लहानसा संशोधक - अनांग

एका अंध व्यक्तीला रस्ता ओलांडण्याची मदत करताना अनांग तडारला एक भन्नाट कल्पना सुचली. या छोट्या संशोधकाची मोठी गोष्ट जाणून घेऊया!
लहानसा संशोधक - अनांग
Published on

नवलनगरी

सोनाली कोलारकर-सोनार

एका अंध व्यक्तीला रस्ता ओलांडण्याची मदत करताना अनांग तडारला एक भन्नाट कल्पना सुचली. या छोट्या संशोधकाची मोठी गोष्ट जाणून घेऊया!

बालमित्रांनो, तुम्ही स्वतःसोबतच घरातील मोठ्यांची आणि आजूबाजूच्या लोकांची काळजी घेता, ही खूप कौतुकास्पद गोष्ट आहे! छोट्या-छोट्या प्रोजेक्ट्सद्वारे आजी-आजोबा, आई-बाबा आणि मित्रांना मदत करणारे बालमित्र पाहिले की आम्हा मोठ्यांना तुमचा खूप सार्थ अभिमान वाटतो.

आता या आपल्या अनांगचंच बघा ना! भारतातील तुमच्याचसारख्या एका विद्यार्थ्याचं सध्या एक काळजीवाहू बालक म्हणून जगभर भारी कौतुक होत आहे आणि कौतुक करणारे कोण आहेत माहिती आहे? तर आपले अंध सखे-सोबती!

तर घडलं असं की, तुफान गर्दीचा रस्ता ओलांडताना तुम्ही देखील कित्येकदा बावरून जात असता, हो ना? आणि कधी कधी मोठ्यांनी तुम्हाला रस्ता ओलांडायला मदतही केली असेल. तर कधी तुम्ही देखील एखाद्या आजी-आजोबांना किंवा अंध व्यक्तीला मदत केली असेल. तेव्हा तुम्ही बघितलंय का, की अंध सोबत्यांच्या हातात एक खास वैशिष्ट्यपूर्ण काठी असते? त्या काठीच्या मदतीने त्यांना वाटेत येणाऱ्या वस्तूंची चाहूल लागते आणि ते स्वतःला धोक्यापासून वाचवू शकतात. पण जेव्हा गर्दी खूप असते आणि गाड्यांची खूप ये-जा सुरू असते, तेव्हा मात्र ते एका ठिकाणी थांबून राहतात. कारण कमरेपेक्षा जास्त उंचीवरच्या गोष्टी या काठीने चटकन लक्षात येत नाहीत! काठीने फक्त जमिनीवरचेच अडथळे ओळखता येतात. मग वरून किंवा जवळून एखादं वाहन जात असेल तर ते लक्षात येत नाही आणि अपघाताचा धोका निर्माण होतो.

अरुणाचल प्रदेशच्या ‘न्यापिन’ या अगदी दुर्गम खेड्यात राहणारा ‘अनांग तडार’ हा एका गरीब शेतकऱ्याचा मुलगा! असाच एक दिवस तो रस्त्याने चालला होता. तितक्यात एका अंध व्यक्तीने त्याला रस्ता ओलांडायला मदतीसाठी हाक दिली. अनांगने त्यांना अगदी प्रेमाने रस्ता ओलांडून दिला आणि त्यांच्या हातातली काठी बघून काही गप्पाही मारल्या. पण घरी परत आल्यावर त्याच्या डोक्यातून हा प्रसंग काही जाईना! त्याच्या मनात विचार आला- अंध व्यक्तींना कमरेएवढ्या उंचीवरचे धोके पण आधीच लक्षात आले तर? मग तर त्यांचं आयुष्य किती सोपं आणि सुरक्षित होईल ना? आणि बस! झाला हा पठ्ठ्या लगेच कामाला सुरू! त्याने एका अनोख्या संशोधनाला सुरुवात केली.

अंध लोक डोळ्यांवर गॉगल लावतात, पण ते दुर्दैवाने फक्त डोळे झाकायलाच! तसा त्याचा काही उपयोग नसतो. मग अनांगने विचार केला- या गॉगलचाच काही नवीन उपयोग करून पाहिला तर? आणि काय सांगावं मित्रांनो! अथक मेहनतीनंतर आणि संशोधनानंतर त्याने ‘G4B’ म्हणजेच ‘गॉगल्स फॉर ब्लाइंड’ शोधून काढले! यात त्याने थेट वटवाघळाची आयडिया (तत्त्व) वापरली! वटवाघळे डोळ्यांनी बघत नाहीत, तर त्यांना ध्वनीलहरींच्या (Sound Waves) मदतीने आजूबाजूला काय आहे हे अगदी अचूक समजते. दोन मीटरच्या परिघापर्यंत कोणतीही वस्तू समोर आली, की ध्वनीलहरी त्या वस्तूवर आदळतात आणि त्याचा प्रतिध्वनी (Echo) तयार होऊन वटवाघळाच्या कानावर पडतो. अनांगने हेच भारी तत्त्व वापरून गॉगलमध्ये ‘अल्ट्रासाऊंड’ आणि ‘इन्फ्रारेड सेन्सर्स’ बसवले! आता कमाल काय झाली बघा- वाटेत कोणतीही वस्तू किंवा अडथळा आला, की अंध व्यक्तीला गॉगलमधून एक बीप असा आवाज ऐकू येऊ लागला... म्हणजे एक प्रकारची ‘धोक्याची सूचनाच!’ त्यामुळे रस्त्यात मध्ये येणारे इलेक्ट्रिकचे खांब, साईन बोर्ड्स, गर्दी आणि वाहतूक या सगळ्यापासून त्यांना सुरक्षित अंतर राखून पुढे जाता येऊ लागलं.

दुर्दैवाने अल्ट्रासाऊंड सिस्टिम कधी बंद पडलीच तर ऐनवेळी पंचाईत नको, म्हणून खबरदारी म्हणून त्याने इन्फ्रारेड सिस्टिमसुद्धा त्यात बसवली आणि गॉगल्स एकदम पक्के तयार केले! आता हातात नेहमीची काठी आणि डोळ्यांवर हा खास गॉगल लावून अंध व्यक्ती कमालीची सुरक्षित झाली! जमीन आणि इतर सर्व अडथळे यांपासूनचे धोके आधीच समजू लागले. सर्वात विशेष म्हणजे, त्यांना कोणतंही नवीन किंवा जड उपकरण सोबत बाळगावं लागणार नव्हतं. जे आधी वापरत होते तशीच काठी आणि गॉगल ते वापरणार होते, उलट आता तो गॉगल पूर्णपणे उपयोगी आणि सुरक्षित झाला होता!

अनांगला आधी गावात सगळे ‘उगीच इकडे-तिकडे भटकत राहतो, अभ्यास करत नाही’ म्हणून चिडवायचे. पण त्याच अनांगला २०१७ मध्ये प्रतिष्ठित ‘डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम IGNITE पुरस्कार’ आणि ‘दीनानाथ पांडेय स्मार्ट आयडिया पुरस्कारा’ने सन्मानित करण्यात आले आहे! युनिसेफ आणि जगभरातील अनेक मोठ्या संस्थांनी त्याला मदतीचा हात देऊन या गॉगल्सचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन करून ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचं सुंदर काम हाती घेतलं आहे.

अनांग आता कॉलेजमध्ये शिकतो आहे. कोविडमुळे या गॉगल्सच्या निर्मितीत थोडी बाधा आली होती, पण आपण सर्वांनी मिळून अनांगला शुभेच्छा देऊया, की हे अतिशय महत्त्वाचे गॉगल्स लवकरच गरजूंपर्यंत उपलब्ध होतील! आहे ना आपला बालमित्र अनांग एकदम जोरदार? रस्ता ओलांडून देण्याचं एक साधं निमित्त झालं आणि या लहानग्या विद्यार्थ्याने संपूर्ण मानवजातीसाठी केवढी मोठी आणि सुंदर मदत केली!!

पर्यावरण शिक्षक, प्रकाशक-संपादक

sonalikolarkarsonar@gmail.com

logo
marathi.freepressjournal.in