जानेवारी महिना कसा जाईल? बघा धनु आणि मकर राशीचे भविष्य

तुमच्यासाठी कसा आहे जानेवारी महिना? जाणून घ्या...
जानेवारी महिना कसा जाईल? बघा धनु आणि मकर राशीचे भविष्य
Published on

डॉ. सविता महाडिक, ज्योतिष भूषण

धनु राशी

बेपर्वाई व आळसापासून अलिप्त रहा

धनु राशी सव्वादोन नक्षत्रांनी बनलेली आहे. मूळ नक्षत्राचे चार चरण, पूर्व शाळा नक्षत्राचे चार चरण व उत्तरा शाळा नक्षत्राचा पहिला चरण मिळून असे नऊ चरण मिळून धनु राशी तयार होते. मूळ नक्षत्र उत्तराषाढा नक्षत्राच्या पहिल्या चरणातील ताऱ्यांनी तयार झालेल्या व प्रत्यक्ष आकाशात दिसणाऱ्या धनुष्यबाण हातात घेतलेल्या व मानवाच्या कमरेवरील डोक्यापर्यंतचा शरीराचा अर्धा भाग हे मानवाचे शरीर असलेल्या आणि कमरेपासून पायापर्यंतचा खालचा अर्धा भाग घोड्याचे शरीर असलेली आकृती अशी ही दोन शरीरे धारण करणारे म्हणजे द्विदेहदारी राशी आहे. धनुर्धारी क्षत्रियाप्रमाणे विपन्नाचे रक्षण करणे, दलितांचे दैन्य व दुःख दूर करणे, शौर्य गाजवणे धैर्य धारण करणे, दान देणे इत्यादी क्षत्रियांचे गुण तसेच रणांगणावर विजय मिळवणे, राज्य करणे, प्रजेचे पालनपोषण करणे, प्रजेला शिक्षण देणे वगैरे क्षत्रियांचे गुण या धनुर्धारी मानवात उपजत आहेत. त्याचप्रमाणे स्वामीनिष्ठा, उघडेपणा, कर्तव्य तत्परता, बेडर वृत्ती, वेग किंवा गती अर्थात कोणत्याही कामास चालना देणे हे घोड्याच्या अंगातील नैसर्गिक गुण धनु राशीत उपजत असतात. ही राशी नऊ अंकाने कुंडलीत दाखवतात.

शिक्षण : शिक्षणाच्या दृष्टिकोनातून सदरील कालावधी अनुकूल आहे. आपण प्रामाणिकपणे घेतलेल्या कष्टाचे चीज होईल. अपेक्षित यश प्राप्त करण्यास मदत होईल. स्पर्धापरीक्षेमध्ये यश प्राप्त करू शकाल. अभ्यासामध्ये मन केंद्रित करू शकाल. त्यामुळे अभ्यास चांगला राहील. कला व क्रीडा क्षेत्रातही यश मिळू शकते. प्रसिद्धीसह अर्थार्जन होईल. परदेशासंबंधी कामे होतील. उच्च शिक्षण घेण्याचे सर्व मार्ग प्रशस्त होतील.

पारिवारिक : परिवारात आनंदाचे वातावरण राहील, एखादे मंगलकार्य ठरू शकते. या कार्यात कुटुंबातील सर्व सदस्यांचे वाढते सहकार्य आपल्याला मिळू शकते, परंतु आप्तेष्ट, नातेवाईक यांच्यामध्ये मानपानाचे नाट्य रंगून रंगाचा बेरंग होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे वादविवादापासून दूर राहा. समज-गैरसमज टाळणे हिताचे ठरेल. शांतपणे विचार करून निर्णय घ्या. आर्थिक परिस्थिती चांगली राहील. मात्र खर्चाचे प्रमाण वाढते राहील. काही वेळेस अचानक खर्च करावा लागेल. त्यामुळे अनावश्यक खर्चाला कात्री लावणे हिताचे ठरेल.

नोकरी-व्यापार-व्यवसाय : मागील काही काळ काहीसा प्रतिकूल गेला आहे. त्यातून आपण सुटकेचा निश्वास घेऊ शकाल. चालू ग्रहमानत काही शुभ ग्रहांची साथ आपल्याला मिळणार असल्याकारणाने व शुभ ग्रहयोग होत असल्याकारणाने आपल्याला दिलासा मिळेल. आतापर्यंत जी कामे होत नव्हती ती आता गतिशील होऊन पूर्णत्वाकडे मार्गक्रमण करतील, राहत्या घराविषयीचे प्रश्न आहेत ते सुटतील. काहींना स्वतःच्या मालकीच्या घरामध्ये प्रवेश करता येईल. वास्तुयोग आहे. नोकरीमधील नकारात्मक वातावरण जाऊन सकारात्मक वातावरणाचा लाभ मिळेल.

शुभ दिनांक : २, ५, ६, १५, २१, २२, २३,२५,२९

अशुभ दिनांक : १, ४, १०, १७, १८, १९, २०, २७, ३०, ३१

मकर राशी

निरनिराळे लाभ होऊ शकतील

मकर रास ही सव्वादोन नक्षत्रांनी बनलेली आहे. उत्तराषाढा नक्षत्राचा दुसरा तिसरा व चौथा चरण, श्रवण नक्षत्राचे चार चरण आणि धनिष्ठा नक्षत्राचा पहिला व दुसरा चरण मिळून नऊ नक्षत्र चरणांनी मकर राशी तयार होते. उत्तराषाढा नक्षत्राचा दुसरा चरण ते धनिष्ठा नक्षत्राचा दुसरा चरण या नक्षत्रातील व आकाशात प्रत्यक्ष दिसणाऱ्या मृगाचे तोंड असलेली व पाठीमागील भाग मगरीचा असलेली मकर रास आहे. मकर राशीतील प्रारंभापासून पंधरा अंशपर्यंतच्या भागात निरुपद्रवता, संतोषीवृत्ती व स्वच्छंद विचार हे हरणाचे गुण आढळतात. मकर राशीचे बाकीचे शरीर मगरीचे आहे. मकर राशीच्या सोळाव्या अंशापासून तीस अंशापर्यंतच्या भागात दुर्बलांवर आक्रमण करून संधी साधून कार्य करणे. आपल्या घरी बलवान राहणे म्हणजे स्वाश्रयाने बलवान करणे वगैरे जलचर मगरीचे गुण दिसतात. ही राशी दहा या अंकाने कुंडलीमध्ये दर्शवतात.

शिक्षण : कला व क्रीडा क्षेत्रात अपेक्षित यश मिळू शकते, परंतु इतर क्षेत्रातील शिक्षणासाठी मात्र जास्त प्रयत्नाची आवश्यकता आहे, जास्त परिश्रम घ्यावे लागतील. मन केंद्रित करून अभ्यास करावयास लागणार आहे. वेळेचे नियोजन उपयोगी पडेल तसेच इतरत्र वेळ वाया न घालवणे हे उपयोगी पडेल. प्रामाणिकपणे व योग्य दिशेने प्रयत्न केल्यास अपेक्षित यश प्राप्त करता येईल. प्रयत्नासाठी अनुकूलिता लाभेल. प्रयत्न यशस्वी होतील.

पारिवारिक : कुटुंबात काही वेळेस शांतता भंग पाहण्याचे प्रसंग निर्माण होऊ शकतात. कुटुंबातील सदस्यांमध्ये मतभेद निर्माण होण्याची शक्यता आहे. हे मतभेद न होण्यासाठी सामंजस्याची आवश्यकता आहे. याप्रकरणी आपल्याला पुढाकार घेणे आवश्यक आहे. आर्थिक परिस्थिती चांगली असल्यामुळे सगळ्यांच्या गरजा पूर्ण होतील. कुटुंबातील सदस्यांच्या मध्ये झालेले गैरसमज दूर करण्याकरिता आपल्याला विशेष प्रयत्नांची आवश्यकता आहे. आपण आपल्या जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडू शकाल.

नोकरी-व्यापार-व्यवसाय : आपल्या व्यक्तिगत करण्यासाठी अथवा नोकरीधंदा-व्यवसायाच्या कारणांमुळे परदेशीसंबंध येऊन परदेश गमनाच्या संधी मिळू शकते. विशेषतः आयात-निर्यात व्यवसायामध्ये नवीन करार होऊ शकतात. जुने संबंध परत नव्याने प्रस्थापित होऊ शकतात. त्याचप्रमाणे काही नवीन संबंध अथवा व्यावसायिक नाती तयार होऊ शकतात. आपल्याला या प्रवासातून निरनिराळे लाभ होऊ शकतील. नवीन ओळखी होऊन उत्पन्नामध्ये भरच पडेल. आपल्या व्यवसायासाठी या ओळखीचा भविष्यामध्ये उपयोग होऊ शकतो. ज्या तरुण-तरुणी परदेशी जाऊन नोकरी करण्याच्या विचारात असतील तर त्या दृष्टिकोनातून केलेले प्रयत्न यशस्वी होतील. परदेशी नोकरी मिळू शकते तसेच जे विद्यार्थी-विद्यार्थिनी आपले उच्च शिक्षण परदेशी घेऊ इच्छितात अशांचे स्वप्न साकार होऊ शकते. कुटुंबातून तसेच गुरुजनांकडून मदत व सहकार्य मिळेल. सहकुटुंब पर्यटनानिमित्त प्रवास करू शकाल वेळ आनंदात जाईल.

शुभ दिनांक : ६,८,११,१२,१३,२३,२५

अशुभ दिनांक : १, ४, १०, १७, १८, १९, २०, २७, ३०, ३१

logo
marathi.freepressjournal.in