

अजब निसर्ग
मकरंद जोशी
निःस्वार्थपणे सावली, फळे, अन्न आणि प्राणवायू देणारी झाडे म्हणजे निसर्गाची सर्वात मोठी देणगी. त्यांच्या अद्भुत जीवनप्रवासाची ओळख करून घेऊ या.
माणसांच्या मूलभूत तीन गरजा म्हणजे अन्न, वस्त्र, निवारा. या गरजा पूर्ण करण्याची क्षमता आणि संपन्नता निसर्गातील एकाच घटकाकडे आहे आणि तो घटक म्हणजे वनस्पती. आपल्या अवतीभवती गवतापासून ते महाकाय वृक्षांपर्यंत वेगवेगळ्या आकाराच्या, प्रकारच्या वनस्पती सहज बघायला मिळतात आणि म्हणूनच बहुदा त्यांचे निसर्गातील वैशिष्ट्यपूर्ण, एकमेवाद्वितीय स्थान आपल्या पटकन लक्षात येत नाही, पण शेतात धान्य उगवायचं बंद झालं, झाडांना फळं लागणं थांबलं, कापसासारख्या गोष्टी देणारी झाडे नष्ट झाली आणि झाडांपासून मिळणारं लाकूड मिळणं बंद झालं तर माणसांच्या जगात किती हलकल्लोळ माजेल याचा विचारही करवत नाही. निसर्गाच्या या चक्रामध्ये फक्त आणि फक्त वनस्पतीच अशा आहेत ज्या स्वतःचे अन्न स्वतः तयार करू शकतात. त्यामुळेच त्या एकमेव स्वयंपूर्ण घटक आहेत. आपल्या पृथ्वीवरील जीवसृष्टीची चाहूल लागली तीच मुळी महासागरात निर्माण झालेल्या शेवाळ्यापासून, त्यामुळे तशाही अर्थाने वनस्पती सगळ्या सजीव सृष्टीतल्या वयाने सर्वात मोठ्या ठरतात. पण आज आपण ज्या रूपात वनस्पती बघतो, म्हणजे मातीत गाडली गेलेली मुळे, वरती भरभक्कम खोड, त्याला फुटलेल्या फांद्या, फांद्यांना असलेली पाने, फुले आणि फुलांची होणारी फळे अशा रूपात पहिल्या वनस्पती नव्हत्या. साधारण ५० कोटी वर्षांपूर्वी सागरातले जीव जमिनीवर येऊन जगायचा प्रयत्न करत होते, त्याच सुमारास सागरातील वनस्पतींनीही आपला मोर्चा जमिनीकडे वळवला होता. त्या काळातली म्हणजे सुमारे ४४ कोटी वर्षांपूर्वीची झाडे आजच्यासारखी उंच आणि सशक्त नव्हती. ती केवळ काही सेंटीमीटर उंचीची असायची, कारण आजच्या झाडांसारखी त्यांना पोषक द्रव्ये, पाणी वाहून नेणारे अवयव नव्हते. आणखी एक मजेदार गोष्ट म्हणजे त्या काळात जमिनीवर बुरशीचं जंगल होतं. वीस-बावीस फुटांपेक्षा जास्त उंच वाढणारी बुरशी तेव्हा जमिनीवर सगळीकडे पसरलेली होती. त्यामुळे पहिल्या वनस्पतींना या बुरशीशी स्पर्धा करावी लागली. त्या काळातल्या वनस्पतींना फुलं येत नसत. त्यामुळे बीज प्रसारासाठी फळंही नव्हती. या वनस्पती आपला बीज प्रसार स्पोअर्स म्हणजे बिजाणूंमधून करत असत. आज त्या गटातली सर्वत्र दिसणारी वनस्पती म्हणजे फर्न अर्थात नेचा.
सपुष्प म्हणजे फुलं येणाऱ्या वनस्पती पृथ्वीवर उगवल्या त्या सुमारे तेरा-चौदा कोटी वर्षांपूर्वी. त्याच सुमारास कीटकही निर्माण झाले होते. त्यामुळे मग वनस्पतींची आणि किटकांची गट्टी जमली ती तेव्हापासूनच. जगभरातल्या किटकांपैकी सुमारे दोन ते तीन लाख प्रकारचे कीटक-फुलपाखरं, माश्या, ढाल किडे, पतंग परागीभवनाचं काम करतात आणि त्यामुळे आपल्याला अन्न मिळतं. वनस्पतींच्या जातींपैकी सुमारे ७०% प्रकारच्या वनस्पती परागीभवनासाठी कीटक आणि अन्य प्राण्यांवरच अवलंबून असतात. तरीही निसर्गात कीटक भक्षी वनस्पतीही पाहायला मिळतात.
वनस्पती आपली जागा सोडू शकत नाहीत, इतर सजीवांप्रमाणे त्या हालचाल करत नाहीत, पण तरीही त्या आपापसात संवाद साधतात. वनस्पतींच्या मुळाशी, जमिनीच्या खाली ‘मायकोरायझल’ या बुरशीचं जाळं असतं. या बुरशीच्या माध्यमातून झाडं एकमेकांना संदेश पाठवतात. त्याबदल्यात या बुरशीला झाडाच्या मुळांकडून पाणी आणि अन्य पोषक द्रव्ये मिळतात. एकमेकांशी गप्पा मारणाऱ्या झाडांना इतर प्राण्यांप्रमाणे आठवणी साठवून ठेवायला मेंदू नसतो, पण त्यांचा एक स्मृती कोष असतो. नव्याने झालेल्या संशोधनात असं आढळून आलं आहे की, झाडं भूतकाळातील पर्यावरणाची आठवण ठेवून आपल्यात काही बदल घडवून आणतात. या संशोधनानुसार जमिनीतल्या पाण्याचा तुटवडा जाणवू लागला की झाडं पूर्वी जे केलं होतं ते आठवतात आणि पाण्याची बचत करायला आपल्या पानांवरची छिद्रे बंद करून घेतात. त्यामुळे मग पाण्याचे बाष्पिभवन होणे थांबते आणि झाडात जमवलेलं पाणी साठवलं जातं. झाडांचा सगळ्यात मोठा फायदा म्हणजे त्यांच्यामुळे हवेची शुद्धता आणि गुणवत्ता कायम वाढत असते. झाडांमध्ये क्लोरोफील म्हणजे हरित द्रव्य असतं आणि ती फोटो सिंथेसिस म्हणजे प्रकाशसंश्लेषण करून आपलं अन्न तयार करतात. हे करताना झाडं सूर्यप्रकाश आपल्या हरितद्रव्यात शोषून घेतात. त्यामुळे तयार झालेल्या ऊर्जेच्या मदतीने मग ते जमिनीतून मिळालेल्या पाण्याचे विघटन करून हायड्रोजन आणि ऑक्सिजन वेगळा करतात. यातला ऑक्सिजन ते बाहेर सोडतात आणि हवेतला कार्बनडाय ऑक्साइड शोषून त्याच्या मदतीने आपले अन्न तयार करतात. त्यामुळे झाडांकडून ऑक्सिजन हवेत मिसळण्याची क्रिया जवळपास सतत सुरू असते. जगभरातल्या सगळ्या झाडांकडून वर्षभरात हवेतला सुमारे दोन दशलक्ष टन कार्बनडाय ऑक्साइड शोषला जातो असा अंदाज आहे. त्यामुळे हवामान बदलाचे दुष्परिणाम कमी करण्यासाठी झाडेच प्रभावीपणे मदत करतात. म्हणून झाडे वाचवली-वाढवली पाहिजेत.
अन्य सजीव प्राण्यांची एक विशिष्ट आयुर्मर्यादा असते तशी वनस्पतींना नसते. प्राणी जसे वयोवृद्ध झाल्याने मरण पावतात तशी झाडं म्हातारी होऊन मरत नाहीत. त्यामुळेच पृथ्वीवर हजारो वर्षांची जुनी झाडं पाहायला मिळतात. मात्र जसजसं झाडांचं वय वाढत जातं, तसतसा त्यांचा आकारही वाढत जातो आणि त्यामुळे मग पाण्याचा तुटवडा, रोग, नैसर्गिक आपत्ती यामुळे अशी झाडे मरण्याचा संभव अधिक असतो. झाडे प्राण्यांसारखी म्हातारी होत नाहीत. कारण त्यांच्यामध्ये एरिस्टिमॅटिक टिश्यूज असतात. माणसांच्या शरीरात असलेल्या स्टेम सेल्सप्रमाणे हे टिश्यूज असतात. या टिश्यूजचं सतत विघटन होत असतं आणि नवीन टिश्यूज तयार होत राहतात. त्यामुळे जणू झाडांना नवतारुण्य मिळत राहतं. मात्र वयाने वाढलेल्या झाडाची प्रतिकारशक्ती मंदावते, त्यामुळे कीटक, बुरशी, पाण्याची कमतरता आणि हवामानातील तीव्र बदल याच्याशी मुकाबला करण्याची त्यांची ताकद कमी होते. त्याचप्रमाणे वयाने वाढलेल्या झाडाची उंची जसजशी वाढत राहते, तसतसं मुळांना झाडाच्या अगदी वरच्या भागाला पाणी आणि अन्य पोषक द्रव्ये पोहोचवणं कठिण जाऊ लागतं. त्यामुळे मग अनेकदा उंचच उंच वाढलेल्या झाडाच्या अगदी वरच्या फांद्या सुकतात. जगातलं बी पासून रुजून वाढलेलं, एकटं सर्वात वयोवृद्ध झाड हे पूर्व कॅलिफोर्नियात आहे. इथल्या व्हाइट माऊंटन परिसरात असलेल्या या ज्येष्ठ पाइनच्या झाडाला ‘मेथुसेलाह’ म्हणतात. कारण या झाडाचं वय ४८५७ वर्षे आहे. म्हणजे या पृथ्वीवर इजिप्तमधले पिरॅमिड्स उभारण्याच्याही आधीपासून हे झाड अस्तित्वात आहे. झाडांचं विश्व खरोखरच विचित्र आहे, मात्र त्यांच्याशिवाय निसर्गाचं चित्र अपुरंच आहे हे विसरता कामा नये.
निसर्ग अभ्यासक व लेखक
makarandvj@gmail.com