

डॉ. सविता महाडिक, ज्योतिष भूषण
मेष
ओळखी मध्यस्थीतून मोठे लाभ
मेष राशीचा स्वामी मंगळ आहे म्हणजे मंगळाचे वर्चस्व या राशीवरती असते. म्हणून मेष रास ही मंगळाची रास म्हणून ओळखली जाते. मेष रास ही राशीचक्रामधील पहिल्या क्रमांकाची रास आहे. मेष राशीचा भाव विषम आहे. लिंग पुरुष आहे. स्वभाव क्रूर आहे. त्याची संज्ञा चर आहे. म्हणजे ती चर रास आहे. मेष रास ही पृष्ठोदयी रास आहे. या राशीची संज्ञा पशू आहे. चतुष्पाद राशी आहे. या राशीने मानवी शरीराचा शीर हा भाग दर्शविला जातो किंवा शिरावर मेष राशीचे कारकत्व असते.
शिक्षण : शिक्षणासाठी किंवा शिक्षण क्षेत्रासाठी हा कालावधी आपणास अनुकूल असणार आहे. कला व क्रीडा क्षेत्रात आपणास अनुकूलता लाभणार आहे. ग्रहांच्या अनुकूलतेमुळे आपण केलेले प्रयत्न यशस्वी होतील, पण प्रयत्न कमी पडून देऊ नका. प्रामाणिकपणे प्रयत्न केल्यास उज्ज्वल यश लागेल. त्याचप्रमाणे आपल्यामधील आत्मविश्वास आपणास यश मिळवून देईल. सर्व क्षेत्रातील व्यक्तींसाठी अनुकूलत आहे. परदेशातील शिक्षणासाठी मात्र जास्त प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे व आवश्यक प्रयत्न करणे व ते प्रामाणिकपणे करणे आपल्या हातात आहे हे विसरू नका.
पारिवारिक : कुटुंबात शांतता ठेवणे गरजेचे आहे हे लक्षात ठेवणे गरजेचे आहे. घरामध्ये थोडेफार मतभेद होण्याची शक्यता आहे. खर्चाचे प्रमाणही वाढते राहील. घरामध्ये एखाद्या महत्त्वाच्या गोष्टीची खरेदी होण्याची शक्यता आहे किंवा काही दुरुस्ती होण्याची शक्यता आहे. कुटुंबातील काही महत्त्वाच्या जबाबदाऱ्या आपल्याला स्वीकाराव्या लागतील. घरात एखाद्या शुभकार्याची शक्यता आहे. या कालावधीच्या पूर्वर्धनामध्ये जनसंपर्कातून महत्त्वाच्या कामांच्या बाबतीत यश लाभेल. स्वतंत्र व्यावसायिकांना चांगला फायदा होऊ शकतो. कुटुंबातील विवाहयोग्य तरुण-तरुणींचे विवाह ठरतील. कोर्टविषयक कामातून मोठी गती मिळेल. व्यवसाय, धंद्यातील वादग्रस्त उधारी वसूल होण्याची शक्यता आहे.
नोकरी, व्यवसाय, धंदा : व्यवसाय, धंद्यातील उधारी वसूल होईल. त्याचप्रमाणे व्यवसाय, धंद्यासाठी परदेशी संबंध येऊ शकतो. व्यावसायिक प्रदर्शनी व उत्सव यशस्वी होतील. त्यातून व्यवसाय वृद्धी होऊ शकेल. नवीन व्यवसाय सुरू करण्याचा मनोदय असेल. त्याप्रमाणे नियोजन केल्यास ते भविष्यकाळात सफल होऊ शकते. तज्ज्ञ लोकांची मदत मिळेल. फक्त प्रामाणिक प्रयत्न करत रहा व कार्यमग्न रहा. कुटुंबातील कार्य संपन्नपणे पार पडतील. कुटुंबातील विवाहयोग्य तरुण-तरुणींचे विवाह ठरतील. आपल्या घरातील मौल्यवान वस्तू तसेच वाहन सांभाळून ठेवा. गहाळ होण्याची शक्यता किंवा विसराळूपणा अथवा वेंधळेपणा अंगलट येऊ शकतो. सावध रहा. विशेषतः प्रवासामध्ये जागरूक राहण्याची गरज आहे, तसेच वाहनाच्या वेगावरती नियंत्रण ठेवा. काही वेळेस नातेवाईक यांच्याबरोबर वादविवादांची शक्यता नाकारता येत नाही. शांत राहणे गरजेचे ठरेल. अपवादात्मक परिस्थितीतून चिंता निर्माण होऊ शकते.
शुभ दिनांक : 4,5,9,15,16,29,30,31
अशुभ दिनांक : 10, 12, 13, 14, 17, 22, 23, 25, 27
वृषभ
उत्तम संधी मिळू शकते
वृषभ रास ही शुक्राची रास आहे, म्हणजेच शुक्राचे अधिपथ्य या राशीवर असते. राशीचक्रातील वृषभ रास ही दुसऱ्या क्रमांकाची राशी आहे. लिंग स्त्री आहे. स्वभाव सौम्य आहे. संज्ञा स्थिर आहे. म्हणजेच ही स्थिर रास आहे. वृषभ रास ही पृष्ठोदयी रास आहे. या राशीची संज्ञा पशु आहे. चतुष्पाद राशी आहे. मानवी शरीराचा मुख या अवयवावर वृषभ राशीचे कारकत्व असते.
शिक्षण : सध्याच्या कालावधीमध्ये आपल्याला स्थिर व शांतचित्ताने अभ्यास करावा लागणार आहे. अभ्यासावर मन केंद्रित करण्यासाठी विशेष प्रयत्नांची आवश्यकता आहे. इतरत्र वेळ न घालवता अभ्यासावर लक्ष दिले गेले पाहिजे तसेच कुसंगतीपासून दूर राहणे हिताचे ठरेल. अभ्यास करताना घाईगर्दी अथवा गडबड टाळावी. आपण केलेले प्रयत्न सकारात्मक राहिल्याने त्याचा फायदा आपल्याला निश्चित होईल. स्वप्रयत्नांमुळे आपल्याला यश मिळणार आहे. शिक्षण क्षेत्रातील कोणत्याही विभागात आपण चांगले यश मिळवू शकाल. कला व क्रीडा क्षेत्रात प्रामुख्याने चांगले यश प्राप्त होईल. परदेशासंबंधी शिक्षणासाठी काही तांत्रिक बाबींची पूर्तता करणे आवश्यक ठरेल. त्याकडे नीट लक्ष द्या तसेच इतरांचे मार्गदर्शन घेण्यामध्ये कमीपणा वाटू देऊ नका. आपल्या स्वतःच्या प्रामाणिक प्रयत्नांमुळे आपल्याला यश मिळू शकते.
पारिवारिक : परिवारामध्ये चांगले वातावरण लाभेल. आपले स्वतःचे संवाद कौशल्य चांगले राहील. परिवारातील समस्या सोडवण्यासाठी आपण पुढाकार घ्याल. आर्थिक बाबी चांगल्या तऱ्हेने हाताळाल. परिवारातील सर्व सदस्यांच्या बहुतेक मागण्या आपण पूर्ण करू शकाल. त्यामुळे आपल्याला समाधान लाभेल. परिवार, मित्रमंडळींसमवेत धार्मिक प्रवास होण्याची शक्यता आहे. आपण घेतलेले निर्णय योग्य ठरतील. घरामध्ये काही नवीन खरेदी करू शकाल. उत्साही वातावरणाचा लाभ मिळेल. तरुण-तरुणींबाबत विवाहविषयक असलेले प्रश्न मार्गी लागतील.
नोकरी, व्यवसाय, धंदा : शेअर मार्केट, सट्टाबाजार तसेच जुगारसदृश व्यवहार अथवा व्यवसाय यामध्ये नवीन गुंतवणूक करू नका. तसेच कोणावरही म्हणजेच कोणाच्या बोलण्यावरही जास्त विश्वास ठेवू नका. विश्वासघात होऊ शकतो हे लक्षात ठेवा. स्वतःची कामे स्वतः करा, लहान-मोठे आर्थिक निर्णय घेताना ते शांतपणे व पूर्ण विचारांती घ्या, एखादा नवीन प्रकल्प स्वीकारताना त्याच्या दोन्ही बाजूंचा पूर्णपणे विचार करा, त्याचप्रमाणे आपल्या क्षमतेचाही विचार महत्त्वाचा आहे, कोणतेही मोठे धोके स्वीकारू नका, जास्त पैसे मिळवण्यासाठी शॉर्टकट अथवा बेकायदेशीर मार्गांचा वापर करू नका, सरकारी नोकरीमध्ये लहान-मोठ्या प्रलोभनांपासून दूर राहा तसेच चालू नोकरीमध्ये राजकारण तसेच गटबाजीपासून दूर राहा. बदलीची शक्यता नाकारता येत नाही. कामाच्या स्वरूपात बदल होऊ शकतो तसेच स्थानबदलही घडू शकतो. जुन्या गुंतवणुकीतून आर्थिक फायदा मिळेल. नवीन गुंतवणूक करताना पूर्ण विचारांती व तज्ज्ञ मंडळींच्या मार्गदर्शनाखाली करा. कुटुंबातील तरुण-तरुणींना परदेशी उत्तम संधी मिळू शकते. नोकरीविषयक प्रश्न सुटतील.
शुभ दिनांक : 4, 5, 7, 8, 15, 16, 20, 24,
अशुभ दिनांक : 10, 12, 13, 14, 17, 22, 23, 25, 27