पाऊलखुणा
बुद्ध मूर्तींचा विकास हीनयान व महायान परंपरेच्या प्रवासातून झाला. कनिष्काच्या राजाश्रयामुळे या बौद्ध मूर्ती कलेला मोठी प्रेरणा मिळाली. गांधार व मथुरा शैलीतून निर्माण झालेल्या बुद्ध मूर्ती म्हणजे सौंदर्य, करुणा आणि शांतीचा मूर्त रूपातील अनुभव. शिल्पकलेतील अद्वितीय सौंदर्यदृष्टी हे बुद्ध मूर्तींचे वैशिष्ट्य. या मूर्तीं केवळ धार्मिक प्रतिक नसून, त्या प्राचीन भारतीय कलासंस्कृतीचा समृद्ध ठेवा आहेत.
सन २००१. अफगाणिस्तानातील बामियानचा डोंगराळ भाग. येथील दऱ्यांमध्ये कोरलेल्या दोन प्राचीन बुद्ध मूर्ती तालिबानने उद्ध्वस्त केल्या. बुद्धांच्या मूर्ती क्रूरपणे अक्षरशः डायनामाइटने उडवून देत ही बाब जगाला लाईव्ह दिसेल, याचीही व्यवस्था तालिबानने केली होती. या मूर्ती अंदाजे सहाव्या शतकातील आणि जगातील सर्वांत उंच बुद्ध मूर्तींपैकी एक होत्या. युनेस्कोच्या वर्ल्ड हेरिटेज यादीत या मूर्तींचा समावेश केलेला होता. पण ही बाबही तालिबानच्या विध्वंसक वृत्तीपासून मूर्तींना वाचवण्यास असमर्थ ठरली. धर्मवेड हे किती जहरी आणि घातक असू शकते, याचा सगळ्या जगापुढे हा पुरावाच मांडला गेला. तालिबानच्या दहशतवादी वृत्तीने केवळ मूर्तींचीच नव्हे, तर मानवतेची मोठी हानी केली. या मूर्ती म्हणजे बौद्ध धर्मातील अहिंसेच्या तत्त्वज्ञानाचे प्रतीक होत्या आणि त्यांचा असा नाश म्हणजे सांस्कृतिक व ऐतिहासिक ठेव्याचा विनाश होता. या मूर्तींचे ऐतिहासिक आणि कलात्मक महत्त्व अनन्यसाधारण होते.
बामियान हे मध्य अफगाणिस्तानातील प्राचीन अवशेषांसाठी विशेषत: बुद्धमूर्तीसाठी प्रसिद्ध असलेले स्थळ. बामियानच्या आसपासचा प्रदेश हा एकेकाळी बौद्ध धर्माचा समृद्ध प्रदेश होता, याचे दाखले तर इतिहासात ठायी ठायी पाहायला मिळतात. अनेक बुद्धमूर्ती, लेणी आणि भित्तिचित्रांच्या गुंफा असा वारसा गांधारदेशात उभारला गेला होता. इ.स. नंतरच्या पहिल्या शतकात, बामियान प्रदेशाच्या उत्तरेला असलेल्या बाल्ख राज्यात, कुशाण टोळ्यांची सत्ता होती. कुशाण राजांनी बौद्ध धर्म स्वीकारल्यामुळे साहजिकच बौद्ध धर्माला या सर्व प्रदेशात प्रोत्साहन मिळाले. गांधारच्या प्रदेशात ग्रीक, रोमन व भारतीय शैलीचा संगम घडून जी नवी शिल्पकला विकसित झाली तिला ‘गांधार शैली’ असे म्हटले जाते. गांधार शैलीचा विकास होण्यापूर्वी हिनयान पंथात बुद्धमूर्तींचा अभाव दिसून येतो. प्रारंभिक बौद्ध शिल्पकलेच्या इतिहासात बुद्ध मूर्तीं सापडत नाहीत. कारण तथागत भगवान बुध्द स्वतः आपल्या मूर्ती पूजेच्या विरोधात होते. इसवी सन पूर्व ४८४ मध्ये बुद्धांच्या महापरिनिर्वाणानंतरही त्यांच्या मूर्ती निर्माणाची कोणतीही परंपरा स्थापित झालेली नव्हती. बुद्धांच्या महापरिनिर्वाणानंतर तब्बल पाचशे वर्षांनी त्यांची शिल्प बनायला सुरुवात झाली.
ग्रीको बुद्धिस्ट मूर्ती
कुषाणांच्या काळातच बुद्ध मूर्ती बनविण्यास प्रारंभ झाला. सम्राट कनिष्काच्या काळापर्यंत स्तूप, चैत्य, विहार, बोधीवृक्ष इत्यादी चिन्हांनी भगवान गौतम बुद्धांचे जीवन सूचित केले जात असे. काळानुरूप त्यामध्ये बदल होत गेले. भगवान गौतम बुद्ध हे दया, क्षमा, शांती या मूल्यांचे पुरस्कर्ते म्हणून ओळखले जातात. गांधार कलेच्या अंतर्गत ज्या बुद्धमूर्ती तयार करण्यात आल्या, त्यामध्ये त्यांचे हे गुण त्यांच्या चेहऱ्यावर दाखवण्याचा प्रयत्न गांधार मूर्तीकारांनी केला. बुद्धमूर्तीच्या चेहऱ्यावर प्रेम, करूणा आणि वात्सल्य या भावना दाखविल्या. पारदर्शकता हे या शैलीचे खास वैशिष्ट्य आहे. गांधार शैलीत गौतम बुद्धांचे केस कुरळे दाखवून ते डोक्यावर आंबाड्यासारखे बांधले. चेहऱ्यावरील मधुरभाव, वस्त्रांच्या चुन्या, नक्षीकामाचे बारकावे या सर्वांचे वस्तुनिष्ठ चित्रण गांधार कलेतून दिसून येते. कनिष्काने दिलेले प्रोत्साहन आणि राजाश्रय यामुळे गांधार कलेचा विकास घडून आला. गांधार शैली मुख्यतः भारतीय उपखंडातील आधुनिक पाकिस्तान आणि अफगाणिस्तानच्या सीमाभागात विकसित झाली. यामध्ये ग्रीक-रोमन प्रभाव स्पष्ट दिसतो. बुद्ध मूर्ती ग्रीक देवतांप्रमाणे वस्त्रधारी, लांब केस, आणि नाक-डोळ्यांत यूरोपीय वैशिष्ट्ये असलेली दिसतात. यामुळे या मूर्तींना 'ग्रीको-बुद्धिस्ट' प्रकार म्हणतात.
महायान परंपरेतील मूर्तिपूजा
बौद्ध परंपरेमध्ये हीनयान आणि महायान असे दोन महत्त्वाचे पारंपरिक भेद आहेत. पहिल्या परंपरेमध्ये मूर्तिपूजा नसल्याने स्तूप किंवा बुद्धाची पावले, बोधिवृक्ष यांची पूजा प्रतीकात्मक रूपात केली जात होती. तर नंतर महायान परंपरेमध्ये मूर्तिपूजा पहायला मिळते. बुद्ध मूर्तीची उत्पत्ती कालांतराने झाली. बुद्धांच्या प्रतिमा आधी त्याच्या मूर्तीच्या रूपात नव्हत्या. बुद्धांच्या जीवनकथेतील प्रसंगांचे प्रतीक म्हणून ‘धम्मचक्र’, ‘पदचिन्ह’, ‘बोधीवृक्ष’, ‘सिंहासन’, ‘छत्र’ इत्यादी चिन्हे वापरली जात. विशेषतः अशोकाच्या स्तंभांवर आपण अशा प्रतीकांचा उल्लेख पाहतो. यामध्ये बुद्धाचे शरीररूप दर्शवले जात नसे, तर त्यांच्या उपदेशांचे प्रतीकात्मक दर्शन घडवले जात असे. प्रारंभीच्या हीनयान बौद्ध संप्रदायात मूर्तिपूजा नव्हती. गौतम बुद्धांचे दर्शन केवळ त्यांच्या उपदेशांतून आणि प्रतीकांतून केले जात असे. पण कालांतराने महायान बौद्ध संप्रदायात मूर्तीची पूजा स्वीकारली गेली. या संप्रदायाने बुद्धाला केवळ तत्वज्ञ नव्हे, तर दैवत रूपात मानले. यानंतर बुद्ध मूर्तींच्या निर्मितीला चालना मिळाली.
मथुरा कलाशैलीतील मूर्ती
कुषाण काळात गांधारशिवाय मथुरा, अमरावती, सारनाथ ही कलेची प्रमुख केंद्रे होती. या ठिकाणी कुषाण काळात बुद्ध व बोधिसत्वाच्या अनेक मूर्ती, स्तूप व बौद्ध विहारे बांधण्यात आली. मथुरा हे कुषाणकालीन भारतातील बौद्ध कलेचे प्रमुख केंद्र होते. थुरा प्रदेशात सापडलेल्या मूर्तीकलेला ‘मथुरा कला शैली’ म्हणून ओळखले जाते. मथुरा कलाशैलीवर भारतीय कलेचा प्रभाव दिसून येतो. मथुरेतील बुद्ध प्रतिमा पूर्वीच्या यक्ष प्रतिमांच्या आधारावर तयार करण्यात आली. लाल दगडाचा वापर हे या कलेचे महत्त्वाचे वैशिष्ट्य. या शिल्पांच्या चित्रणासाठी ठिपके असलेला वाळूचा खडक हे माध्यम वापरले गेले. या शैलीतही विविध परंपरांचा संगम घडून आला असला, तरी मुख्य प्रभावस्त्रोत हा भारतीय कलेचा होता. मथुरा येथील स्थानिक शिल्पकलेची परंपरा उत्तर भारतातील इतर भागांमध्ये पसरली. मथुरा कला शैलीत बुद्ध प्रतिमांच्या जोडीला जैन तीर्थंकार व हिंदू देवतांच्या मूर्तीही घडवल्या गेल्या.
कनिष्क नाण्यांवर बुद्ध प्रतिमा
कनिष्काने बौद्ध धर्मास राजाश्रय दिल्याने बुद्धांच्या सुंदर मूर्तींचा विकास झाला. बौद्ध धर्म प्रसारासाठी या शिल्पांमध्ये कलात्मकता आणताना सौंदर्यावर भर दिला गेला. कनिष्काच्या काळात बौद्ध कलेच्या निर्मितीमुळे व कनिष्काने गांधार शैलीस आश्रय दिल्यामुळे भारतीय कलेच्या विकासाला चालना मिळाली. कनिष्काच्या काही नाण्यांवर बुद्धांची प्रतिमा कोरलेली आहे. अशा नाण्यांवर ग्रीक लिपीतील उल्लेख आहे. या नाण्यांमधून प्रथमच राजकीय आणि आर्थिक व्यवहारांतही प्रतिमेच्या माध्यमातून बुद्धांचा समावेश झाला. गांधार शैलीच्या प्रभावाचा चीन, तुर्कस्थानपासून पूर्वेकडे प्रसार झाला. तसेच या कलेने चीन व जपानी कलांना प्रभावित केले. त्यामुळे बुद्धमूर्तीची जडणघडण निरनिराळ्या देशांत वेगवेगळ्या शैलींनुसार झाल्याचे दिसून येते. ग्रीक कलाकारांनी आपल्या कल्पनेप्रमाणे इ.स.च्या पहिल्या शतकात उपलब्ध असलेल्या मूर्तीवर आधारित धर्मोपदेश करणाऱ्या बुद्धांची प्रतिमा गांधार शैलीप्रमाणे तयार केली, तर सारनाथ येथील किंवा श्रीलंकेतील अनुराधपुर येथील ध्यानस्थ बुद्धाची मूर्ती तेथील कलाकारांनी आपापल्या कल्पनांप्रमाणे तयार केली. येथील कलाकारांना ध्यानस्थ बुद्धाची प्रतिमा जास्त महत्त्वाची वाटल्याने त्यांनी त्याप्रमाणे मूर्ती तयार केल्या.
rakeshvijaymore@gmail.com