नोंदवही
अपर्णा पाडगावकर
अहिल्याबाई होळकर यांचं त्रिजन्मशताब्दी वर्ष सुरू आहे. एक राणी, एक धार्मिक स्त्री ही अहिल्याबाई यांची सर्वसाधारण ओळख आहे. पण अहिल्याबाईंचं कार्यकर्तृत्व अधिक मोठं आहे. स्त्रीसबलीकरणाची बीजं त्यांच्या कार्यकाळात रोवली गेली. म्हणूनच मातृशक्तीचा जागर करताना अहिल्याबाईंची पुन्हा नीट ओळख करून घ्यायला हवी.
अहिल्याबाई म्हटलं की डोळ्यांसमोर उभी राहते ती पांढऱ्या साडीतली, कमीतकमी आभूषणं ल्यालेली, हातात छोटी शंकराची पिंडी घेतलेली सोज्वळ मूर्ती. आपल्याला हेच सांगण्यात आलेलं असतं की, ती कशी धार्मिक वृत्तीची स्त्री होती, तिने किती देवळं उभारली, घाट-धर्मशाळा बांधल्या...क्वचित कधी शाहीर अनंतफंदी यांची गोष्टही सांगितली जाते की जेव्हा त्यांनी अहिल्याबाईंवर खंडकाव्य लिहिण्याचा मनोदय बोलून दाखवला तेव्हा बाईंनी त्यांना ईशस्तुती करणारी कवनं लिहिण्याचा सल्ला दिला. त्यानुसार लावण्या व कवनं लिहिणारे फंदी नंतर कीर्तनं करू लागले.
धार्मिक वृत्तीने जगणारी बाई म्हणजे परंपरेला धरून राहणारी..सत्शील म्हणजे कुणालाही प्रश्न न विचारणारी, घरसंसार सांभाळणारी..अहिल्याबाईंचा संसार एका राज्याइतका मोठा होता, इतकंच. अहिल्याबाई होळकर म्हटलं की हा एक आदिबंध आपल्या मनात सहज तयार होतो. तो तसा होण्यातच पारंपरिक समाजव्यवस्थेचं यश दडलेलं असतं.
वर उल्लेख केलेली अनंतफंदी यांचीच गोष्ट पाहू. या अनंतफंदी यांचं दरोडेखोरांच्या टोळीने एकदा अपहरण केलं आणि त्यांच्याकडे खंडणी मागितली. कवी बिचारे कुठून खंडणी देणार? तेव्हा दरोडेखोरांनी अहिल्याबाईंकडे खंडणीची मागणी केली आणि बाईंनी ती पुरवलीही, कारण ही आपली रयत आहे, म्हणून. किती सात्विकपणा हा..!
अहिल्याबाईंचं मोठेपण हे की त्या एवढ्यावरच थांबल्या नाहीत. या दरोडेखोरांचा उपद्रव वाढतच चालला होता. अठराव्या शतकाच्या उत्तरार्धात राजकारण फारच पेटलं होतं आणि शाही सैन्य बराच काळ मोहिमेवर असे. त्याचाच फायदा घेऊन या काही टोळ्या आपली पोळी भाजून घेत होत्या. बाईंनी मग रयतेलाच आवाहन केलं की याचा बंदोबस्त जो करेल त्याला सरदारकी बहाल करण्यात येईल. यशवंतराव फणसे नावाचा तरुण होतकरू मुलगा पुढे आला आणि त्याने या टोळ्यांचा बंदोबस्त केला. बाईंनी त्याला सरदारकी तर दिलीच, पण आपल्या मुलीचं, मुक्ताचं लग्नही त्याच्याशी लावून दिलं. आपले गुण-कौशल्य जाणून त्याला योग्य वाव देणारा असा बॉस मिळावा, ही आज अनेकांची इच्छा असेल. पण मुलीचं लग्न..?
आजही कुळ-घराणं बघूनच सोयरिकी जुळवणारा आपला समाज. होळकरांचं घराणं तर तेव्हा देशभरात आब राखून असलेलं. कोणत्याही राजघराण्यात त्यांना मुलीची सोयरिक करता आली असती. पण अहिल्याबाईंनी जावई निवडला तो केवळ कर्तृत्व बघून. जो स्वतःच्या बुद्धी-मनगटाने कर्तृत्व सिद्ध करतो, त्याच्यावर स्त्रीचा मान राखण्याचीही जबाबदारी अहिल्याबाईंनी टाकली. किती हा काळाच्या पुढचा विचार..
अहिल्याबाईंनी ज्या ज्या गोष्टी आपल्या आयुष्यात केल्या त्या सगळ्या आजच्या स्त्रीमुक्ती अभियानाचा ओनामाच म्हणता येतील.
सती प्रथेला विरोधाची सुरुवात
अहिल्याबाई सती गेल्या नाहीत, ही गोष्ट सगळ्यांना माहीतच आहे. त्याचं श्रेय आपण मल्हारराव होळकरांना देतो, ते योग्यही आहे. मल्हाररावांच्या त्या कृतीमागे निःसंशय राज्याच्या हिताचा विचार होता. त्यावेळी खंडेरावाच्या चितेवर अन्य नऊ स्त्रिया सती गेल्याचे उल्लेख सापडतात. सतीप्रथा बंद करण्याचे थेट प्रयत्न झाल्याचे दिसत नाहीत. ब्राह्मणी धर्मव्यवस्थेचा आणि राजपुतानी जोहर परंपरेचा पगडा या काळात महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर होता. अर्थात या गोष्टीला कायद्याचं रूप देता आलं नसतंच. मात्र अहिल्याबाईंनी सती जाणं बंद व्हावं म्हणून वैयक्तिक पातळीवर खूप प्रयत्न केले. धर्मव्यवस्थेचा दाब एवढा प्रचंड होता की, अहिल्याबाईंना स्वतःच्या मुलीचं आणि सुनेचं सती जाणंही थांबवता आलं नाही. त्यांच्या सुनेवर सती जाण्यासाठी तिच्या माहेरच्यांनी दबाव टाकला, तर मुक्ताला वाटलं की आपल्या अंगी आपल्या आईएवढं सामर्थ्य नाही की आपण समाजाला एक विधवा म्हणून तोंड देऊ शकू.. केवढा मोठा पराभव हा. त्या काळातील धार्मिक प्रभावाचा विचार करता, हाती राजसत्ता असूनही त्यांना सतीविरोधाचा कायदा करता आला नाही, हे खरं. मात्र, आपल्या दुःखावर मात करत अहिल्याबाई सतीप्रथा थांबवण्यासाठी आपल्या परीने लोकांशी बोलत राहिल्याच. सतीप्रथा-बंदीचा कायदा पुढे ब्रिटिश राज्यात १८२९ साली झाला खरा. पण त्याची पायाभरणी करायला अहिल्याबाईंनी सुरुवात केली होती, असे म्हणायला हरकत नाही.
स्त्री सैन्याची उभारणी
अहिल्याबाईंनी स्त्रियांच्या सैन्याची उभारणी केल्याची गोष्ट आपल्याला माहीत आहेच. तख्ताधीन पेशव्यांच्या खुनाबद्दल बदनाम रघुनाथराव पेशव्यांना खिजवणारी म्हणूनच ही गोष्ट आपल्याला माहीत असते. ही केवळ काही स्त्रियांना लष्करी प्रशिक्षण देण्याची बाब नव्हती, तर त्या निमित्ताने स्त्रियांमध्ये आत्मबल जागे करणारी ही घटना होती. ज्या काळाच्या पार्श्वभूमीवर ‘घाशीराम कोतवाल’सारखे- जिथे स्त्रीचा वापर पुरुष आपल्या स्वार्थासाठी करतो, असे नाटक लिहिले गेले, त्याच काळात मराठी राज्याच्या एका भागात अहिल्याबाईंनी महिलांची सेना उभी केली आणि तिचा समर्थ वापरही केला, ही घटना भारतीय स्त्रीसबलीकरणाच्या पटावर सर्वात प्रथम मांडली जायला हवी. त्यानंतर सुमारे ऐंशी वर्षांनंतर १८५७मध्ये झाशीच्या राणीने आपल्या महिलाप्रधान सैन्यासह एल्गार केला, त्याची ही पार्श्वभूमी कशी विसरता येईल?
सारा भरण्यासाठी सातबारा उतारा किंवा इंदुरी साड्यांच्या उद्योगाची प्रेरणा, युद्धासाठी स्फोटके निर्मितीचा कारखाना या साऱ्यामागे रयतेच्या भलाईचा विचार राज्यकर्त्यांना किती वेगवेगळ्या मार्गांनी करता येतो, हे अहिल्याबाईंनी दाखवून दिलं. कुशल राजकारणी तर त्या होत्याच, उत्तम समाजकारणीही होत्या. पण त्याहून काही अंगुळं अधिक त्या एक स्वाभिमानी स्त्री होत्या. एकूणच स्त्रीच्या आत्मसन्मानाचा विचार त्यांच्या मनात कायम होता आणि त्यासाठी त्यांनी नात्याची किंवा राजकारणाची पर्वा कधीच केली नाही.
भारतीय महिला सबलीकरणाच्या त्या आद्य पुरस्कर्त्या होत्या, असंच म्हटलं पाहिजे.
मालिका-सिनेमांच्या निर्मात्या व ललित लेखक