आडवाटेवरील गुप्त ठेवा; गरम पाणी, मंदिर आणि नदी

कोकणाच्या डोंगररांगांमध्ये लपलेलं, निसर्गचमत्कार आणि इतिहासाची सांगड घालणारं राजवाडी गाव म्हणजे आडवाटेवर सापडलेलं एक अनमोल रत्न. गरम पाण्याची कुंडं, अद्भुत नदी आणि प्राचीन मंदिर यामुळे हे गाव अनुभवायलाच हवं.
आडवाटेवरील गुप्त ठेवा; गरम पाणी, मंदिर आणि नदी
Photo : trip.com
Published on

डोळस भटकंती

मुक्ता नार्वेकर

कोकणाच्या डोंगररांगांमध्ये लपलेलं, निसर्गचमत्कार आणि इतिहासाची सांगड घालणारं राजवाडी गाव म्हणजे आडवाटेवर सापडलेलं एक अनमोल रत्न. गरम पाण्याची कुंडं, अद्भुत नदी आणि प्राचीन मंदिर यामुळे हे गाव अनुभवायलाच हवं.

तुम्ही कोकणातील ‘राजवाडी’ या गावाविषयी ऐकलंय का? राजवाडी हे रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील सुंदर गाव. डोंगरांच्या पायथ्याशी, जंगलाच्या सान्निध्यात हे गाव वसलंय. रत्नागिरीच्या किनाऱ्यापासून साधारण ५० ते ६० किमी लांब असून बरंच आतमध्ये हे गाव आहे. कोकणची आडवाटेवरची भटकंती करत असाल तर हे ठिकाण बघितलंच पाहिजे. कोकण म्हणजे निळाशार समुद्र, त्यावर तरंगणाऱ्या होड्या, लांबलचक समुद्रकिनारा हे चित्र डोळ्यांपुढे येतं. कोकणची ही खलाटीची बाजू म्हणजे खालची समुद्रकिनाऱ्याची बाजू सर्वश्रुत आहे, पण वलाटीकडच्या म्हणजे वरच्या बाजूच्या डोंगररांगांच्या सान्निध्यातही काही रत्नं दडली आहेत. राजवाडी हे त्यापैकीच एक.

राजवाडी गावात मी अगदी लहान असल्यापासून जात आहे. आमचे मूळ गाव राजवाडीच्या बाजूलाच आहे धामणी म्हणून. त्यामुळे अनेकदा मी राजवाडीत आले आहे. या गावाला छोट्या छोट्या टेकड्यांनी कुशीत घेतलंय. भवानीगडावरही या गावातून जायला वाट आहे. एक सुंदरशी नदीही गावातून वाहते. नेहमीच्या गावाप्रमाणे वाटणाऱ्या सर्व गोष्टी या गावात आहेत, पण राजवाडीला वेगळेपण प्राप्त झालं आहे गावातील या तीन अद्भूत ठिकाणांमुळे.

संगमेश्वरात मी आमच्या गावी असले की, राजवाडीला आणि त्या तीन अद्भूत ठिकाणांना अजूनही आवर्जून भेट देते. या तिन्ही ठिकाणांकडे जाण्यासाठी गावात एक सुंदर पाखाडी आहे, जी झाडाझाडांतून, शेतातून वळसे घेत जाते. पाखाडी म्हणजे पायऱ्यांची वाट. थोडीशी गूढ वाटणारी ही वाट. सहसा या वाटेवर फार कोणी नसतं. उतरताना केवळ आपल्या पावलांचा आणि सुकलेली पानं पायाखाली चुरडल्याचा आवाज येतो.. ही शांत आणि निसर्गदर्शन घडवणारी पाखाडी उतरली की, समोर पहिलं अद्भुत ठिकाण दिसतं. एका कौलारू घरासदृश जागेतून पाण्याच्या वाफा वर वर जात हवेत विरताना दिसतात. हे आहे राजवाडीतील गरम पाण्याचं कुंड.

या कुंडाला जांभ्याचा वापर करून वाड्यातील चौकाप्रमाणे बांधलं आहे. मध्ये गरम पाण्याचे कुंड, चारी बाजूने खांब आणि त्यावर कौलांचे छप्पर. कुंडाचा बरोबर वरचा चौकोनी भाग मात्र वाफ जाण्यासाठी मोकळा ठेवला आहे. त्यातून आकाशाचं प्रतिबिंब कुंडात पडतं आणि पाणीही निळंशार दिसतं. कुंडाच्या बाजूलाच स्नान करता येईल अशी जागा आहे. या कुंडाच्या भवताली भातशेतीची खाचर आहेत. फणसाची, आंब्याची मोठी झाडं आहेत. सकाळी आलात तर चिक्कार पक्षी इथे दिसतात. त्यांच्याच कूजनाने परिसर मंतरलेला असतो. हा गोड आवाज कान देऊन ऐकला ना की, आपल्या आवाजानं हे मंतरलेपण भंग होऊ नये असं वाटतं. असा हा परिसर फारच सुंदर आहे; त्यामुळे एखादं चित्रच जिवंत झाल्यासारखं वाटतं.

या कुंडातील पाणी बाराही महिने गरम असतं. जमिनीतून गरम पाण्याचे उमाळे येत असतात.. बुडबुडे येत असतात.. काही जणांच्या मते, गंधकामुळे हे पाणी गरम आहे. काहीजण भूशास्त्रीय कारणही सांगतात. इथल्या पाण्याने अंघोळ केल्यावर त्वचाविकार दूर होतात, असंही ऐकण्यात आलं.

या ठिकाणच्या माझ्या बालपणीच्या अनेक आठवणी आहेत. माझे आजोबा गंमत म्हणून रुमालात तांदूळ बांधून आणायचे आणि तो रूमाल काठीला बांधून कुंडात धरून ठेवायचे. काही वेळातच तांदळाचा मऊसूत भात झालेला असायचा. ही छोटीशी गोष्ट आहे, पण आम्हाला याचं फार कौतुक वाटायचं.

आम्ही घरातून येतानाच तांब्या-बादली घेऊन यायचो. कुंडातील गरम गरम पाणी काढायचो आणि मस्त अंघोळ करायचो. त्या पाण्याने अंघोळ केल्यावर भूक अशी सणकून लागायची की, घरी गेल्यावर चिकनच्या सागुतीवर ताव मारायचो आणि नंतर आम्हाला अगदी बाळसं धरल्यासारखं व्हायचं. दिवसाढवळ्याच पडवीत गाढ झोपून जायचो.

इतक्या आठवणी आहेत इथल्या की, हे ठिकाण मला कधीच परकं वाटत नाही. इथे एकदा गावातील काकू भेटल्या होत्या. त्यांनी सांगितलं की, 'फक्त इथेच गरम पाणी नाही येत; तर गावात विहीर खणली, नळ लावला तरी गरमच पाणी येतं.' त्यांनी पुढे हेही सांगितलं की, 'नदीकडे जाऊन उभी रहा. एक पाय गरम पाण्यात असेल आणि एक गार पाण्यात. हे सांगून काकू त्यांचं काम करायला निघून गेल्या. माझं मात्र कुतूहल चाळवलं. अशी नदी नसतेच कुठे, काकूंना काहीतरी गैरसमज झाला असेल, असे मनात पुटपुटत मी नदीकडे जाऊन पोहोचले. पाय सावरत नदीत हळूहळू उतरले. पाण्यात बघते तर नदीतल्या मातीतून बुडबुडे येत होते. जिथे बुडबुडे येत आहेत तिथे पाय ठेवला तर तिथल्या दगडांचा पायाला चटका बसला आणि त्या जागेतील पाणीही गरम होतं. तिथून थोडं दुसऱ्या बाजूला गेले तर पाणी गार होतं. काकूंना गैरसमज वगैरे काही झाला नव्हता, तर मीच निसर्गाला ठोकताळ्यात बघत आहे असं जाणवलं. ही नदी म्हणजे या गावातील दुसरं अद्भुत ठिकाण.

तिसरं अद्भूत ठिकाण गरम पाण्याच्या कुंडाच्या समोरच आहे. कौलारू, अत्यंत देखणं आणि ४०० ते ५०० वर्षं जुनं असं भगवान शिवशंकराचं मंदिर. श्री सोमेश्वर मंदिर. मंदिराच्या बाजूने जुनी तटबंदी, छोटे प्रवेशद्वार आणि ओवऱ्या आहेत. मंदिराच्या प्रांगणात भव्य अशी दीपमाळ आहे. या मंदिराची अशी रचना पाहिली, प्रशस्त आवार पाहिला की मनात येतं, हे मंदिर त्याकाळचं एखादं मुख्य ठिकाण असेल का? प्रवासी इथे विश्रांतीसाठी थांबत असतील का? हे मंदिर भवानीगडाच्या पायथ्याशी आहे. संगमेश्वर ते राजापूरचा हा हायवे पूर्वीच्या काळी व्यापारी मार्ग होता. कदाचित त्याकाळी लोकं इथे मंदिरात संध्याकाळी थांबत असतील आणि पुढचा प्रवास करत असतील.

कोकणातील मंदिरांसारखंच हे मंदिर बाहेरून दिसत असलं तरी या मंदिराचं वेगळेपण दिसते सभामंडपात आणि गाभाऱ्यात. सभामंडप शेणाने सारवलेला, बसण्यासाठी तिन्ही बाजूने दगडी कट्टे आणि सुबक कोरीव काम केलेल्या लाकडी खांबांनी सजलेला असा आहे. पुराणातील देवदेवतांची चित्रं, गंडभेरुंड पक्ष्याचं चित्र या लाकडी खांबांवर आणि त्यांच्या महिरपीवर काढलेलं आहे. या मंदिरातील गाभारा बघून आपण अत्यंत विलक्षण मंदिर बघत आहोत, असंच वाटतं. आपल्यासामोर एक गाभारा नसतो, तर एकावर एक बांधलेले दोन गाभारे दिसतात. यातल्या खालच्या गाभाऱ्यात शिवपिंड आहे आणि वरच्या गाभाऱ्यात नाग धारण केलेली गणपतीची मूर्ती. गाभाऱ्यात प्रवेश करायला मनाई आहे. लांबूनच दर्शन घ्यावं लागतं. पण खालच्या गाभाऱ्यातून वरच्या गाभाऱ्यात जाण्यासाठी आतून पायऱ्या आहेत, अशी माहिती मिळाली. खरंच अशी मंदिरं दुर्मीळ आहेत.

कोकणची आडवाटेवरची भटकंती करताना अशी विलक्षण मंदिरं बघता येतात. निसर्गसंपदेसोबतच निसर्ग चमत्कार बघायला मिळतात. अशी ठिकाणं राजवाडीत एकाच ठिकाणी आहेत. मुंबई-गोवा महामार्गावरून प्रवास करत असाल तर वाट थोडी वाकडी करून राजवाडीचं हे वैभव नक्की अनुभवा. n

ट्रॅव्हल व्लॉगर

muktanarvekarofficial@gmail.com

logo
marathi.freepressjournal.in