमला, स्थावर मालमत्ता, वडिलोपार्जित संपत्ती याविषयीची कार्य गतिमान होऊन पूर्ण होतील. कायदेविषयक कामे आपल्या पक्षात राहतील. तसेच राहत्या घराच्या विषयीच्या काही समस्या व प्रश्न असल्यास त्या संपुष्टात येऊन राहत्या घराबाबतचे प्रश्न अथवा समस्या सुटतील. आपल्या घरात आपण भौतिक सुविधा वाढविण्यासाठी खर्च कराल. त्याचबरोबर जे जातक आपल्या स्वतःच्या मालकीच्या घराबाबतचे स्वप्न बाळगून होते अशा जातकांची स्वप्नपूर्ती होऊ शकते. मात्र त्यासाठी प्रामाणिक प्रयत्नांची आवश्यकता आहे. काही वेळेस वस्तुस्थितीची जाण ठेवणे हितकारक ठरेल. काही वेळेस अपवादात्मक परिस्थिती तयार होऊन नैसर्गिक दुर्घटनातून नुकसान होण्याची शक्यता, तर काही विशिष्ट परिस्थितीत महत्त्वाच्या कामात रंगाचा बेरंग होऊ शकतो. अशा वेळेस कोणतेही लहानमोठे निर्णय पूर्ण विचारांती शांतपणे घेण्याची आवश्यकता आहे. आपल्या कार्यक्षेत्रात व कुटुंबात नात्यांना महत्त्व द्या. माता-पितांच्या मतास महत्त्व द्या. जुनी गुंतवणूक चांगल्यापैकी फलद्रूप होईल. नवीन गुंतवणूक करताना मात्र सावधगिरी बाळगणे जरुरीचे ठरेल. कुटुंबातील विवाहयोग्य तरुण-तरुणींचे विवाह ठरतील. काहींचे प्रेमविवाह सफल होतील, त्याचबरोबर नोकरीविषयक प्रश्न सुटतील. मुलाखतीमधून नोकरीसाठी बोलावणे येऊ शकते. चालू असलेल्या नोकरीत अनुकूल कालावधी आहे. कुटुंबातील मुला-मुलींना शैक्षणिक क्षेत्रात अपेक्षेप्रमाणे यश मिळेल. उच्च शिक्षण परदेशी जाऊन घेण्याचे स्वप्न साकार होईल. गुरुजनांकडून मदतीसह मार्गदर्शन मिळेल.
शुभ दिनांक :- ६, ७, ९, १०, ११, १४, १७, १९, २४, २८
अशुभ दिनांक : - २, ३, १६, १८, २१, २२, २३, ३०, ३१
कन्या रास
सरकारी कामातून यश
सतत कुशाग्र बुद्धिमत्तेने काम करणारे स्वतःच्या कामाचे नियोजन करून ते पूर्ण करणारे अशा व्यक्ती कन्या राशीच्या असतात किंवा ही या राशीची विशेषतः आहे. स्वतःचे व्यवहार अत्यंत स्वच्छ असतात. प्रामाणिक व इमानदार असतात. बुद्धीच्या जोरावर एखाद्या विषयात सखोल ज्ञान प्राप्त करतात किंवा चिकित्साही करतात. चौकस स्वरूपाचा स्वभाव असतो तसेच आत्मकेंद्रित असतात. त्याचप्रमाणे मनकवडी देखील असतात. थोडक्यात सांगायचे, तर कन्या राशीच्या व्यक्तींच्या स्वभावात विविधता आढळते. त्यांच्या स्वभावाचा लवकर अंदाज येत नाही. या राशीचे वर्चस्व पोटावर असते. कन्या ही कोमलतेचे प्रतीक आहे. अत्यंत बुद्धिमान व कल्पक दृष्टिकोन असतो. बुद्धीचा योग्य वापर करणारे, चतुर राजनीतिज्ञ, आपल्या मतावर ठाम असणारे असे असतात. बोलण्यात त्यांना आनंद वाटतो. तत्त्वनिष्ठता, व्यवहार कुशलता यांच्यासोबत आढळते. दुसऱ्याला मार्गदर्शन करण्याची आवड, योग्य निर्णय, दयाळू, नम्रता, दिखाऊपणा असे वेगवेगळे गुण त्यांच्यामध्ये असतात. एकावेळी दोन काम करण्याची क्षमता असते. यांच्यामध्ये चापलूसी करण्याचा गुणधर्म आढळतो. बडबडेपणा जास्त असतो. कधी विस्मृती असते. बुद्धिमान तर असतात पण कंजूषही असतात. तसेच दुर्गुण म्हणाल तर विनाकारण चिंता करतात. संशयी स्वभाव, त्यामुळे संभ्रम निर्माण होणारे असे असू शकतात. यामुळे निर्णय क्षमतेवर परिणाम होतो. कधी अतिविचार करतात. काही गोष्टींबाबत स्वतःच भ्रम निर्माण करणारे असू शकतात.
शिक्षण :- सर्व प्रकारच्या शिक्षणासाठी हा कालावधी चांगला असला तरीही या व्यक्तींनी सातत्याने अभ्यास करणे जरुरीचे आहे. वेळेचे नियोजन अवश्य करावे. वेळेचा, अपव्यय करणे टाळावे, त्याचप्रमाणे कुसंगत टाळणे जरुरीचे आहे. धरसोड वृत्ती सोडली पाहिजे. त्याचप्रमाणे नियमित अभ्यासाची सवय करून घेतली पाहिजे. तसेच मन शांत ठेवण्याची आवश्यकता आहे. विनाकारण चिडचिड होऊन अभ्यास न होणे याची शक्यता आहे. पण योग्य दिशेने व नियमित अभ्यास झाल्यास यश चांगले मिळेल. परदेशसंबंधी शिक्षणात पण यश येईल, परंतु सूचना लक्षात घेणे आवश्यक आहे. कला-क्रीडा क्षेत्रातील जातकांना सरावाची आवश्यकता आहे व त्यात सातत्य हवे. त्यामुळे उज्ज्वल यश मिळू शकते.
पारिवारिक :- कुटुंब परिवारामध्ये वातावरण अत्यंत आनंदी व सहकार्याचे राहील. कुटुंबातील सदस्य एकमेकांची काळजी घेतील तसेच त्यांच्यामध्ये सामंजस्याची भावना उठून दिसेल. भावा-बहिणीचे आपल्याला वाढते सहकार्य मिळू शकते. कुटुंब परिवारात एखाद्या मंगलकार्याचे आयोजन होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नातेवाईक आप्तेष्ट यांची भेट झाल्यामुळे आनंद वाटेल. बिघडलेले संबंध सुधारतील. आपली आर्थिक बाब उत्तम असल्यामुळे कुटुंबातील सर्व सदस्यांच्या गरजा आपण पूर्ण करू शकाल. खर्चाचे प्रमाण वाढेल परंतु आनंदही अधिक मिळेल, त्यामुळे समाधानी राहाल.
नोकरी-व्यापार- व्यवसाय :- सुरुवातीच्या कालावधीत आपल्या कार्यक्षेत्रात म्हणजेच नोकरी-व्यवसाय- धंद्यामध्ये काही वेळा अनपेक्षित घटना त्रास देतील. चालू नोकरीमध्ये वरिष्ठांच्या संबंधाला तसेच मताला प्राधान्य द्या. त्याचप्रमाणे नोकरीच्या ठिकाणी चालू असलेल्या राजकारण व गटबाजीपासून दूर राहा. आपल्या कामाविषयीच्या ज्ञानाबाबत जागरूक राहून अद्यावत राहा. ते आपल्या हिताचे ठरेल. माहीत नसलेल्या एखाद्या बाबीत उगाचच आपले मत प्रदर्शित करू नका. कोणाचीही बाजू घेणे टाळा. त्याचप्रमाणे व्यवसाय धंद्यामध्ये काही वेळेस पूर्वी केलेले नियोजन बदलावे लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे अचानकपणे काही वेळेस प्रश्न उभे राहिल्यासारखे वाटू शकतात. पण या समस्येवर आपण यशस्वीरीत्या मात करू शकाल. आर्थिक मदतीची गरज वाटेल व ती मदत आपल्याला मिळू शकेल. व्यवसाय, धंद्यातील स्पर्धक काही वेळेस बलवान होऊ शकतात. त्यांच्यावर बारीक लक्ष ठेवणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे कामगारांचे प्रश्नही उपस्थित होऊ शकतात. त्यांच्या प्रश्नाकडे सकारात्मकतेने बघणे व त्यांचे प्रश्न सोडवणे गरजेचे ठरू शकते. ते आपल्या व्यवसायासाठी पोषक ठरेल, त्याचप्रमाणे भागीदारीच्या व्यवसायात भागीदाराच्या मताला प्राधान्य द्या. वादविवाद करणे टाळलेले बरे. नात्याला महत्त्व द्या.
शुभ दिनांक :- ९, १०, ११, १७, १९, २०, २४, २६
अशुभ दिनांक : - २, ३, १६, १८, २१, २२, २३, ३०, ३१