समाजमनाच्या ललित नोंदी
लक्ष्मीकांत देशमुख
भारतीय विद्यार्थ्यांचा स्वप्नांचा प्रदेश त्यांच्या डोळ्यासमोर उद्ध्वस्त होत आहे. टॅरिफ बॉम्बच्या आधीच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी इमिग्रेशन बॉम्ब फोडून भारतीय विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना सुरुंग लावला आहे. भारतीय सरकारने याविरोधात कठोर भूमिका घेत संकटात अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना मदत केली पाहिजे आणि उर्वरित विद्यार्थ्यांसाठी पर्यायी स्वप्नप्रदेश उपलब्ध करून दिले पाहिजेत.
दरवर्षी जून-जुलैपर्यंत लाखो भारतीय विद्यार्थी अमेरिकेच्या विविध विद्यापीठात प्रवेश मिळवून आपलं ‘अमेरिकन ड्रीम’ पूर्ण करण्याच्या तयारीत असतात. गेल्या वर्षी २०२४ ला तीन लाखांहून अधिक भारतीय तरुणांना अमेरिकेतील विविध विद्यापीठात उच्च शिक्षणासाठी प्रवेश मिळाला होता. यंदा मात्र ट्रम्प यांच्या लहरी आदेशाने व्हिसासाठी अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांच्या मुलाखती अनिश्चित काळासाठी स्थगित झाल्या आहेत. त्यामुळे २०२५ या शैक्षणिक वर्षात भारतीय विद्यार्थ्यांना अमेरिकेत जाणे शक्य होणार नाही, असेच आजचे चित्र आहे.
आज भारतात सर्वत्र अमेरिकन राष्ट्राध्यक्ष ट्रम्पने भारतीय उत्पादनावर ५०% आयात शुल्क लावून जो भलामोठा टॅरिफ बॉम्ब फोडला आहे त्याची चर्चा चालू आहे. पण टॅरिफ बॉम्बच्या आधी त्यांनी भारतीय विद्यार्थ्यांचे उच्च शिक्षणाचे स्वप्नभंग करणारा ‘इमिग्रेशन बॉम्ब’ चार महिने आधीच फोडला आहे. त्याची फारशी चर्चा होत नाही. पण हा हजारो भारतीय विद्यार्थ्यांसाठी जीवन-मरणाचा प्रश्न झाला आहे. टॅरिफबाबत भारताने न नमता अमेरिकेला उत्तर दिले आहे. अशीच कठोर भूमिका भारताने शिक्षणासाठी अमेरिकेत जाणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांना टार्गेट करण्याच्या असंवेदनशील धोरणाबाबत घेण्याची वेळ आली आहे.
पण याबाबतचा सर्वात कळीचा प्रश्न आहे तो म्हणजे भारतीय तरुण वर्गाला ज्याची अनिवार ओढ आहे त्या अमेरिकन ड्रीमचे काय करायचे? या तरुणाईला त्यातून बाहेर कसे काढायचे? कारण हा आता राष्ट्रीय स्वाभिमानाचा प्रश्न आहे. म्हणूनच ज्याला ‘अमेरिकन ड्रीम’ म्हटले जाते ते नेमके काय आहे? हे समजून घेतले पाहिजे.
मेल्टिंग पॉटची सुरुवात
‘अमेरिकन ड्रीम’ हा शब्द लोकप्रिय केला तो १९३० च्या दशकात जेम्स ट्रसलो ॲडम यांनी. तेव्हा सामायिक उत्तम जगणे (वेल बिईंग) आणि नैतिक चारित्र्य याचा संगम असणारे जीवन त्याला अभिप्रेत होते. कालांतराने वैयक्तिक यश, करिअर आणि जीवनाच्या सर्वच क्षेत्रात शिखरापर्यंत जाण्याची संधी म्हणजे ‘अमेरिकन ड्रीम’ असा अर्थ प्राप्त झाला. खास करून स्थलांतरितासाठी. कारण मुळातच अमेरिका हा स्थलांतरितांचा देश आहे. जगातील कोणतेही राष्ट्रीयत्व, रंग, वंश आणि धर्म असणाऱ्या लोकांचा हा देश म्हणजे ‘मेल्टिंग पॉट’ आहे. सूत्ररूपाने सांगायचे तर ‘अमेरिका’ नामक एका विशाल भांड्यात भिन्न भिन्न लोकांचे एकजीव होणे म्हणजे अमेरिकन ड्रीम. हे या देशाचे बलस्थान आहे.
अमेरिकन ड्रीम साकार व्हायला विसाव्या शतकाच्या प्रारंभी निर्माण झालेल्या संपर्क आणि दळणवळणाच्या सोयी कारणीभूत ठरल्या आणि झपाट्याने जगाला त्याची भुरळ पडू लागली. त्याला जोड मिळाली ती हॉलिवूड सिनेमा व तिथल्या पॉप संगीताची. सर्वात मोठा लोकशाहीवादी देश, आर्थिक महासत्ता, सर्व प्रकारचे स्वातंत्र्य असणारा आणि मुख्य म्हणजे गुण, बुद्धी आणि मेहनतीचे सोने होण्याची अफाट संधी व शक्यता स्थलांतरित लोकांना उपलब्ध असलेला देश. सर्वच क्षेत्रात आघाडी. नामांकित विद्यापीठातले दर्जेदार शिक्षण, मुक्त आणि बंधनरहित म्हणूनच उपभोगावीशी वाटणारी आधुनिक जीवनशैली, उत्तम पायाभूत सुविधा, ज्ञान-विज्ञान व तंत्रज्ञानातले अग्रेसरत्व यामुळे आधुनिक प्रगती आणि जीवनाचे अमेरिका हे प्रतीक बनले. आपला देश जगात असाच कायम सर्वात पुढे असावा म्हणून उदार इमिग्रेशनचे, स्थलांतराचे धोरण अमेरिकन अध्यक्षांनी स्वीकारले. ज्यांच्याजवळ कुशाग्र बुद्धी आहे, मेहनत करण्याची तयारी आहे आणि मोठी स्वप्ने साकार करण्याची जिद्द आहे, अशा साऱ्यांच्या स्वागताला अमेरिका देश कायम उत्सुक होता.
अमेरिकन ड्रीमची भुरळ
भारतीय लोकांना या अमेरिकन स्वप्नाची भुरळ पडली नसती, तर नवल. कारण आता स्वतंत्र होऊन आठ दशकं होत आली तरी अजूनही बरीच गरिबी आहे. दरडोई उत्पन्नात भारत जगाच्या सरासरी उत्पन्नाच्या बराच खाली आहे. पुन्हा कमालीची आर्थिक विषमता आहे. शिक्षण व्यवस्था, खास करून उच्च शिक्षण, संशोधन यात आपण बरेच मागे आहोत. मुख्य म्हणजे उच्चभ्रू जीवनमान जगता येईल अशा नोकरी/व्यवसायाच्या संधी कमी आहेत. पुन्हा भ्रष्टाचार, कायद्याचे पालन नीट न होणे आणि आधुनिक मूल्ये अजूनही सर्वदूर न रुजणे...हे प्रश्न आहेतच. मला आपल्या देशाला मुळीच कमी लेखायचे नाही. पण ‘स्वदेश’ चित्रपटात शाहरूख खान जसे ‘मेरा देश दुनिया का सबसे महान देश हैं ऐसे मैं नहीं समझता, लेकिन जरूर बन सकता है, ये मेरा विश्वास है’ असे म्हणतो, तसे मानणारा मी सच्चा भारतीय आहे. येथे मला फक्त वर नमूद केलेल्या भारताच्या काही कमतरतांच्या पार्श्वभूमीवर अमेरिकन ड्रीमची भुरळ भारतीय लोकांना का पडते, हे सांगायचे आहे.
अमेरिकेचे ‘मागा’ स्वप्न
९/११ च्या ट्विन टॉवर उद्ध्वस्त करण्याच्या अतिरेकी कृत्यानंतर अमेरिकेने आपल्या स्थलांतरितांबाबतच्या धोरणात बदल करायला प्रारंभ केला व तिथे येणाऱ्या स्थलांतरितांच्या संख्येवर निर्बंध घालणे सुरू केले आणि आता २०२५ मध्ये ट्रम्प प्रशासनाने त्यांच्या ‘MAGA’ म्हणजे ‘मेक अमेरिका ग्रेट अगेन’ धोरणाप्रमाणे नोकरीसाठीचे व्हिसा देण्याची प्रक्रिया अवघड केली आहे. कारण त्यामुळे स्थानिकांचा रोजगार हिरवला जातो, असे त्यांचे ठाम मत आहे. म्हणून अमेरिकन प्रशासनाने विविध कसोट्या निश्चित केल्या आहेत. उदा. विद्यापीठात शिकणाऱ्या व नोकरी-उद्योग करणाऱ्यांनी अमेरिकेच्या परराष्ट्र व अंतर्गत धोरणावर टीकाटिपण्णी करू नये. इस्त्रायल करत असलेल्या गाझा पट्टीतील पॅलेस्टाईन लोकांच्या नरसंहाराविरुद्ध अमेरिकेतील अनेक विद्यापीठांमध्ये अमेरिकन विद्यार्थ्यांसोबत इतर देशांच्या विद्यार्थ्यांनीही निदर्शनं केली होती. ती ट्रम्प यांना खटकली आणि त्यांनी अँटी-इमिग्रंट भूमिका घेत अमेरिकन विद्यापीठांनी आता परदेशी विद्यार्थ्यांवर सरकार सांगेल तसे निर्बंध घालावेत, असे सूचित केले. आणि सरकारचे ऐकले नाही तर ग्रॅन्ट बंद करण्याची धमकी द्यायला सुरवात केली. अमेरिकेत सर्व विद्यापीठं आपली स्वायत्तता कसोशीने जपतात. आणि त्यांच्या शैक्षणिक धोरणाचा DEI म्हणजे डायव्हर्सिटी (विविधता), इक्विटी (हिस्सेदारी) आणि इन्क्लूजन (समावेशकता) हा गाभा आहे. त्यामुळे त्यांनी ट्रम्प सरकारचे आदेश पाळण्यास स्पष्ट नकार दिला. त्यामुळे ट्रम्पने नव्याने परदेशी विद्यार्थी अमेरिकेत येऊच नयेत म्हणून व्हिसासाठी अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांच्या मुलाखती अनिश्चित काळासाठी स्थगित केल्या व एच-बी 1 व्हिसा काही कारण न देता रद्द करायला सुरवात केली आहे.
खुले शैक्षणिक वातावरण
भारतीय तरुणांना अमेरिकेच्या विद्यापीठात शिकण्यासाठी प्रसंगी घरदार विकून वा बँकेचे कर्ज घेऊन का यावेसे वाटते?कारण ही सर्व विद्यापीठं सर्वार्थाने आंतरराष्ट्रीय आहेत. तिथे जगातील सर्वोत्तम बुद्धीचा संगम होतो, त्यामुळे तिथले शैक्षणिक वातावरण खुले व बुद्धीचा कस पाहणारे असते. एकूणच विद्यार्थी अमेरिकेत येतात ते प्रामुख्याने STEM शिक्षणासाठी म्हणजे - science( विज्ञान), Technology (तंत्रज्ञान), Engineering (अभियांत्रिकी ) आणि Mathematics (गणित) या विषयांतील उच्च पदवी, पदव्युत्तर पदवी, पीएच.डी आणि पोस्ट डॉक्टरल अभ्यासक्रमासाठी. त्याचा अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला मोठा फायदा होतो. कारण प्रत्येक भारतीय विद्यार्थी अमेरिकेतल्या शिक्षणासाठी साधारणपणे एक ते तीन कोटी रुपये खर्च करतो. पीएच.डी व पोस्ट डॉक्टरल संशोधनामुळे अमेरिकेचे विविध क्षेत्रातील अग्रेसरत्व परदेशी विद्यार्थ्यांच्या जोरावर कायम राहते. पुन्हा त्यांच्या उद्योग व सेवा क्षेत्रास फायदा होतो तो वेगळाच. पुढे हेच विद्यार्थी शिक्षणासाठी घेतलेले बँकेचे कर्ज फेडण्यासाठी अमेरिकेतच अमेरिकन नागरिकांच्या तुलनेत कमी वेतनावर काम करतात. त्यामुळे अमेरिकन उद्योगांना अधिक नफा होतो. त्यासाठी परदेशी विद्यार्थ्यांना दीर्घ मुदतीचा व्हिसा दिला जातो. पुढे त्यातील काहीजण ग्रीन कार्ड मिळवून तेथील नागरिकही बनतात.
नेमके हेच स्थानिक अमेरिकन गोऱ्या नागरिकांना, जो ट्रम्पचा मुख्य जनाधार आहे, त्यांना खटकत आहे. कुठेतरी हे आपल्या डोक्यावर येऊन बसले आहेत, याचा त्यांना संताप वाटत आहे. कारण अमेरिकेत उच्च शिक्षण महाग असल्यामुळे स्थानिक अमेरिकन विद्याथ्य्यांचे विद्यापीठत जाण्याचे प्रमाण कमी आहे. ट्रम्पने स्थानिकांचा हा राग नेमकेपणाने ओळखून परदेशी विद्यार्थ्यांवर निर्बंध घालायला सुरवात केली आहे.
भारतीय म्हणून आपणास अमेरिकेचे अपमानजनक वर्तन तीव्रतेने खुपणारे आहे. चीनवर निर्बंध घालणे वा टॅरिफ अस्त्र चालवणे अमेरिकेला शक्य नाही. कारण चीनवर हा देश अनेक महत्त्वाच्या बाबींसाठी निर्भर आहे. त्यामुळे सॉफ्ट टार्गेट म्हणून भारताशी असणारी मैत्री व व्युहात्मक भागीदार म्हणून गेली काही दशके असणारे चांगले संबंध विसरून ट्रम्प प्रशासनाने भारतावर जो दंडात्मक ५०% टॅरिफ लावला आहेत, तो अनुचित व मानहानी करणारा आहे. याच्या पुढे जात तेथे शिकायला जाऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांचा व्हिसा रोखणे, कामासाठी दिलेला दीर्घ मुदतीचा व्हिसा कारण न देता अचानक रद्द करणे, शिष्यवृत्ती थांबावणे, अशा अनेक मार्गांनी भारतीय विद्यार्थ्यांना अमेरिका एक प्रकारे राजकीय सुडबुद्धीने हीन व अपमानस्पद वागणूक देत आहे. त्यामुळे त्यांच्यासाठी आता अमेरिकन ड्रीम हे ‘नाईटमेअर’, ‘दु:स्वप्न’ ठरु पाहत आहे.
भारतीय विद्यार्थ्यांची यामुळे फार मोठी गोची होत आहे. त्यांचे शिक्षण मध्येच थांबण्याचा धोका व्हिसा रद्द केल्यामुळे निर्माण झाला आहे व त्यांना तिथे राहण्यासाठी कोर्टाच्या पायऱ्या चढाव्या लागत आहेत. सरळ भारतात परत यावे म्हटले तर शिक्षण अपूर्ण राहते व झालेला खर्च वाया जातो. या समस्येकडे भारत सरकारचे अद्याप म्हणावे तितके लक्ष गेलेले दिसत नाही. त्यांनी यात हस्तक्षेप करुन होणारा जाच थांबवला पाहिजे.
मुख्य म्हणजे आता भारतीयांनी अमेरिकन स्वप्नाचा ध्यास सोडला पाहिजे. कारण आता ट्रम्प राजवटीत अमेरिका अधिक अनुदार व स्वकेंद्रित झाली आहे. तिथल्या गोऱ्यांच्या रंगवाद व वर्चस्ववादाला शासनाचीच साथ आहे. आता उच्च शिक्षणासाठी अमेरिकेला पूर्ण युरोप, ऑस्ट्रेलिया, रशिया आणि चीन हे सुद्धा चांगले पर्याय उपलब्ध आहेत. तेथील विद्यापीठे पण प्रगत आहेत, शिवाय खर्च कमी आहे. त्यामुळे एकेकाळच्या ‘अमेरिकन ड्रीम’ला आता अनेक पर्यायी स्वप्नं उपलब्ध आहेत. त्यांचा विचार केला पाहिजे.
अमेरिकन ड्रीमचा मोह आता आपण ‘डेड ड्रीम’ म्हणून सोडून दिला पाहिजे. नाही का?
ज्येष्ठ साहित्यिक व अ.भा.मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष