- विशेष
- उदय कुलकर्णी
ॲडोलसन्स म्हणजे पौगंडावस्था. साधारण दहा ते सतरा वर्षं या वयोगटातील मुलं आणि मुली. या मुलांचं भावविश्व आज शारीरिक, मानसिक, भावनिक, शाब्दिक हिंसेने ग्रस्त आहे. लैंगिकतेविषयीच्या चित्रविचित्र संकल्पनांमध्ये ही मुलं गुरफटलेली आहेत. त्याचा अचूक वेध ॲडोलसन्स या ब्रिटिश मालिकेमध्ये घेण्यात आला आहे.
'ॲडोलसन्स’ ही ब्रिटिश मालिका मार्च २०२५ मध्ये नेटफ्लिक्सवर दाखल झाली आणि मालिकेने एक वादळच निर्माण केलं. हिंदीतील काही वेगळ्या वाटेवरच्या दिग्दर्शकांनी याची खूप प्रशंसा केली. मराठीमध्येही या मालिकेवर लेख आले आणि ब्रिटनमध्ये तर ब्रिटनच्या पंतप्रधानांनी या मालिकेची दखल घेतली, मालिकेच्या टीमबरोबर संवाद साधला.
या मालिकेत जेमी एडवर्ड मिलर या तेरा वर्षांच्या मुलाची कहाणी आहे. परंतु ती त्याच्यापुरतीच मर्यादित न राहता त्या वयाच्या मुला-मुलींचं एक वेगळं जगच समोर येतं. धक्का बसतो. या गोष्टी आपल्याला माहीत कशा नाहीत, असं वाटून आपण जणू खडबडून जागे होतो.
मालिका फक्त चार भागांची आहे आणि कथानकाबरोबरच यातील अभिनय, दिग्दर्शन, संपादन, रचना-बांधणी आणि छायाचित्रण हे सर्वच विचारपूर्वक केलेलं आहे.
मालिकेच्या पहिल्या भागात दिसतं, की सकाळी सहा वाजता पोलीस अधिकारी व त्यांची टीम जय्यत तयारीनिशी संदेश मिळण्याची वाट बघत आहेत. तो मिळताच पोलीस व्हॅन निघतात. एका घराजवळ थांबतात, त्यातून मास्क घातलेले, हातात बंदुका घेतलेले काही पोलीस उतरतात. घराचं दार फोडून आरडाओरडा करत आत घुसतात. तुमची काहीतरी चूक होतेय, असं घरातील पालक सांगत असतात. पण पोलीस थेट घरातील तेरा वर्षांच्या जेमीच्या खोलीत जातात आणि त्याला खुनाच्या आरोपाखाली अटक करतात.
मुलगा म्हणत असतो, मी काही केलं नाही. त्याच्या पालकांचीही खात्री असते की, काहीतरी चूक झालेली आहे, तर पोलिसांच्या मते मुलाने गंभीर गुन्हा केलेला आहे.
पहिला भाग हा संपूर्णपणे मुलाला अटक करणं ते पोलीस स्टेशनमध्ये बाकीची प्रोसिजर पूर्ण करणं इतकाच आहे. यात त्या मुलाला आरोपी म्हणून असलेले त्याचे हक्क सांगण्यात येतात, नर्सकडून त्याची तपासणी करण्यात येते. एका गाडीतून त्याला पोलीस स्टेशनमध्ये नेलेलं असतं. तो सतत रडत असतो, वडिलांना बोलवा म्हणत असतो. त्याचे आई-वडील, बहीण तिथे येतात. जेमीचे वडील एडवर्ड यांच्या संमतीने सरकारतर्फे जेमीला एक वकील देण्यात येतो.
पोलीस ऑफिसर बॅस्कॉम आणि त्याची सहकारी मिशा यांच्यावर तपासाची जबाबदारी आहे. ते जेमीचे वडील आणि वकील यांच्या उपस्थितीत जेमीचा जबाब घेता-घेता त्यांना एक सीसीटीव्हीचा व्हिडीओ दाखवतात. त्यात जेमी चाकू खुपसून केटी नावाच्या मुलीचा खून करत आहे, असे स्पष्ट दिसत असते. जेमी ते नाकारत राहतो, रडायला लागतो. सुरुवातीला वडील तोंड फिरवतात, मात्र काहीवेळाने ते त्याला जवळ घेतात. दोघं रडतात.
इथे स्पष्ट होतं की, मालिकेत खून असला तरी ही रहस्यमालिका, खून कोणी केला अशा प्रकारची मालिका नाही. कारण खून कोणी केला हे लगेच दाखवलं आहे. एक क्षीण आशा मात्र जरूर असते, की काही चूक झाली असेल. हा निर्दोष असेल.
दुसऱ्या भागात पोलीस अधिकारी बॅस्कॉम आणि मिशा शाळेत जाऊन तपास करतात. टॉमी आणि रायन हे जेमीचे जवळचे मित्र, त्या तिघांचा एक ग्रुपच असतो, त्यातल्या रायनशी ते बोलतात. जेडी ही केटीची जवळची मैत्रीण, तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न पोलीस करतात. परंतु ती खूप संतापलेली असते. बॅस्कॉमचा मुलगा ॲडमही या शाळेत शिकत असतो. मला तुमच्याबरोबर एकांतात बोलायचं आहे, असं तो वडिलांना सांगतो आणि मग तो त्यांची शाळाच घेतो. टीनएज मुलांच्या विश्वातील संकल्पना वडिलांना समजावून सांगताना तो म्हणतो, “तुम्ही चुकीचे अर्थ लावत आहात. इंस्टाग्रामवरच्या संदेशांमध्ये जिथे स्तुती केली आहे, असं तुम्हाला वाचल्यावर वाटतं, त्यात खरं तर त्याला वाईट म्हटलेलं आहे.” ॲडम मग ज्या इमोजी वापरल्या जातात त्याचे अर्थ सांगतो. हार्टच्या इमोजींचा अर्थ ती इमोजी कोणत्या रंगाची आहे त्यानुसार बदलतो. ‘इनसेल’ हा शब्द तिथे वापरलेला आहे. त्याचा अर्थ ‘इन्व्हॉलंटरी सेलिबेट’ म्हणजे इच्छा नसतानाही ब्रह्मचारी असणं. यावर बॅस्कॉम म्हणतो, जेमी तेरा वर्षांचा मुलगा आहे. म्हणजे तो सेलिबेट असणारच, तर त्याचा मुलगा सांगतो, “त्याला पुढेही सेक्स मिळणार नाही, तो व्हर्जिनच राहणार असा त्या इनसेल शब्दाचा अर्थ आहे.” थोडक्यात, शाळेतील या मुलांची भाषाच वेगळी आहे, ती इतर कोणाला कळत नाही. मोठ्यांच्या जगाला तर त्याचा पत्ताही नाही. ही भाषा मुलांनी तयार केली आहे आणि ते ती वापरतात. हे सगळं एका वर्तुळात मर्यादित असल्याने ते एकमेकांशी काय बोलतात, त्यांचे एकमेकांबरोबर काय संबंध आहेत ते बाह्य जगाला कसं कळणार?
मालिकेचा तिसरा भाग अतिशय इंटेन्स आहे. जेमीच्या अटकेनंतर सात महिने होऊन गेलेले आहेत. यात जेमी व त्याच्या मन:स्थितीचा आढावा घेण्यासाठी आलेली सायकॉलॉजिस्ट ब्रायोनी या दोघांमधील संवाद आहे किंवा वाक्युद्ध आहे. जेमी तिच्यावर हावी व्हायला बघत आहे. ती वयाने मोठी, खुर्चीत बसलेली. पण हा एकदा चिडून उभा राहतो, रागात फेऱ्या मारता मारता तिच्या जवळ येऊन उभा राहतो. ‘टॉवरिंग ओव्हर हर’ हा प्रकार कॅमेऱ्यातूनही चपखलपणे दाखवला आहे. कॅमेरा अँगल असा घेतलेला आहे की, तो तिच्यासमोर पॉवरफुल वाटेल. तो तिला आवाज करून घाबरवतोही. तीही हादरून गेलेली दिसते. या भागात आणखी जास्त खुलासा होतो. ज्या केटीचा खून झालेला आहे तिलाही कशाप्रकारे बुलिंग होत होतं, कोणी मुलगा तिचा मित्र व्हायला तयार नव्हता, असे तपशील कळत जातात. तिने जेमीबाबत इंस्टाग्रामवर काय लिहिलं होते, त्यावर आणखी काहीजणांनी काय लिहिलं, ते सारं खूप अपमानकारक होतं, हेही कळतं.
चौथ्या भागात आता जेमीला आतमध्ये ठेवून तेरा महिने झालेले आहेत. त्याचे आई-वडील आणि जेमीची बहीण यांच्यावर या घटनेचा झालेला परिणाम यावर हा पूर्ण भाग आहे. या भागाची सुरुवात होते तेव्हा वरवर हे कुटुंब शांत, आनंदी आहे, असं वाटतं. नंतर कळतं की, ते आतून किती दुःखी आहेत. ते सारखा हा एकच विचार करत आहेत की, मुलाला वाढवण्यात आपण कुठं कमी पडलो? आई सांगते, तो शाळेतून आला की थेट त्याच्या रूममध्ये जायचा, दरवाजा बंद करून बसायचा. संवाद जणू थांबल्यासारखा झाला होता.
आजच्या व्यक्तिवादी काळात मुलांना घरातही स्पेस व प्रायव्हसी हवी असते. परंतु ती कुठपर्यंत द्यावी? त्यावर काही कंट्रोल नको का? मुलं बंद दाराआड काय करतात बघायला नको का? असे अनेक प्रश्न या वळणावर उभे राहतात, मात्र त्याचबरोबर जेमीची सतरा वर्षांची बहीण लिसा समजूतदारपणे वागत आहे. ती आई-वडिलांना चुकीचे निर्णय घेऊ देत नाही, योग्य मार्गावर ठेवते. वडील म्हणतात, हिलासुद्धा तर आपणच वाढवलं. ही मुलगी इतकी चांगली वाढली, तर मुलाचं असं कसं झालं?
यात जेमी मिलर या मुलाचे काम ओवेन कुपर याने केलं आहे. आपल्याला मालिका बघताना एवढा त्रास होतो, तर भूमिका साकारताना या मुलाची काय अवस्था झाली असेल? असा प्रश्न पडतो. मालिकेच्या निर्मात्यांनी एक ऑनलाइन प्रेस कॉन्फरन्स घेतली होती. त्यात त्यांनी माहिती दिली की, शूटिंगच्या दरम्यान त्यांनी कायम बालमानसतज्ज्ञ बरोबर ठेवला होता. सीन झाला की तो मुलगा लगेच स्विंग बॉल खेळायला पळायचा! शिवाय निर्मात्यांनी मालिकेचा तिसरा भाग सर्वात आधी शूट केला. म्हणजे जो सर्वात कठीण भाग आहे तोच आधी शूट करून घेतला.
जॅक थोर्न व स्टिफन ग्रॅहम हे या मालिकेचे निर्माते व लेखक आहेत. फिलिप बारन्तिनी दिग्दर्शक आहेत. एडवर्ड म्हणजे वडिलांच्या भूमिकेत स्टिफन ग्रॅहम, ब्रियोनीच्या भूमिकेत एरीन डोहर्ती आहे.
ज्या गोष्टींची आपल्याला माहिती नाही त्या होतच नाहीत, अस्तित्वात नाहीत, असं सर्वसाधारणपणे मानलं जातं. पौगंडावस्थेतल्या मुलांचं जगही हे असं आहे. आपल्याला ते माहीत नाही, म्हणून ते अस्तित्वात नाही, असं नाही. या जगात काय खळबळ चालली आहे, त्याची चाहूल मोठ्यांनी घेणं आवश्यक आहे.
माध्यमविश्वातील घडामोडींचे अभ्यासक