
विशेष
शब्दांकन : पूजा सामंत
१५ जूनला फादर्स डे आहे. परंपरागत समजूत वडिलांना कठोर, शिस्तप्रिय मानते. पण अनेकदा आपल्या मुलांना हळूवारपणे फुलवण्याचं काम अनेक बाबामंडळी करत असतात. विशेषत: लेकींच्या बाबतीत बाबा लोण्याहून मऊ होतात, तर एखादे ‘पा’ त्याच्या मुलासाठी जगण्याचा पाया असतात. त्या पायावर उभं राहून तो मुलगा जगाकडे पाहत असतो. उंगली पकड के तूने, चलना सिखाया था ना...असं म्हणत अभिषेक बच्चन आपल्या आयुष्यातील आपल्या बाबांचं स्थान उलगडत आहेत.
आपल्याकडे एक गैरसमज आहे. मोठ्या वृक्षाखाली लहान झाडांची वाढ होत नाही, असं म्हटलं जातं. पण हे मत चुकीचं आहे. प्रत्येकाचं टॅलेंट वेगळं असतं, प्रत्येकाला मिळणारी संधी वेगळी असते आणि अर्थातच प्रत्येकाचं नशीबही वेगळं असतं. त्यामुळे इथे इंडस्ट्रीत किंवा इतर कुठल्याही क्षेत्रात वडील-मुलगा, आई-मुलगी, बहिणी-बहिणी अशी जी तुलना होत असते ती अयोग्य आहे. माझी आणि माझ्या वडिलांची कायम तुलना केली गेली. म्हणूनच ‘फादर्स डे’च्या निमित्ताने बोलताना मला याच मुद्द्यावर माझं मत स्पष्ट करायचं आहे आणि त्याचवेळी मी जगातील सगळ्यात भाग्यवान मुलगा आहे, हेही मला सांगायचं आहे. अमिताभ बच्चन आणि आई जया बच्चन यांचा मुलगा असणं ही माझ्यासाठी मोठी उपलब्धी आहे.
जगासाठी माझे पा (मी डॅडना ‘पा’ असे संबोधित करतो) लेजंड आहेत, पण माझ्यासाठी मात्र ते माझे मित्र आहेत. माझे पा फारसं बोलत नाहीत, त्यामुळे त्यांना कमी बोलणारी माणसं आवडतात. पांची जीवनशैली अभिजात आहे. वाचन, लेखन, सोशल मीडियाचे अपडेट्स, जागतिक घडामोडी, देशांतर्गत होणाऱ्या सामाजिक-राजकीय घडामोडी आणि चित्रपट जगतातील घटना याबाबत ते सजग आहेत. ते न्यूज पाहतात. उत्तम पुस्तकं वाचतात. चित्रपटांच्या अनेक स्क्रिप्ट्स वाचतात. चित्रपटांमधील त्यांच्या व्यक्तिरेखांचा होमवर्क करतात. ते सामाजिक कार्यातही भरीव योगदान देतात. या सगळ्यातून ते आपल्या कुटुंबाला देखील पुरेसा वेळ देतात.
मेरा और पा का रिश्ता बेटा और पिताजी का कम, और दो अजीज दोस्तों का ज्यादा है.. आम्ही दिवसभरात एकमेकांना अनेक जोक्स-चुटकुले फॉरवर्ड करत राहतो. ते माझे चांगले समीक्षकही आहेत. माझी माँ माझ्या परफॉर्मन्सबद्दल ‘बायस्ड’ असते. माझा परफॉर्मन्स उत्तम नसला तरी ती म्हणते, ‘दारुण’! (हा बंगाली शब्द आहे आणि त्याचा अर्थ आहे उत्तम.) पण पांचे असे नाही. माझा परफॉर्मन्स जर कामचलाऊ असेल तर ते माझी कानउघाडणी करतात. त्याचवेळी त्यांना त्यांची प्रशंसा केलेली अजिबात आवडत नाही. Its Very routine...very normal असं त्यांचं स्वत:च्या कामाबाबत मत असतं.
पा में ऐसे अनगिनत गुण है, जिसके बारे में सभी परिचित नहीं है.. शाळेत असताना ते दादा-दादीबरोबर अलाहाबादला राहत असत. सातवीत असताना पांना फोटोग्राफी आवडू लागली. त्यांनी दादाजींकडे कॅमेरा मागितला. त्यांना हवा असलेला कॅमेरा महाग होता, तो विकत घेण्याची दादाजींची त्या काळात ऐपत नव्हती. दादाजींनी प्रोफेशनल कॅमेरा सध्या नको, साध्या कॅमेऱ्याने तुझा छंद भागव, असं सांगितलं. पण साध्या कॅमेऱ्याने देखील पांनी नेहमीच उच्च प्रतीचं काम केलं. पुढच्या दोन वर्षांत दादाजींनी पांना प्रोफेशनल कॅमेरा भेट दिला. मग काय, तहान-भूक विसरून पा सूर्योदय, सूर्यास्त, वाईल्डलाइफ, निसर्गदृश्य टिपू लागले. पांचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य म्हणजे ते जे काम करतात, स्वीकारतात त्यात ते सर्वस्व झोकून देतात. दादाजींनी दिलेल्या त्या कॅमेऱ्यातून त्यांनी पहिलं छायाचित्र त्यांच्या बाबूजी आणि माँचं घेतलं. त्यांना संगीतातही रुची आहे. भारतीय क्लासिकल म्युझिक तर त्यांना प्रिय आहेच, पण जॅझ, रॅप यातही त्यांना स्वारस्य आहे. या वेगवेगळ्या संगीत प्रकारांची सगळी माहिती त्यांना आहे. सगळ्याच अभिजात कलांबद्दल त्यांना खूप आदर आहे. त्यांच्या त्या एकाच मेंदूत ते इतक्या माहितीचा आणि ज्ञानाचा संग्रह कसा काय करतात, याचं मला नेहमी कुतूहल वाटतं. याबाबत मी त्यांच्याशी या जन्मात तरी बरोबरी करू शकत नाही. ते दिवसाचे १७ ते १८ तास कामात व्यग्र असतात, खूप सक्रिय असतात. ‘कौन बनेगा करोडपती’च्या सेटवर ते सकाळी आठ वाजल्यापासून ते रात्री बारा वाजेपर्यंत असतात. हे काम खूप थकवणारं आहे. गेली २५ वर्षं ते हे होस्टचं काम करत आहेत. मला नेहमी वाटतं, पांनी आता शरीराला थोडा आराम द्यायला हवा, पण ‘पॉज घेणं’ हा वाक्प्रचार त्यांच्या शब्दकोशात नाही!
स्वतःच्या चाहत्यांशी कनेक्टेड राहणं ही त्यांची मानसिक गरज आहे. ते सोशल मीडियावर ब्लॉग लिहितात. नवोदित कलावंत, गायक-गायिका सगळ्यांचं अभिनंदन करतात. त्यांना स्वहस्ताक्षरात पत्र लिहून पुष्पगुच्छ पाठवतात आणि मग त्यांच्या हस्ताक्षरातील पत्र हा उदयोन्मुख कलावंतासाठी लाईफटाइम पुरस्कार ठरतो. मी पांच्या स्वभावातील अशा अनेक छटा, असे अनेक दुर्मिळ गुण लहानपणापासून पाहत आलो आहे.
प्रसिद्ध ॲड-फिल्ममेकर आर. बाल्की आमच्या घरी आले होते. ते पांशी गप्पा मारत असताना मी तिथे होतो. मी माझ्या वडिलांना ‘पा’ म्हणतो हे त्यांना नव्याने कळलं. आमच्यातील प्रेम, बॉण्डिंग पाहूनच त्यांना ‘पा’ सिनेमाचं शीर्षक आणि कथा सुचली.
किती गुण आहेत ‘पा’कडे. शिस्त, वक्तशीरपणा, स्त्री दाक्षिण्य, अभिनयात झोकून देण्याची वृत्ती, गार्डनिंगची आवड... खूप अभिजात आवडी आहेत त्यांच्या! ते फॅमिली मॅन तर आहेतच. म्हणूनच मी जगातला अतिशय भाग्यवान पुत्र आहे!