

साधक-बाधक
क्रांती गोडबोले-पाटील
लहान मुलांच्या चेहऱ्यावर प्रौढांचे भाव, अस्खलित संवाद आणि वास्तवासारखे भासणारे व्हिडीओ-एआयने हे सगळं शक्य केलं आहे. तंत्रज्ञानाची ही करामत थक्क करते; मात्र त्याच वेळी सत्य आणि आभास यांच्यातली रेषा कुठे उरली आहे, हा प्रश्नही निर्माण करते.
आजकाल सोशल मीडियावर लहान मुलांच्या चेहऱ्याचे, त्यांच्या तोंडी भन्नाट पंच असलेले आणि मोठ्यांसारखे अस्सल हावभाव करणारे एआय (AI) व्हिडीओ जे धुमाकूळ घालत आहेत. सध्या जगाच्या पाठीवर जिथे नजर टाकावी, तिथे एकच एक शब्द घुमतो आहे- एआय (AI) अर्थात कृत्रिम बुद्धिमत्ता. या कृत्रिम बुद्धिमत्तेच्या रंगमंचावर आज प्रत्येकानेच आपापला मुखवटा चढवला आहे. माहितीचा अथांग समुद्र, पैशांच्या पावसामुळे ओलसर झालेली नवी बाजारपेठ आणि प्रत्येक मोबाईलच्या स्क्रीनवर चाललेला हा 'एआय-एआय'चा गजर. सोशल मीडियाची पानं उघडली की, एक अत्यंत मजेशीर पण तितकाच अद्भूत नजराणा दिसतो- लहान मुलांचे ते कोवळे, निरागस चेहरे, पण त्यांच्या देहबोलीत आणि वागण्यात मात्र एखाद्या अनुभवी प्रौढाचा आव. हे कोणतं मायाजाल आहे, कोणती जादू आहे जी या पोरक्या चेहऱ्यांवरून हसू आणि विस्मय दोन्ही गोळा करते? अकोल्याच्या तेल्हारा तालुक्यामधील शेरी वडणेर गावातून वऱ्हाडी बोलीत रील गाजवणारे शिव सपकाळ यांसारखे तरुण याच मायेच्या जोरावर आज आपल्या फोनच्या टॅबवरून महाराष्ट्राच्या घराघरांमध्ये पोहोचले आहेत.
शेतीत घाम गाळत, नोकरीची कसरत करत, वेळेच्या कोपऱ्यात बसून या तरुण मंडळींनी स्वतःच्या हिमतीवर हे जग शिकून घेतलं आहे. असे अनेकजण आहेत. चॅटजीपीटीवर कथा लिहिणं, जेमिनीच्या माध्यमातून दहा-दहा सेकंदांचे तुकडे जोडणं आणि वऱ्हाडी लहेजातल्या अस्सल शब्दांना त्या डिजिटल पात्रांच्या ओठांवर बसवणं हा सगळा प्रवास पाहिला की थक्क व्हायला होतं. हजार रुपयांच्या मोबाईल रिचार्जमध्ये मिळणारे हे तंत्रज्ञान आज प्रत्येकाच्या खिशात उपलब्ध आहे. शिव सपकाळ सांगतात तसं, "आपण जसा प्रॉम्प्ट देऊ, तशीच ती AI कला बोलते. जर का तुम्हाला असे काही व्हिडीओ बनवायचे तर सगळ्यात आधी मोबाईलवर किंवा टॅबवर जेमिनी किंवा चॅटजीपीटीसारख्या एआय टूल्सचा वापर करून मनातल्या विचारांना किंवा एखाद्या भारी जोकला शब्दांत बांधायचं. यात फक्त संवाद लिहून चालत नाही मंडळी, तर तो मुलगा बोलताना गालातल्या गालात हसतोय, रागवतोय की टोचून बोलतोय, हे कंसात इंग्रजीत किंवा हव्या त्या भाषेत अगदी बारकाईने सांगावं लागतं, कारण हेच त्याचे हुकमी प्रॉम्प्ट्स असतात. एकाग्रतेने दिलेली ही आज्ञा वाचून एआय स्वतःहून त्या पात्राचा चेहरा, कपडे आणि बॅकग्राऊंड अगदी हुबेहूब उभी करतो, ज्यासाठी वेगळा फोटो शोधायची काहीच गरज पडत नाही. आजकाल मोबाईलच्या काही खास रिचार्जेसमध्ये ही सुविधा सहज हाती येते आणि एआय अचूक १० सेकंदांचा एक छोटा व्हिडीओ तुकडा तयार करून देतो, ज्यामध्ये ओठांची हालचाल आणि चेहऱ्यावरचे हावभाव इतके अस्सल वाटतात की बघणारा थक्क होतो. अशा अनेक भाषेत हे व्हिडीओ असतात आणि प्रत्येकाचा लहेजा वेगळा असतो. आता अडचण अशी असते की एआय एका वेळी फक्त दहा सेकंदांचाच व्हिडीओ देतो,
पण आपल्याला तर मोठा व्हिडीओ हवा असतो, मग त्यासाठी मी अशाच पद्धतीने दहा-दहा सेकंदांचे दोन-तीन तुकडे बनवून ते सेव्ह करतो. हे सगळे छोटे तुकडे मोबाईलमधील इन्शॉटसारख्या एखाद्या भारी व्हिडीओ एडिटिंग अॅपमध्ये एकत्र आणून फेविकॉलसारखे जोडून एकसंध करून आणि शेवटी त्याला मस्त पार्श्वसंगीत आणि तो अस्सल वऱ्हाडी टोन देऊन अंतिम रूप देतो. बस, मग काय ! हा धमाकेदार व्हिडीओ वऱ्हाडी कट्टा या इन्स्टाग्राम आणि फेसबुक पेजवर धुमाकूळ घालण्यासाठी पूर्णपणे तयार होतो !"
प्रक्रिया कळली तरी यामध्येसुद्धा पेशन्स पाहिजे, कारण दरदिवशी साधारणतः कमी बजेटमध्ये ३ व्हिडीओ AI बनवून देतो. मग पुढील प्रक्रिया होते. पण हे सारे व्हिडीओ पाहत असताना एक अनामिक हुरहूर मनाला घेरून टाकते. तिथेच थांबून ते रील पाहिलं जातं तेव्हा वाटतं हा ट्रेंड नाही, तर मानवी मेंदूच्या कल्पनाशक्तीचं एका नव्या आणि अज्ञाताच्या प्रवासात झालेलं स्थानांतरण आहे. आपण जेव्हा एखाद्या बालकाच्या तोंडून राजकारणावर, संसारावर किंवा दैनंदिन त्रासावर भारी जोक ऐकतो, तेव्हा आपल्याला हसू येतं; पण त्या हसण्यामागे एक तंत्रज्ञानाचं नियंत्रण असतं, ही जाणीव आपल्याला थोडीशी पोरकी करून सोडते.
या सगळ्या चकाकीच्या मागे एक खोल अंधारही दडलेला आहे. एआयचे हे व्हिडीओ पाहताना जेवढं मनोरंजन होतं, तितकीच ती एक भयानक भविष्याची चाहूल असते. आज लहान मुलांच्या तोंडून जे बोलवलं जातं, उद्या कोणत्याही मोठ्या नेत्याच्या, विचारवंताच्या किंवा सामान्य माणसाच्या तोंडी हुबेहूब बसवून दिशाभूल करता येऊ शकते. 'डीपफेक'चा हा महापूर मानवाच्या अस्मितेला आणि सत्याला गिळंकृत करायला पाहतोय. कोण खरं आणि कोण खोटं, हे ठरवण्याची क्षमता आता मानवी डोळ्यांची राहिलेली नाही. तंत्रज्ञानाचा हा अफाट विस्तार जसा मनोरंजनासाठी वरदान ठरतोय, तसाच तो नैतिकतेच्या आणि सुरक्षिततेच्या संदर्भात एक महाभयंकर शाप बनण्याची शक्यता नाकारता येत नाही. तंत्रज्ञानाच्या या अथांग समुद्रात पोहत असताना, 'तंत्र माणसाच्या सेवेसाठी आहे की माणसालाच तंत्राचे गुलाम बनवण्यासाठी?' हा प्रश्न वारंवार मनाला चटका लावून जातो. आजचं तंत्र आपल्याला डोळ्यांसमोर सर्वकाही खरं भासवून एक आभासी जग तयार करून देतं, जिथे सत्याची व्याख्याच बदलून जाते.
अर्थकारणाच्या दृष्टीने विचार केला तर हा खेळ अगदीच स्वस्त आणि मस्त वाटू लागला आहे. हजार-सहाशे रुपयांचे शुल्क आणि हातात एक टॅब किंवा मोबाईल यांच्या जोरावर आज कुठलाही तरुण खेड्यापाड्यात बसून जागतिक पातळीवरील प्रेक्षकांशी संवाद साधू शकतो. दुकानांच्या जाहिराती, चित्रपटांचं प्रमोशन आणि त्यातून मिळणारा अल्पसा आर्थिक आधार अनेकांना या जगाकडे खेचून घेत आहे. यूट्यूबच्या कडक अटी किंवा इन्स्टाग्रामचे अल्गोरिदम यांच्यासोबत चाललेला हा लढा म्हणजे जणू एका नव्या युद्धाचं रणशिंगच आहे. मात्र, या आर्थिक झगमगाटात आपण स्वतःचं मूळ मानवीपण गमावून बसलो तर नाही ना, ही शंका मनातून जात नाही. आजवर कलेची निर्मिती वेदनेतून, अनुभवातून आणि जगण्याशी दोन हात करताना होत असे; पण आता ती सर्जनाची जागा अल्गोरिदमच्या कोडिंगने आणि शब्दांच्या अचूक सूत्रांनी घेतली आहे. जेव्हा एखादा तरुण खेड्यात बसून व्यवसायासाठी किंवा मनोरंजनासाठी एआयचा वापर करतो, तेव्हा त्याला मिळणारा पैसा तात्पुरता सुखावणारा असतो, पण तो त्याच्या जगण्यातील अस्सल संघर्षाला आणि कष्टाला किती दूर नेतो, याचा विचार कोण करतो?
या प्रवासात प्रश्न असा पडतो की, यापुढे एआय अजून काय काय घेऊन येणार आहे? आज जे व्हिडीओ दहा सेकंदांचे दिसतात, उद्या ते पूर्ण चित्रपट बनवतील.
कदाचित उद्याचा इतिहास हा मानवाने लिहिलेला नसून, मशीनने वर्तवलेल्या शक्यतांचा संग्रह असेल. कवी बा. सी. मर्डेकरांच्या किंवा इतर संवेदनशील मनांच्या ओळींची आठवण यावी तसं आजचं हे चित्र आहे- जिथे 'माणूस आणि यंत्र यांच्यातील रेषा धूसर होत चालली आहे.' मराठी साहित्यात जसं माणसाच्या वेदनेला वाचा फोडली जाते, तिथे आता तंत्रज्ञानाद्वारे भावनांचं ढोंग उभं केलं जात आहे. या तंत्रज्ञानाच्या रंगात सगळी दुनिया रंगून जात असताना, एक गोष्ट मात्र नक्की आहे की, माहितीचा हा महापूर आपल्याला ज्ञानी बनवण्याऐवजी एका अशा आभासी जगात घेऊन चालला आहे, जिथे प्रत्येक चेहरा आपलासा वाटतो, पण कोणीच ओळखीचं नसतं. शंकांचं हे काहूर आणि प्रश्नांचं हे जाळं आपल्याला एकाच गोष्टीची साक्ष देते प्रगतीच्या या वेगाला आवळणारा अंकुश जर वेळीच सापडला नाही, तर माणसाची अस्मिता या कृत्रिम रंगात कायमची विरघळून जाईल.
आता या संपूर्ण प्रवासाच्या पसाऱ्यात एकच विचार मनात येतो, तो म्हणजे मानवाचं खरेपण आणि यंत्राची करामत यांच्यातील ही दरी भविष्यात कशी सांधली जाईल ? शिव सपकाळ यांच्यासारखे तरुण आपल्या मेहनतीने या तंत्रज्ञानाचा वापर करून जग जिंकत असले, तरी या आभासी मुखवट्यामागचं खरं मानवी हास्य आपल्याला कधी शोधता येईल का? तंत्रज्ञानाचा स्वीकार करणं चुकीचं नाही, कारण प्रगतीचं पाऊल मागे घेता येत नाही; पण त्या पावलांच्या ठोक्यात मानवी हृदयाची धडधड कायम ठेवणं हीच आपली खरी परीक्षा आहे. जोवर माणूस आपल्या मातीशी, आपल्या भाषेशी आणि आपल्या संवेदनशील मनाशी जोडलेला आहे, तोवर तो या यंत्रांचा गुलाम होणार नाही. पण जर ही सगळीच पिढी अशीच एआयच्या रंगात रंगत गेली, तर उद्याची दुनिया ही माणसांची न राहता फक्त कोड आणि अल्गोरिदमची होऊन जाईल, जिथे नात्यांचे अर्थ कागदावर नव्हे तर स्क्रीनवर शोधावे लागतील.
krantip 183@gmail.com