

बालोद्यान
एकनाथ आव्हाड
बाळू-शमी शाळेतून संध्याकाळी घरी आले. घरात शिरल्यावर पाहतात तर काय, बैठकीच्या खोलीत एका कोपऱ्यातील टेबलावर छान पुस्तकं मांडून ठेवली होती. बाळू म्हणाला, “बाबा, कपाटातली ही पुस्तकं अशी मांडून का ठेवलीत?”
“अरे, हा माझा वाचनकट्टा आहे. आता मी ठरवलंय, महिन्याभरात ही इथे डोळ्यांसमोर असलेली पाच पुस्तकं आपण वाचून काढायची. ती वाचली, की मग पुढील महिन्यात नवीन पुस्तकं इथे आणून ठेवायची. मग तीही पुस्तकं वाचून काढायची. अरे, लहानपणी मी खूप पुस्तकं वाचायचो. पण आजच्या धावपळीत वाचनासाठी वेळ देणं फारसं जमतच नाही मला. पण आता मी मनाशी निर्धार केलाय, आपल्या या वाचन छंदासाठी आपण वेळ काढायचाच. आजकाल कामाच्या जबाबदारीने माझा वाचनाचा छंद जपणं, जोपासणं हल्ली कठीण होत चाललंय. व्हॉट्सॲप, फेसबुक आणि इतर सोशल मीडियावरही माझा अधिक वेळ खर्च होतोय, हेही लक्षात आलंय माझ्या. म्हणूनच मी तयार केलाय हा वाचनकट्टा. रिकाम्या वेळी मोबाईल हातात घेण्याऐवजी मी आता पुस्तक हातात घेणार आणि ते वाचून काढणार. तुम्हीही घेत जा घरात असल्यावर एखादं पुस्तक हातात.”
बाळू पटकन म्हणाला, “अहो बाबा, आम्हाला रोज शाळेचा किती अभ्यास असतो. पाठ्यपुस्तकं वाचायलाच आम्हाला वेळ कमी पडतो; मग गोष्टींची पुस्तकं वाचायला वेळ कुठून मिळणार?”
“चांगल्या गोष्टींसाठी वेळ हा मिळत नसतो बाळू. तो काढावा लागतो.”
शमी पटकन म्हणाली, “पण बाबा, शाळेचा गृहपाठ, प्रकल्प, उपक्रम आणि पाठांतर करता-करताच आम्ही दमून जातो. मग गोष्टींची पुस्तकं वाचण्यासाठी आणखी वेळ कसा काढणार?”
आईला मुलांचं बोलणं ऐकून वाईट वाटलं. ती म्हणाली, “अरे मुलांनो, आवड असली की सवड आपोआप मिळते. एकदा का तुम्हाला वाचनाची गोडी लागली की बघा चमत्कार, तुम्ही भान हरपून पुस्तकं वाचणार आणि शाळेचा अभ्याससुद्धा करणार.”
बाबा लगेच म्हणाले, “आणि हे वाचन तुमच्या अभ्यासाला पूरकच ठरणार, हे नक्की लक्षात ठेवा. अरे, मी सहावीत असताना शाळेच्या ग्रंथालयातून नवीन पुस्तक घरी आणलं की तहानभूक हरपून ते पुस्तक आधाशासारखं वाचून काढायचो. माझ्या लहानपणी मी खूप पुस्तकं वाचलेली आहेत. सुधाकर प्रभू यांचं ‘लग्नघरात राजू प्रधान’, भा. रा. भागवतांचं ‘फास्टर फेणे’, मालती दांडेकर यांचे ‘दिपूला भेटली जलपरी’, लीलावती भागवतांचं ‘चिट्टू पिट्टूचा पराक्रम’, डॉ. विजया वाड यांचं ‘बंडू बॉक्सर’, गिरिजा कीर यांचं ‘झंप्या’... अशी कितीतरी पुस्तकं वाचल्याचं आजही आठवतंय मला आणि आता आपल्या घरात मी विकत घेतलेली, पण अजून न वाचलेली अशी बरीच पुस्तकं आहेत. त्यातीलच काही पुस्तकं मी या वाचन कट्ट्यावर मांडून ठेवली आहेत. सुट्टीच्या दिवशी व फुरसतीच्या वेळी या पुस्तकांचं वाचन करण्याची सवय मी आता स्वतःला लावून घेणार आहे. बाळांनो.. लक्षात ठेवा, पुस्तकं आपल्यासाठी नवनवीन माहितीचं दालन सतत खुलं करीत असतात.”
आई उत्साहाने म्हणाली, “खरंय मुलांनो.. म्हणतात ना,
समजते उमजते, विज्ञानाची किमया,
पुस्तक जणू माझे, एक अजबच दुनिया...
…पुस्तकांच्या वाचनामुळे आपली बुद्धी तल्लख होते. मेंदूचा छान व्यायाम होतो. आपल्या एकाग्रतेत वाढ होते. आपले संवाद कौशल्य अधिक प्रभावी होण्यास पुस्तकं मदत करतात. थोडक्यात काय, तर पुस्तकं आपलं मनोरंजन करता-करता आपल्या ज्ञानात भर घालतात. बरं चला, आपण नुसते बोलत काय बसलोय, आत्ताच तुम्ही शाळेतून आलात ना. मग आधी शाळेचे कपडे बदला, हातपाय धुवा आणि पटापट या. मी शिरा करते सर्वांसाठी. वाचन कट्ट्याच्या शुभारंभाबद्दल घरात गोड पदार्थ आज करायलाच हवा. नाही का?”
बाळू-शमी हातपाय धुवून, कपडे बदलून बाहेर आले. शिरा खाऊन झाल्यावर बाळू, शमी दोघंही अभ्यासाला बसले. शमीला निबंध लिहायचा होता. तिच्या निबंधाचा विषय होता…‘भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर’. बाळूलाही त्याची प्रकल्प वही पूर्ण करायची होती. ६ डिसेंबर हा दिवस भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन. यानिमित्ताने आंबेडकरांचे कार्य, त्यांच्या जीवनातील एखादा प्रेरक प्रसंग, त्यांच्या कार्याचे काही फोटो अशा सर्वच गोष्टी या प्रकल्पासाठी बाळूला हव्या होत्या. पण दोघांनाही फारसं काही सुचेना. तेवढ्यात बाळूचे लक्ष वाचन कट्ट्यावरील एका पुस्तकाकडे गेले. यदुनाथ थत्ते यांचे पुस्तक होते ते. त्या पुस्तकाचे नाव होते, ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर: जीवन, विचार, कार्य आणि परिणाम’. बाळूने लगेच बाबांना हाक मारली. बाबा आल्यावर तो म्हणाला, “बाबा, आम्हाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल माहिती सांगा ना या पुस्तकातून. मला या विषयावर प्रकल्प वही पूर्ण करायचीय आणि शमीला ‘भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ या विषयावर निबंध लिहायचाय.”
बाबा म्हणाले, “मी म्हटलं होतं ना, अभ्यासासाठीसुद्धा आपण केलेल्या पूरक वाचनाची मदत ही आपल्याला होतच असते. मुलांनो, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना वाचनाची खूप आवड होती. त्यांचा श्वासच होता तो. असं म्हणतात, त्यांचा वैयक्तिक ग्रंथसंग्रह खूपच मोठा होता. त्यातील पुस्तकांची संख्या ५० हजारांपेक्षा अधिक होती.”
शमी आश्चर्याने म्हणाली, “बापरे..! एवढी पुस्तकं..!”
“होय बाळा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुस्तकांना खूप जपायचे. खूप वाचायचे. त्यांना त्यांच्या आयुष्यात खूप त्रास सहन करावा लागला. पण त्याचा परिणाम त्यांनी कधीही आपल्या शिक्षणावर, वाचनावर होऊ दिला नाही. ते दररोज १४ ते १८ तास अभ्यास करीत असत. बडोद्याचे महाराज सयाजीराव गायकवाड यांनी उच्च शिक्षणासाठी त्यांना इंग्लंडला पाठवलं होतं. लंडन येथे वास्तव्याच्या वेळी ते दररोज एका ग्रंथालयात जात असत आणि तासन्तास वाचन करीत बसत. वाचता वाचता त्यांना भूक लागली की ते गुपचूपपणे ग्रंथपालाची नजर चुकवून ब्रेडचे तुकडे तिथेच बसून खायचे. कारण खाण्यात जास्त वेळ वाया जाऊ नये, असं त्यांना वाटे. एके दिवशी तिथल्या गोऱ्या ग्रंथपालाने बाबासाहेबांना ब्रेड खाताना पाहिलं. ग्रंथपाल त्यांना म्हणाला, “हे काय करताय तुम्ही? हे ग्रंथालय आहे. हॉटेल नाही. ‘येथे काही खाऊ नये. घाण करू नये’, हा समोरचा बोर्ड वाचा.” बाबासाहेब म्हणाले, “क्षमा करा. यापुढे मी या सूचनेचे पालन करीन. उपाशी राहून वाचन करीन.” ग्रंथपाल म्हणाले, “चूक केली आहे तर, शिक्षा ही झालीच पाहिजे.” बाबासाहेब म्हणाले, “कोणतीही शिक्षा द्या, पण ग्रंथालयाचे दरवाजे माझ्यासाठी कृपा करून बंद करू नका. ग्रंथांशिवाय मी जगू शकत नाही.”
बाबासाहेबांचे ग्रंथांवरील हे अजोड प्रेम पाहून तो गोरा ग्रंथपाल चकीत झाला. म्हणाला, “मिस्टर आंबेडकर, मी शिक्षा तर देणारच आहे. तुम्ही उद्यापासून माझ्यासोबत जेवायचे. हीच तुम्हाला शिक्षा आहे. मी तुमच्यासाठी जेवण आणत जाईन.” गोऱ्या ग्रंथपालाने सुनावलेली ही अभिनव शिक्षा ऐकून बाबासाहेबांचे डोळे पाणावले. त्यांना या ग्रंथपालाच्या रूपाने पुस्तकांसोबतच आणखी एक नवीन मित्र मिळाला.”
बाळू-शमी भान हरपून हे सारं ऐकत होते. आई म्हणाली, “मुलांनो.. खरंच, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे कार्य थोर आहे आणि त्यांचे वाचनाचे वेड तर सर्वश्रूत आहे. तुम्हीही बाबासाहेबांचा वाचनाचा हा गुण आत्मसात केला पाहिजे. म्हणतात ना, जो व्यक्ती वाचन करीत नाही तो वाचता न येणाऱ्या अशिक्षित माणसासारखाच आयुष्यात येणाऱ्या वेगवेगळ्या संधी गमावत असतो. म्हणून प्रत्येकाने पुस्तकं ही वाचलीच पाहिजेत.”
शमी लगेच म्हणाली, “बाबा, मीही आता नियमित वाचन करणार. छान-छान गोष्टींची पुस्तकं वाचणार. गोष्टी सांगायला तर मला खूप आवडतात.” बाळूही लगेच म्हणाला, “बाबा, मीही बालकवितांची पुस्तकं वाचणार. मला बालकविता वाचायला अणि त्या सादर करायला खूप आवडतात. वाचनासाठी मीही आता वेळ काढणार.”
आई हसून म्हणाली, “अरे हो हो, पण तुमचा वाचन कट्टा कुठेय? आपण असं करूया, या आमच्या वाचन कट्ट्याच्या बाजूला तुमचाही छोटासा वाचन कट्टा सुरू करूया. बालसाहित्याची काही नवीन पुस्तकं उद्याच तुमचे बाबा दुकानातून घेऊन येतील. ती आपण तुमच्या वाचन कट्ट्यावर उभी मांडून ठेवूया. त्यातली तुम्ही महिन्याभरात किती आणि कोणती पुस्तकं वाचली त्याची नोंद ठेवायची बरं आणि हो, वाचलेल्या पुस्तकातलं तुम्हाला काय आवडलं, तेही आम्हाला सांगायचं. चालेल?”
बाळू पटकन म्हणाला, “होय, होय चालेल! आई, किती छान आहे ही आयडिया.”
शमी म्हणाली, “बाबा, हा वाचन कट्टा म्हणजे आमचं छोटंसं ग्रंथालयच जणू.”
टेबलावर मांडून ठेवलेल्या पुस्तकांची पानं खिडकीतून आलेल्या वाऱ्याच्या झुळकीबरोबर फडफडली. घरातल्या पुस्तक गप्पा ऐकून जणू काही तीही आनंदाने प्रतिसाद देत होती. आई त्या आवाज करणाऱ्या पुस्तकांकडे पाहून पटकन म्हणाली, “हे नच पुस्तक, ही तरी खिडकी, जग भोवतीचे बघण्यासाठी.”
साहित्य अकादमी बालसाहित्य पुरस्कारप्राप्त लेखक