
- सिनेरंग
- पूजा सामंत
बालकलाकार म्हणून आपला वेगळा ठसा उमटवणारी, अमिताभ अंकलसोबत काम करताना त्यांचं बारीक निरीक्षण करत त्यांच्यापासून खूप काही शिकणारी, बाल अहिल्येची भूमिका करताना अहिल्याबाईंच्या व्यक्तिमत्त्वाने प्रभावित होऊन समाजसेवेची ओढ वाटणारी छोटी अदिती जलतरे ‘अक्षररंग’च्या या खास बाल विशेष पुरवणीत आपल्या बाल वाचकांसाठी हजेरी लावत आहे.
गेल्या काही वर्षांमध्ये दोन पिढ्यांमधील अंतर कमी कमी होत ते आताशा पाच वर्षांवर येऊन ठेपलं आहे. दर पाच वर्षांनी दोन पिढ्यांच्या विचारांमध्ये बदल घडून येतो. गेल्या दहा-बारा वर्षांपूर्वी एखाद्या लहान मुलाला प्रश्न विचारला आणि उत्तर काय द्यावं हे सुचलं नाही की मुलं कावरीबावरी होत आणि मग आईकडे पाहत. मात्र आताच्या पिढीतली मुलं बिनबोभाट त्यांना जे उत्तर सुचेल ते देऊन मोकळी होतात. त्यांच्यातला संकोच, भीड या धावत्या आणि बदलत्या जगात जणू लोप पावल्यासारखी झाली आहे. लहान मुलांच्या आत्मविश्वासाने आता शिखर गाठलं आहे, हे अनेक जाहिराती, टीव्ही शोज्, रिॲलिटी शोज्, फिल्म्स यातून दिसून येत आहे. बालकलाकार अदिती जलतरे हिच्याशी बोलताना तिचा हा आत्मविश्वास सतत जाणवतो.
बालकलाकार म्हणून नाव गाजवलेल्या अनेकांनी भविष्यात अभिनय क्षेत्रात आपल्या नावाची स्वतंत्र मुद्रा उमटवली आहे. प्रख्यात सिने अभिनेत्री मीना कुमारी, तबस्सुम, डेझी इराणी, मधुबाला, उर्मिला मातोंडकर यांनी मोठेपणी अभिनय क्षेत्राला स्वत:ची स्वतंत्र दखल घ्यायला लावली. नायिका, सहनायिका म्हणून त्या प्रसिद्ध झाल्या. आजचा प्रसिद्ध अभिनेता-दिग्दर्शक सचिन हा देखील नामांकित बालकलाकार होताच.
बालकलाकार अदिती जलतरे अलीकडे सध्या ‘छोटी अहिल्या’ म्हणून प्रसिद्ध आहे. ‘पुण्यश्लोक अहिल्याबाई’ या सोनी टीव्हीवरील मालिकेत ती अहिल्याबाईंच्या बालपणाची भूमिका करत आहे. अकरा वर्षांच्या अदितीने आतापर्यंत अनेक जाहिराती, टीव्ही शोज् यामध्ये कामं करून तिच्यातील अभिनयगुणांची चुणूक दाखवलेली आहे. कुटुंबात अभिनयाची कसलीही पार्श्वभूमी नसताना लहानग्या अदितीने तिचं वेगळेपण सिद्ध केलं आहे. तिला स्वत:ला याची जाणीव आहे. अदितीशी संवाद साधताना तिच्यातील हा आत्मविश्वास सतत जाणवतो. ती बुद्धिमान असल्याचंही जाणवतं. इतक्या लहान वयात तिला असलेलं समाजभान लक्षात येतं. तिला भविष्यात नेमकं काय करायचंय हेही तिला ठाऊक आहे. तिच्यात असलेल्या या सर्व गुणांमुळे तिने ‘राणी अहिल्याबाई’सारखं थोर, आदरणीय व्यक्तिमत्त्व एका उंचीवर नेलं आहे.
अदिती, तुझ्याबद्दल अधिक जाणून घ्यायला आम्हाला आवडेल. तुझा प्रवास तूच सांग ना.. तुला अभिनय करावा असं का वाटलं?
“माझा जन्म नागपूरचा.. मी, आई, बाबा आणि लहान भाऊ असे आम्ही चौघे पुण्यात बाणेरला राहतो. माझ्या आणि भावाच्या संगोपनासाठी माझ्या आईने स्वत:चं स्वतंत्र करियर न करता पूर्ण वेळ घर सांभाळण्याची जबाबदारी स्वीकारली. तिने आमच्या आयुष्याला शिस्त लावली. माझे वडील सिव्हिल इंजिनिअर आहेत. शूटिंगच्या निमित्ताने अलीकडे माझा आणि माझ्यासोबत आईचा मुंबईतला वावर वाढला आहे. बाणेरच्या व्ही.पी.एम. इंटरनॅशनल शाळेत मी पाचवी इयत्तेत शिकतेय. शाळेत असल्यापासून मला सांस्कृतिक कार्यक्रमात भाग घ्यायची आवड होती. मी अशा कार्यक्रमांमध्ये नेहमी हिरिरीने भाग घेते हे पाहून माझा कल अभिनयाकडे आहे, हे आईला जाणवलं आणि तिने त्या दिशेने प्रयत्न सुरू केले. सुरुवातीला मी काही जाहिराती केल्या. त्यानंतर २०१६मध्ये ‘सबसे बडा कलाकार’ या रिॲलिटी शो मध्ये मी ऑडिशन दिल्या आणि माझी त्यात एक प्रतिस्पर्धी म्हणून निवड झाली. हा शो सोनी चॅनेलवर होता. तिथे मला एक स्क्रिप्ट देण्यात येत असे आणि त्यात जे परफॉर्म करण्यासाठी सांगण्यात येई ते मी करून दाखवत असे. शो अंतिम टप्प्यावर आला तेव्हा मी डिस-क्वालिफाय झाले. पण मला ट्रॉफी मात्र मिळाली. ‘इंडियाज बेस्ट ड्रॅमेबाज - सीझन ३’ या रिॲलिटी शोच्या ऑडिशनमध्ये मी सिलेक्ट झाले. काही राऊंड्स मी केले. खूप मज्जा आली मला.. रिॲलिटी शोचा अनुभव घेणं हे माझ्यासाठी खूप इंटरेस्टिंग होतं. मला यात अवॉर्ड मिळालं. पुढच्या टप्प्यावर मी ‘मेरे साई’सारखे काही शोज् केलेत. या शोजमुळे मला रिॲलिटी आणि फिक्शन शो यांमधला फरक जाणवला. मला फिक्शन शोमध्ये काम करणं खूप आवडलं होतं. रिॲलिटी शोमध्ये स्वत:कडची कला दाखवली जाते, पण त्यात परफॉर्मन्स म्हणजे इथे अभिनय म्हणायचंय मला.. तो कुठे असतो? मग मी आईला म्हटलं, मला यानंतर रिॲलिटी शो करायचे नाहीत. माझ्या भाषेत मी आईला सांगितलं की, मला रिॲलिटी शोमध्ये ॲक्टिंग करायला मिळत नाही आणि मला अभिनय करायचा आहे...”
पुढे काय झालं मग?
“झालं! मग तेव्हापासून मी रिॲलिटी शो करणं सोडून दिलं. मला एक मोठी संधीही मिळाली. मी एका चॅनेलसाठी ‘सिंधू’ ही मालिका केली. मुख्य म्हणजे मला टायटल रोल करण्याची संधी या शोमुळे लाभली. सध्या हा शो झी ५ वर पाहता येईल. मी तेव्हा नऊ वर्षांची होते. पण ‘सिंधू’मध्ये नायिका सिंधू नऊवारी साडी नेसते. या भूमिकेसाठी नऊवारी साडी नेसणं आवश्यक होतं. या अनुभवातून जुन्या काळातील स्त्रियांचं जीवन किती कठीण होतं, हे माझ्या लक्षात आलं.
या शो नंतर काय गंमत झालीए माहिताय का? मला चक्क बॉलिवूडचे मेगास्टार अमिताभ बच्चन यांच्यासोबत ‘स्वच्छ भारत अभियान’ ही जाहिरात करण्याची संधी मिळाली. हे शूटिंग गोरेगावच्या फिल्मसिटी स्टुडिओमध्ये फक्त तीन दिवस होतं. पण मला जणू तीन महिन्यांचा अनुभव मिळाला, खूप काही शिकण्याची संधी अमिताभ अंकल यांना पाहून, त्यांचं निरीक्षण करून मिळाली. त्यांचं व्यक्तिमत्त्व खूपच प्रेरणादायी आहे. सेटवर लहानात लहान असलेल्या मला आणि इतर सगळ्यांना म्हणजे अगदी थेट स्पॉट बॉय ते मेकअप दादा.. या सगळ्यांना ते इतकं आदराने संबोधतात, हे पाहून मी थक्क झाले. टाइमबाबत खूप पर्टिक्युलर आहेत अंकल. दिग्दर्शकांनी त्यांना नुसतं ‘लूक’ देण्यास सांगितलं तरी ते ‘ब्रिफिंग’ घेतात. त्यांच्यातील ती सीनविषयी अधिकाधिक जाणून घेण्याची उत्सुकता मला खूप आवडली. अमिताभ अंकल इतके सीनियर असूनही ते अभिनय करताना त्यात स्वत:ला पूर्ण झोकून देतात. अमिताभ अंकलमुळे माझं अभिनयावरचं प्रेम आणखी वाढलं!”
अदिती, सध्या ‘पुण्यश्लोक अहिल्याबाई’ या मालिकेतला तुझा रोल गाजतोय. तो तुला कसा मिळाला? काम करायच्या आधी तू अहिल्याबाईंंच्या बालपणाबद्दल काही माहिती मिळवलीस का? आणि हो, ‘डेली शो’ म्हणजे अभ्यासाचा खेळखंडोबा.. असं तर होत नाहीए ना?
“मी नेहमीप्रमाणे ऑडिशन दिली आणि अनेक राऊंड्सनंतर सिलेक्ट झाले. माझ्यासाठी ‘पुण्यश्लोक अहिल्याबाई’ हा आयुष्यभराचा खजिना आहे. अहिल्याबाई देशाचे वैभव होत्या. त्यांच्याकडून जितकं शिकावं तितकं कमीच. त्या एक समाजाभिमुख राणी होत्या. ही भूमिका करताना माझ्यातही काही बदल होताहेत, असं मला वाटतं. माझा वाढदिवस ९ सप्टेंबरला असतो. माझ्या बाबांनी मला यंदा खूप आधीच विचारलं की, तुला यावर्षी काय बर्थ डे गिफ्ट हवंय? मी याचा आधीच विचार केला होता. मी बाबांना सांगितलं, ‘बाबा, तुमच्या ड्रायव्हरच्या मुलांच्या शिक्षणाची संपूर्ण जबाबदारी आपण घ्यायची. माझ्या वाढदिवसाचं सेलिब्रेशन म्हणून.’ समाजातील गरीबांना मदत करण्यात आनंद आहे. केवळ स्वतः एन्जॉय करण्यात नाही, हे मला बाल अहिल्येची भूमिका करता करता उमजू लागलं आहे.
अभ्यासाचं म्हणाल तर, या सेटवर जेव्हा शूटिंग नसतं, ब्रेक असतो, तेव्हा मला अभ्यास करण्याची परवानगी असते. जेव्हा जसा वेळ मिळेल तसा मी अभ्यास करते. माझा अभिनय-परफॉर्मन्स उत्तम वठावा यासाठी सगळ्यांची मदत होते. मी देखील सेटवर भरजरी पेहराव, अलंकार, सगळ्यांचा अभिनय, संवादफेक, उच्चार, सेटवरचं माहोल या सगळ्याचं निरीक्षण करते. मला असं वाटतं की, हीच असावी माझी अभिनयाची जर्नी!”
तू अभिनय क्षेत्रात आलीस. तुझा चेहरा घराघरांत लोकप्रिय झाला. तुझ्या शाळेतील शिक्षक, क्लासमेट्स यांची काय प्रतिक्रिया असते?
“मला माझ्या शाळेतील शिक्षक, क्लासमेट्स यांची खूप मदत होते अभ्यासात. ऑनलाइन स्कूल आणि अभ्यासासाठी मी पूर्ण वेळ दिला नाही तरी ॲप आहे. त्यामुळे सगळे अपडेट्स मिळतात मला. सगळ्यांना माझा अभिमान वाटतो.
अलीकडेच मी माझ्या कुटुंबासोबत बाणेर मॉलमध्ये शॉपिंगला गेले होते. दुकानात एका कुटुंबाने मला ओळखलं. त्यांनी मला विचारलं, तूच ना छोटी अहिल्याबाई? मलाही आनंद झाला. अहिल्येच्या भूमिकेमुळे लोक मला ओळखू लागले आहेत. मी होकार देताच माझ्यासोबत फोटो काढले सगळ्यांनी! हे सगळं सुरू असलं तरी मी माझ्या अभ्यासाकडे लक्ष देते. तो मी वेळेवर पूर्ण करते. त्यामुळे अभिनयामुळे माझं नुकसान होतंय, असं मला वाटत नाही.”
तुझ्या जीवनातला अविस्मरणीय प्रसंग कोणता?
“इंस्टाग्रामवर मला आलेल्या एका मेसेजेवरून समजलं की, बंगळुरूमध्ये एक कॅन्सर पेशंट आमचा ‘पुण्यश्लोक अहिल्याबाई’ शो पाहून रिकव्हर होऊ लागला. अहिल्याबाई मालिका पाहून त्याला मिळणारा सकारात्मक आनंद आणि त्यामुळे होत जाणारी त्याची रिकव्हरी हे डॉक्टरांच्या रिपोर्टसह त्याने पोस्ट केलं होतं. खूप आनंद झाला मला.. हा अहिल्याबाईंचा करिष्मा आहे. हा क्षण माझ्या कायम लक्षात राहील!”
पुढे तुला अभिनयातच करियर करायचं आहे का?
“अभिनय करणं खूप आवडू लागलंय मला. पण याच क्षेत्रात पुढचं करियर करायचं का नाही, याचा निर्णय अजून घेतलेला नाही. मी कदाचित समाजसेवा देखील करेन.”
ज्येष्ठ सिने पत्रकार