ऑक्टोबर महिना कसा जाईल? बघा तुळ आणि वृश्चिक राशीचे भविष्य

तुमच्यासाठी कसा आहे ऑक्टोबर महिना? जाणून घ्या...
ऑक्टोबर महिना कसा जाईल? बघा तुळ आणि वृश्चिक राशीचे भविष्य
Published on

डॉ.सविता महाडिक, ज्योतिष भूषण

तुळ रास

शुभ ग्रहांची साथ संगत

तुळ राशीच्या व्यक्तींना एकापेक्षा जास्त क्षेत्रात परिपूर्ण ज्ञान असते. संवेदनशीलता, रसिकता इत्यादी गुणांनी परिपूर्ण असतात, लहान-मोठ्या प्रत्येक गोष्टींमध्ये सौंदर्य शोधण्याची वृत्ती असते. सकारात्मक विचार करतात. वाईटातून चांगले शोधण्याची वृत्ती असते. संधीचा फायदा घेतात. तुळ रास ही राशीचक्रातील सातवी रास आहे. या राशीचा स्वामी शुक्र आहे. ही रास सप्तम स्थानात येते. लांबी व खालच्या भागावर या राशीचा अमोल आहे. ही विषम रास आहे. पुरुष राशी आहे. वायुतत्त्वाची शीर्षोदय रास आहे. दिगबली राशी आहे. तुळ राशीचे प्रतीक तराजू आहे. तराजू हे संतुलन दर्शवते तसेच ते न्यायाचे सुद्धा प्रतीक मानले जाते. तुळ ही राजस रास आहे. या राशीवरील व्यक्ती नेहमीच संतुलीत वागतात. या राशीचे जातक सत्यप्रिय असतात. त्यांना खरेपणा आवडतो. त्यांना खोटेपणाची चीड असते.

शिक्षण :- शिक्षणासाठी हा कालावधी चांगला असला तरी प्रयत्न कमी पडू देऊ नका. अभ्यासात एकाग्रता व सातत्य राखणे आवश्यक आहे तसेच कुसंगत टाळा. त्याने नुकसान होण्याचा संभव जास्त आहे. वेळेचे नियोजन उपयोगी पडेल, इतरत्र वेळ वाया घालवू नका. कला व क्रीडा क्षेत्रात चांगले यश प्राप्त करू शकाल. पण त्यासाठी प्रयत्न व प्रामाणिक कष्ट घेणे आवश्यक आहे. प्रदेशासंबंधी यश येण्यासाठी प्रयत्नात वाढ करणे आवश्यक आहे.

पारिवारिक :- कुटुंबातील परिस्थिती चढउताराची राहणार असल्यामुळे आपण सावध राहणे गरजेचे ठरेल. परिस्थितीनुरूप आपल्याला निर्णय घेणे जरुरी ठरेल, कुटुंबातील सदस्यांमध्ये वेळोवेळी वादविवाद घडण्याची शक्यता आहे. त्यामुळे गैरसमज होण्याची शक्यता नाकारता येत नाही. परिवारातील गैरसमज दूर करण्यासाठी तुम्हाला प्रयत्नशील राहणे आवश्यक आहे. आपले प्रयत्न त्या दृष्टीने केल्यास असे प्रसंग सामोरे येणार नाहीत. आपल्याला प्रयत्नशील राहावे लागेल. काही वेळेस काही अचानक खर्च आपल्यासमोर उभे राहतील व ते आपण पूर्ण करू शकाल. उत्पन्न वाढल्यामुळे पैशाची आवकही चांगली असेल. कुटुंबातील सर्व सदस्यांच्या गरजा आपण पूर्ण कराल. तुमची सुयोग्य प्रयत्न व परिवारात वातावरण समतोल राहण्यासाठी केलेले प्रयत्न यशस्वी ठरल्यामुळे समाधानी राहाल. आपल्याला गरजा पूर्ण करण्यासाठी स्वतःच्या प्रयत्नांवर भर द्यावा लागेल.

नोकरी-व्यापार-व्यवसाय :- या कालावधीच्या सुरुवातीपासूनच आपल्याला शुभ ग्रहांची साथसंगत लाभत असल्यामुळे आपले सर्व निर्णय बरोबर व अचूक ठरतील. त्याचा फायदा आपल्याला आपल्या कार्यक्षेत्रामध्ये होईल. काही वेळेस खर्चाचे प्रसंग तेही अचानक उभे राहिल्यामुळे आपल्याला नियोजनात बदल करावा लागेल. कामे यशस्वी होतील. इतरांची मदत मिळेल. कुटुंबातून तसेच आपल्या कार्यक्षेत्रातून इतरांचे आपल्याला वाढते सहकार्य मिळेल. दीर्घकालीन रखडलेली जमीनजुमल्याविषयीची कामे तसेच स्थावर मालमत्तेबाबतची कामे मार्गी लागतील. गतिमान होतील. ओळखीमध्ये ती उपयोगी पडतील. त्यातून चांगला आर्थिक फायदा होऊ शकतो. नवीन गुंतवणूक करू शकाल. व्यवसाय-धंद्यामध्ये नवीन करार होण्याची शक्यता आहे. व्यवसाय-धंद्यातील उलाढाल वाढून नफ्याचे प्रमाण वाढल्यामुळे व्यवसायामध्ये फायदा होईल. नवीन जोडधंदा करण्याचा विचार असेल अथवा व्यवसाय विस्तार करण्याच्या दृष्टिकोनातून विचार असू शकतो. त्या दृष्टीने प्रयत्न केल्यास ती यशस्वी होतील. त्याचप्रमाणे ज्या जातकांनी स्वतःच्या मालकीच्या घराचे स्वप्न बघितले आहे अशांचे स्वप्न साकार होऊ शकते. स्वतःच्या मालकीच्या घरात प्रवेश करू शकाल. त्याचप्रमाणे स्वतःच्या मालकीच्या जागेत व्यवसायही सुरू करू शकाल, मात्र व्यवसायात भागीदाराबरोबर मतभेद होण्याची शक्यता आहे. व्यवसायाच्या दृष्टिकोनातून वादविवाद टाळणे महत्त्वाचे ठरेल. ते व्यवसायासाठी पोषक ठरेल. भागीदाराच्या मताला विशेष प्राधान्य द्या. प्राप्त परिस्थितीचा चौफेर विचार करून मगच निर्णय घ्या. गैरसमज टाळा. चालू नोकरीमध्ये आपण केलेल्या कामाचे चांगले फळ मिळेल. वरिष्ठांशी व सहकाऱ्यांशी चांगले संबंध ठेवा. ते आपल्या हिताचे ठरेल. आपण आपली महत्त्वाची कामे पूर्ण करू शकाल. व्यवसायात भागीदाराच्या मताला उचित प्राधान्य द्या व वादविवाद टाळा. कुटुंबात एखादे महत्त्वाचे कार्य घडू शकते. त्याचप्रमाणे उत्सव-समारंभात आपली उपस्थिती राहील. आपल्या मौल्यवान वस्तू जपा. हरवण्याची किंवा चोरी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच आपली गाडी सुरक्षित ठिकाणी पार्क करा.

शुभ दिनांक : - १, ४, ५, ९, १३, १४, १५, २१,२२,२८,३०,३१

अशुभ दिनांक : - ७,१०,१९,२५

वृश्चिक रास

व्यवसायात अचानक धनलाभ

वृश्चिक राशीच्या व्यक्ती सातत्याने कार्यमग्न आपल्याला दिसतात. या व्यक्तींना सातत्याने काम करण्याची सवय असते. कष्ट करण्यास मागेपुढे पाहत नाहीत. खूप काम करूनही त्यांच्या चेहऱ्यावर थकण्याची जाणीव होत नाही. वृश्चिक रास राशी चक्रातील आठवी रास आहे. या राशीचा मंगळ हा स्वामी आहे. ही रास निसर्ग कुंडलीत आठव्या स्थानावर येते. आकाशात दिसणारा तारकापूंज हा विंचूसारखा दिसतो. वृश्चिक म्हणजेच विंचू. त्यामुळे स्वभावत:च ते उग्र, विषारी, रहस्यमय, एकांतप्रिय असतात.

षडयंत्र, गुप्त गोष्टी, दुर्बलांवर चोरी करणे, अभिमानी, महत्त्वाकांक्षी, दुसऱ्यांचा आदर करणारे, धाडसी, स्वतंत्रविचारी, परिश्रमी, अशा गोड वैशिष्ट्यांच्या असतात. या व्यक्तींमध्ये चैतन्य व प्रसन्नता हा विशेष गुण आहे. उच्च आकलन शक्ती, मुद्देसूद बोलणे, अटी-नियमानुसार वागणे, एका बाजूला प्रेम तर दुसरे टोक उग्र स्वभाव, अशा विरुद्ध गुणांचे दिसतात. सतत आपल्या कार्यात मग्न असतात.

शिक्षण :- सदरील काळामध्ये आपणासाठी शिक्षणातील कोणत्याही शाखेत योग्य प्रयत्नाने यश मिळणार आहे. आपल्या प्रयत्नांची दिशा योग्य हवी म्हणजे नेहमीपेक्षा जास्त कष्ट घ्यावे लागणार नाहीत, पण प्रयत्नात प्रामाणिकता हवी. प्रदेशातून शिक्षण घेत असाल तरीसुद्धा प्रयत्नशील राहणे गरजेचे ठरणार आहे. संपूर्ण एकाग्रतेने व सातत्याने अभ्यास झाल्यास आपण चांगले यश मिळवू शकाल. स्पर्धा परीक्षेत प्रयत्न व परिश्रमाद्वारे चांगले यश मिळेल.

पारिवारिक :- कुटुंबात आपल्याबरोबर अथवा कुटुंबातील सदस्यांमध्ये वादविवादामुळे गैरसमज तसेच कलासदृश परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता असल्याने कुटुंबातील शांतता टिकवण्यासाठी आपल्याला विशेष प्रयत्न करावे लागतील. यासाठी तुम्ही स्वतः शांत राहून घरातील गैरसमज कसे दूर होतील, याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. त्या दृष्टीने प्रयत्न केल्यास त्यात यश मिळेल. कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तींचे म्हणणे ऐकणे आपल्या हिताचे ठरेल. त्यांच्या मताला प्राधान्य द्या. त्यामुळे प्रश्न निर्माण होणार नाहीत. त्याचप्रमाणे परिवारासाठी अचानक काही वेळा खर्चाचे प्रमाण वाढणार आहे. त्यासाठी आर्थिक नियोजनाची आवश्यकता भासेल. खर्च वाढला तरी आपणास उत्पन्न वाढणार आहे. त्यामुळे त्या खर्चाचे काहीही वाटणार नाही. कोणत्याही प्रकारचा ताणतणाव जाणवणार नाही. कुटुंबातील शिक्षण घेणाऱ्या मुला-मुलींकडून त्यांच्या प्रगतीपर वार्ता समजल्यामुळे परिवारात आनंदी आणि उत्साही वातावरण राहील. पती-पत्नीमधील संबंध चांगले राहते. आपल्याला आपल्या जीवनसाथीची मदत मिळेल.

नोकरी-व्यापार-व्यवसाय :- चालू कालावधीमध्ये आपल्या कार्यक्षेत्रामध्ये आपल्याला अचानकपणे काही खर्चाच्या प्रसंगांना तोंड द्यावे लागेल. खर्च वाढू शकतो, परंतु तो खर्च आपल्या सकारात्मक कामासाठी होणार असल्याने तो करावा लागणार आहे. कुटुंबातील सदस्यांच्या वाढत्या मागण्यांसाठी खर्च होऊ शकतो. त्याचप्रमाणे आपल्या दीर्घकालीन प्रलंबित राहिलेल्या सरकारी कामांसाठी खर्च करावा लागेल. ओळखी, मध्यस्थी उपयोगी पडतील, परंतु वेळ आणि पैसा दोन्हीही खर्च करावा लागेल. त्याचप्रमाणे आपल्या व्यवसाय-धंद्यातील यंत्रे, वाहने यांच्या देखभालीच्या खर्चात वाढ होईल. त्यामुळे पहिल्यापासून आर्थिक नियोजनाद्वारे आपण आपल्या समस्या यशस्वीपणे सोडवू शकाल. व्यवसाय- धंद्यातील उलाढाल वाढल्याने आपल्या नफ्याच्या प्रमाणात वृद्धी होईल. त्यामुळे आपली आर्थिक परिस्थिती चांगली राहील, परंतु आपल्याजवळ आलेल्या पैशांचा विनियोग उत्तम प्रकारे व्हायला पाहिजे. यासाठी आर्थिक नियोजन करणे गरजेचे राहील. योग्य ठिकाणी योग्य वेळेस खर्च झाल्यास त्याचा फायदा आपल्याला व आपल्या व्यवसाय-धंद्याला पोषक ठरेल. काही वेळेस अनपेक्षित अडचणी सामोऱ्या येतील. त्यामुळे परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घ्या. स्वतंत्र व्यावसायिकांना सदरील काळ विशेषतः अनुकूल राहील. नवीन संकल्पना राबवू शकाल. त्याचा फायदा व्यवसायात होईल, परंतु आपल्या कार्यक्षेत्रातील सहकारी तसेच कामगार यांचे प्रश्न निर्माण होऊ शकतात. त्यांच्या प्रश्नाकडे सकारात्मकतेने बघितल्यास सहज प्रश्न सोडवू शकाल. चालू नोकरीमध्ये सगळ्यांबरोबर सहकार्याचे धोरण अंमलात आणल्यास आपल्या दृष्टिकोनातून ते फार हिताचे ठरेल. वादविवाद नकोत, तसेच वरिष्ठांच्या मताला योग्य ते प्राधान्य द्या. आपल्या कार्यक्षेत्रातील कामासाठी अथवा खासगी कामासाठी व्यक्तिगत कामासाठी सहकुटुंब आपल्याला प्रवास करावा लागू शकतो. परंतु प्रवासामध्ये जपा. गाडीच्या वेगावर नियंत्रण ठेवा तसेच वाहतुकीचे नियम पाळा. दुखापतींपासून सावध रहा.

शुभ दिनांक : - २, ८, १४, १५, १७, २०, २१, २२, ३०

अशुभ दिनांक : ७,१०,१९,२५

logo
marathi.freepressjournal.in