ज्याचे त्याचे पूर्वज

पृथ्वीवर लाखो वर्षांपूर्वी वावरणाऱ्या वन्यजीवांचे पूर्वज नेमके कसे होते आणि काळाच्या ओघात त्यांच्यात काय बदल झाले, याचा रंजक मागोवा..
ज्याचे त्याचे पूर्वज
ज्याचे त्याचे पूर्वज
Published on

अजब निसर्ग

मकरंद जोशी

पृथ्वीवर लाखो वर्षांपूर्वी वावरणाऱ्या वन्यजीवांचे पूर्वज नेमके कसे होते आणि काळाच्या ओघात त्यांच्यात काय बदल झाले, याचा रंजक मागोवा..

आज निसर्गात दिसणारे अनेक प्राणी-पक्षी-किटक-उभयचर- जलचर हे सगळे या पृथ्वीवर लाखो वर्षांपूर्वी अवतरले आहेत.बागेत दिसणाऱ्या चतुरापासून ते महासागरातील शार्क माशांपर्यंत आणि वाळवंटातल्या उंटांपासून ते गर्द अरण्यातील महाकाय हत्तींपर्यंत अनेक प्राणी आज आपल्याला जसे पाहायला मिळतात तसेच ते तेव्हा म्हणजे लाखो वर्षांपूर्वी होते का? थोडक्यात या प्राण्यांचे पूर्वज कसे होते? त्या पूर्वजांमध्ये आणि आजच्या वंशजांमध्ये काही साम्य शिल्लक आहे का?ज्या भूप्रदेशात-वातावरणात हे पूर्वज प्राणी जन्माला आले,त्याच परिसरात-हवामानात त्यांचे वंशज आजही राहातात का ? अशा प्रश्नांचा मागोवा घेतल्यावर लक्षात येतं की निसर्ग खरोखरच अजब आहे पण त्या अजबपणातही त्याची एक विशिष्ट रचना आहे.चला तर मग काही वैशिष्ट्यपूर्ण जीवांचे पूर्वज होते तरी कसे याची थोडक्यात माहिती घेऊया.

पृथ्वीच्या पाठीवरच्या वेगवेगळ्या भौगोलिक आणि नैसर्गिक परिसरांमध्ये राहाणाऱ्या जीवांमधील वैविध्य खरोखरच थक्क करणारं आहे,हे वैविध्य नेमकं किती प्रकारचं आहे याची तर नीटशी गणनाही करता आलेली नाही.दरवर्षी जीवांच्या साधारण १०,००० तरी नवीन प्रजाती सापडतात,त्यामुळे या वैविध्याची मोजणी करणं खरोखरच अशक्य आहे.मात्र यातले बहुसंख्य जीव मग ते पाण्यात राहाणारे असोत किंवा जमिनीवर,ते व्हर्टिब्रेट्स म्हणजे कणावान असोत किंवा इनव्हर्टिब्रेट्स म्हणजे कणाहीन असोत,कसे निर्माण झाले-उत्क्रांत झाले याचा मागोवा मात्र नक्की घेता येतो.यातल्या अनेक जीवांचे पूर्वज त्यांच्या मूळ रुपात या पृथ्वीवरुन अस्तंगत होऊल लाखो वर्षे लोटली आहेत तरीही फॉसिल्स म्हणजे जिवाश्मांच्या मदतीने त्यांचा अंदाज बांधता येतो.त्यातून अनेक मनोरंजक गोष्टी समोर येतात.आता उंट हा वाळवंटातला प्राणी आहे.आफ्रिकेतील,भारतातील वाळवंटातलं जहाज म्हणून तो ओळखला जातो पण त्याचा उगम झाला होता उत्तर अमेरिकेत.सुमारे चाळीस ते पन्नास दशलक्ष वर्षांपूर्वी आजच्या साउथ डाकोटा प्रांतातल्या खुरट्या जंगलात उंटाचा पूर्वज ज्याला ‘प्रोटिलोपस’ म्हणतात तो रहात होता आणि सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे हा पूर्वज सशाच्या आकाराचा प्राणी होता.मात्र पुढच्या पाच ते आठ दशलक्षवर्षांमध्ये या प्राण्यात बदल होत गेले आणि आजच्या उंटाच सर्वात जवळचा पूर्वज ‘पोब्रोथेरियम’ अवतरला.हा प्राणी साधारण बकरीच्या आकाराचा होता.त्यानंतरच्या काळात जो ‘मिओसिन पिरियड’ ( सुमारे २३ ते ५ दशलक्षवर्ष मागे) म्हणून ओळखला जातो,या काळात जेव्हा पृथ्वीचं हवामान बदलून अधिक कोरडं,थंड होऊ लागलं त्या काळात उंटाचा थेट पूर्वज ‘प्रोकॅमेलस’ हा अवतरला.साधारण तीन दशलक्ष वर्षांपूर्वी उंटांनी उत्तर अमेरिकेतून दक्षिण अमेरिकेत स्थलांतर करायला सुरवात केली,या स्थलांतरामुळे दक्षिण अमेरिकेतील लामा, ग्वानाको,विकुना हे प्राणी जन्माला आले.बेरिंग स्ट्रीट मार्गे हे उंटांचे पूर्वज युरोप आणि आशियात आले.यांच्यातूनच आजचे दोन मदारीचे बॅक्ट्रियन कॅमल आणि एका मदारीचे उंट अवतरले.मात्र उंट युरोपमध्ये टिकू शकले नाहीत,फक्त आफ्रिका आणि आशियातील वाळवंटात स्थिरावले.आज जगभरात सर्वात जास्त प्रमाणात आढळणारे ‘अरेबियन उंट ’ हे फक्त सहा हजार वर्षांपूर्वी पृथ्वीवर अवतरले आहेत.

सस्तन प्राणी,पक्षी यांच्या पूर्वजांपेक्षा कणाहिन गटातील प्राण्यांचे पूर्वज खरोखरच आश्चर्यकारक आणि भितीदायक होते.आता साध्या मिलिपेड आणि सेंटिपेड म्हणजे आपले सहस्रपाद - पैसा किडा आणि शतपाद किंवा घोणीचंच उदाहरण घ्या.हे प्राणी साधारण दहा-बारा इंच आकाराचे असतात.मात्र यांचा साधारण तीस बत्तीस कोटी वर्षांपूर्वीचा पूर्वज मात्र राक्षसी आकाराचा होता.किमान सहा फूट ते कमाल आठ फूट आकाराचा हा प्राणी आता अस्तित्वातच नाही हे आपलं भाग्य.त्याच्या जिवाश्मांवरुन त्याचा आकार आणि जीवनशैली संशोधकांनी शोधून काढली आणि त्याला ‘अर्थ्रोप्लुरा’ हे नाव दिलं.हा प्राणी बहुदा उभयचर असावा आणि उथळ पाणथळींच्या तळशी राहात असावा असा अंदाज आहे.युरोप आणि उत्तर अमेरिकेत आढळणारा हा प्राणी मेलेल्या प्राण्यांच्या आणि वनस्पतींच्यावर आपला गुजारा करत असे.त्यामुळे हा महाकाय संधिपाद निसर्गचक्रात महत्वाची भूमिका बजावत होता.

आज नदी,तलाव,समुद्र असे वेगवेगळ्या जलाशयांमध्ये दिसणारे मासे या पृथ्वीवर अवतिर्ण झाले ते साधारण त्रेपन्न कोटी वर्षांपूर्वी.सुरवातीच्या काळातल्या माशांचं मुख्य वैशिष्ट्य म्हणजे त्यांना गील्स म्हणजे कल्ल्यांसारखा अवयव होता पण जबडा नव्हता.या जबडा विहीन माशांच्या डोक्यावर आणि शरीराच्या पुढच्या भागात संरक्षणासाठी बोनी प्लेट्सचे चिलखतासारखे आवरण असायचे.आज दिसतात तसे जबडा असलेले मासे अवतरले ते त्रेचाळीस कोटी वर्षांपूर्वी.आणखी काही कोटी वर्षांनी ‘डिव्होनियन ’ कालखंडात खऱ्या अर्थाने माशांचे वेगवेगळे प्रकार निर्माण झाले.मात्र आज यातले अनेक प्रकार अस्तित्वात नाहीत.

मात्र याचा अर्थ असा नाही की प्रत्येक प्राण्याचे भूतकाळातले पूर्वज आणि आजचे वंशज यांच्या रुपात नेहमीच मोठा फरक पडलेला पाहायला मिळतो.काही प्राणी असेही आहेत की जे गेल्य़ा लाखोवर्षांपासून आपलं रंगरुप,शरीराचा आकार टिकवून आहेत.यातला प्रमुख प्राणी म्हणजे ‘ मगर’.डायनासॉर्सच्या युगापासून मगर आणि तिचे भाइबंद या पृथ्वीवर वावरत आहेत.मात्र गेल्या दहा कोटी वर्षांमध्ये मगरींच्य शरीरात,आकारमानात काही फरक पडलेला नाही.डायनॉसॉर युगातले त्यांचे पूर्वज आकाराने लहान होते,अधिक चपळ होते आणि जमीन व पाणी दोन्ही ठिकाणी सहजपणे शिकार करुन आपला गुजारा करत होते.असाच आणखी एक प्राणी म्हणजे ‘हॉर्स शू क्रॅब’.एकतर हा काही खेकड्यांच्या गटातला म्हणजे संधिपाद प्राणी नाही,तर कोळी-विंचू यांच्या ‘आर्चनिड्स’ गटाचा हा सभासद आहे.सुमारे पंचवीस कोटी वर्षांपूर्वी पृथ्वीवर अवतरलेला हा प्राणी इतक्या दीर्घ काळात जराही बदललेला नाही.आपल्या अगदी ओळखीचा आणि गेल्या तेरा कोटी वर्षांमध्ये न बदललेला प्राणी म्हणजे झुरळ.या प्राण्याचा विनाश तर अणुस्फोट ही करू शकणार नाही,त्यामुळे कदाचित मानवानंतरही हा प्राणी मात्र पृथ्वीवर वावरत असेल.

लाखो-कोट्यावधी वर्षांपूर्वीचे विविध प्राण्यांचे पूर्वज आणि त्यांचे आजचे वंशज यांच्यातील दुवे खरोखरच अजब आणि रंजक आहेत.माणसाचे पूर्वज कसे होते आणि आजच्या माणसांबरोबर त्यांचं काही नातं होतं का? याविषयी पुन्हा कधीतरी.

निसर्ग अभ्यासक व लेखक

makarandvj@gmail.com

logo
marathi.freepressjournal.in