

विचारपान
संदीप प्रधान
एआय तंत्रज्ञान मानवी उणीव भरून काढण्यासाठी मदत करत असले, तरी निनादसारख्या मुलांनी यंत्रालाच नात्याची जागा दिल्यास ते उत्तराऐवजी नव्या मानसिक प्रश्नांचा गुंता निर्माण करेल. प्रगतीसाठी एआयचा वापर करताना मानवी भावना आणि प्रत्यक्ष नात्यांचे अस्तित्व नाकारले गेले, तर तंत्रज्ञान हे विज्ञानाचे वरदान न ठरता सामाजिक विरक्तीचे कारण ठरेल.
ऑक्सफर्ड विद्यापीठातील एआयचे प्राध्यापक मायकेल वुलव्रिज यांनी एका भाषणात सांगितले की, सेंटर फॉर डेमॉक्रसी अँड टेक्नॉलॉजीने केलेल्या एक पाहणीत २०२५ मध्ये जवळजवळ एक तृतीयांश विद्यार्थ्यांनी आपले एआयसोबत प्रणय संबंध असल्याचे मत नोंदवले. कंपन्या एआयला मानवासारखे सादर करणार असतील व माणसे माणसांऐवजी एआयला माणसांचा पर्याय समजू लागली तर भविष्यात मानवी जीवनात प्रचंड गुंतागुंत निर्माण होणार आहे. एआय उत्पादने करणाऱ्या कंपन्या आपल्या उत्पादनांकरिता विधिनिषेधशून्य वर्तन करन असून एआयच्या निर्मितीचा मूळ विचार आणि प्रत्यक्षात जे निर्माण झाले आहे त्यात जमीनअस्मानाचा फरक असल्याचे वुलव्रिज यांनी म्हटलंय.
नवी दिल्लीत भारत मंडपम येथे जगातील एआय कंपन्यांची एआय इम्पॅक्ट समिट २०२६ सुरू झाली. भारताने एआयच्या क्षेत्रातील वापरकर्ता नव्हे तर निर्माता व्हावे, असे सरकारला वाटते. या समिटमध्ये सहभागी कंपन्यांनी आपापली उत्पादने लोकांसमोर सादर केली. येथील रोबो मानवी क्षमतांपेक्षा कित्येक पटीने झटपट कामे करताना पाहून अनेकांनी तोंडात बोटं घातली. या बदललेल्या जगातील स्पर्धेत कोण टिकणार, कोण बाहेर फेकला जाणार, याचे केवळ अंदाज बांधण्याखेरीज आता आपल्या हाती काही नाही. एआयमुळे भीषण स्वरूपाची बेरोजगारी येणार, असे छातीठोकपणे सांगणारे जसे आहेत तसेच एआय नव्या रोजगार निर्मितीला चालना देणार, असा दावा करणारेही आहेत. टीव्ही आल्याने रेडिओ संपला नाही, संगणक आल्याने नोकऱ्या गेल्या नाहीत, ओटीटी आल्याने चित्रपट निर्मिती थांबलेली नाही, असा युक्तिवाद एआयमुळे बेरोजगारी येणार नाही, असे सांगणारे करतात. मात्र एआयमुळे काहींचा रोजगार जाणार हे पूर्णपणे नाकारता येणार नाही.
एआयमुळे २०३० पर्यंत ८० दशलक्ष रोजगार जाण्याची भीती असली, तरी प्रत्यक्षात ९२ दशलक्ष नव्या संधी निर्माण होऊन रोजगाराच्या कक्षा अधिक विस्तारणार आहेत. आता ग्लास अर्धा भरलेला आहे की अर्धा रिकामा आहे हे तुम्ही कुठली बाजू पाहणार त्यावर अवलंबून आहे. जो कुणी एआयमधील नवनवीन प्रगतीशी जुळवून घेऊ शकणार नाही, त्याची नोकरी जाणार. सायबर सिक्युरिटी, डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन, डिजिटल मार्केटिंग या क्षेत्रातील नोकऱ्या वाढणार आहेत. एखाद्याने एआयच्या मदतीने कविता तयार केली तर ती प्रतिभावान कवीच्या कवितेएवढी प्रभावी असणार नाही. त्यामुळे मानवी प्रतिभा ही नेहमीच एआयच्या पुढे राहील. मात्र जी व्यक्ती बेसिक पातळीवर आहे तिला एआयमुळे निश्चित फटका बसणार आहे.
प्रत्यक्षात एआयच्या क्षेत्रात आपण बरेच पिछाडीवर आहोत. चीन व दक्षिण कोरियाने बरीच आघाडी घेत अमेरिकेलाही मागे टाकले आहे, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. फेसबुक, व्हॉट्सअॅप, इन्स्टाग्राम याचे भारतीय मोठ्या संख्येने वापरकर्ते आहेत. सोशल मीडियाच्या वापरामुळे लोकांच्या मानसिकतेवर विपरीत परिणाम होत असल्याचे सुप्रसिद्ध मानसोपचारतज्ज्ञ व लेखक शैलेश उमाटे सांगतात. डिजिटल अरेस्ट किंवा सेक्सॉर्टनच्या प्रकरणात अडकलेल्यांमध्ये तीव्र स्वरूपाचे डिप्रेशन जाणवते. एकटेपणा ही मानसिक आजाराची जननी आहे. सोशल मीडियावर नकारात्मक वावर असलेल्यांत मानसिक आजाराची लक्षणे दिसतात, असे उमाटे म्हणतात. एआयवरील अवलंबित्वामुळे मेंदूच्या कामकाजावर भविष्यात विपरीत परिणाम होऊ शकतो. अटेन्शन डेफिझीट हायपर अॅक्टिव्हीटी डिसऑर्डर (एडीएचडी) या आजाराचे रुग्ण वाढतील. एआयमुळे क्रिएटीव्ह थिंकिंग कमी होणार. एआयच्या सल्ल्याने आजारावर उपचार केले किंवा काही लक्षणांवरून आजाराचे निदान करण्याचा प्रयत्न केला तर लोकांचा जीव जाऊ शकेल.
एआयने आपल्या आयुष्याचा अधिकाधिक भाग व्यापल्यावर कायदेशीर गुंतागुंत होणार आहे, असे सुप्रसिद्ध कायदेतज्ज्ञ व आंतरराष्ट्रीय राजकारणाचे अभ्यासक अॅड. प्रदीप पाटील सांगतात. पाटील म्हणतात की, कायदा ही संज्ञा मानवी संस्कृतीशी निगडित आहे. कायदा स्थितीशील नसतो. अन्यथा तो नष्ट होतो. दिवाणी व फौजदारी दोन कायदे असून जे दिवाणी नाही ते फौजदारी, अशी विभागणी आहे. कुठल्याही फौजदारी गुन्ह्यात आरोपीला शिक्षा करताना आरोपीचे मन दोषी असणे (गिल्टी माइंड) व वाजवीपेक्षा जास्त दाब देणे (अॅक्टसरियस) या दोन बाबी विचारात घेतल्या जातात. एआयच्या प्रगत होण्यानंतर दोषी मन नेमके कुणाचे ? ज्याने एआय अॅप बनवले त्याचे की ज्याने त्याचा वापर केला त्याचे ? असा मुद्दा उपस्थित होणार. यामुळे कायदा ढवळून निघेल. विदा (डेटा) चोरी, गैरवापर याचे दावे वाढतील. मानवकेंद्रित कायद्याचे स्वरूप एआय केंद्रित करावे लागेल. सध्याचा इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी कायदा भविष्यातील या बदलांकरिता प्रभावी नाही.
अलीकडेच प्रदर्शित झालेल्या 'उत्तर' या चित्रपटात एआयवर काम करत असलेला इंजिनिअर मुलगा निनाद आपल्या आईच्या उमाच्या आवाजात संवाद साधणारे 'अनमिस' हे यंत्र तयार करतो. आईच्या अकाली निधनानंतर त्याच्यासमोरील अनेक प्रश्नांची उत्तरे हे एआय यंत्र देते, अशी चित्रपटाची मध्यवर्ती कल्पना आहे. येथवर ठीक आहे, पण भविष्यात एखादा निनाद खऱ्या जिवंत आईला विसरून आपल्या कुठल्याच गोष्टीला नकार न देणाऱ्या एआय यंत्रालाच आई समजू लागला तर मग एआय हे उत्तर न राहता नवनवे प्रश्न निर्माण करील हे नक्की!
pradhansandeep19@gmail.com