ऑगस्ट महिना कसा जाईल? बघा मिथुन आणि कर्क राशीचे भविष्य
डॉ.सविता महाडीक, ज्योतिष भूषण
मिथुन रास
व्यावसायिक धनवर्षाव
मिथुन रास असलेल्या व्यक्ती अत्यंत सृजनशील असतात. ते नवतेत नवा आनंद शोधत असतात. त्यांना नावीन्य आवडत असल्याने अथवा नावीन्यामध्ये आनंद मिळत असल्याने नवनवीन कार्य करण्यास उत्सुक असतात. या नवतेच्या कार्यातच एक प्रकारचे सुखसमाधान ते मिळवत असतात. कोणतीही गोष्ट पारंपरिक पद्धतीने न करता नावीन्यपूर्ण रीतीने करण्याकडेच त्यांचा अधिक कल असतो. त्यामुळे ते लोकांना आपल्याकडे आकर्षित करतात. त्यांची मने जिंकतात. आपण इतरांपेक्षा कसे वेगळे आहोत हे दर्शविण्याचा वेळोवेळी प्रयत्न ते करीत असतात. त्यांच्याकडे संवाद कौशल्य खूप चांगले असते. काही व्यक्ती तर खूपच बडबड्या असतात, तर काही कमी बोलून योग्यवेळी आपले ज्ञान व बुद्धीचे दर्शन घडवितात. समोरच्या व्यक्तीला जिंकण्याची क्षमता त्यांच्यात असते. ही राशी ‘बौद्धिक राशी’ समजली जाते. चांगली लेखनशैली असल्याने शब्दांकन चांगले करतात. स्वभाव चांगला असतो, पण तो द्विस्वभाव असतो. बुद्धी जरी असली तरी विवेक हवा.
शिक्षण :- या कालावधीमध्ये आपले शिक्षण कोणत्याही क्षेत्रात उत्तम पद्धतीने होऊ शकते. अर्थात आपण कोणतेही क्षेत्र जरी निवडले तरी त्यात यशप्राप्त होऊ शकते. शिक्षण घेण्यासाठी अनुकूल कालावधी आहे. उत्तम यश मिळू शकते. विद्यार्थी-विद्यार्थिनींना स्पर्धात्मक यश मिळेल. स्पर्धापरीक्षा गाजवू शकता. परदेशासंबंधी शिक्षण असले तरीही त्यात चांगले यश मिळू शकते. शिक्षणासाठी सदरचा कालावधी अतिउत्तम असला तरीही प्रामाणिकपणे कष्ट घेणे याला महत्त्व आहे हे लक्षात ठेवावे.
पारिवारिक :- कुटुंबामध्ये जास्त जबाबदारी घ्यावी लागण्याची शक्यता आहे व आपण ती पूर्णपणे यशस्वीरीत्या सांभाळणार आहात. घरातील सर्व निर्णय सक्षमरीत्या घ्याल. परिवाराला प्राधान्य देणार आहात. आर्थिकदृष्ट्या हा कालावधी चांगला असल्यामुळे कुटुंबातील सदस्यांच्या वाढत्या मागण्या आपण पूर्ण कराल. आपल्याला अंतरिक समाधान वाटेल. कुटुंबातील तरुण-तरुणींचे प्रश्न संपुष्टात येतील.
नोकरी-व्यापार-व्यवसाय :- काही वेळेस ग्रहयोगातून संमिश्र फळे मिळू शकतात. आयत्या वेळेस पूर्वी केलेले नियोजन बदलावे लागण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे व्यवसाय-धंद्यात स्पर्धक बलवान होऊ शकतात. त्यामुळे त्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवणे गरजेचे राहील. कालानुरूप आपल्या स्वतःच्या व्यवसायात बदल करणे गरजेचे ठरू शकते. त्याचप्रमाणे चालू नोकरीमध्ये वरिष्ठांना सांभाळा. त्यांच्या मताला विशेषत्वाने प्राधान्य देणे गरजेचे राहील. त्याचप्रमाणे नोकरीतील राजकारण व गटबाजीपासून अलिप्त राहण्याचा प्रयत्न करा किंवा अलिप्त रहा. ते हिताचे ठरेल, तसेच आपल्या कामाविषयीच्या ज्ञानाबाबत अद्यावत रहा. शिस्त पाळा. उत्तरार्धामध्ये व्यवसाय-धंद्यातील परिस्थिती बदलून धनवर्षाव होईल. आपल्या नियोजनानुसार व्यवसाय- धंद्यामध्ये बदल करू शकाल, मात्र कुटुंबातील तसेच व्यवसाय-धंद्यातील मौल्यवान गोष्टी जपा. चोरीची शक्यता नाकारता येत नाही. लहान-मोठे उपक्रम हाती घेऊन ते यशस्वी कराल. व्यवसाय- धंद्यात मोठे भाग्योदय होऊ शकते. परदेशवारीची शक्यता. दीर्घ तसेच अल्प मुदतीचे करार होतील. आपल्या व्यक्तिमत्त्वाच्या जोरावर तसेच वाक्चातुर्याने आपण त्यात यश संपादित करू शकाल. समाजातील थोरामोठ्यांचे सहकार्य लाभेल. जुनी येणी वसूल होतील. तरुण-तरुणींना उत्तम उत्तम संधी प्राप्त होईल. सरकारी योजनांचा फायदा मिळू शकतो. व्यवसायात यश मिळवू शकाल. सामाजिक मानसन्मान मिळेल. सामाजिक, राजकीय तसेच धार्मिक कार्यात सक्रिय योगदान द्याल.
व्यवसाय- धंद्यात भागीदाराबरोबर वादविवाद टाळा. भागीदाराच्या मतास उचित प्राधान्य द्या. कुटुंबातील सदस्य एकमेकांशी आपुलकीने वागतील. पती अथवा पत्नीचा भाग्योदय. कुटुंबातील विद्यार्थी-विद्यार्थिनींकडून त्यांच्या प्रगतीच्या वार्ता कानी आल्यामुळे समाधानी आणि आनंदी राहाल. त्याचबरोबर आपल्याला स्वतःच्या व आई-वडिलांच्या आरोग्याची काळजी घ्यायला पाहिजे. सहकुटुंब पर्यटनाचा योग आहे. सहकुटुंब-मित्रमंडळींसमावेत प्रवास करू शकाल. नवविवाहित दांपत्यांना अपत्य योग.
शुभ दिनांक : - ६, ७, १४, १९, २०, २४, २६
अशुभ दिनांक : - २, ३, १६, १८, २१, २२, २३, ३०, ३१
कर्क रास
वैवाहिक जीवनात आनंद
कर्क राशीच्या व्यक्ती अत्यंत संवेदनाशील व नम्र असतात. त्यांचे मन कोमल असते. या व्यक्ती अत्यंत भावनाशील असतात. एखाद्या गोष्टीबद्दल त्यांना वाईट वाटले तर लगेचच रडू येते किंवा डोळ्यात पाणी येते. त्यांची नको ती चेष्टा केल्यास अथवा अपमान केल्यास त्या व्यक्ती लक्षात ठेवतात. योग्य वेळी त्याचा बदला सुद्धा घेऊ शकतात. ते इतर कोणाच्या कामात अडसर निर्माण करत नाहीत, पण उगाचच वाट्याला गेल्यास त्याचा बदला जरूर घेतात. कोणाबरोबर वाईट वागत नाहीत. ही राशी ‘राणी राशी’ समजली जाते. सन्मान, राजवैभव प्राप्त होते. शांत, दयाळू, कोमल, नम्रता, सरळ कल्पकता, निष्ठा हे मुख्य गुण आहेत. भावनाशीलतेचा अतिरेक सुद्धा वाईट असतो. इतर लोक त्याचा गैरफायदा घेतात. त्यामुळे या व्यक्तींना थोडे तरी व्यावहारिक असावे लागते तसेच भावनांपेक्षा बुद्धीला जास्त प्राधान्य देणे आवश्यक आहे. यांना अध्यात्मामध्ये जास्त रुची असते.
शिक्षण :- या कालावधीमध्ये आपणास सर्व क्षेत्रात चांगले यश प्राप्त होणार आहे. तांत्रिक शिक्षण किंवा अधिकाराचे कोणते शिक्षण घेत असाल तर त्यामध्ये उत्तम यश प्राप्त करू शकाल. परदेशात किंवा त्यासंबंधी शिक्षण असेल तरी त्यात उत्तम यश प्राप्त होईल. आपण केलेले प्रयत्न योग्य दिशेने असतील. जास्त परिश्रम करू शकाल. त्यामुळे यश निश्चितच येईल.
पारिवारिक :- कुटुंबात परिस्थिती ठीकठाक असली तरी कोणाचे तरी मन अशांत असण्याची शक्यता आहे. त्याकडे लक्ष ठेवावे लागेल. त्या व्यक्तीची समजूत घालावी लागेल. तुम्ही मात्र मन शांत ठेवूनच आपल्या क्षेत्रात कार्य करणे महत्त्वाचे राहील. कुटुंबात नेहमीपेक्षा जास्त लक्ष द्यावे लागणार आहे. कुटुंबातील सदस्यांमध्ये ज्या काही कुरबुरी अथवा वादविवाद असतील तर ते सोडवण्यासाठी आपल्याला पुढाकार घ्यावा लागेल. त्यामुळे कुटुंबातील शांतता टिकून राहील. कुटुंबात जास्तीच्या जबाबदाऱ्या पडू शकतात. त्या पूर्ण करण्याकडे आपल्याला लक्ष द्यावे लागणार आहे. वैवाहिक जीवनाचा आनंद साजरा करता येईल. कुटुंबात अविस्मरणीय प्रसंग घडू शकतात. त्यामुळे मन आनंदित राहील.
नोकरी-व्यापार- व्यवसाय :- व्यवसाय- धंद्यात सरकारी बंधने, त्याचप्रमाणे कायदे काटेकोरपणे पाळणे हिताचे ठरेल. कामगारांसंबंधी प्रश्न निर्माण होऊ शकतात. कामगारांच्या समस्येकडे सकारात्मकतेने पहा. व्यवसाय- धंद्यात नव्याने उसनवारी नको. व्यावसायिक जुनी येणी वसूल होतील, मात्र वसुली होत असताना वादविवाद टाळा. भांडणे नकोत. नात्यांना महत्त्व द्या. सरळ मार्ग स्वीकारणे हितकारक ठरेल. त्याचप्रमाणे नवीन गुंतवणूक करताना ती काळजीपूर्वक करणे आवश्यक आहे. फसवणुकीची शक्यता. कालपरत्वे व्यवसाय-धंद्यातील परिस्थिती अनुकूल राहील. व्यवसायात नवे बदल करावयाचे असल्यास त्यासाठी अनुकूल कालावधी. स्पर्धकांवर विजय मिळवता येईल. उलाढाल वाढून नफ्याच्या प्रमाणात वृद्धी संभवते. नवे करार होतील. काही व्यावसायिक आपल्या स्वतःच्या मालकीच्या जागेत आपला व्यवसाय सुरू करू शकतील. एक नवी व्यावसायिक झेप घेऊ शकाल. स्वतंत्र उद्योजकांना विशेष अनुकूल परिस्थिती राहील. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठ तसेच इतरांच्या मतास प्राधान्य देणे हितकारक ठरेल. सरकारी स्वरूपाच्या नोकरीत आपले अधिकार व जबाबदाऱ्या ओळखून कार्य पूर्ण करा. अतिरिक्त कार्यभार सोपवल्यामुळे जास्तीचे काम करावे लागेल. त्याचप्रमाणे कामाच्या स्वरूपात बदल होईल.
बदलीची शक्यता. त्याचप्रमाणे लहान अथवा मोठी प्रलोभने टाळणे गरजेचे ठरेल. नोकरीसाठी दिलेल्या मुलाखती सफल होतील. चालू नोकरीत पदोन्नती अथवा वेतनवृद्धी होण्याची शक्यता. तरुण-तरुणींना प्रगतीची दालने खुली होतील. त्यांच्या समस्या संपुष्टात येतील. नोकरीविषयक प्रश्न मिटून नोकरी मिळेल. आपापल्या क्षेत्रात स्पर्धात्मक यश मिळवून कर्तृत्व उजळेल.
आत्मविश्वासात वृद्धी होईल. उपक्रमातून यश संपादित करू शकाल. पती अथवा पत्नीचा भाग्योदय होऊन वैवाहिक सुख लाभेल. वादविवाद शमतील. कुटुंबातील मुला-मुलींकडून सुखद वार्ता येतील. प्रेमिकांना प्रेमात यश संभवते. मात्र मर्यादा सांभाळाव्या लागतील. अचानक धनलाभाची शक्यता. घरातील सुखसुविधा वाढविण्याचा मानस असेल. त्याचप्रमाणे उंची व महागडी खरेदी करू शकाल. पैशांची सोय होईल. घराचे स्वप्न साकार होईल.
शुभ दिनांक : - ६, ८, ९, १४, १७, २४, २५,२६,२८
अशुभ दिनांक : - २, ३,१६,१८,२१,२२,२३,३०,३१