

प्रवीण दवणे
आभाळ भरून आले की मनातही आठवणींचे ढग दाटतात. तीस-बत्तीस वर्षांच्या संसारानंतर नीला आणि राघव एका नव्या वळणावर उभे आहेत. मुलांच्या आयुष्यात हस्तक्षेप न करता स्वतःच्या सहवासातील हरवलेले क्षण पुन्हा शोधण्याची त्यांची ही हळवी धडपड.
मन भरून यावं तसं आभाळ भरून आलं होतं. नीला आणि राघव एकमेकांशी न बोलता त्यांच्या हौसेने घेतलेल्या, परंतु फारसे जाणे आणि नसलेल्या घरात कसे गप्प गप्प वावरत होते. मध्येच एकमेकांशी नजर मिळत असे; जशी नुकतीच ओळख झाली असावी. खरे तर त्यांना इगतपुरीतील आपली आवडती वास्तू स्वतःच्या संसाराइतकीच ओळखीची होती; तरीही तीही आज नव्याने भेटत होती. त्या भिंती मंद स्मित करत, भेटायचे राहून गेलेल्या जिवलग नात्याला भेटायला यावे तसा आनंद व्यक्त करत होत्या. नीला आणि राघव यांच्याही भेटीचा ‘आता बहुधा पुन्हा पुन्हा योग येणार बरं का!’ या अर्थाने मौन संवाद साधत होते.
भिंतींची पण इतकी सोबत असते आणि आकाशही आत येण्यासाठी इतके उत्सुक असते याची जाणीव दोघांना प्रथम झाली असावी. जवळच्या थर्मासमधील कॉफी कपात ओतताना दोघांनी एकमेकांकडे पाहिले. स्वल्पविरामासारखे थबकून नीला स्वतःशीच म्हटल्याप्रमाणे बोलली, “राघव आपण मनात घेतलेला, अजून एकमेकांतच असलेला डिसिजन योग्य वाटतोय ना तुला?”
“का? तुझ्या मनात अजूनही शंका आहे का?”
“शंका नाही, थोडी हुरहूर मात्र वाटते. स्मितचं लग्न होऊन फक्त दोन महिने झाले आहेत. नैनितालहून ते दोघे घरी परत येऊन, पंधरा-वीस दिवसच झालेत, बरं, मयुरी आपल्या घरी अनेकदा आलेली आहे. आपण तिला ओळखतो. अविश्वसनीय वाटावी इतकी गोड मुलगी सून म्हणून आपल्या घरात आली आहे. स्मित आपल्याशी किती अटॅच आहे! आपण दोघेही त्यांच्याबरोबर एकत्र राहावं असंही त्यांना वाटतंय. मयुरीलाही नात्यांची, माणसांची आवड असावी, असं तिच्या इतक्या महिन्यांच्या ओळखीवरून वाटतंय. मग तरीही आपण स्वतःहून असे थोडे दूर राहिलो, तर आपण दूरच असण्याची दोघांना सवय नाही का होणार? आपण अजूनही उमेदीत आहोत, पण पुढे आपल्याला त्यांचा हात हवा असेल तेव्हा तो देतील का? की खूप दूर जातील? असं खूप काही माझ्या मनात दाटून आलंय. एक मन म्हणतं योग्य वेळी आपण त्यांना त्यांची स्पेस देण्याचा विचार करीत आहोत आणि दुसरं मन म्हणतं, त्यांच्या नात्याला दिलेली ही स्पेस आहे की आपण आपल्या भविष्याची पोकळी इन्व्हाईट करत आहोत? या पेचात मी आहे.”
गरम कॉफीला दाद देत राघव म्हणाला,
“नीला, तुला तसं वाटणं अगदी स्वाभाविक आहे. मलाही थोडंसं असंच वाटतं; पण बत्तीस वर्षं मनाने मागे गेल्यावर मला आठवतो आपला त्या वेळेचा नवा संसार. आपण आपल्या दोन्हीकडच्या नात्यांना धरून होतो. तुला भाऊ नव्हता. शेवटच्या काळात तुझे बाबाही आईनंतर आपल्याकडे अगदी सन्मानाने राहिले. तू तिघांचे अगदी प्रेमाने केलंस. आपला संसार वाढला. स्मित छान आजी-आजोबांसोबत लहानाचा मोठा झाला. हे सगळं खरं आहे; पण एकच सांग नीला, हा एकत्रित संसार सांधताना, खरंच आपल्याला ‘आपला’ संसार करता आला? कर्तव्य पूर्ण करण्याचा आनंद नक्कीच आपल्याला मिळाला, पण पुढील प्रत्येक पिढीने त्याच भाग्यावर जगावं असं वाटतं तुला? खरं सांग..?”
राघव इतक्या विस्ताराने आणि आतून बोलत होता की नीलाला काही सुचेना; तिचे ते अबोलणे पुरेसे बोलके होते. राघवने तिचे हात हातात घेतले आणि आत्मीय विश्वासाने तो म्हणाला, “नीला, खरं सांगू का; ही जनरेशनसुद्धा गुणी आहे, त्यांना माणसं आवडतात, सेलिब्रेशन आवडतं, त्यांची सेलिब्रेशनची पद्धत जरा वेगळी असेल; ते त्यांच्या पद्धतीने लाइफ एन्जॉय करू इच्छितात. थोडा मोकळा श्वास घेण्याची खिडकी मात्र आपण त्यांना द्यायला हवी. आपण काय करतो, खिडकीचा दरवाजा करतो आणि तो मिटून घेतो.”
राघवच्या विधानाचा नीट अर्थ समजून घेत नीला स्पष्टपणे म्हणाली, “स्टेटमेंट जनरलाइज्ड होतंय तुझं..”
नीलाने आपलं म्हणणं अगदी वैयक्तिक घेतलं, हे राघवच्या लक्षात आलं. थोडं सावध होत तो म्हणाला,
“तू अशी दुराग्रही आहेस, असं मला अजिबात म्हणायचं नाही. उलट तुझं नि माझं तिथं त्यांच्याबरोबर असणं ही करिअर नव्याने उभे करू पाहणाऱ्या मयुरी नि स्मितला सोयीचेच असणार आहे. पण मी काय म्हणतो, थोडी आपल्या नात्याची तहान तर लागू दे ना त्यांना. नात्यांचं जवळ असणं कळण्यासाठीही थोडे दूर असणे आवश्यक आहे, असं वाटत नाही का तुला?”
एक एक ढग दूर दूर जाताना खोल निळ्या आकाशाकडे नीला निःस्तब्ध पाहात होती. मनाचा आंदोल अजूनही दोलायमान होताच. खरंतर राघव तिच्या मनातीलच बोलत होता. पण हे सर्व उघडपणे व्यक्त करण्याची तिची धीटाई गेल्या तीस-बत्तीस वर्षांच्या कर्तव्यपरावर विरून गेली होती.
नीलाच्या लक्षात येत होतं, राघव जपत होता ते केवळ मयुरी आणि स्मितची स्पेस नाही, तर तो जपू पाहात होता ते, आपले आता उरलेले क्षण..! ओघळत चाललेले मणी..!
एक आई.. पत्नी नि.. तिचं आतापर्यंत घरात अधोरेखित न झालेले अस्तित्व.
तिच्या मनात आधीच असलेलं, परंतु आता राघवकडून व्यक्त झालेलं तिचं मन तिलाच जणू नव्याने भेटत होतं. एकमेकांच्या नात्यांची ती समजूतदार दखल, आधीच्या निसटलेल्या वाटांना निमंत्रण देत होती.
धुक्यात हरवलेला आपल्याच अस्तित्वाचा एक समंजस कोपरा उजळताना राघव सुखावला. तिच्या डोळ्यात पाहात म्हणाला,
“नीला, मला वाटतं तुला पटतंय. नवा ट्रॅक बदलताना क्षणभर वेळ लागतोच. पण, ध्यानात ठेव, आपण आपले नवे कर्तव्य टाळत नसून, आपल्या मनातल्या मनात विरून गेलेल्या सहवासासाठी थोडे मोकळे होत आहोत. उलट आता संदर्भ बदलले आहेत. या नव्या मुलांची एकत्र असण्याची, प्रेमाची आणि रागाची कारणं आता बदलली आहेत. त्यांच्या आनंदाची कारणे आपली असतीलच असं नाही; मग आपण आपले ते पूर्वीचे आधीच्या पिढीने आपल्याकडे दिलेले आपले आनंदाचे चौरंग त्यांच्या हाती सोपवून एकमेकांची घुसमट करण्यापेक्षा त्यापासून थोडे दूर राहून स्वतःच जगणं जगू इतकंच. नीला, एक सांग, एखाद्या छोट्या वादातून, नंतर त्यांनी सुचवण्यापेक्षा आधीच आपण त्यांना ती वेळ येऊ न देण्याची खबरदारी घेतली तर..! वेगळं राहूनही एकत्र राहता येईल की नाही? एकाच घरात वेगळे राहण्यापेक्षा, योग्य अंतरावर एकत्र राहणं ही मला वाटतं आता आपल्या पिढीचीही गरज आहे..!”
“राघव, मला तुझं हे सगळं पटतंय; पण पावलोपावली कितीतरी निर्णय असे असतात की ही मुलं भोवऱ्यात सापडतात. अनपेक्षित व्यवहाराच्या गुंतागुंतीचा या आपल्या मुलांना अजिबात अनुभव नाही, अशावेळी त्यांनी जायचं तरी कुणाकडे? असं नको वाटायला त्यांना, आवश्यकता असताना हक्काचे आपले आई-बाबा आपल्यापासून दूर राहिलेत. केवळ त्यांच्या मजेसाठी..!”
राघवला नीलाच्या डोळ्यात काही चमकताना दिसले. अश्रूंचा तो अगदी झिरझिरीत पडदा असावा. डोळे बाहेरच्या निळ्याभोर आकाशाकडे नि दुरून दिसणाऱ्या हिरव्या ओलसर डोंगरांकडे पाहत राहणे तिने पसंत केले. दोन्ही खांदे धरून तिला पुन्हा स्वतःकडे पाहते करत राघव म्हणाला,
“बोल बोल ना. मनातलं बोल नीलू..!”
तिचं मन पुन्हा एकदा आभाळ होऊन भरून आलं. कितीतरी वर्षांनी पुन्हा एकदा ऐकलं, अगदी लग्नानंतरच्या पहिल्या वर्षातलं “नीलू!”
शांतपणे ती म्हणाली,
“काय बोलू? राघव, वाटतं, यांच्याकडे पैसा आहे, पण संसाराचा अनुभव आहे का? दोघेही अगदी प्रेम करून एकत्र आले असले तरीही फक्त तीच सोबत पुरी पडेल का? आपण त्यांना थोडं आधीच दूर तर करीत नाही आहोत? थोडी घाई तर होत नाहीये ना?”
त्या प्रशस्त हॉलमध्ये येरझारांची मुळाक्षरे गिरवत, राघव नीलाजवळ आला, म्हणाला;
“नीला, आपण त्यांना पुस्तकी शिक्षण दिलं, पण आता आयुष्य जगायचे शिक्षण त्यांचं त्यांनीच घ्यायला नको का? चुकतील ते.. काही निर्णय फसतील, पण त्यातूनच ते उभे राहतील. सतत जर आपणच त्यांना आधार दिला, तर त्यांची नाती इमॅच्युअर राहतील. मुळातून, खोडांतून भक्कम कशी होणार ती? आणि आपण इतके कुठे दूर आहोत..? फोनच्या अंतरावर तर आहोत. अगदी एका कॉलच्या अंतरावर. बाय रोड तर दोन तासांची वाट आहे. आपण जवळच आहोत आणि इतकेही जवळ नाही की त्यांनी म्हणावं, आई-बाबा जरा फिरूया पंधरा-वीस दिवस.. नीला, सतत आजारी असणाऱ्या माझ्या आईसाठी तू तुझी बँकेतली नोकरी सोडलीस. करिअरवर पाणी सोडलंस कर्तव्य बजावताना. माझ्या एकट्याच्या पगारात फ्युचरचा विचार करून संसार केलास. आता नव्या जनरेशनकडून ही अपेक्षा योग्य वाटते का? नव्या लाइफस्टाईलमध्ये ते आहे पॉसिबल?”
एक दीर्घ उसासा सोडून राघव म्हणाला,
“या मुलांचं आयुष्य युद्ध झालंय. घरात असताना पण घरात नसतात. या वर्क फ्रॉम होमने, त्यांचं बाहेरचं जग अक्षरशः कुरतडून टाकलंय. अशावेळी उरलेल्या वेळात त्यांना ‘त्यांचं पूर्ण घर’ द्यायला नको का? तेच आपण देत आहोत! तू आई म्हणून विचार करतेस ते योग्यच आहे. पण थोडं स्मितची मयुरी होऊन विचार कर. आपलाही हा एक रियाज आहे; थोडं नव्याने जगण्याचा! एक प्रयत्न करून बघू. ‘चलो एक बार फिर से अजनबी बन जाये हम दोनो’ ही साहिरची आपली आवडती ओळ जगून बघू. नात्यांना एकमेकांची ओढ असतानाच ती ओढ जपलेली बरी असते. म्हणून म्हटलं थोडा आपणही रियाज करूया! आपल्या नव्या पाऊलवाटेचा आणि त्यांना त्यांचाही करू दे. समजून घेत आहेसच, मान्यही कर. अर्थात लगेच नाही सांगितलंस तरी चालेल. अजून आहोत आपण इथे पंधरा-वीस दिवस. आपलं हे हौसेनं घेतलेलं सेकंड होम आहे ना. मनात ठरवलं तर ते आपलं फर्स्ट होमही होऊ शकेल.! स्मित-मयुरीकडे जाता येईल अधूनमधून.”
नीला नि राघव एकमेकांकडे काहीच न बोलता कितीतरी वेळ बघतच राहिले. ते मौन अधिक बोलकं होतं नि आता शब्दांतून सांगण्यासारखं उरलं तरी काय होतं?