नोव्हेंबर महिना कसा जाईल? बघा धनु आणि मकर राशीचे भविष्य

तुमच्यासाठी कसा आहे नोव्हेंबर महिना? जाणून घ्या...
नोव्हेंबर महिना कसा जाईल? बघा धनु आणि मकर राशीचे भविष्य
Published on

डॉ.सविता महाडिक, ज्योतिष भूषण

धनु रास

प्रश्न- समस्या सुटतील

मुख व मान लांबट, छाती पुढे काढून चालण्याची सवय, हनुवटी मोठी, शरीर बळकट, निरोगी, वर्ण तांबूस, केसाचे प्रमाण कमी असते, नखे सारखे स्वच्छ करावी लागतात, आपल्या आवाक्याबाहेरची कामे स्वीकारल्यामुळे कधी कधी अपयश मिळते. त्यामुळे शक्तीच्या बाहेर उलाढाली कराव्या लागतात, शरीर काटक, नाक चाफेकळीसारखे असते. शरीराची ठेवण विशेष बांधेसूद, पिळदार दंड-मनगटे, मारामारीत पराभव न पत्करणारा, स्वतःच्या बळाचा गर्व असणारा. मोहक लढवय्या, डोळे किंचित पिंगट. राजाचा मित्र, विद्या कमी, तेजस्वी, उदार, कविता कुशल, पितृद्रव्याची प्राप्ती होणारा, कर्मशील, शिल्पज्ञ, बंधू द्वेष्टा, सामोपचाराने वश होणारा, बळाने वश न होणारा, आपल्या कुळामध्ये प्रमुखपणाचा मान मिळवणारा, शत्रू पक्षावर विजय मिळवणारा, श्रेष्ठपदास पोहोचणारा, स्वपराक्रमी, संतती संख्या मध्यम इत्यादी धनु राशीची वैशिष्ट्ये सांगता येतील.

शिक्षण :- स्वतःच्या प्रयत्नाने व स्वकष्टाने आपण आपले विद्यापीठातील यश खेचून आणणार आहात, कला व क्रीडा क्षेत्रात चांगले यश प्राप्त होईल, नवनवीन संधी मिळण्याचे योग आहेत, बुद्धिचातुर्य व समजदारीने आपण यश मिळवणार आहात. टेक्निकल क्षेत्रात चांगले यश मिळेल. परदेशासंबंधी सर्व कार्य सुरळीत होतील. परदेशगमनाच्या संधी मिळू शकतात. हवे तसे यश मिळण्याचे योग आहेत. परंतु आपल्याला नियमित अभ्यास व परिश्रम घेणे जरुरी आहे. त्याचप्रमाणे इतरत्र वेळ वाया घालवू नये हे लक्षात ठेवावे.

पारिवारिक :- कुटुंबात आपल्याला आपल्या जोडीदाराचे अत्यंत मोलाचे सहकार्य लाभणार आहे. महत्त्वाच्या निर्णयात जोडीदाराचे निर्णय योग्य ठरतील. त्यामुळे आपल्या जोडीदाराचा सल्ला न विसरता घ्या. महत्त्वाच्या निर्णयात आपल्या जोडीदाराचा सिंहाचा वाटा असेल, आर्थिक स्थिती मजबूत राहिल्याकारणाने कोणत्याही अडचणीतून योग्य मार्ग मिळविणारा आहात, आपल्या हातून धार्मिक तसेच सामाजिक कार्य घटित होण्याची शक्यता आहे. सक्रिय योगदान देऊ शकाल तसेच धार्मिक स्थळांना भेटी देण्याचाही योग आहे. घरात शांतता व सामंजस्य असेल. परिवारात आपल्याला व आपल्या मताला उचित प्राधान्य मिळेल.

नोकरी-व्यापार-व्यवसाय :- बदलत्या ग्रहमानाच्या पार्श्वभूमीवर सध्याचा कालावधी हा काहीसा प्रतिकूल राहील. कुयोगाच्या पार्श्वभूमीवर सकारात्मकतेमध्ये कमी येऊ शकते. आपल्या कार्यक्षेत्रात तसेच व्यवसाय धंद्यात व नोकरीमध्ये निर्णय घेताना शांतपणे व पूर्ण विचारांती घेणे हिताचे ठरेल. त्याचप्रमाणे परिवारात शांतता नांदण्यासाठी आपल्या वागण्यावर व बोलण्यावर नियंत्रण ठेवायला हवे. बहुतेक सगळीकडून नकारात्मकता दिसून येत असल्याकारणाने आपल्या स्वभावात चिडखोरपणा डोकावण्याची संभावना आहे. नियोजित कार्यात अडथळे येऊ शकतात व कार्य पूर्ण होण्यासाठी विलंब लागू शकतो. त्यातच खर्चाचे प्रमाणही वाढू शकते.

शुभ दिनांक : - १, ४, ७, ९, १०, १२, १३,२३,२५,२६,२७

अशुभ दिनांक : - २,५,६,८,१४,१८,१९,२०

मकर रास

व्यावसायिक उपक्रम यशस्वी होतील

स्वतःच्या जोडीदाराचे व संततीचे लाड करणारे, शरीराने खुश, एक वेळा शरीर लठ्ठ पण असू शकते. मिशा मोठ्या पिळदार असतात. केस राठ असतात. अंगावर केस जास्त असतात. शरीर किंचित ओबडधोबड राहते. अप्पलपोटे असतात. खाण्यापिण्याची आवड असते. स्वतःच्या मताविरुद्ध बोलल्यास राग पटकन येतो. पण तो दर्शवत नाहीत. जमा-खर्चाची आवड असते. हिशेबी असतात, कंजूस असतात, पण स्वतःसाठी खर्च करतात. जेवताना तोंड वेडेवाकडे होत असते. जेवताना आवाज काढतात. वातबुद्ध शरीर असते, स्नानसंध्या नियमित करणारे तसेच स्वतःच्या कामांमध्ये नियमितता पाळणारे, दूरदूरचे प्रवास करण्याची आवड असते. शरीराच्या मानाने डोक्याचा भाग मोठा असतो. जबडा मगरीसारखा किंवा बारीकही असू शकतो. विद्या व बुद्धी कमी असते. चंचल असतात, कधी कधी चुकीचे निर्णय व मूर्खासारखे निर्णय घेऊ शकतात. संगीततज्ज्ञ, डोंगर, वनात राहण्याची आवड असते. उदारपणा कमी असतो. संततीमध्ये कन्या संतती अनेक, असे मकर राशीचे स्वरूप आहे

शिक्षण :- कला व क्रीडा क्षेत्रामध्ये आपले कर्तृत्व सिद्ध करण्याच्या अनेक संधी मिळतील. अपेक्षेप्रमाणे यशही मिळेल, टेक्निकल क्षेत्रात चांगले यश प्राप्त करू शकाल. तुमचा आत्मविश्वास चांगला राहणार आहे. मित्रमंडळींच्या वर्तुळातून आपल्याला चांगले सहकार्य मिळणार आहे. मित्रांची चांगली साथ मिळेल, तसेच तुमचे स्वतःचे प्रयत्न चांगले यशस्वी होतील. योग्य दिशेने प्रयत्न केल्याने त्याचे फळ मिळेल. परदेशासंबंधी सुद्धा केलेले प्रयत्न यशस्वी ठरतील. चांगले यश मिळू शकते. स्पर्धा परीक्षेत अपेक्षित यश मिळवू शकाल, परिश्रमात सातत्य ठेवा.

पारिवारिक :- परिवारामध्ये चांगली परिस्थिती राहणार आहे. आर्थिक परिस्थिती विशेषत: चांगली राहील, स्वप्रयत्नाने घरातील प्रश्न सोडवू शकाल, भावंडांमध्ये सामंजस्यता निर्माण करण्याच्या प्रयत्नांना यश मिळेल. परिवारातील गैरसमज आपल्या प्रयत्नाने दूर करू शकाल. आर्थिक जबाबदाऱ्या चांगल्या प्रकारे पूर्ण करू शकाल. परिवारातील सर्व सदस्यांच्या वाढत्या मागण्या पूर्ण कराल, कुटुंबात एखादे मंगलकार्य ठरेल तसेच धार्मिक कार्यामध्ये सक्रिय योगदान देऊ शकाल. शुभ ग्रहांची साथ चांगली लाभणार आहे. धार्मिक स्थळी प्रवास होतील.

नोकरी-व्यापार-व्यवसाय :- चालू नोकरीमध्ये गेल्या काही दिवसांत जे ताणतणाव आपण झेलत होतात ते आता नाहीसे होतील. एखादी गुप्त चिंता असल्यास ती संपुष्टात येईल. वरिष्ठांबरोबरचे संबंध सुधारतील, मात्र परिवारात वादविवादाची शक्यता नाकारता येत नाही. छोट्या-मोठ्या प्रसंगांवरून होऊ घातलेल्या वादविवादांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्यास परिवारात वितुष्टपणा येणार नाही व शांतता टिकेल. शांतता टिकवण्यासाठी आपल्यालाच पुढाकार घ्यावा लागेल तसेच कुटुंबातील सदस्यांमध्ये झालेले गैरसमज दूर करावे लागतील. जोडीदाराशी मतभेद संभवतात.

शुभ दिनांक : - १, ३, ७, ९, १०, १२, १३,१५,१६,२५,२६,२७,२९,३०

अशुभ दिनांक : - २,५,६,८,१४,१८,१९,२०

logo
marathi.freepressjournal.in