विविधरंग
संजय कुळकर्णी
'आवारा हूँ' हा कार्यक्रम अशोक हांडेच्या सखोल संशोधन आणि कलात्मक नियोजनाचा उत्कृष्ट नमुना आहे... राजकपूर यांच्या चित्रपटांतील गाणी, नृत्य आणि जीवनगाथा हा रंगभूमीवरील तीन तासांचा कार्यक्रम मंत्रमुग्ध करून टाकतो.
गाणी म्हणजे जिव्हाळ्याचा विषय. त्यातही जुनी गाणी म्हणजे शब्द, संगीत, आवाज यांचा सुंदर मिलाफ. त्यात विशिष्ट 'ब्रँड'ची गाणी, कार्यक्रम असतील तर अजूनच जल्लोष. आज हे लिहिण्याचे कारणही खास आहे. व्यावसायिक रंगभूमीवर वाद्यवृंद क्षेत्रात अशोक हांडे हा 'ब्रँड' लोकप्रियतेच्या शिखरावर विराजमान झालेला दिसत आहे. आजपर्यंत त्यांनी केलेल्या सर्व निर्मिती या बॉक्स ऑफिसवर सुपर डुपर हिट झाल्या आहेत. आपला 'अशोक हांडे ब्रँड' लोकप्रिय करण्यात त्याचे परिश्रम, चिकाटी आणि त्या त्या कार्यक्रमाबद्दल त्यांनी केलेले संशोधन हेच त्यामागील एकमेव गुपित आहे. गेले ३८ वर्षे तो चौरंग संस्थेसाठी जीवापाड मेहनत घेताना दिसला आणि अजूनही नवनवीन करण्याचा त्याचा संकल्प निश्चितच असतो. त्यांनी निर्मिती केलेल्या सर्व कार्यक्रमांवर नजर फिरवली तर माझ्या या विधानावर आपण पूर्णतः संमती दर्शवाल. 'मंगल गाणी दंगल गाणी' असो की 'मराठी बाणा' असो, 'आवाजकी दुनिया' असो की 'आजादी ५०' असो, 'माणिक मोती' असो की 'अमृत लता' असो इत्यादी सर्व कार्यक्रमांत अशोक हांडे या बॅण्डवर त्याने शिक्कामोर्तब केले आहे. यावर कळस म्हणजे नुकताच राजकपूर जन्म शताब्दीचे औचित्य साधून निर्मिती केलेला 'आवारा हूँ' हा लक्षणीय, बहारदार आणि सर्व अंगाने सादर होणारा वेधक कार्यक्रम. आपण ७० एम. एम. चित्रपट पाहतो पण 'आवारा हूँ' हा त्याच्या पलीकडे असल्यामुळे त्याचे वर्णन करण्यासाठी माझ्याकडे शब्दच नाहीत. 'अशोक हांडे ब्रँड' हा चिरकालीन राहणार हे नाट्य इतिहासकाराना मान्य करावे लागेल.
राजकपूर हा हिंदी चित्रपट सृष्टीतील शोमॅन. त्याची जन्मशताब्दी १३ डिसेंबर रोजी नुकतीच संपली. राजकपूर यांचं निर्माता, दिग्दर्शक, अभिनेता म्हणून हिंदी चित्रपट सृष्टीत नाव कोरलं गेलं असलं तरी त्यांनी त्याचं हिंदी चित्रपट सृष्टीला नर्गिस, वैजयंतीमाला, पद्मिनी, मंदाकिनी, यासारख्या अभिनेत्री दिल्या आहेत. राजकपूर यांच्या आर के बॅनरच्या चित्रपटात भूमिका केल्यामुळे त्यांना लोकप्रियता लाभली ती केवळ आर के चे चित्रपट हिट झाल्यामुळेच. राजकपूर यांची चित्रपट कारकीर्द अफाट सागराहून मोठी आणि त्याचं अवकाश तर त्याहून भव्य दिव्य होतं हे अशोक हांडे यांचा ‘आवारा हूँ’ हा कार्यक्रम पाहिल्यावर अधोरेखित होतं. हा कार्यक्रम पाहताना लक्ष विचलित न होता रंगमंचावर सादर होणाऱ्या गाण्यात आणि लक्षवेधी नृत्यात आपण रममाण होतं असताना राज कपूर यांचे चित्रपट डोळ्यासमोर येतं होते. त्याच्या चित्रपटातील त्याच्या नायिका सुद्धा आल्या. हे सर्व तीन तासाच्या कालमर्यादेत अनुभवताना अशोक हांडे यांनी केलेले राज कपूर यांच्या कारकिर्दीचे संशोधन नजरेत भरणारे असेच होते. राज कपूरचे जवळ जवळ ७७ चित्रपटांपैकी ५६ चित्रपट पुन्हा पुन्हा अशोक हांडे यांनी पाहिले आणि त्यातून मनोवेधक सीन निवडले. राज कपूर यांच्या चित्रपटात जवळजवळ ५०० हून अधिक गाणी आहेत. ती ऐकून प्रथम त्यानं १५३ निवडली. त्याची छानणी करत करत ५६ गाणी निवडली. हे सर्व करताना कुठून घ्यायचं आणि कुठलं वगळायचे हा खेळ सुरु झाला. प्रामुख्याने ज्यात नृत्य सादर करता येतील तीच गाणी त्यानं शॉर्टलिस्ट केली. हे त्याचे संशोधन १ वर्षभर सुरु होतं .
कार्यक्रम पहात असताना त्यातील नृत्य नजरेत भरणारी होती. राज कपूर यांच्या प्रत्येक चित्रपटातील नृत्य लक्षवेधी असायची. ‘आवारा हूँ’ यातील नृत्य सुद्धा तेवढीच लक्षवेधी आहेत. याचं श्रेय नृत्य दिग्दर्शक सुभाष नकाशे यांनाचं जातं. प्रत्येक नृत्यातील आकृतिबंध हा त्यांच्या नृत्य दिग्दर्शनाची कल्पकता सिद्ध करणारा आहे. तसेच जे चाळीस तरुण - तरुणी ती नृत्य सादर करतात त्यांच्या पदन्यासाला दाद द्यायलाचं हवी. प्रत्येक नृत्यातून कवीने लिहिलेल्या शब्दपंक्तीस आपल्या मुद्राभिनयाच्या अदाकारीने त्याला एक नजाकत त्यांनी दिली आहे. त्यांनी परिधान केलेल्या वेशभूषेने आणि त्याच्या रंगसंगतीने प्रत्येक नृत्यांगनाना रेखीव रंगरूप मिळालेले आहे. अर्थात त्याचं क्रेडिट हे कल्याणी देशपांडे श्रॉफ आणि गौरी पाठक या वेशभूषाकारांना जातं. प्रसाद ठक्कर हा रंगभूषाकार कलाकरांना दिलेल्या रंगरुपामुळे आपलं अस्तित्व सिद्ध करतोय. प्रत्येक नृत्यास आणि गाण्यास सुनील जाधव या प्रकाश योजनाकाराची जी प्रकाश योजनेची रंगबेरंगी उधळण होते त्यानं कार्यक्रमास श्रीमंत थाटाची पुष्टी मिळते.दर्शनी भागात लावलेल्या भव्य स्क्रीनवर दिसणाऱ्या त्या त्या राज कपूरच्या चित्रपटातील सीनला दृश्य - श्राव्याचा लहेजा प्राप्त झालेला आहे.
राज कपूर यांच्या चित्रपटातील प्रत्येक गाणी सुपर डुपर हिट होती आणि आजही ही ती चिरकालीन आहेत. शंकर जयकिशन आणि इतर संगीतकारांनी संगीत दिलेली ती गाणी आजही रंगमंच्यावर त्याचं श्रवणीय वाद्यवृंदाने सादर करणे तसं अवघडच.पण सत्यजित प्रभू या संगीत संयोजकाने त्याच्या सहकाऱ्यांमार्फत लिलया ती पेलली आहे नव्हे त्यात ते यशस्वी झालेले आहेत. मुझे किसीसे प्यार हो गया, घर आया मेरा परदेसी, ओ बसंती, मेरे मनकी गंगा, झूठ बोले कौवा काटे (प्रीती वारियार), आजा सनम, निगाहे मिलाने को चाहता है, मूड मूड के ना देखो मूड मूड के (संपदा गोस्वामी), प्यार हुआ इकरार हुआ, बाहेर से कोई अंदर ना आ सके (कस्तुरी वावरे), बरसात में ताक धिना धींन, सत्यम शिवम सुंदरम (अस्मिता काळे), ये गलिया ये चौबरा (पूजा बनकर), नन्हे मुन्ने बच्चे तरी मुट्ठी में क्या है (सानिका इंदुलकर), प्यार हुआ इकरार हुआ, आजा सनम मधुर चाँदनी में, डम डम डिगा डिगा, छलिया मेरा नाम, दोस्त दोस्त ना रहा, जाने कहा गये वो दिन (संकेत जाधव), रामय्या वत्सा वैया, आंसू भरी है ये जीवन की राहें, अब लोट चले, ये मेरा प्रेम पत्र पढकर, सजन रे झूठ मत बोलो (प्रमोद सोहनीं), आवारा हूँ, मेरा जुता है जपानी, सब कुछ सिखा हमने, कहता है जोकर (सचिन मुळ्ये), ओ महबूबा (रुदेश कानविंदे), किसी की मुस्कुराहटोंसे (ललित जाधव) आणि हर दिल जो प्यार करेगा, होठोपे सच्चाई रहती है, मेरे मनकी गंगा, ए भाई जरा देख के चालो, मूड मूड के ना देख मूड मूड के, जिना यहाँ मरना यहाँ (अशोक हांडे) इत्यादी श्रवणीय गाणी गायक - गायिकांकडून ऐकल्यावर नक्कीच आपण भूतकाळात जातो. राज कपूरच्या चित्रपटाची एक सफर करून येतो. काही काही गाणी स्क्रीनवर कलाकार पेश करीत असताना गायक गायिकांनी ती कशी गायली आहेत ते पाहणं म्हणजे त्यांची कमाल आहे..
‘आवारा हूँ’ या कार्यक्रमाचे अशोक हांडे अभ्यासपूर्ण निवेदन करताना आपणास ज्या गोष्टी माहित नसतात त्याचा उलगडा ते करतात. त्या निवेदनातून त्यांनी केलेले संशोधन नजरेत भरते. लेखनात क्लिष्टता नाही आणि मुद्देसूद असल्यामुळे कार्यक्रमाच्या रंगतीचा बेरंग होत नाही. कार्यक्रमाचे आणि स्क्रीनवर दिसणाऱ्या सीनचे केलेलं संकलन योग्यरित्या त्यानं केलेलं आहे. एखाद्या कार्यक्रमाची भट्टी जमली की कार्यक्रम कसा लक्षणीय होतो त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे ‘आवारा हूँ’ हा कार्यक्रम आहे. हा चौरंगचा प्रयोग आवर्जून पाहायला हवा. कारण तीन तास मनोरंजन तर होतेच पण त्याहीपेक्षा राज कपूरची जीवनगाथा आपणास अनुभवता येते . म्हणून प्रयोग संपल्यावर सहजच आपल्या मुखातून स्वर उमटतो ‘आसू भरी है ये जीवन की राहें...’