ऑक्टोबर महिना कसा जाईल? बघा सिंह आणि कन्या राशीचे भविष्य

तुमच्यासाठी कसा आहे ऑक्टोबर महिना? जाणून घ्या...
ऑक्टोबर महिना कसा जाईल? बघा सिंह आणि कन्या राशीचे भविष्य
Published on

डॉ.सविता महाडिक, ज्योतिष भूषण

सिंह रास

परिस्थितीजन्य निरनिराळे लाभ होतील

सिंह रास ही राज राशी म्हणून ओळखली जाते. राशीचक्रातील ही पाचवी रास आहे. जंगलाचा राजा सिंह हे या राशीचे प्रतीक आहे. ही रास अधिकार गाजवणारी आहे. या राशीच्या जातकांना दुसऱ्यावर वर्चस्व ठेवणे कायम आवडते. या राशीच्या लोकांकडे नेतृत्वगुण चांगले असतात. हे लोक तुम्हाला कायमच वरिष्ठ पदावर दिसत असतात. सिंह राशीचे जातक मन, कर्म आणि कर्तृत्व यांच्यामध्ये सिंहाच्या समान अर्थातच राजाप्रमाणे असतात, दिलदार असतात. सिंह राशीचा स्वामी रवी आहे. रवी हा सर्व ग्रहांचा राजा आहे. सूर्यभोवतीच सर्व ग्रह भ्रमण करत असतात त्याचप्रमाणे रवीकडून सर्व ग्रह ऊर्जा मिळवत असतात, अथवा घेत असतात. या राशीचे वर्चस्व हृदयावर आहे. सिंह ही विषम रास आहे. त्याचप्रमाणे पुरुष रास आहे. सिंह रास चतुष्पाद रास असून अग्नी तत्त्वाची आहे. शिषोदय दिवाबली तसेच वंद्याराशी मानली जाते या राशीच्या व्यक्तींच्या मध्ये नेतृत्व, शक्ती, स्थिरता, प्रामाणिकपणा, इमानदार, निष्ठा, विश्वास, कुटुंबवत्सलता, उच्च अवलोकन शक्ती, दुसऱ्याचा सन्मान करणे, सन्मानाने राहणे, साहस, निर्भयता, महत्त्वाकांक्षा हे विशेष गुण आढळतात. या राशीच्या व्यक्ती अधिकार उपभोगतात. या राशीच्या व्यक्तींना सामान्यतः राजयोग प्राप्त होतो. त्याचप्रमाणे कोणत्याही क्षेत्रात अपमान सहन होत नाही.

शिक्षण : सदरच्या कालावधीमध्ये कोणत्याही क्षेत्रात शिक्षण घेणाऱ्या जातकांसाठी अनुकूल कालावधी राहील. उच्च शिक्षण घेतल्यास अधिक फायदा होऊ शकेल. कला, क्रीडा क्षेत्रातही या व्यक्तींना चांगले यश मिळणार आहे. त्याप्रमाणे प्रयत्नांची दिशा ठेवा, प्रसिद्धीही लाभेल. परदेशी जाऊन उच्च शिक्षण घेण्याचे स्वप्न साकार होईल. त्या कामी इतरांची मदत होऊ शकते, नवनवीन व चांगल्या संधी मिळतील.

पारिवारिक : सध्याच्या काळामध्ये परिवारात आपल्याला जास्त लक्ष द्यावे लागेल. कारण दिवाळी काळात ग्रहमान किंचित तुमच्यावर रुसण्याची शक्यता आहे. विशेषतः आपल्या मुला-मुलींकडे लक्ष पुरवणे व तेही वेळेवर हिताचे राहील. त्यांच्या प्रश्नांकडे सकारात्मकतेने बघा. त्यांचे प्रश्न सोडवण्यात मदत करा, तसेच परिवारातील ज्येष्ठ व्यक्तींच्या मार्गदर्शनाचा लाभ होईल. त्यांच्या मताला उचित प्राधान्य दिल्यास कुटुंबात चांगले वातावरण राहू शकते. आयत्या वेळेस काही नवीन जबाबदाऱ्या आपल्याला स्वीकाराव्या लागतील व त्या आपण पूर्ण पाडू शकाल. कुटुंबातील महिलांनी मात्र आपल्या बोलण्यावर, वागण्यावर नियंत्रण ठेवा. ते हिताचे राहील. कुटुंबात शांतता अबाधित राहू शकते. मनोरंजनासाठी परिवारात काही कार्यक्रम होऊ शकतात. त्यातून सर्वांना आनंद मिळणार आहे. आर्थिक परिस्थिती चांगली राहिल्यामुळे आपल्या सर्व गरजा पूर्ण होतील.

नोकरी-व्यापार-व्यवसाय : सध्याचा कालावधी आपल्याला तसा सर्वच क्षेत्रांमध्ये अनुकूल राहील. विशेषतः आर्थिक बाबींमध्ये आपण प्रगती करू शकाल. जुन्या गुंतवणुका लाभदायक ठरून चांगले लाभ होतील, नवीन गुंतवणूक करताना मात्र त्या त्या क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्तींचे मार्गदर्शन उपयुक्त ठरू शकेल. काही वेळेस आपल्याला अचानक धनलाभाची शक्यता आहे. शेअर मार्केट, सट्टाबाजार, तेजी-मंदीविषयक व्यवहार यामध्ये आपल्याला आर्थिक फायदा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आपली आर्थिक परिस्थिती अधिक मजबूत राहील. स्थायी संपत्ती, जमीनजुमला, वडिलोपार्जित संपत्ती इत्यादी क्षेत्रातील दीर्घकाळ रखडलेले व्यवहार पूर्णत्वाच्या मार्गी लागतील. त्यातून आपल्याला चांगला फायदा मिळेल. ओळखी, मध्यस्थींचा उपयोग होईल. कुटुंबातील तरुण-तरुणींचे नोकरीविषयक प्रश्न मिटतील. पूर्वी दिलेल्या नोकरीविषयक मुलाखतींमधून नोकरीसाठी बोलावणे येऊ शकते. विद्यार्थी-विद्यार्थिनींना कॉलेज कॅम्पसमधून नोकरीविषयक संधी मिळू शकतात. नोकरीसाठी दिलेल्या मुलाखतीमध्ये यश प्राप्त होईल. व्यवसाय-धंद्यामध्ये आपण नवीन संकल्पनांचा वापर यशस्वीरीत्या केल्यामुळे उलाढाल वाढून नफ्याच्या प्रमाणात वाढ झालेली आढळून येईल. त्यामुळे आपण व्यवसाय विस्ताराचा देखील विचार करू शकाल. भागीदारीच्या व्यवसायात विशेष फायदा होण्याची शक्यता. बँकांची कामे होतील. आर्थिक मदत हवी असल्यास ती उपलब्ध होईल. सहकुटुंब-सहपरिवार प्रवासाची शक्यता आहे. मात्र प्रवासात वाहनाला तसेच स्वतःला जपा. दुखापतीची शक्यता, तसेच नातेवाईक आणि आप्तेष्ट यांच्याबरोबर वादविवाद टाळणे महत्त्वाचे ठरेल. त्यामुळे कुटुंबातील शांतता टिकण्यास मदत मिळेल.

शुभ दिनांक : १, ४, ५, ८, १२, १४, १५, २१, २२, २८, ३०, ३१

अशुभ दिनांक : ७, १०, १९, २५

कन्या रास

पती अथवा पत्नीचा भाग्योदय

कन्या रास ही राशीचक्रातील सहावी रास आहे. या राशीचा स्वामी बुध आहे. निसर्ग कुंडलीतील सहाव्या स्थानावर येते. या राशीचे वर्चस्व मानवी शरीराच्या पोटावर आहे. कन्या हे कोमलतेचे प्रतीक आहे. हातात प्रज्वलित दिवा हे वैभवाचे व समृद्धीचे प्रतीक आहे. कन्या रास ही समरास आहे तसेच ती द्विस्वभाव राशी आहे. कन्या रास राशी असून पृथ्वीतत्त्वाची रास आहे. या राशीचा स्वामी मूळतः कन्या राशीच्या व्यक्ती बुद्धिमान असतात, परंतु चंचल असतात. काही वेळेस निर्णय घेण्यामध्ये गोंधळ निर्माण होतो. परंतु यांच्याजवळ कल्पक दृष्टिकोन असतो. त्यामुळे ते चतुर व दृढनिश्चयी व राजनीतिक असतात. या राशीचे लोक बोलणे पसंत करतात. तत्त्वनिष्ठा, व्यवहार कुशलता, कुशाग्र बुद्धी इतरांना मार्गदर्शन करण्याची आवड, दयाळू, नम्रता त्याचप्रमाणे देखावा करण्याची आवड. लाजाळू, शांत स्वभाव, गुणगान करणे, बडबड करणे, आळस, बुद्धिमान, कंजूस मनातील गोष्ट ओळखण्याची काही अंशी ताकद म्हणजेच मनकवडे असू शकते. मुळातच बुद्धिमान असल्याने व्यवहार उचलता व राजनीतीने निर्णय घेणारे असतात. त्याचप्रमाणे खूप चिकित्सकही असतात.

शिक्षण : शिक्षण क्षेत्रामध्ये सदरचा कालावधी आपणास अत्यंत चांगला आहे. विशेषतः कला, क्रीडा क्षेत्रातील व्यक्तींना इतर कोणत्याही शाखेसंबंधित शिक्षण घेत असल्यास चांगले यश मिळणार आहे. त्यासाठी आपल्या प्रयत्नांमध्ये सातत्य पाहिजे, प्रामाणिकता हवी. स्पर्धा परीक्षांमध्ये स्पर्धात्मक यश मिळवू शकाल. मुलाखतींमध्ये जास्त बोलणे टाळा. आपले मत प्रदर्शित करणे धाडसाचे ठरेल, फारसे स्पष्ट बोलू नये. परदेशी शिक्षण घेण्यासाठी केलेल्या प्रयत्नांमध्ये छोटे-मोठे अडथळे येऊ शकतात, पण निराश न होता आपण आपले प्रयत्न चालू ठेवल्यास चांगले यश मिळेल.

पारिवारिक : परिवारात चांगले वातावरण ठेवण्याचा प्रयत्न यशस्वी होणार आहे. कधी कधी परिवारातील सदस्यांमध्ये वादविवाद घटित होण्याची शक्यता नाकारता येत नाही. विशेषतः महिला सदस्यांमुळे कुटुंबातील शांतता भंग पावू शकते. कुटुंबामधील शांतता टिकवण्यासाठी आपल्याला विशेष प्रयत्नांची गरज आहे. त्या कामी आपल्याला आपल्या जीवनसाथीचा उपयोग होईल अथवा सहकार्य मिळेल. आपल्या कुटुंबात काही नवीन जबाबदाऱ्या स्वीकाराव्या लागणार आहेत. खर्चाचे प्रमाण मात्र वाढताना दिसेल. कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तींच्या आरोग्याकडे लक्ष देणे महत्त्वाचे ठरेल. मनोरंजन किंवा माैजमजा अथवा प्रवास यासाठीही खर्च होऊ शकतो. तुम्ही स्वतः सकारात्मक दृष्टिकोन ठेवल्यास संतुलित राहून कुटुंबातील सर्व प्रश्न सोडवू शकाल. वादविवाद राहणार नाहीत. कोणत्याही क्षेत्रात गुंतवणूक करताना मात्र सतर्क राहणे आवश्यक आहे. आर्थिक परिस्थिती चांगली राहील.

नोकरी-व्यापार-व्यवसाय : सध्याचा कालावधी तसा अनुकूलच म्हणता येईल. परंतु काही बाबतीमध्ये मात्र सावधानता बाळगणे हिताचे ठरेल. आपल्या नोकरीच्या ठिकाणी आपल्या कामाकडे लक्ष दिल्यास व कार्य मग्न राहिल्यास विशेष प्रश्न निर्माण होणार नाहीत, त्याचप्रमाणे आपल्या कामाच्या स्वरूपामध्ये बदल होऊ शकतो. तो स्वीकारावा. त्याचा फायदा नक्की होईल. आर्थिक फायद्याच्या बाबतीमध्ये अपेक्षित घटना घडू शकतात. पदोन्नती अथवा वेतनवृद्धी मिळेल, परंतु सहकाऱ्यांशी अथवा वरिष्ठांशी चांगली नाती ठेवा. त्यांच्या मताला प्राधान्य द्या. स्वतःचे मत जरा बाजूला ठेवा. शांत रहा. ते आपल्या हिताचे राहील. व्यवसाय-धंद्यामध्ये कोणतेही लहानमोठे आर्थिक व्यवहार करताना सावधानता बाळगा. फसवणुकीची शक्यता नाकारता येत नाही. कोणावरही अतिविश्वास ठेवू नका किंवा अंधविश्वास ठेवू नका. जाहिरातबाजीला अथवा गोड बोलण्याला फसू नका. नवीन गुंतवणूक करताना सर्व बाजूंनी विचार करा. कोणताही जुगारसदृश व्यवहार नका. बंदीविषयक व्यवसाय विशेष जागरूकतेने व परिस्थितीचे अवलोकन करून करा. सामाजिक आणि धार्मिक कार्यामध्ये सक्रिय योगदान द्याल, परंतु कोणत्याही सार्वजनिक अथवा कौटुंबिक कार्यामध्ये आपल्या बोलण्यावर व वागण्यावर नियंत्रण ठेवा, नाहीतर रंगाचा बेरंग होऊ शकतो हे लक्षात ठेवा. इतरांशी थट्टामस्करी टाळा. व्यवसाय-धंद्यात नफ्याच्या प्रमाणात वाढ होईल. नवनवीन संकल्पनांचा वापर यशस्वी होईल. त्याचा सकारात्मक परिणाम व्यवसाय-धंद्यावर होईल. व्यवसायात तेजी दिसेल. कुटुंबात पती अथवा पत्नीचा त्यांच्या कार्यक्षेत्रातील भाग्योदय होताना जाणवेल. शुभवार्ता मिळतील. त्यामुळे घरातील वातावरण आनंदी आणि उत्साही राहील. कुटुंबातील सदस्यांचे सहकार्य लाभेल.

शुभ दिनांक : २, ४, ५, १३, १४, १५, २१, २२, २८,३०,३१

अशुभ दिनांक : ७,१०,१९,२५

logo
marathi.freepressjournal.in