अदा-ताल-शृंगार...कथ्थक आणि लावणीचे फ्युजन

प्रसिद्ध अभिनेत्री आणि नृत्यांगना अमृता खानविलकर सध्या आपला नृत्याचा कार्यक्रम अमेरिकेतल्या वेगवेगळ्या शहरांमध्ये सादर करत आहे आणि त्याला तेथील रसिकांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे. यानिमित्ताने ‘नवशक्ति’च्या वाचकांशी बोलताना अमृताने आपल्या कारकीर्दीतील महत्त्वाचे टप्पे उलगडून दाखवले आहेत.
अदा-ताल-शृंगार...कथ्थक आणि लावणीचे फ्युजन
Published on

सिनेरंग

पूजा सामंत

प्रसिद्ध अभिनेत्री आणि नृत्यांगना अमृता खानविलकर सध्या आपला नृत्याचा कार्यक्रम अमेरिकेतल्या वेगवेगळ्या शहरांमध्ये सादर करत आहे आणि त्याला तेथील रसिकांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे. यानिमित्ताने ‘नवशक्ति’च्या वाचकांशी बोलताना अमृताने आपल्या कारकीर्दीतील महत्त्वाचे टप्पे उलगडून दाखवले आहेत.

नृत्यनिपुणता, अभिनयसंपन्नता आणि धडाडी... असे सगळे गुण एकत्र आले की आपसूक पावले वेगळ्या वाटेवर चालू लागतात. यश मिळेल का अपयश? याची भीती बाजूला सारून नवे काही करण्याची धमक या अशा व्यक्ती दाखवतात. असेच एक नाव म्हणजे अभिनेत्री अमृता खानविलकर. अलीकडेच कतरिना कैफ या नामांकित स्टारच्या जागी ‘रिप्लेसमेंट’ म्हणून अमृताला निवडण्यात आले. विशुद्ध भारतीय आणि आयुर्वेदिक उत्पादन असा नावलौकिक असलेल्या मेडीमिक्स या साबणाच्या जाहिरातीत कतरिना कैफच्या जागी अमृताची निवड झाल्याने अमृताची ‘ब्रँड व्हॅल्यू’अधिकच वाढली आहे. दुसरी विशेष बाब म्हणजे पुण्यासारख्या सांस्कृतिक शहरातून आलेल्या मध्यमवर्गीय अमृताला सुरुवातीला तिच्या घरच्यांनी अभिनय क्षेत्रात जाण्यासाठी नकार दिला होता. पण अमृता हार मानणारी नव्हतीच. तिने पालकांचा होकार मिळवला. वेगवेगळ्या रिॲलिटी शोज‌्मधून आपली नृत्यनिपुणता तिने सिद्ध केली. ‘नच बलिये’ या शोमध्ये तिला तिचा जोडीदार (हिमांशू मल्होत्रा) देखील लाभला. मराठी ते हिंदी चित्रपट, वेब शो अशा एक एक पायऱ्या चढत ती निर्माती झाली. अनेक पुरस्कारांवर मोहर उठवत ती एक एक पाऊल पुढे टाकत गेली आणि सध्या ती कोरिओग्राफर आशिष पाटीलसोबत अमेरिकेच्या दौऱ्यावर आहे.

कथ्थक आणि लावणी यांचा मिलाफ असलेले डान्स शोज् ती तिथे सादर करणार आहे. ‘अदा-ताल-शृंगार’ असे तिच्या शोचे नाव आहे. २० जुलैला वॉशिंग्टन येथे झालेल्या पहिल्याच प्रयोगाला तुफान प्रतिसाद मिळाला असून पुढे तब्बल ११ शहरांमध्ये या कार्यक्रमाचे प्रयोग असणार आहेत. येत्या काही दिवसांत अमृताचे दोन हिंदी, दोन मराठी चित्रपट आणि काही हिंदी वेब सीरिज प्रदर्शित होत आहेत. या सगळ्या पार्श्वभूमीवर वेगवेगळ्या मुद्द्यांवर अमृताशी झालेल्या गप्पागोष्टी-

अमेरिकेत सादर होणाऱ्या ‘अदा-ताल-शृंगार’ या तुझ्या कार्यक्रमाचे वेगळेपण काय आहे ?

“हे कथ्थक आणि लावणीचे फ्युजन आहे. यात प्रसिद्ध कोरिओग्राफर आशिष पाटील माझ्यासोबत आहेत. आम्ही ही वेगळी संकल्पना राबवली आहे आणि अमेरिकेतील विविध महराष्ट्र मंडळांनी या उपक्रमाला अतिशय भरभरून प्रतिसाद दिला आहे. या स्वागताने आम्ही थक्कच झालो आहोत. गेल्या तीन महिन्यांपासून या शोची तयार सुरू होती. भारतीय क्लासिकल नृत्य आणि आपल्या पारंपरिक लावणीचे फ्युजन परदेशातील नागरिकांना इतके भावेल, याची कल्पना नव्हती. हे यश म्हणजे आपल्या मराठी मातीतल्या लावणीचे यश आहे, त्यात जो गावरान गोडवा आणि ठसका आहे ना, त्याचे यश आहे.”

अमृता, तुझे नृत्यातील कौशल्य वादातीत आहेच, पण तुला असे वाटते का की नृत्यनिपुणतेमुळे तुझ्यातील नृत्याला कायम दाद मिळाली तरी अभिनेत्री म्हणून अधिक कणखर व सक्षम भूमिकांसाठी तुझा विचार झाला नाही?

“छे! छे! असे नाही कधी वाटत. नृत्याचा मी अगदी मनापासून आनंद घेते. माझी समाधीच लागते म्हण ना नाचताना..अगदी देहभान हरपून नाचते मी.. पण मी कुशल नृत्यांगना असल्याचे कसलेही कुठलेही बॅगेज माझ्यावर येत नाही, न आतापर्यंत कधी आले. मला वाटते, गेल्या १५-२० वर्षांमध्ये जितक्या सशक्त, उत्तम भूमिका मला मराठी /हिंदीत मिळायच्या होत्या त्या मिळाल्या आहेत आणि पुढेही मिळत राहतील...माझा मार्ग कधीच खुंटला नाही. नृत्यामुळे नाही किंवा आणखी कशामुळे नाही. या क्षेत्रात माझा कुणीही गॉडफादर /गॉडमदर, मार्गदर्शक नसताना ‘एकला चलो रे..’ असे म्हणत मी माझा मार्ग बनवत गेले. मी संघर्षातून घडले..माझ्यासाठी कधीच काही सोपे नव्हते. अनेक दिग्गज स्पर्धेत असताना मी रिॲलिटी शोमधून पुढे आले. मराठी-हिंदी दोन्ही इंडस्ट्रींनी मला हात दिला. यातूनच यथावकाश स्वत:ची निर्मिती करण्याचे खूळ डोक्यात आले. आज माझ्या नृत्यकौशल्यामुळेच मला अमेरिकेत माझी पारंपरिक भारतीय मूळ असलेली नृत्यकला सादर करण्यास मिळतेय. माझ्या मते नृत्य ही एक स्वतंत्र कला आहे जी शिकता येते. पण अभिनय हा सर्वस्वी वेगळा प्रांत आहे आणि मी अभिमानाने सांगेन की मी दोन्हीत उत्तीर्ण झाले आहे. इथे एक गोष्ट मात्र मला आवर्जून नमूद करावीशी वाटते, आशा-अपेक्षांना अंत नसतोच. त्या अथांग असतात. आपण आपले काम करत राहायचे.”

गेली दोन दशके अभिनय क्षेत्रात आहेस. या कारकीर्दीविषयी समाधानी आहेस, संतुष्ट आहेस?

“कुठला कलाकार त्याच्या क्षेत्रात पूर्णपणे संतुष्ट असतो? जवळजवळ सहा दशकं अभिनयात सूर्यासारखे तळपूनही अमिताभ बच्चन हे संतुष्ट आहेत आहे का? यह दिल मांगे मोअर..अशीच मानसिक अवस्था प्रत्येकाची असते. पण हो, मी समाधानी मात्र नक्कीच आहे. कारण शून्यातून विश्व निर्माण होत गेले. आई-वडिलांची अभिनय क्षेत्रासाठी परवानगी मिळवणे हेच माझ्यासाठी मोठे टास्क होते. संघर्ष आणि परिस्थितीशी दोन हात करत मी पुढे जात राहिले. माझ्या आजवरच्या करियरच्या गतीबद्दल मला समाधान आहे. पुढे जात राहण्याची जिद्द आहे. और उम्मीद पर दुनिया कायम है...”

हल्ली सोशल मीडियावर सगळेच कलाकार सक्रिय असतात. ते वरचेवर ट्रोलही होत असतात. या ट्रोलिंगला तू कसे हॅन्डल करतेस?

“मला जे अपडेट्स-ज्या पोस्ट सोशल मीडियावर द्यायच्या असतात त्या मी देत असते. ट्रोलर्सना घाबरून माझे सोशल मीडिया अकाऊंट मी डिॲक्टिव्हेट का करायचे? सुदैवाने मला कधी फार ट्रोलिंग झाले नाही. पण समाजात ट्रोलर्सचे प्रमाण वाढते आहे. अर्थात सोशल मीडियावर कलाकारांची प्रशंसा देखील होत असते. बहुतेक कलाकार मंडळी आपल्या प्रोजेक्टचे प्रमोशन सोशल मीडियावर करत असतात. समाजातील एकी, शांतता भंग पावेल असे वर्तन आपल्याकडून होणार नाही, याची काळजी घ्यावी. बाकी, ट्रोलर्सची तमा बाळगण्याचे कारण नाही.”

मनोरंजन विश्व वरकरणी जितके ग्लॅमरस दिसते तितकेच ते आतून पोखरलेले आहे. यशोशिखरावर गेलेल्या कलावंतांना नंतर एकटेपणा जाणवतो. कधी यशाचा उन्माद असतो, तर कधी अपयशाचे वैफल्य! तू कसे पाहतेस या सगळ्याकडे?

“अभिनय क्षेत्रात सततच्या वाढत्या स्पर्धचे दडपण, त्यामुळे येणारी असुरक्षितता हे वास्तव आहे. हातात आज काम असेल, पण उद्या ते असेलच याची खात्री नाही. एकदा यश मिळाले तरी ते टिकेल का? उद्याचे काय? हे प्रश्न असतातच. अलीकडे अनेक कारणांनी एकटेपण येते. याचे प्रमाणही वाढत चालले आहे आणि हे फक्त ग्लॅमर इंडस्ट्रीत आहे, असे नाही. कॉर्पोरेट क्षेत्रातही हेच वातावरण आहे. आत्महत्यांचे वाढते प्रमाण हा सामाजिक चिंतेचा विषय आहे. अर्थात एन्टरटेन्मेंट इंडस्ट्रीमध्ये तुमची स्क्रुटिनी अधिक होते, हे खरे आहे. जे नाही ते हवे आहे आणि जे आहे त्याकडे दुर्लक्ष, असे इथले वातावरण आहे. या अशा वातावरणात आपल्या मनातल्या भावना व्यक्त करणे अधिक गरजेचे आहे, असे मला वाटते. भावनांचा निचरा व्हायला पाहिजे. मी खूप बोलकी आहे. सतत व्यक्त होत असते. माझे कुटुंब, आई-बाबा, बहीण हे सगळेच मला जवळचे आहेत. माझे बरे-वाईट अनुभव मी नेहमी शेअर करते. त्यामुळे मला कधी एकटेपणा आला नाही.”

अलीकडे तू नवे, प्रशस्त घर घेतलेस. या नव्या घरात सकाळी दहा वाजेपर्यंत कुणालाही येण्याची अनुमती नाही, असे समजते. असे का बरे?

“हा..हा..(हसून) अरेच्या..ही बातमी झाली तर आता.. काय आहे- ज्या फिल्म/ग्लॅमर इंडस्ट्रीचा मी एक भाग आहे - ते क्षेत्र खूप डिमांडिंग आहे! ते तुम्हाला जे काही देते, मग तो पैसा असेल, मान-मरातब असेल, प्रसिद्धी असेल, त्या साऱ्यासाठी स्वत:ला मेंटेन ठेवावे लागते. मग त्यासाठी तितका वेळ स्वतःला, स्वत:वर द्यावा लागतो. फिटनेस, योग, प्राणायाम, नृत्य सराव... थोडक्यात, वर्क ऑन माइंड अँड बॉडी, स्कीन केअर, हेअर केअर... या सगळ्यासाठी काटेकोरपणे-नियमितपणे वेळ द्यावाच लागतो. मी या ग्रुमिंगसाठी अगदी ठरवून वेळ देतेच. पण होते काय - पहाटेपासून दूधवाला, पेपरवाला, सफाई कर्मचारी अशा सगळ्यांचा राबता सुरू होतो. सतत वाजणारी घराची बेल नकोशी होते. ध्यानधारणेत व्यत्यय येतो. म्हणूनच मी शक्यतो सकाळी दहा वाजेपर्यंत घरात कोणाचे येणे फारसे पसंत करत नाही. क्वचित एखादा अपवाद वगळता!

ज्येष्ठ सिनेपत्रकार.

logo
marathi.freepressjournal.in