जुलै महिना कसा जाईल? बघा कर्क आणि मिथुन राशीचे भविष्य

तुमच्यासाठी कसा आहे जुलै महिना? जाणून घ्या...
जुलै महिना कसा जाईल? बघा कर्क आणि मिथुन राशीचे भविष्य
Published on

डॉ.सविता महाडीक, ज्योतिष भूषण

मिथुन रास

महत्त्वाकांक्षा पूर्ण होतील

मृगशीर्ष नक्षत्राचे तिसरे व चौथे चरण, आदरा नक्षत्राचे चार चरण, पुनर्वसू नक्षत्राचे पहिले, दुसरे व तिसरे चरण मिळून मिथुन रास बनते. मिथुन राशी ही विषम राशी आहे. ही मानवी द्विपा राशी असल्याने लग्नात बलवान होते. स्वभाव राशी असल्याने बोलण्यात व कृतीमध्ये मेळ नसतो. कोणत्याही विषयाचे सखोल ज्ञान नसते. दुटप्पी वर्तन, आत एक बाहेर एक असे विशेष गुण मिथुन राशीत आढळतात. वायु तत्त्वाची राशी असल्याने बुद्धिमत्ता हा एक ठळक गुण आहे. त्याचप्रमाणे कुशाग्र बुद्धी, संशोधनबुद्धी, चिकित्सक स्वभाव सदा गतिमान राहण्याची आवड, प्रामाणिकपणा इत्यादी गुण आढळतात.

शिक्षण :- शिक्षणासाठी हा कालावधी आपल्याला अनुकूल आहे. कला-क्रीडा क्षेत्रासाठी विशेष अनुकूल आहे. पण इतर क्षेत्रातही आपण चांगली प्रगती करू शकाल. अनुकूल वातावरण शिक्षणासाठी बनलेले आहे. परदेशातूनही आपणास उत्तम संधी प्राप्त होऊ शकतात. उज्ज्वल भविष्यासाठी प्रामाणिकपणे कष्ट घेणे तसेच वेळेचे नियोजन करणे व कुसंगतीपासून लांब राहणे इत्यादी गोष्टी पाळल्या तर भविष्य आपलेच आहे.

पारिवारिक :- चालू ग्रहमानाच्या पार्श्वभूमीवर आपल्याला काही वेळेस मिश्र फळे प्रतिपादित होतील. शत्रुत्वाच्या पार्श्वभूमीवर जपून पावले टाकावीत. परिवारात मतभेद निर्माण होऊ शकतात. परिवारातील तरुण-तरुणींचे मंगलकार्य ठरू शकते. तरुण-तरुणी आपल्या आवडीप्रमाणे जीवनसाथी निवडू शकतील. बलवत्तर विवाहयोग आहे. घरातील मौल्यवान वस्तू सांभाळा तसेच वाहन सुरक्षित ठिकाणी पार्क करा. चोरीची शक्यता नाकारता येणार नाही.

नोकरी-धंदा-व्यवसाय : - नोकरी-धंदा-व्यवसायासाठी सदरचा कालावधी अत्यंत अनुकूल राहील. सतत व्यावसायिक धनवर्षाव होत राहील. काही शुभ ग्रह आपल्यावर मेहरबान राहतील. नवीन करारमदार होऊ शकतात. त्याचप्रमाणे व्यावसायिक उलाढाल वाढून नफ्याचे प्रमाण वाढू शकते. व्यवसाय विस्ताराच्या दृष्टिकोनातून सदरचा कालावधी अनुकूल आहे. त्याप्रमाणे प्रयत्न केल्यास ते निश्चितच सफल होतील. भागीदारी व्यवसायात विशेष फायदा होऊ शकतो. दीर्घकालीन व्यावसायिक जुनी येणी वसूल होतील. व्यवसायासाठी अथवा व्यक्तिगत कामासाठी जवळचे तसे दूरचे प्रवास होऊ शकतात. चालू नोकरीमध्ये वरिष्ठांची मर्जी सांभाळण्यासाठी विशेष प्रयत्नांची गरज आहे. कामाविषयी आपले ज्ञान अद्यावत ठेवण्याची गरज आहे. त्याचप्रमाणे शिस्तबद्धता पाळा. हा कालावधी संमिश्र घटनांचा असल्यामुळे कधी कधी आपल्याला आपल्या मनाविरुद्ध निर्णय घ्यावे लागतील. व्यापार, व्यवसाय, धंदा तसेच नोकरीमध्ये आपण आपले पूर्ण योगदान देणार आहात. तुम्ही तुमचे कामाचे ध्येय निश्चित करणार आहात. तुमचे काम तुम्ही एकाग्रतेने करण्याचा पूर्ण प्रयत्न करणार आहात. एकदा हाती घेतलेले काम पूर्ण करेपर्यंत आपण शांत बसणार नाही. अविरत सातत्याने काम करण्याचा प्रयत्न करणार आहात. त्यामुळे यश खेचून आणाल. मात्र आपले संवाद कौशल्य वाढवणे आवश्यक आहे. समजुतीने व सौहार्दपणे वागण्याचा प्रयत्न करा, वागण्यात विनयशीलता असणे महत्त्वाचे ठरेल. अजिबात अहंकाराची भावना येऊ देऊ नका. आपल्या बोलण्यावर व वागण्यावर नियंत्रण ठेवणे गरजेचे राहील. आपल्या भावंडांना तुम्ही मदतीचा हात द्याल. आपल्या राशी शुभ ग्रहाचे भ्रमण असल्याने अनेक समस्या सुटणार आहेत. त्याचप्रमाणे आपण जे शिक्षण घेत असाल त्या शिक्षणामध्ये चांगले यश मिळेल. तसेच कुटुंबातील मुलांच्या प्रगतीमुळे आपण आनंदी होणार आहात. कुटुंब परिवारातील वातावरण आनंदी आणि उत्साही राहील. एखाद्या कार्यक्रमाच्या निमित्ताने पाहुणे मंडळी घरी येतील. आपल्या कार्यात व नोकरीत चांगले बदल घडतील तसेच तुमच्या व्यक्तिमत्त्वात सकारात्मक बदल घडू शकतात. तुमची तत्त्वे व्यक्तिगत पातळीवर आणि सामाजिक पातळीवर राबवण्याचा प्रयत्न करून कामे पूर्ण कराल. सरकार आणि प्रशासनासोबत काम करताना तुम्हाला यश मिळेल. व्यापार, व्यवसायात वृद्धी, नोकरीमध्ये आपणास बढती किंवा पगारवाढ मिळू शकते. नोकरीनिमित्त प्रवास होऊ शकतो. नवीन प्रकल्प हाती घेताना पूर्णपणे साधक-बाधक विचार करणे अति आवश्यक आहे. स्वतःचा स्वभाव समतोल ठेवण्याचा प्रयत्न करा. वरिष्ठ व अधिकाऱ्यांशी सुसंवाद ठेवणे आवश्यक आहे. सदरच्या काळामध्ये समृद्धीमध्ये वाढ झाल्याने आपण दानधर्म कराल.

शुभ दिनांक : - ५, ९, १२,१६,१८, १९, २१, २५, २७

अशुभ दिनांक : - ५, ८, १५, १७, २२, २३, २४, ३०

कर्क रास

नवे व्यावसायिक प्रस्ताव

पुनर्वसू नक्षत्राचे चौथे चरण, पुष्य नक्षत्राचे चार चरण, आश्लेषा नक्षत्राचे चार चरण मिळून कर्क रास तयार होते. प्रबळांशी नमते घेणे, दुर्बलांवर आक्रमण करणे अशा खेकड्याच्या अंगातील जे ठळक गुण आहेत ते सर्व या कर्क रास असलेल्या व्यक्तींमध्ये आढळतात. गुप्तपणे टेहळणी, सावज पकडणे व पकडलेल्या सावजाचे तुकडे करणे हे नैसर्गिक गुण या राशींच्या व्यक्तींमध्ये असतात. शांतपणा, सौम्यता, लज्जा, नम्रता हे गुण असतात. तसेच प्रवासाची आवड असते. कोमलता, सौंदर्य परिस्थितीप्रमाणे बदलणे हेही गुण असतात.

शिक्षण : शिक्षण घेण्यासाठी सदरचा कालावधी अनुकूल आहे. सतत अभ्यासात राहून कार्यमग्न राहणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे प्रामाणिक कष्ट करावेत, कष्टामध्ये सातत्य असावे, कला, क्रीडा क्षेत्रातील व्यक्तींनी आलेल्या संधीचा योग्य तो उपयोग करून घ्यावा. परदेशातून अनेक चांगल्या संधी येतील. परदेशी जाऊन शिक्षण घेऊ शकाल.

पारिवारिक : - काही वेळेस कुटुंबात अशांतता असू शकते. खर्चाच्या प्रमाणतही वाढ होऊ शकते. घरातील एखाद्या व्यक्तीचे आजारपण असू शकते. सर्व पातळीवरती जबाबदाऱ्या वाढल्याने मानसिक तणावाची शक्यता आहे. त्यातूनच आपली चिडचिड होऊ शकते. त्यामुळे कुटुंबात वादविवादाची स्थिती निर्माण होऊ शकते. नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आपले मन शांत ठेवणे व वादविवादापासून अलिप्त राहणे हितकारक ठरेल. त्याचप्रमाणे वाहन चालवताना वाहनाच्या वेगावर नियंत्रण ठेवा. अपघाताची शक्यता, दुखापतीपासून सांभाळा. त्याचप्रमाणे विशिष्ट वादग्रस्त कोर्ट प्रकरणे सुटतील.

नोकरी-व्यवसाय-धंदा : - कुटुंबात मोठे समारंभ होऊ शकतात. स्वतंत्र व्यावसायिकांना नवे व्यावसायिक प्रस्ताव येतील. त्याचा पूर्ण व शांतपणे विचार करून व स्वतःच्या क्षमतेचा विचार करून ते स्वीकारा. जुन्या गुंतवणुकीतून लाभ मिळू शकतो. नोकरी, व्यवसायात हा कालावधी आपणाला संमिश्र आहे. काही वेळा अत्यंत अनुकूलता लाभणार आहे. काही वेळा परिस्थिती तुमच्या हातात नसणार आहे. अपेक्षा पूर्ण होणार नाहीत. सर्व आघाड्यांवर जबाबदारी वाढू शकते. एक विशिष्ट जबाबदारी पूर्ण करण्यासाठी जास्त कष्ट घ्यावे लागतील, त्याचप्रमाणे ताणतणाव येऊ शकतो. अशा वेळेस आपली मानसिकता सकारात्मक ठेवणे गरजेचे ठरेल तसेच कार्यक्षमता वाढवण्यासाठी योग्य ते प्रयत्न करणे जरुरीचे आहे. कामाचे नियोजन करणे आवश्यक आहे. एखाद्या व्यक्तीवर काम सोपवल्यास ते नीटपणे पूर्ण होत आहे की नाही तसेच वेळेवर होते किंवा नाही इत्यादी बाबतीत दक्ष राहणे गरजेचे ठरेल. कोणत्याही परिस्थितीत आक्रमकता टाळणे गरजेचे आहे. इतरांशी बोलताना, संवाद साधताना सर्व प्रकारचे भान ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. चुकून जरी एखादा शब्द वेडावाकडा गेल्यास त्याचे वाईट परिणाम होण्याची दाट शक्यता आहे. तसेच त्याचा नात्यांवर परिणाम होऊ शकतो. परिवारात सामंजस्य व एकोपा राहण्यासाठी आपल्याला योग्य दिशेने प्रयत्न करावे लागतील. कुटुंब, नोकरी, व्यापार-व्यवसायात शांतपणे व विचारपूर्वक वर्तन ठेवणे आवश्यक राहणार आहे. जर आपणास नवीन गुंतवणूक करायची असल्यास खूप विचारपूर्वक व दूरदर्शीपणाने त्याबद्दल निर्णय घ्या. अडथळे व अडचणी येतील, पण त्यांना चांगल्या प्रकारे सकारात्मकतेने हाताळल्यास त्या दूर होतील. तुम्ही आपल्या कार्यात नियमित कष्ट केल्यास व प्रामाणिक परिश्रम घेतल्यास प्रगती होणार आहे. चांगल्या परिणामांसाठी तुमचे मन शांत व स्थिर ठेवणे गरजेचे आहे. या काळात आपण वस्तुस्थितीचे सकारात्मक दृष्टीने परीक्षण करणे गरजेचे आहे. तसेच कामात सखोल अवलोकन करण्याची आवश्यकता आहे. गुंतवणूक करताना दूरदृष्टीने गुंतवणूक करणे आवश्यक आहे. त्यासाठी तज्ज्ञांचा सल्ला उपयोगी पडेल. परिस्थितीशी चांगली झुंज द्याल. तुमच्या प्रयत्नांमुळे तुमच्या उत्पन्नात वाढ होणार आहे. शत्रू तुम्हाला दुखावू शकणार नाहीत. तुमच्यासाठी तुम्ही योग्य वेळ द्या, त्याचा आनंद उपभोगा, समाधानी रहा. कुटुंबाचे सहकार्य मिळणार आहे. या कालावधीमध्ये व चांगल्या कामामुळे आपल्याला प्रसिद्धीही मिळेल. आपणास मोबदला आणि ओळख दोन्ही मिळणार आहे. तुमच्या प्रयत्नांमुळे मोबदल्यात वाढ होईल. नवीन नोकरीची संधी येण्याची शक्यता आहे. विविध क्षेत्रातील व्यक्तींशी आपले चांगले संबंध असतील. मौल्यवान वस्तूंची खरेदी होऊ शकते.

शुभ दिनांक : - ३,४,७,१२,१६, १८,१९,२१,२७,२९,३०,३१

अशुभ दिनांक : - ६,८,११,१७, २२,२३,२४,२६

logo
marathi.freepressjournal.in