नाबाद शतक..

आचार्य अत्रे यांनी लिहिलेल्या झेंडूच्या फुलांनी बघता बघता शंभरी पार केली, पण अजूनही ती ताजी टवटवीत आहेत. आजही साहित्यिक संस्थांना त्यांच्या शतक महोत्सवी वर्षानिमित्त कार्यक्रम करावासा वाटतो. साहित्य क्षेत्रातल्या मान्यवरांना त्यावर लिहावसं-बोलावसं वाटतं. याचं श्रेय अर्थातच झेंडूच्या फुलांमधल्या तिरकस शैलीला, विडंबन काव्याला जातं.
नाबाद शतक..
Published on

विशेष

महेश केळुसकर

आचार्य अत्रे यांनी लिहिलेल्या झेंडूच्या फुलांनी बघता बघता शंभरी पार केली, पण अजूनही ती ताजी टवटवीत आहेत. आजही साहित्यिक संस्थांना त्यांच्या शतक महोत्सवी वर्षानिमित्त कार्यक्रम करावासा वाटतो. साहित्य क्षेत्रातल्या मान्यवरांना त्यावर लिहावसं-बोलावसं वाटतं. याचं श्रेय अर्थातच झेंडूच्या फुलांमधल्या तिरकस शैलीला, विडंबन काव्याला जातं. आज शंभर वर्षांनंतर असं विडंबन काव्य लिहिण्याजोगी राजकीय-सामाजिक-सांस्कृतिक परिस्थिती आहे का, असा प्रश्न विचारतच आपल्याला झेंडूच्या या फुलांकडे पाहिले पाहिजे.

खरं म्हणजे १०० वर्षांआधी म्हणजे १९२२ च्या मे महिन्यातच आचार्य अत्रे यांनी 'झेंडूची फुले' मधल्या विडंबन कविता लिहिलेल्या होत्या. पण ते हस्तलिखित बराच काळ त्यांच्याकडे तसंच पडून होतं. त्या कविता कोणाला वाचून दाखवण्याचं किंवा प्रसिद्ध करण्याचं धैर्य त्यांना झालं नाही. अखेर १९२५ साली 'झेंडूची फुले' हा काव्यसंग्रह प्रसिद्ध झाला आणि त्यातील विडंबन काव्याने बघता बघता प्रचंड लोकप्रियता मिळवली. कवी केशवकुमार या नावाने ही विडंबने आचार्य अत्रे यांनी लिहिली. २०२५ हे झेंडूच्या फुलांचे शतक महोत्सवी प्रकाशन वर्ष आहे.

'झेंडूची फुले' मधल्या सुरुवातीच्या कविता वाङ्मयीन आणि विशेषतः काव्य विश्वातील अपप्रवृत्तींना उघडं पाडण्यासाठी केशवकुमार यांनी लिहिल्या. मात्र नंतर उत्तरार्धातील कविता संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीचे एक नेते व पत्रकार या भूमिकेतून विरोधकांवर आक्रमक राजकीय हल्ले करण्यासाठी अत्रेनी लिहिल्या. पण शंभर वर्षांनंतरही ज्या आजही ताज्या वाटतात. झेंडूच्या फुलांना सुवास नसला आणि रंगही तसा मोहक नसला तरी फुलांच्या तळाशी देठापाशी जो पांढरा गर असतो त्याप्रमाणे या कविता आहेत. खुसखुशीत गोड खोबऱ्यासारखा अनुभव त्या देतात. केशवकुमारांच्या या काव्यरचना त्यातील मथितार्थ लक्षात आला की रसिकांना आजही गोड वाटतील,

"वास्तविक मला जायचे होते दुसऱ्याच मुक्कामाला. मला बालकवी व्हायचे होते.

मला गोविंदाग्रज व्हायचे होते. त्यासाठी माझी खटपट चालू होती.

पण ते सगळं राहिलं बाजूला आणि देवाच्या आळंदीला पोहोचायच्या ऐवजी मी चोराच्या आळंदीला जाऊन पोहोचलो", असं आचार्य अत्रे यांनी 'मी विडंबनकार कसा झालो' या लेखात लिहून ठेवलं आहे.

काहीतरी अर्वाच्य विषय घेऊन अद्वातद्वा रचना केली म्हणजे विडंबन काव्य होतं, असा अनेक कवींचा गैरसमज असतो. या अशा विडंबनकारांना सल्ला देताना आचार्य अत्रे सांगतात, "काव्यरचनेच्या तंत्रावर प्रभुत्व असल्या वाचून आणि काव्याच्या अंतरंगातील बारीकसारीक तथ्यांचे मार्मिक ज्ञान असल्याखेरीस विडंबन काव्य लिहिता येणे अशक्य आहे. सर्कशीमध्ये विदूषक घोड्यावर बसण्याचे विडंबन करून जो हशा पिकवतो त्याचे एक कारण म्हणजे तो स्वतः पट्टीचा घोडेस्वार असतो. स्वतः निर्दोष काव्य जो लिहू शकतो तो दुसऱ्यांच्या काव्यामधल्या चुकांचे विडंबन करू

शकेल. किंबहुना त्यालाच तसे विडंबन करण्याचा अधिकार पोहोचतो. अर्थात विडंबनकाराच्या अंगात तल्लख विनोदबुद्धी असेल तरच त्याला प्रभावी विडंबने लिहिता येतील."

तात्कालिक विषयावर रचल्या गेलेल्या प्रचारी वाङ्मयासारखाच विडंबनालाही शिळवटपणा येण्याचा धोका असतो. पण सगळ्याच विडंबनांबाबत नेहमीच असं घडतं असंही नाही. भावी पिढ्यांना सुद्धा अनेकदा विडंबन नकोसं होतं, कारण त्याला एक प्रकारचा असा ठळकपणा आणलेला असतो की त्यातलं दोष दर्शन कोणाच्याही नजरेत भरावं. अतिरेकीपणा, विक्षिप्तपणा, भावविवशता, पढिक पांडित्य, कंठाळीपणा, मठ्ठपणा, दिखावूपणा, प्रसिद्धीलोलुपता किंवा आत्मगौरव यासारख्या दोषांच्या दर्शनावर विडंबनकाराचा कटाक्ष असतो. त्या दोषांना एक प्रकारचं सार्वत्रिक मूल्य असतं. त्यामुळे यशस्वी विडंबन हे विशिष्ट लेखनानुकरणापलीकडे दशांगुळे उरतं. 'झेंडूची फुले' या काव्यसंग्रहाला असं स्वयंपूर्ण हास्यमूल्य लाभलेलं आहे आणि म्हणूनच त्याची शताब्दी साजरी होत आहे.

आचार्य अत्रे म्हणजे कवी केशवकुमार हे एका बाजूने टीकाकार होते, तर दुसऱ्या बाजूने ते जातिवंत कलावंत होते. मूळ कृतीच्या मर्मस्थानांचा वेध घेताना ते टीकाकाराप्रमाणे विश्लेषक बनत असले तरी सारे धागेदोरे नीट जुळवून त्यांची विनोदी पातळीवर एकात्म संरचना करताना कवी केशवकुमार कलावंताप्रमाणे संश्लेषकही होत असत. यामुळे साध्या समीक्षक टीकाकाराला कवी मंडळी ज्याप्रमाणे वांझोटा, हताश कलावंत अशी शेलकी मुक्ताफळं बहाल करून झटकून टाकू शकतात तसं ते आचार्य अत्रे यांना झटकून टाकू शकले नाहीत.

आचार्य अत्रे यांच्या अंगी व्यंगचित्रकारासारखी रूपविडंबनाची कला जन्मजात होती. कुणाचा मळका पंचा, कुणाचे दाढीचे खुंट, कुणाचे अनेक फ्लॅट्स, कुणाचं नाव, कोणाच्या थापा, कुणाचा कोकाकोला, कोणाची शमेवरची शस्त्र, कुणाचे खोटे अश्रू, कोणाचे संतप्त उद्‌गार त्यांनी वेठीस धरले आणि हास्यास्पद शब्दचित्रे रेखाटून त्यांची पुरी भंबेरी उडविली. या विडंबनांचं उद्दिष्ट वेगळं असल्याने त्यांचं बाह्यांग वेगळं झालं. तिथं चिरपरिचित चालींचा आश्रय घेण्यात आला. ओव्या, अभंग, आरत्या, भुपाळ्या, पाळणे, विडा, भक्तीपर पदे, लावण्या... हे सारं मराठी संस्कृतीत मुरलेलं आहे. त्यांची परंपरा शतकांची आहे. क्रमिक पुस्तकातील कविता लोकांच्या पाठांतरात असतात. तसंच ध्वनिमुद्रिकांनी लोकप्रिय केलेली गाणी त्यांच्या मुखी खेळत असतात. ध्वनिमुद्रिकांनी लोकप्रिय केलेल्या गझलांचा ठेका जनता लगेच पकडते. अशाच तहेच्या चाली राजकीय विडंबन गीतांसाठी केशवकुमारांनी उचलल्या. त्यामुळेच त्यांचा मुखडा म्हणताच ताबडतोब हसू फुटतं...

'हातात घ्या काळे निशाण', 'होळीवर होळी', 'अहमदाबाद अहमदाबाद' यांना विडंबन गीते म्हणण्यापेक्षा विभंजन गीते किंवा विटंबन गीते असंच म्हणावं लागेल. कारण त्यातली अभिव्यक्ती संतप्त भूमिकेतून निर्माण झालेली आहे. विसंगती दर्शनाबरोबरच चिडणे ही एक प्रतिक्रिया झाली. पण तिच्याकडे पाहून आलेल्या चिडीचं रूपांतर हास्य विनोदात करणं ही पर्यायी प्रतिक्रिया होय. अत्र्यांसारख्या विडंबनकाराने आणि 'झेंडूची फुले' सारख्या विडंबन काव्यसंग्रहाने हे कार्य मराठी रसिकांसाठी सतत १०० वर्ष केलं. त्यांनी तरुणपणी केशवसुत, गोविंदाग्रजांच्या परंपरेचा अभिमान बाळगून विपक्षीयांना अस्वली गुदगुल्या केल्या आणि उत्तरकाळात संयुक्त महाराष्ट्राचा पक्ष घेऊन राजकीय प्रतिस्पर्ध्याना त्राही भगवान केलं. तारुण्यात त्यांनी जी वाङ्मयीन विडंबनं लिहिली आणि नंतर जी राजकीय विडंबनं लिहिली त्यांच्या स्वरूपात जरी फरक असला तरी त्या दोन्ही प्रकारांमागचं व्यक्तित्व एकच आहे. त्यामागची भूमिका एकच आहे आणि ती म्हणजे अन्यायाची चीड. त्यांनी स्वार्थासाठी, स्वतःचाच बोलबाला व्हावा म्हणून इतर कवींचे विडंबन केले नाही. काव्यक्षेत्रातील आपल्या गुरूंच्या अवमूल्यनाचा त्यांना खरा राग आला होता. म्हणूनच प्रारंभी त्यांनी वाड्मयीन विडंबन काव्यं लिहिली आणि मराठी कवितेची प्रकृती निकोप राखली. उत्तरआयुष्यात तीन कोटी मराठी लोकांच्या फसवणुकीला वाचा फोडण्याचे ऐतिहासिक कार्य 'झेंडूची फुले' या संग्रहाने केलं. परिणामी राजकारणातला एक घोर अन्याय दूर होण्यास हातभार लागला.

केशवकुमार यांनी रसिकांना 'चेतावणी' देताना माझ्या फुलांचे काहीही करा, रागाने चुरगळलीत तरी हरकत नाही पण तळीचे खोबरे खायला मात्र विसरू नका, असं सांगितलं होतं. हे 'तळीचे खोबरे' म्हणजे जन्मजात विनोद बुद्धीचा विलास. विनोद बुद्धीच्या विलासामुळेच 'झेंडूची फुले' एकमेवाद्वितीय ठरलेली आहेत. विडंबनाची निमित्तं कालांतराने विसरली जातात, ती आस्वाद्य राहत नाहीत. पण हे 'तळीचे खोबरे' म्हणजेच विनोद बुद्धी त्याला स्वतंत्र मूल्य प्राप्त करून देते. यातल्या पहिल्या कालखंडातील विडंबन गीतांचा विस्तारपूर्वक विचार करताना त्यांना हे मूल्य कसं भरघोस लाभलेलं आहे, हेच दिसून येतं.

'झेंडूची फुले' ची पहिली आवृत्ती १९२५ साली पुण्याच्या 'सारस्वत प्रकाशन मंडळ' या संस्थेने प्रकाशित केली, तेव्हापासून आतापर्यंत या काव्यसंग्रहाच्या दहा आवृत्त्या निघाल्या आणि आता २०२५ साली शंभर वर्षे झाल्याच्या निमित्ताने 'डिंपल पब्लिकेशन' तर्फे नवीन आवृत्ती प्रकाशित करण्यात आलेली आहे. उच्च निर्मिती मूल्यांमुळे ही शताब्दी आवृत्ती देखणी झालेली आहे.

ज्येष्ठ कवी आणि साहित्याचे आस्वादक

----------------------------------------------------------------------------------------------------------

झलक एका फुलाची

शताब्दी झाली तरी केशवकुमारांची झेंडूची फुलं किती ताजी आणि समकालीन भाष्य करणारी आहेत, हे या 'नवी मोटार' या विडंबन गीतातून लक्षात येते. मंत्र्यांसाठी अद्ययावत मॉडेलच्या कोऱ्या मोटारगाड्या विकत घेण्यात आल्या आहेत, त्या पार्श्वभूमीवर हे विडंबन आहे.

नवी मोटार

मी मंत्री झालो, नवी मोटार आणून का हो द्या ना?

झाले बारा महिने नको मॉडेल जुने कोऱ्या गाडीवाचून मजा येईना..

रामराज्य करू मोटारीतून फिरू जनता उपाशी का ती मरेना..

गरीबांचा पैसा उधळू या असा झाली देशाची जरि या दैना..

पगार वाढवून घेऊ खूप भत्ते खाऊ पैशांवाचून अडे जरि कोयना..

पाच वर्षांमध्ये केले नाना धंदे हौस मोटारीची परि जाईना..

आम्ही दौरे काढू मेजवान्या झोडू गांधीबाबाचे नाव तुम्ही घ्या ना..

अन्नवस्त्राविणे गरीबांचे जिणे बंगले, मोटारी आणि मंत्र्यांना...

मी मंत्री झालो नवी मोटार आणून का हो द्या ना?..

logo
marathi.freepressjournal.in