

"आम्हां घरी धन शब्दांचीच रत्ने..." संत तुकारामांनी शब्दांचे हे मोल किती नेमकेपणाने सांगितले आहे! शब्द हे केवळ भावना व्यक्त करण्याचे साधन नसतात, तर ते विचारांचे संचित असतात. पिढ्यान्पिढ्या माणसाच्या अनुभवांचा, संघर्षांचा, आनंदाचा आणि अस्वस्थतेचा वारसा शब्दच पुढे नेत असतात. म्हणूनच साहित्यनिर्मिती ही केवळ लेखकाची व्यक्तिगत अभिव्यक्ती राहत नाही; ती समाजाच्या सांस्कृतिक जडणघडणीचा एक महत्त्वाचा भाग बनते.
"काळ बदलतो, संदर्भ बदलतात; पण माणसाच्या मनाचा शोध कधी संपत नाही." या शोधाला दिशा देण्याचे काम साहित्य करत असते. कधी एखादी कथा आपल्या जगण्याचा आरसा बनते, कधी कवितेची एखादी ओळ मनात वर्षानुवर्षे रेंगाळते, तर कधी एखादा लेख आपल्या विचारांची चौकटच बदलून टाकतो. म्हणूनच साहित्य हे केवळ वाचून संपवण्याचे माध्यम नाही; ते अनुभवण्याचे, अंतर्मुख होण्याचे आणि विचारसमृद्ध होण्याचे एक निमित्त आहे.
दिवाळी म्हणजे अंधारावर प्रकाशाने मिळवलेला विजय नव्हे, तर मनाच्या कोपऱ्यांत साचलेल्या अंधाराला शब्दांच्या उजेडाने दूर करण्याचाही उत्सव. घराघरांत पणत्या उजळतात, आकाशात रोषणाई फुलते आणि त्याचवेळी साहित्यविश्वातही शब्दांचे दीप प्रज्वलित होतात. दिवाळी अंकांची परंपरा ही मराठी साहित्यविश्वातील अशीच एक समृद्ध सांस्कृतिक परंपरा. वर्षभर वाचकांच्या मनात साठलेल्या अपेक्षांना या अंकांच्या माध्यमातून साहित्यिक मेजवानी मिळते. कथा, कविता, ललितलेख, वैचारिक लेखन आणि विविध विषयांचे अनोखे आविष्कार यांतून दिवाळी अंक केवळ वाचनाचे साधन राहत नाहीत, तर ते काळाचे, समाजाचे आणि माणसाच्या भावविश्वाचे दस्तावेज बनतात.
या समृद्ध परंपरेचा एक भाग व्हावे, आपणही कधीतरी मोठेखानी दिवाळी अंकाच्या माध्यमातून वाचकांसमोर काही वेगळं, दर्जेदार साहित्य घेऊन येण्याच्या दिशेने टाकलेले हे एक छोटेसे, पण मनापासून उचललेले पाऊल. या साहित्यप्रवाहात आपलाही खारीचा वाटा असावा, या भावनेतून 'नवशक्ति'चा हा ३२ पानी टॅब्लॉइड दिवाळी अंक वाचकांच्या भेटीला घेऊन येत असताना आम्हाला विशेष आनंद होत आहे.
मराठी साहित्यविश्वात आपल्या लेखनाने स्वतंत्र ओळख निर्माण केलेले नीरजा, श्रीकांत बोजेवार, प्रवीण दवणे, प्रणव सखदेव, अक्षय वाटवे, सॅबी परेरा, रविप्रकाश कुलकर्णी, अनंत देशमुख, मंजिरी हसबनीस, गीतेश शिंदे, संकेत म्हात्रे, आदित्य दवणे, प्रशांत असनारे, जगदीश काबरे, मेधा आलकरी, प्रसाद कुलकर्णी, शंतनु परांजपे, एकनाथ आव्हाड, मंगला परुळेकर, मकरंद जोशी, सोनाली कोलारकर सोनार या लेखकांनी या अंकासाठी साहित्य दिले. त्यांच्या लेखनाचा या अंकात समावेश होणे ही आमच्यासाठी आनंदाची आणि अभिमानाची बाब आहे. प्रत्येक लेखकाची अभिव्यक्ती
वेगळी, अनुभवविश्व वेगळं आणि जगाकडे पाहण्याचा दृष्टिकोनही स्वतंत्र. या विविधतेतूनच अंकाला एक वेगळे साहित्यिक परिमाण प्राप्त झाले आहे.
रविवारच्या 'नवशक्ति 'च्या 'ऐसी अक्षरे रसिके' या पुरवणीतील 'बालरंग' आणि 'भ्रमंती' ही वाचकांच्या परिचयाची आणि आवडीची सदरेही या अंकात समाविष्ट केली आहेत. त्यामुळे लहानग्यांच्या कल्पनाविश्वापासून ते निसर्ग, प्रवास आणि अनुभवांच्या विस्तीर्ण अवकाशापर्यंत अनेक विषयांना या अंकात स्थान मिळाले आहे. कथा, कविता, लेख, ललितलेखन, बालसाहित्य आणि भ्रमंती अशा विविध साहित्यप्रकारांनी सजलेला हा अंक वाचकांना नक्कीच नवी अनुभूती देईल, असा विश्वास वाटतो.
कोणत्याही निर्मितीमागे केवळ एक व्यक्ती नसते; अनेक हातांची मेहनत, अनेक मनांची आस्था आणि एकत्रित प्रयत्नांची ऊर्जा असते. या शब्दरूपी अंकाला कलात्मकतेचा दर्जा देण्याची संपूर्ण जबाबदारी आमचे डिझायनर आर्टिस्ट सुहास सावंत यांनी लीलया पेलली. संपादन प्रक्रियेत फीचर्स एडिटर संदीप प्रधान आणि उपसंपादक क्रांती गोडबोले यांनी मोलाचे सहकार्य केले. अंकाचे मुखपृष्ठ आणि आतील चित्रांसाठी कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (AI) तंत्रज्ञानाची मदत घेतली आहे. बदलत्या तंत्रज्ञानाचा स्वीकार करताना त्याचा सर्जनशील वापर कसा करता येऊ शकतो, याचाही हा एक छोटासा प्रयोग आहे. 'नवशक्ति'च्या टीममधील काही सहकाऱ्यांचे साहित्यही या अंकात समाविष्ट आहे.
या अंकाकडे पाहताना त्यातील साहित्याइतकाच त्यामागचा प्रवासही महत्त्वाचा वाटतो. कमी वेळ, मर्यादित साधने आणि अनेक जबाबदाऱ्या असतानाही काहीतरी वेगळे निर्माण करण्याची जिद्द आम्हाला या टप्प्यापर्यंत घेऊन आली. एखादा अंक प्रकाशित करणे ही प्रक्रिया कागदावर शब्द छापण्यापुरती मर्यादित नसते. त्या शब्दांना लेखकाच्या मनातून वाचकाच्या मनापर्यंत पोहोचवण्याची ती एक जबाबदारी असते. वाचकाने एखादी कथा वाचून क्षणभर थांबावे, एखाद्या कवितेतील ओळ मनात साठवून ठेवावी, एखादा लेख वाचून विचार करावा किंवा एखाद्या अनुभवाशी स्वतःला जोडून पाहावे, एवढे जरी या अंकामुळे घडले, तरी आमचा प्रयत्न सार्थकी लागला असे म्हणता येईल. आपल्या प्रतिसादातूनच अशा उपक्रमांना बळ मिळत असते. त्यामुळे अंक वाचल्यानंतर आपल्या प्रतिक्रिया, सूचना आणि अभिप्राय आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा.
आज माहितीचा प्रचंड ओघ आहे. एका क्लिकवर असंख्य बातम्या, विचार आणि मते आपल्यासमोर येतात. मात्र, या माहितीच्या कोलाहलात विश्वासार्ह, सकस आणि दर्जेदार आशयाचे साहित्य विचारधन वाचकांपर्यंत पोहोचवणे अधिक महत्त्वाचे आहे. वस्तुनिष्ठ बातमीसोबतच वैचारिक आणि सांस्कृतिक भुकेलाही योग्य साहित्याने समृद्ध करणे, हेच आमचे ध्येय आहे. आमचे सर्व वाचक, वितरक, जाहिरातदार या सर्वांना 'दीपावली 'निमित्त मनःपूर्वक शुभेच्छा !
प्रकाश सावंत, संपादक