फेब्रुवारी महिना कसा जाईल? बघा तुळ आणि वृश्चिक राशीचे भविष्य

तुमच्यासाठी कसा आहे फेब्रुवारी महिना? जाणून घ्या...
फेब्रुवारी महिना कसा जाईल? बघा तुळ आणि वृश्चिक राशीचे भविष्य
Published on

डॉ. सविता महाडिक, ज्योतिष भूषण

तुळ

नवनवीन संधीची उपलब्धता

तुळ रास ही शुक्राची रास आहे. या राशीतील सव्वादोन नक्षत्रे म्हणजे चित्रा नक्षत्र, स्वाती नक्षत्र व विशाखा नक्षत्र होय. चित्रा नक्षत्र हे मंगळाचे नक्षत्र आहे. स्वाती नक्षत्र राहूचे नक्षत्र आहे. विशाखा नक्षत्र हे गुरूचे नक्षत्र आहे. चित्रा नक्षत्र राक्षसगणी आहे. स्वाती नक्षत्र हे देवगुणी नक्षत्र आहे. विशाखा नक्षत्र हे सुद्धा राक्षसगणी नक्षत्र आहे. चित्रा नक्षत्राची वैशिष्ट्ये म्हणजे नवनवीन वस्त्र धारण करणारे, विविध चित्रविचित्र वेश परिधान करणारे, सुंदर डोळे असलेले, तामसी, काही वेळेस दुर्गुणी, विषयासक्त, गायनप्रिय, संशय, गणितात प्रावीण्य असलेला, गुढ शास्त्राची आवड असणारा, काही वेळेस विद्या व बुद्धी कमी असू शकते. स्वाती नक्षत्राची वैशिष्ट्ये म्हणजे शांत, वाणिज्यवृत्ती, कृपाळू, मधुर्वचनी, धार्मिक, असक्त, चंचल, पशुपक्ष्यांची आवड असणारा, धनवान, आत्मसंयमी, नीतीवान, तडजोडीने वागणारा, विद्वान, भोगी व आनंदी.

शिक्षण : शिक्षणासाठी अत्यंत अनुकूल ग्रहमान लाभलेले आहे. सर्वच क्षेत्रातील शिक्षणासाठी अनुकूलता मिळेल. थोड्याच प्रयत्नांनी आपण उज्ज्वल भविष्य मिळवू शकाल, परंतु त्यासाठी योग्य दिशेने प्रयत्न करणे व त्यामध्ये सातत्य राखणे आपल्याच हातात आहे हे लक्षात ठेवा. परिस्थितीचा फायदा घ्या. कला व क्रीडा क्षेत्रातील जातकांनी प्रयत्नांवर जादा भर देणे हिताचे ठरेल. परदेशी जाण्यासाठी केलेल्या प्रयत्नांना यश लाभेल. त्याचप्रमाणे अतिआत्मविश्वास टाळणे अत्यंत महत्त्वाचे व हिताचे ठरणार आहे हे लक्षात ठेवावे.

पारिवारिक : शुभ ग्रहमान असल्यामुळे कुटुंबातील वातावरण आनंदी आणि उत्साही राहील. शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांकडून तसेच विद्यार्थिनींकडून त्यांच्या प्रगतीपर बातम्या आल्यामुळे घरामध्ये आनंदी वातावरण राहील, परंतु खर्चाचे प्रमाण वाढणार आहे. कुटुंबातील सदस्यांच्या मागण्या वाढू शकतात तसेच खरेदीसाठीही खर्च होऊ शकतो. एखाद्या व्यक्तीचा हट्ट पुरवताना कोणाला दुखावले जाणार नाही याची आपण आवश्यक काळजी घ्या. इतरत्र सर्व बाबतीत अनुकूलता लाभलेली असेल. आर्थिक बाबतीतही चांगले ग्रहमान असल्यामुळे घरातील सर्व जबाबदाऱ्या आत्मविश्वासाने पूर्ण कराल.

नोकरी-व्यापार-व्यवसाय : कुटुंबातील तरुण-तरुणींचे प्रश्न संपुष्टात येतील. त्यांचे सदरील काळात भविष्य ठरेल. नवनवीन संधी मिळून त्यांना आपली कारकीर्द सुरू करता येईल. ज्यांचे शिक्षण पूर्ण झाले आहे व नोकरीत आपले करिअर करण्याचे योजले आहे अशांना नोकरी मिळेल. कॉलेज कॅम्पसमधून नोकरीसाठी बोलावणे येऊ शकते. त्याचप्रमाणे परदेशातूनही नोकरीच्या संधी उपलब्ध होऊ शकतात. विवाहयोग्य तरुण-तरुणींचे विवाह निश्चित होतील. विवाह ठरण्यातील अडचणी दूर होतील. कुटुंबात सुवार्ता मिळाल्यामुळे वातावरण आनंदी आणि उत्साही राहील. मुला-मुलींची प्रगती होईल. ज्या जातकांनी स्वतःच्या घराचे स्वप्न बघितले आहे अशांचे स्वप्न साकार होऊ शकते, परंतु त्या दृष्टिकोनातून प्रयत्न हवेत. पैशांची सोय होईल. स्वतःच्या घरामध्ये प्रवेश कराल.

शुभ दिनांक : २, ३, ५, ६, १०, १८, १९, २०, २६, २८

फेब्रुवारी महिना कसा जाईल? बघा तुळ आणि वृश्चिक राशीचे भविष्य
फेब्रुवारी महिना कसा जाईल? बघा सिंह आणि कन्या राशीचे भविष्य

वृश्चिक

वास्तूविषयक व्यवहार होतील

वृश्चिक ही मंगळाची रास आहे. वृश्चिक राशीत विशाखा नक्षत्र, अनुराधा नक्षत्र व ज्येष्ठा नक्षत्र यांचा समावेश होतो. विशाखा हे गु‌रूचे नक्षत्र आहे, अनुराधा हे शनीचे नक्षत्र आहे, ज्येष्ठा हे बुधाचे नक्षत्र आहे. विशाखा हे राक्षसगढी नक्षत्र आहे. अनुराधा देवगणी नक्षत्र आहे. ज्येष्ठा नक्षत्र हे राक्षसगढी नक्षत्र आहे. विशाखा नक्षत्राची गुणवैशिष्ट्ये म्हणजे जातक लोभी, घातकी, दुसऱ्याचा हेवा करणारा, वाक‌्चतुर, भांडण प्रिय, रोगट, विद्या कमी असू शकते. अनुराधा नक्षत्राची वैशिष्ट्ये म्हणजे धनवान, गोड बोलणारा, सौंदर्याची आवड असणारा, कपडे व दागदागिन्यांची आवड असणारा, दूर देशात राहणारा प्रवासी, विषयासक्त असू शकतो. ज्येष्ठ नक्षत्राची वैशिष्ट्ये म्हणजे कमी मित्र असणारा, संतोषी, धार्मिक, रागीट, हट्टी, गुप्तरोगी, अल्पभूती धगधग होऊ शकते. शूर, उपद्रव्यापी, नेहमी संकटात पडणारा, विशाखा नक्षत्राचा पहिला चरण, अनुराधा नक्षत्राचे चार चरण व ज्येष्ठ नक्षत्राचे चार चरण मिळून वृश्चिक रास तयार होते.

शिक्षण : शिक्षण घेण्यासाठी अनुकूल असे ग्रहमान लाभलेले आहे. त्यामुळे अल्प प्रयत्नांनी सुद्धा आपल्याला यश मिळू शकते. वेळेचा उपयोग अभ्यासासाठी करा. त्याचप्रमाणे वेळेचे नियोजन उपयोगी पडेल. कुसंगत टाळणे हिताचे ठरेल. कला, क्रीडा क्षेत्रात आपणास चांगल्या संधी मिळू शकतात. आपले कर्तृत्व करण्याच्या संधी मिळतील. मैदानी खेळामध्ये प्रावीण्य मिळण्याची शक्यता आहे. शैक्षणिक क्षेत्रात अनुकूल ग्रहमान लाभल्यामुळे आपण त्याचा फायदा करून घ्या. अभ्यासात सतत सातत्य ठेवून व योग्य दिशेने प्रयत्न करून संधीचे सोने करा.

पारिवारिक : परिवारातील सदस्यांमध्ये काही वेळेस मतभेदांमुळे कलहसदृश परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. वादविवाद घडू शकतात. ज्या घटनांमुळे वादविवाद निर्माण होण्याची शक्यता आहे अशा गोष्टींकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्यास वादविवाद निर्माण होणार नाहीत, पण त्यासाठी आपल्याला प्रयत्नशील असावे लागेल. घरामध्ये एखाद्या मंगलकार्याचे नियोजन होऊ शकते. नातेवाईकांशी संबंध सुधारतील, त्याचप्रमाणे त्यांची मदतही मिळेल. सहकुटुंब धार्मिक स्थळी भेट देण्याचे योग बनतील. आपल्या हातून दानधर्म होऊ शकतो. त्याचप्रमाणे सामाजिक अथवा धार्मिक क्षेत्रात सक्रिय योगदान देण्याची इच्छा होऊ शकते.

नोकरी-व्यापार-व्यवसाय : दीर्घकाळ रखडलेली अथवा प्रलंबित राहिलेली कामे या कालावधीत आपण हातावेगळी करू शकाल. विशेषतः जमीनजुमला, स्थायी संपत्ती, वडिलोपार्जित संपत्ती याविषयीचे वादग्रस्त अथवा प्रलंबित राहिलेले प्रश्न सुटतील. ओळखी, मध्यस्थी उपयोगी पडू शकते. सर्वमान्य तोडगा निघेल. कुटुंबातून ज्येष्ठांचे मत या कामी उपयोगी पडेल. भावंडांचे सहकार्य मिळेल. महत्त्वाच्या व्यक्तींच्या गाठीभेटी होऊन प्रश्न सुटतील. महत्त्वाचे पत्रव्यवहार होतील. कुटुंबातील तरुण-तरुणींचे नोकरीविषयक प्रश्न सुटतील. नोकरीसाठी दिलेल्या मुलाखती यशस्वी होऊन नोकरीसाठी बोलावणे येऊ शकते. कुटुंबातील मुला-मुलींच्या चिंता मिटतील.

शुभ दिनांक : २, ३, ५, ६, ७, १०, २०, २२, २८

logo
marathi.freepressjournal.in