
डॉ.सविता महाडीक, ज्योतिष भूषण
मेष रास
वास्तुयोग
मेष राशीमध्ये अश्विनी भरणी कृतिका ही नक्षत्रे येतात. ही सव्वादोन नक्षत्र आहेत. मेष राशीचे चिन्ह मेंढा आहे. मेष रास असलेल्या व्यक्तींमध्ये धडक मारण्याची वृत्ती असते. अविचार, निकराची लढत देणे हे नैसर्गिक गुण मेष राशीत आढळतात. मंगळाची रास असल्याने धाडस, क्रौर्य, सोशिकता, निष्ठुरता स्वभावात दिसते. साहस, अहंकार, घमेंड, प्रेम, शौर्य, निर्भयता, कर्तृत्व, स्वावलंबित्व, काटकपणा, दुसऱ्यावर हुकूमत गाजवण्याची आवड, त्याचप्रमाणे अधिकार लालसा असते. चंचलता हा गुण त्यांच्यात असतो.
शिक्षण :- या कालावधीमध्ये शिक्षणासाठी ग्रहमान हे मध्यम स्वरूपाचे आहे. प्रयत्नांना यश लाभणार आहे. मात्र प्रयत्न जास्त करावे लागतील. प्रामाणिक परिश्रम केल्यास यश आपलेच आहे. त्याचप्रमाणे कोणत्याही शाखेत उत्तम यश येऊ शकते, तसेच परदेशातूनही आपणाला चांगल्या संधी शिक्षणासाठी मिळू शकतात.
पारिवारिक :- परिवारात वातावरण चांगले असणार आहे. आनंद, उत्साह असेल. सहचार्याचे वातावरण असेल. आर्थिक बाबतीत सुस्थिती राहील. अंगावर घेतलेल्या जबाबदाऱ्या पूर्ण करणार आहात. घरात पाहुणे येण्याची शक्यता आहे. घरात नवनवीन चविष्ट पदार्थ बनवले जातील. खेळीमेळीचे वातावरण राहील. आपण आपल्या मालकीच्या घराचे स्वप्न बघत असाल तर ते या काळामध्ये पूर्ण होऊ शकते. पण त्यासाठी प्रयत्न मात्र हवेत. पैशाची सोय होऊ शकते. वास्तुयोग घटित होत आहे.
नोकरी-व्यापार-व्यवसाय :- या कालावधीमध्ये निर्णय क्षमता वाढवण्याची आपल्याला गरज आहे. तसेच योग्य ठिकाणी धाडसही दाखवावे लागणार आहे. मात्र या काळात कुटुंबात आजारपण येण्याची शक्यता आहे. खर्चही वाढू शकतो. मित्र व सहकाऱ्यांशी सांभाळून वागणे महत्त्वाचे ठरेल. तरच मग भाव जपण्याची प्रसंगी क्षण होण्याची शक्यता आहे. कुटुंबात काही तक्रारी असू शकतात. एकमेकांबद्दल गैरसमज निर्माण होऊ शकतात. तुम्ही मात्र सर्व गोष्टींवर सकारात्मकतेने सामोरे जाणार आहात. पण स्वतःच्या प्रकृतीची काळजी घेणे. जास्त दगदग करू नये. योग्य आहार-विहार व उपचार आवश्यक आहेत. प्रयत्न सातत्याने करणार आहात. नोकरी, व्यवसायात कामाचा ताण जाणवू शकतो. जास्तीचे काम करावे लागेल. आर्थिक नियोजन मात्र व्यवस्थित ठेवणे आवश्यक आहे. आपले प्रयत्न मात्र यशस्वी होतील. कार्यकुशलता तुमच्या स्वभावातच आहे. त्यामुळे नकारात्मक परिस्थितीत सुधारणा होईल, शिवाय शुभ ग्रहांची साथही आपणास मिळणार आहे. आपले धाडस व योग्य प्रयत्न आपणास आपल्या कार्यात नव्या उंचीवर नेणार आहे. प्रभावशाली व्यक्तींबरोबर असलेले आपले संबंध वृद्धिंगत होतील. त्याचा फायदा आपल्याला नोकरी, व्यवसायात होताना अनुभवता येईल. कुटुंबात संबंध सलोख्याचे राहतील. पण कुटुंबातील मुले जाणती असतील तर तुमच्यात व मुलांमध्ये मतमतांतरं घडू शकतात. दूरचे प्रवास आपणासाठी फलदायी ठरणार आहेत. तुमच्या व्यक्तिगत इच्छा पूर्ण करण्यासाठी तुम्हाला इतरांची मदत मिळेल. आर्थिक आवक निश्चितच वाढणार आहे. त्यामुळे इतर सर्व गोष्टींवर सकारात्मक बदल झालेले दिसतील. व्यक्तिगत विश्वास स्वप्ने आणि तत्त्वे यावर निश्चितच प्रभाव पडणार आहे. तुमच्या क्षमतेनुसार तुम्हाला सरकार आणि वरिष्ठ अधिकारी यांच्याकडून एक नवीन चांगली ओळख मिळेल. तुमचा स्वभाव मैत्रीपूर्ण राहील. विविध प्रकारचे सामाजिक भान असलेल्या माणसांचा सहवास तुम्हाला आवडतो. बाह्यरूपातील बदलांपेक्षा व्यक्तिमत्त्वातील परिवर्तन अधिक महत्त्वाचे असते. व्यक्तिगत व व्यावसायिक आघाडीवरती अडथळे निर्माण झाले, कितीही कठीण परिस्थिती असली, तरीही आपण ती शांतपणे व चातुर्याने हाताळाल. धाडस व योग्य निर्णय यांच्या मदतीने आपण सतत विजयी राहाल. मालमत्तेच्या व्यवहारात चांगले फायदे होतील. कोर्टकचेरीतले खटले आपल्या बाजूने राहतील. व्यापार, व्यवसायातील जुनी येणी वसूल होतील. व्यापार किंवा नोकरीसाठी केलेला प्रवास यशस्वी ठरेल. कार्यामुळे आपल्याला आदर व मानसन्मान मिळेल. आर्थिक प्रगतीत उन्नती होईल. घरातील सर्व सदस्यांच्या वाढत्या मागण्या आपण पूर्ण करू शकाल. घरात नवीन खरेदी होईल. आरामदायी वस्तूंवर खर्च होण्याची शक्यता आहे. नवीन वास्तू किंवा नवीन वाहन खरेदीचा विचार असेल.
शुभ दिनांक : - ४, ९, १२, १५, १८, १९, २१, २५, २७
अशुभ दिनांक : - ६, ८, ११, १७, २२, २३, २४,२६
वृषभ रास
शुभ ग्रहांची साथसंगत
कृतिका नक्षत्राचा दुसरा-तिसरा-चौथा चरण, रोहिणी नक्षत्राचे चार चरण, मृगशीर्ष नक्षत्राचे पहिले व दुसरे चरण हे वृषभ राशीत येतात. वृषभ राशीचे चिन्ह बैल आहे. वृषभ रास असलेल्या व्यक्तींमध्ये कष्ट करण्याची तयारी असते. कष्टाळू, शोषिकता, सतत कार्य करण्याची धमक, दीर्घोद्योगी हे बैलाचे गुण आहेत, ते त्यांच्यात दिसतात. ही सौम्य राशी आहे. दुसऱ्याचे ऐकून घेण्याची वृत्ती, समजूतदारपणा, शांतपणा हे गुण सामान्यत: असतात.
शिक्षण :- शिक्षणासाठी आपणास अनुकूल असे ग्रहमान राहील. आपल्याला आपल्या क्षेत्रात तसेच हवे त्या क्षेत्रात यश मिळणारच आहे, पण त्यासाठी चिकाटीने व प्रामाणिक प्रयत्नाने परिश्रम घेणे गरजेचे ठरेल. आपणास परदेशावारीही घडू शकते. अपेक्षा पूर्ण होऊ शकतात, मात्र येथे सातत्य ठेवणे आवश्यक आहे. यश भरघोस मिळेल.
पारिवारिक :- परिवारात अतिशय अनुकूल वातावरण राहणार आहे. पण तुम्ही आपल्या कार्यक्षेत्रात जास्त व्यस्त असू शकता. त्यामुळे कुटुंबाकडे दुर्लक्ष होण्याची शक्यता आहे. पण वेळ काढून कुटुंबाकडे लक्ष द्यावे लागणार आहे. लक्ष पुरवल्याने कुटुंबात आनंद व उत्साह राहील. कुटुंबातील प्रश्न मार्गी लागतील. आपण आपल्या जबाबदाऱ्या पूर्णपणे पार पाडणार आहात. आपले कर्तव्य न विसरता आपण पूर्ण करणार आहात. परिवारातील तरुण-तरुणींचे प्रश्न सुटतील. मंगलकार्याचे नियोजन होऊ शकते.
नोकरी- व्यापार- व्यवसाय :- सुरुवातीच्या काळामध्ये आपल्याला सर्व बाजूंनी खबरदारी घेणे अपरिहार्य ठरणार आहे. परिवारात तसेच आपल्या कार्यक्षेत्रात वादविवाद होऊ नये यासाठी खबरदारी घेणे अत्यावश्यक आहे. पापग्रहांचे गोचर सुखस्थानातून होत असल्याने खर्चाचे प्रमाणही वाढताना दिसेल, तसेच भाजणे, कापणे इत्यादींसारख्या घटना घडण्याची शक्यता आहे. सर्व प्रकारची काळजी घेणे आवश्यक आहे. थोडक्यात, सावध रहा. मात्र अन्य ग्रहांचे भ्रमण आपणासाठी अनुकूल असल्यामुळे सर्व बाजूंनी आपणास सहकार्य मिळणार आहे. चालू नोकरीत सहकारी तसेच वरिष्ठांकडून उत्तम सहकार्य मिळेल. महत्त्वाची कामे करून घेता येतील. दीर्घकाळ रखडलेली जमीनजुमला, मालमत्ता इत्यादीविषयी रखडलेली कामे या कालावधीत पूर्ण होऊ शकतात. ओळखी, मध्यस्थांचा लाभ होईल. त्याचप्रमाणे कोर्टकचेरीतली कामे आपल्या बाजूने राहतील. त्यामुळे आपल्याला दिलासा मिळेल. व्यापार, व्यवसायात चांगली कामगिरी होणार आहे. तुमची स्वयंशिस्त, नियंत्रण व सूक्ष्म निरीक्षण या गोष्टींमुळे आपणास प्रगती साधता येणार आहे. त्यामुळे नोकरीधंद्यात आपले वरिष्ठ आपणावर खुश असतील. नोकरीच्या ठिकाणाचे वातावरण अनुकूल राहील. नोकरीत आपली कार्यक्षमता चांगली राहणार आहे. कार्य चांगले होणार आहे. व्यापार, व्यवसायात आपले कार्यक्षेत्र वाढणार आहे. तुमची मते इतरांपर्यंत पोहोचवण्यास तुम्ही यशस्वी ठरणार आहात. आपली सामाजिक दृष्टी, तत्त्वे इतरांत आपला आदर वाढवतील. आपल्या कार्यक्षेत्रात आपण यशस्वी ठरल्याने आपण आनंदी, उत्साही राहणार आहात. घरात एखादी शुभ घटना घडण्याची शक्यता आहे. या काळात शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या तुम्ही धाडसी निर्णय घ्याल. तुमच्या नातेवाईकांसाठी हा काळ चांगला राहणार आहे. तुमच्या कारकीर्दीमध्ये आपण नवीन प्रयत्न कराल. त्यातून चांगले निर्णय घेता येतील. भौतिक सुखाच्या वस्तूंवर खर्च होण्याची शक्यता आहे. नोकरीत प्रगती झाल्याने आर्थिक वाढ होईल. पदोन्नती अथवा वेतनवृद्धी होऊ शकते. परदेशातील लोकांशी चांगल्या ओळखी होतील. तुमचे चांगल्या व्यक्तींशी संवाद होतील. तुम्ही तुमच्या कुटुंबात व कार्यक्षेत्रात चांगले संतुलन राखू शकाल. तुमचा सर्व ठिकाणी जबाबदारी पूर्ण करण्याचा कल असतो. त्यातूनच तुम्हाला समृद्धी व लोकप्रियता मिळणार आहे. चांगले उत्पन्न व लाभात वाढ होईल. जुन्या मित्रांशी चांगले संबंध राहतील. जुन्या मित्रांच्या गाठीभेटी होतील, वरिष्ठ वर्गाकडून व प्रभावशाली व्यक्तींकडून सहकार्य मिळेल. हा कालावधी विविध अंगाने अनुकूल ठरेल. तुमच्या आजूबाजूचे वातावरण इतके चांगले आहे की प्रत्येक समस्या आपोआप सोडवल्या जातील. तुमच्या घरचे व्यवहार एकदम सुरळीत राहतील. आपली इच्छाशक्ती तसेच ऊर्जा उच्च पातळीवरची असणार आहे.
शुभ दिनांक : - ३, ७, १२, १४, १५, १६, २१, २७, २९, ३०, ३१
अशुभ दिनांक : - ६, ८,११, १७, २२, २३, २४, २६