चिरतारुण्यासाठी अभ्यंगस्नान

दिवाळीच्या खरेदीत उटणे आणि सुवासिक तेल यांचे स्थान अबाधित आहे. दिवाळीच्या पहिल्या दिवशी केली जाणारी पहिली आंघोळ ही उटणे आणि तेलाचे अभ्यंग याशिवाय पूर्ण होत नाही. आयुर्वेदात या अभ्यंगाचे महत्त्व विशद केलेले आहे. अभ्यंगाचे विविध उपयोग असून आपल्या रोजच्या दिनचर्येत त्याचा समावेश करणे आवश्यक आहे.
चिरतारुण्यासाठी अभ्यंगस्नान
Published on

आयुर्वेद मंत्र

डॉ. किरण आंबेकर

दिवाळीच्या खरेदीत उटणे आणि सुवासिक तेल यांचे स्थान अबाधित आहे. दिवाळीच्या पहिल्या दिवशी केली जाणारी पहिली आंघोळ ही उटणे आणि तेलाचे अभ्यंग याशिवाय पूर्ण होत नाही. आयुर्वेदात या अभ्यंगाचे महत्त्व विशद केलेले आहे. अभ्यंगाचे विविध उपयोग असून आपल्या रोजच्या दिनचर्येत त्याचा समावेश करणे आवश्यक आहे.

नुकताच दहावा आयुर्वेद दिवस साजरा झाला. इसवी सन पूर्व ५००० म्हणजेच किमान ७५०० वर्षांच्या परंपरेवरच राजमुद्रा उमटवली गेली आहे. आपल्या जीवनातील किती तरी भाग हा आयुर्वेदाच्या तत्त्वांवर आधारलेला आहे. त्या सर्व संस्कारांना एवढ्या काळाची परंपरा आहे. शौच, मुखमार्जन, अभ्यंग, व्यायाम, उद्वर्तन, स्नान हीच दिनचर्या म्हणजे रोजचा दिनक्रम आहे. ती या आयुर्वेदीय संहितांची देणगी आहे. ती आजतागायत चालू आहे. ही सवय आणि परंपरा हा आज आपल्या संस्कारांचा भाग झालेल्या आहेत.

तपशिलामध्ये काही बदल झाले आहेत. म्हणजे दंतधावनाच्या जागी टूथपेस्ट आली. चूर्ण कमी झाली. पण ते सर्व विधी त्याच क्रमाने आजही केले जातात. पण अलीकडे या सवयींमध्ये बदल होताना दिसत आहे. उठण्याच्या वेळा, झोपण्याच्या वेळा, खाण्याच्या वेळा बदलल्या आहेत. नवनवीन खाद्यपदार्थांचा आहारात समावेश झाला आहे. यामुळे होणारी आरोग्याची नासाडी आपण पहात आहोत. आपल्या पिढीतील लोकच त्याला जबाबदार आहोत हे मान्य करावेच लागेल.

रोजच्या जीवनक्रमामध्ये ‘अभ्यंग’ हा फार महत्त्वाचा विधी आहे. दिवाळीच्या निमित्ताने आपण तो अजूनही अनुभवतो. पण अभ्यंग समजण्यासाठी आपल्याला उद्वर्तन आणि स्नान दोन्हींमागचा विचार पहावा लागेल. आपण सुंदर दिसावे असे कोणाला वाटत नाही? आणि कोणाला तरुण दिसण्याची इच्छा नाही? त्यासाठी अभ्यंगाबद्दल माहिती असायलाच हवी. त्वचेच्या आरोग्यावरून शरीराचे आरोग्य लगेच कळते. पण हे कृत्रिमही असू शकते. थोडक्यात मेकअप करून काही प्रमाणात वरवरचे आरोग्य दाखवता येते. पण जर आरोग्य खरेच टिकायला हवे असेल तर आयुर्वेदाने सांगितलेल्या जीवनशैलीला पर्याय नाही. आयुर्वेदाचे ज्ञान हे केवळ शाश्वतच नाही, तर ते प्रत्यक्ष अनुभवलेले शास्त्र असल्याने तसेच ते निसर्गाच्या मूळ सिद्धांतांवर आधारलेले असल्यामुळे निरंतर आहे. म्हणूनच आयुर्वेदातील दिनचर्या ही आजच्या जीवनात ‘लाईफ स्टाईल’ म्हणून स्वीकारली जायला हवी.

अभ्यंग म्हणजे काय?

अभ्यंग म्हणजे शरीराच्या त्वचेमध्ये तेल जिरवणे. हा मुळात रोज करण्याचा विधी आहे. पण तो समजून घेतला तर आपल्या जीवनक्रमामध्ये त्याला नियमित स्थान देणे शक्य आहे. त्यामुळे त्वचेची कांती सुधारते. त्वचा तजेलदार होते. त्वचेवरील मल मोकळा होऊन त्वचा स्वच्छ होण्यासाठीही अभ्यंग उपयोगी आहे. आरोग्यदायी त्वचा आघात सहन करण्यासाठी सक्षम होते. त्वचेवर सुरकुत्या येत नाहीत. त्वचेला उत्तम आरोग्य प्राप्त होते आणि त्वचा रोगांना बळी पडत नाही. नियमित अभ्यंगामुळे त्वचेवरील जखमाही लवकर भरून येतात. त्याशिवाय त्वचेच्या संवेदना सुधारतात आणि शरीराचे बचावतंत्र सुधारते.

अभ्यंगाचे लाभ : नियमित अभ्यंगातून सर्व शरीराचे उपचारही काही प्रमाणात होतात. हाडांना बळकटी येते. शिरांचं बळ सुधारतं. मांसपेशी बलवान होतात. त्वचेची आणि शरीराची लवचिकता सुधारते. केस लवकर पांढरे होत नाहीत. केस गळत नाहीत. दृष्टी चांगली राहाते. ऐकण्याची क्षमताही चांगली टिकते. म्हातारपणाची लक्षणं लवकर दिसत नाहीत. त्याशिवाय मानसिक आरोग्य सुधारण्यासाठीही याचा उपयोग होतो.

यातील सर्व परिणाम दिसण्यासाठी नियमितपणे अभ्यंग करावे लागते. डोक्यापासून पायाच्या नखांपर्यंत तेल जिरवणे आवश्यक असते. यात फार रगडणे अपेक्षित नाही, पण तेल जिरवावे मात्र लागते. थंडीच्या काळात गरम तेलाने आणि उष्ण काळामध्ये थंड तेलाने अभ्यंग करावे. हातात घेतलेले तेल त्वचेत जिरेपर्यंत त्वचेचे मर्दन करावे.

अभ्यंग आणि त्वचेचे आरोग्य : त्वचा म्हणजे शरीराचे आच्छादन. त्वचा हे वाताचे स्थान आहे. स्पर्श हा तिचा धर्म आहे. तेल जिरवल्याने सर्व शरीराला फायदा मिळतो. शरीर आणि मन ताजेतवाने होते. हे तेल जिरवल्यानंतर व्यायाम करायला हवा. म्हणजे ते चांगला परिणाम दाखविते. व्यायामानंतर येणारा घाम हा चांगल्या उटण्याने निपटून काढावा. त्याचाही परिणाम खूप चांगला होतो. त्यातून त्वचेचे आरोग्य आणखीनच सुधारते. पूर्वी साबण नव्हते. त्वचेवरील अस्वच्छता नाहीशी करण्यासाठी त्वचेवर चंदन किंवा अन्य सुवासिक चूर्ण चोळत असत. यामुळे त्वचा शुद्ध आणि स्वच्छ होत असे. आपण पूजेमध्ये ‘करोद्ववर्तनार्थे चन्दनं समर्पयामि’ असे म्हणतो. त्याचा अर्थ असा की, जेवणानंतर हात धुण्यासाठी चंदन अर्पण करतो, अभिषेकानंतर मांगलिक स्नान म्हणून चंदनमिश्रित पाण्याचे स्नान घालतो.

अभ्यंगासाठी मुख्यतः तिळाचं तेल वापरावं. ते श्रेष्ठ आहे. कित्येक जणांना तेल वापरल्याने त्रास होतो. एखाद्या व्यक्तीच्या त्वचेचा तो गुणधर्म असतो. तसे असेल तर त्या व्यक्तीने त्वचेच्या आरोग्यासाठी, त्वचेची आर्द्रता टिकवण्यासाठी इतर द्रव्यांचा वापर करावा. उत्तर भारतात राईच्या तेलाचा वापरही करतात. ते उष्ण असते. सर्वांना मानवतेच असे नाही. नारळाच्या तेलानेही अभ्यंग केले जाते. हे तेल थंडीत गोठते. पण अभ्यंगासाठी वापरता येते. आवश्यकतेप्रमाणे आम्ही काही औषधी वनस्पती वापरून तयार केलेली तेले वापरतो. पण सर्वसामान्यपणे साधे तिळाचे तेलही वापरले तर चालते. लाकडी घाणीवरील तेलाचा परिणाम अधिक चांगला असतो. ते लागतेही कमी.

हे सर्व संस्कार आपल्या जीवनात कायम करत राहणे आवश्यक असते. अभ्यंग जरूर करावे, पण ते केव्हा करू नये अशा अवस्थाही माहीत असायला हव्यात. अजीर्ण असताना, तापामध्ये अभ्यंग करू नये. पंचकर्म उपचारांनंतर अभ्यंग करू नये. बऱ्याच वेळा तशी आवश्यकताही नसते.

दिवाळीत अभ्यंग स्नान करायला सांगितले जाते, कारण ते मांगलिक स्नान आहे. सकाळी लवकर उठून केलेल्या अभ्यंगाचा परिणामही छान असतो. घरात आनंदी वातावरण असते. त्यामुळे तो आनंद वाढतो. थंडीची चाहूल लागलेली असते. त्यामुळे आता येणाऱ्या थंडीची तयारी म्हणूनही ती सूचना असते. तेव्हापासून थंडी संपेपर्यंत नियमितपणे अभ्यंग केल्यास थंडीत त्वचा कोरडी पडत नाही. त्वचेचे आणि सर्वांगीण आरोग्यही सुधारते. पहिल्या दिवशी आईकडून, मोठ्यांकडून किंवा इतर भावंडांकडून करून घेतलेले अभ्यंग आनंद वाढवते. पाडव्याच्या दिवशी पत्नीकडून आणि भाऊबिजेला बहिणीकडून अभ्यंग करून घेणे हे नात्यातील आनंद वाढवते. तसंच घरातील महिलांनाही ते करायला हवे. अभ्यंगानंतर सुगंधी उटणे वापरून केलेले स्नान अतिशय आल्हाददायक असते. तेलाचा तेलकटपणा काढण्यासाठी उटणे आहे. तेथे हल्ली आपण साबणही वापरतो. साबण कितीही नाही म्हटले तरी त्वचा कोरडी करतो. तसे उटण्याने होत नाही. साबणाचा जन्म होण्यापूर्वी हजारो वर्षे उटणे वापरले जातेय. त्वचा आरोग्यपूर्ण राहण्यासाठी आणि मनाला-शरीराला तजेला येण्यासाठी उटणेही श्रेष्ठ आहे.

अभ्यंग झाल्यावर मानवेल तसे गरम, कोमट किंवा थंड पाण्याने स्नान करावे. अभ्यंग झाल्यावर किंचित उष्ण पाण्याने स्नान केल्याने बरे वाटते. व्यायाम केल्यावर थंड पाणीही वेगळी ऊर्जा देणारे ठरू शकते. पण ज्यांना शिंका येतात, ज्यांची त्वचा कोरडी असते, ज्यांचे शरीर नाजूक आहे त्यांनी कोमट पाणी वापरावे हे उत्तम आहे. श्रम झाल्यावर गरम पाण्याने स्नान करणे हे श्रमाचे हरण करणारे ठरते. जे अतिशय नाजूक, आजारी किंवा अशक्त आहेत त्यांनी स्नान न करता अंग पुसून घेणे योग्य ठरते. स्नान हे श्रम देणारे आहे. त्यामुळे वृद्ध मंडळींनी स्नान करण्यापूर्वी पाणी पिऊन मग ते करायला हवे. काहींना स्नानानंतर चक्कर आल्यासारखी वाटते. अशांनी तसेच वृद्धांनी थोडा चहा घेऊन नंतर स्नान करावे. स्नानासाठीही श्रम होतात, हे माहिती असावे. भरल्यापोटी विशेषतः जेवणानंतर लगेचच अभ्यंग तसेच स्नान करू नये. काही कारणांनी एखादे वेळी तसे करावे लागल्याने बिघडत नाही, पण त्याचा पचनावर परिणाम होतो, हे लक्षात घ्यावे. अभ्यंग केल्यावर आंघोळीनंतर अंग टॉवेलने खसाखसा पुसू नये, अलगद टिपावे.

काही वेळा अभ्यंग करण्यासाठी वेळ नसतो. अशा वेळी तळपाय, कान आणि डोकं यांना जरी तेल चोळलं तरी चालते. मग वेळ असेल त्यावेळी पूर्ण अभ्यंग करावे. आपल्या नित्य विधींमध्येही अभ्यंगाला स्थान दिलेले आहे. त्याचेच उदाहरण म्हणजे दिवाळीतील अभ्यंगस्नान. त्याशिवाय प्रत्येक प्रतिपदा, अष्टमी आणि द्वादशीलाही अभ्यंग करावे.

बहुगुणी अभ्यंगाला जीवनात पुन्हा स्थान द्यायला हवे. त्याने सर्वांगीण आरोग्य सुधारेल आणि दीर्घायु-चिरतरुण होण्याचे इंगित हाती येईल.

ज्येष्ठ आयुर्वेदतज्ज्ञ

logo
marathi.freepressjournal.in