- समाजमनाच्या ललित नोंदी
- लक्ष्मीकांत देशमुख
ॲडोलसन्स म्हणजे पौगंडावस्था. साधारण दहा ते सतरा वर्षं या वयोगटातील मुलं आणि मुली. या मुलांचं भावविश्व आज शारीरिक, मानसिक, भावनिक, शाब्दिक हिंसेने ग्रस्त आहे. लैंगिकतेविषयीच्या चित्रविचित्र संकल्पनांमध्ये ही मुलं गुरफटलेली आहेत. त्याचा अचूक वेध ॲडोलसन्स या ब्रिटिश मालिकेमध्ये घेण्यात आला आहे.
तो आज जीवनाच्या अशा वळणावर उभा आहे, जिथं त्याचं बालपण अजून रेंगाळतंय आणि तारुण्य खुणावू लागलंय. ही पौगंडावस्था एकाच वेळी मनोहर व रोमांचक असते, तशीच ती संभ्रमात टाकणारी असते. कारण त्या काळात वाटणारं स्त्रीलिंगी आकर्षण! पण जीवनातला हा टप्पा काही मोहक आठवणी मागे ठेवून संपतो. फक्त पालकांनी या काळातली मुलांची मानसिक वादळं आम्ही तुझ्यासोबत आहोत असा विश्वास देत समंजसतेने सांभाळावीत. बस्स!
मी स्वत: जेव्हा टीनएजमध्ये होतो तेव्हा राज कपूरचा ‘मेरा नाम जोकर’ पाहिला होता. शाळकरी राजू सहलीच्या वेळी त्याला आवडणाऱ्या, एक प्रकारे न कळणारी क्रश असणाऱ्या देखण्या टिचरला स्नान करताना पाहतो आणि एक अपरिचित लैंगिक जाणीव त्याच्या मनाला स्पर्शून जाते. काही काळ राजू त्या ‘सेक्श्युअल अवेकनिंग’ने सैरभैर होतो. त्या शिक्षिकेला तिचा प्रियकर राजूच्या संभ्रमित वागण्यामागचं हे कारण समजावून सांगतो.
१९७० चा तो आपल्या मॅनहूड किंवा पुरुषत्वाची जाणीव होण्याचा, कुणाची तरी अनिवार ओढ/क्रश वाटण्याचा आंबटगोड अनुभव आणि किशोरवय ते तरुण होण्यामधला रोमांचक अनुभवाचा कालखंड कुठे आणि आज इंटरनेट व मोबाइलच्या कालखंडात विपुल प्रमाणात सहज उपलब्ध असणाऱ्या टॉक्सिक सेक्श्युअल सामग्रीने विकृत पुरुषी सेक्स जाणिवा, त्यातही टॉक्सिक मस्क्युनॅलिटी/ मर्दानगी जागृत होण्याचा, नकोशा गडद स्मृतीचे ओरखडे उमटवून कोवळेपण नासवून जाणारा कालखंड कुठे?
आज २०२५ मध्ये ‘Adolscense-ॲडोलसन्स’ ही ब्रिटिश वेबसीरिज पाहिल्यावर व आजची आभासी जगात सतत रममाण असलेली पौगंडावस्थेतली मुलं आणि त्यांचं टॉक्सिक सेक्श्युअल मस्क्युलाईन बनलेलं चित्र पाहिल्यानंतर मन सुन्न होतं. आजच्या किशोरवयातील मुलांची स्त्रीकडे पाहण्याची जी मानसिकता झाली आहे, त्याचं प्रतिनिधित्व करणारी ही ब्रिटिश वेबसीरिज आज सबंध जगात चर्चेचा व चिंतनाचा विषय बनली आहे.
मला ‘ॲडोलसन्स’ ही वेबसीरिज पाहताना आजच्या पौगंडावस्थेतील मुलांचं यात दाखवलेलं चित्र सार्वत्रिक आहे की केवळ विकसित जगापुरतं मर्यादित आहे? किती भारतीय मुलं याची शिकार आहेत? हा प्रश्न भेडसावत होता. कारण माझ्या पिढीचं मागील शतकातल्या सत्तर ते नव्वदीच्या दशकातलं निरागस किशोरवयीन बालपण आज किती विषारी व रोगट झालंय हे सुद्धा ही वेबसीरिज दाखवत होती. पाहताना मी हादरून गेलो होतो.
‘ॲडोलसन्स’ या सीरिजमध्ये एक १३ वर्षांचा मुलगा आपल्या वर्गातील एका मुलीचा चाकूचे वार करत निर्घृण खून करतो. कारण ती त्याची गर्लफ्रेंड व्हायला नकार देते. त्याला आपण अजून व्हर्जिन आहोत, याचा न्यूनगंड आहे. त्याला कारण तिथला प्रचलित सिद्धांत. तो असा की, ८० टक्के मुली फक्त २० टक्के मुलांकडे आकर्षित होतात व त्यांच्याशी डेटिंग करतात. आपण या २० टक्के मुलांमध्ये नाही आहोत, या न्यूनगंडाने हा मुलगा पछाडलेला आहे. इंस्टाग्राम, फेसबुकवरील सेक्स संबंधित प्रौढ सामग्री पाहून उफाळून आलेल्या मर्दानगीच्या विकृत कल्पनेने, ज्यात स्त्री ही फक्त वैषयिक वस्तू आहे व तिने नकार देणं म्हणजे आपल्या पौरुष्याचा अपमान आहे, या मानसिकतेतून तो वर्गमैत्रिणीचा खून करतो. सीरिज पाहताना हे ठळकपणे जाणवत होते.
भारतातही आता मोबाइलचा प्रसार खूप झाला आहे व पौगंडावस्थेतील मुलं ‘ॲडोलसन्स’ मालिकेतील मुलाप्रमाणेच विकृत मर्दानगीचे व मुलगी म्हणजे उपभोगाची चीज अशा रोगट मानसिकतेचे बळी ठरताना दिसून येत आहेत. काही वर्षांपूर्वी दिल्लीजवळच्या गुरुग्राम शहरातील एका पॉश इंग्रजी माध्यमाच्या शाळेत गृहपाठ केला नाही म्हणून शिक्षिका रागावल्यामुळे एका नववीच्या मुलाने चिडून ‘तुझ्यावर व तुझ्या याच शाळेत शिकणाऱ्या मुलीवर मी रेप करीन’ अशी धमकी देणारा इमेल पाठवल्याची बातमी प्रसिद्ध झाली होती, तर त्याच शाळेतील दुसऱ्या एका टीनएज मुलाने त्याला आवडणाऱ्या व क्रश असणाऱ्या शिक्षिकेला इमेल पाठवून डेटिंग, जॉयराईड व सेक्स करूया का? असं विचारलं होतं. ठाणे शहरातली अलीकडची बातमी पण अशीच धक्कादायक आहे. एका १४ वर्षीय शाळकरी मुलीवर १६ वर्षीय विद्यार्थ्याने लैंगिक अत्याचार केले व त्यातून ती शाळकरी मुलगी दोन महिन्यांची गर्भवती झाली. त्या मुलाला अर्थातच अटक करण्यात आली आहे.
किशोरवयातील वाढते मुक्त लैंगिक संबंध ही पण आजची मोठी गंभीर समस्या आहे. अमेरिका देश टीनएज प्रेग्नन्सी म्हणजेच बालवयातील गर्भारपण ही समस्या कशी हाताळावी या प्रश्नांचा सामना करत आहे. काही वर्षांपूर्वी प्रशासकीय सेवेत असताना मी काही महिने न्यूयार्क राज्यात होतो. तेव्हा तिथल्या एका शाळेला भेट दिली होती. त्यावेळी तिथले पाळणाघर पाहून नवल वाटलं. फ्री सेक्समुळे शाळेतल्या गर्भवती झालेल्या व तेरा-चौदाव्या वर्षी बालमाता झालेल्या मुलींच्या बाळांचं ते पाळणाघर होते. हा माझ्यासाठी ४२० व्होल्टचा फार मोठा सांस्कृतिक झटका होता.
इंटरनेटच्या ॲडिक्शनचे इतरही भयावह परिणाम होत आहेत. जगापासून तुटत जाणं, एकलकोंडं होणं, सतत नेट-चॅट व आभासी जगात वावरणं, हिंसा व सेक्सने भरलेले व्हिडीओ गेम खेळणं, अभ्यासाकडे होणारं दुर्लक्ष आणि अखेरीस समाजापासून, घर-कुटुंबापासून अलिप्त होत जाणं...हे सारं आज आपण भारतात पण पाहत आहोत. अगदी लहान दोन-तीन वर्षांची मुलं पण मोबाइलसाठी हट्ट करतात, रडतात. हे आता अपवादात्मक राहिलेलं नाही.
इंटरनेटवरील विकृत लैंगिक सामग्रीमुळे आजची मुले अकाली प्रौढ होत चालली आहेत. ती बालपणीच शरीराआधी मनाने तरुण होत चालली आहेत. त्यामुळे त्यांची बौद्धिक वाढ खुंटतेय. ती मोठ्या प्रमाणात असामाजिक होताना दिसताहेत. ही कोणत्याही समाजासाठी व राष्ट्रासाठी फार मोठी हानी आहे. आजची मुलं हीच उद्याचे नागरिक आहेत, ते जर असे मनाने नासलेले व विकृत मानसिकतेचे शिकार झाले तर भविष्यात देश कसा अग्रेसर राहणार?
निसर्गाचा नियम आहे की, प्रत्येक गोष्टीला एक वेळ असते, काळ असतो. पण इंटरनेटवरील पॉर्न साहित्य आणि व्हिडीओमुळे शरीराआधी मन वयात येतंय, तेही शरीरसंबंधातला रोमांच, आकर्षण आणि सहजीवनाची ओढ घेऊन नाही, तर विकृत भोग, ओरबाडून सुख मिळवणं, मला आवडलेल्या मुलीने नकार देता कामा नये, दिला तर ॲसिड हल्ला, बलात्कार किंवा खून करायला मागेपुढे न पाहण्याची विकृत मानसिकता सोबत घेऊन मन वयात येतंय. अनादी काळापासून चालत आलेल्या पुरुषी वर्चस्ववादी संस्कृतीला इंटरनेट युगात अधिक विकृत वळण लागत चाललं आहे. काल सुद्धा स्त्री अशा वर्चस्ववादी मानसिकतेची बळी होती, पण आज त्यात अधिक क्रौर्य, विकृती आणि निर्घृणता आली आहे. आज शाळकरी व किशोरवयीन मुली भयग्रस्त जीवन जगत आहेत. अपवादानेच एखाद्या स्त्रीच्या वाट्याला लैंगिक छळ येत नसेल.
म्हणून ‘ॲडोलसन्स’ ही वेबसीरिज म्हणजे केवळ कलाकृती नाही, तर तो एक आरसा आहे. एक भीषण समस्या तिच्या समग्रतेसह निर्दय प्रामाणिकपणे दाखवली गेली आहे. कोवळ्या निरागसतेचा खून कसलाही धरबंध नसलेल्या इंटरनेट नामक खेळण्यामुळे होत असेल, तर त्यावर काही वाजवी निर्बंध घालायला नकोत? ऑस्ट्रेलिया देशाने १६ वर्षांखालील मुलांनी इंटरनेट किती पाहावं व काय पहावं याबाबतचा कायदा अलीकडेच केला आहे. पण मुलांचा कोवळेपणा व निरागसता जपण्यासाठी पालकांनीच आता पुढे आलं पाहिजे. मुलांना क्वालिटी टाइम दिला पाहिजे. इंटरनेटच्या पलीकडेपण किशोरवयात करण्याजोगं खूप काही आहे. खेळ, प्रवास, व्यायाम, छंद, वाचन, आजोबा-आजींसोबत वेळ घालवणं, समाजकार्य करणाऱ्या संस्था दाखवणं, इतिहास, संविधान, स्वातंत्र्यलढा, विवेक, माणुसकी यांची माहिती देणं आणि एकमेकांना होईल तेवढीच मदत करणं... हे सारं पालकांनीच मुलांना शिकवलं पाहिजे. तरच इंटरनेटची विषारी मगरमिठी सुटू शकेल आणि किशोरवयीन मुलं-मुली वेळेआधीच वाईट अर्थाने तरुण व प्रौढ होणार नाहीत!
ज्येष्ठ साहित्यिक व अ.भा.मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष