सागरात हिमशिखरे!

धुक्याच्या पदराआडून हळूच उलगडत जाणारं, हिमनगांनी नटलेलं अंटार्क्टिकाचं स्वप्नवत विश्व या महासागरातला प्रत्येक क्षण थरार आणि सौंदर्याची नवी व्याख्या सांगतो.
सागरात हिमशिखरे!
Published on

जगतवारी

मेधा आलकरी

धुक्याच्या पदराआडून हळूच उलगडत जाणारं, हिमनगांनी नटलेलं अंटार्क्टिकाचं स्वप्नवत विश्व या महासागरातला प्रत्येक क्षण थरार आणि सौंदर्याची नवी व्याख्या सांगतो.

साठ डिग्री साऊथ या अक्षांशाला अंटार्क्टिकाची सीमा सुरु होते; परंतु साधारण ४९-५५ डिग्री साऊथला हवेतील गारठा जाणवू लागतो. धुकं अधिक दाट होऊ लागतं आणि मनातली उत्सुकताही! अगदी धीम्या गतीने आमची बोट अंटार्क्टिका द्वीपकल्पाकडे कूच करत होती. अंटार्क्टिकाचं अप्रूप जो हिमनग (आईसबर्ग), तो कुठल्याही क्षणी, कुठल्याही रूपात आम्हाला दर्शन देणार होता. कसा बरं असेल तो ? लांब क्षितिजावर दिसेल की धुक्याचा पडदा सारून अचानक समोर उभा ठाकेल आमच्या? जाग येताच डेकवर धावलो. बोटीच्या विरुद्ध दिशेने चालणारी एक किलोमीटर लांबीची भिंत हिमनगाच्या स्वरूपात पाहून आम्ही थक्क झालो. ज्ञानदेवांची चालणारी भिंत आठवली.

हिमनगांची जन्मकथा आदल्याच दिवशी बोटीवरील तज्ज्ञांनी ऐकवली होती. हिमनदीच्या (ग्लेशियर) गर्भातून झालेला त्याचा जन्म बघणं ( Calving ) हा एक रोमांचकारी अनुभव आहे. आईपासून वेगळा होताना तो एक प्रचंड टाहो फोडतो. त्याचा कडाडणारा आवाज दूरपर्यंत ऐकू येतो. आधी भुसभुशीत बर्फ आणि मग मोठ्ठाले तुकडे पाण्यात पडतात. कधी कधी त्यांचे पुढे लहान लहान तुकडे होतात. जणू जुळं, तिळं! पण चेहरामोहरा मात्र अगदी वेगळा. निसर्गमातेची किमयाच! प्रत्येक हिमनग वेगळा. हिमनदी जिथे सागराला मिळते तिथे पाण्याचं तापमान तुलनेनं जास्त असल्यामुळे तळाचा बर्फ वितळू लागतो. त्याला आता हा डोईवरचा बर्फाचा डोलारा जड होऊ लागतो. मागून हिमनदीचा जोर वाढत जाऊन त्याला पुढे रेटतो. शेवटी त्याचे तुकडे होऊन ते पाण्यात फेकले जातात.

हिमनगांचे आकार जसे वेगवेगळे तसाच त्यांचा रंगही वेगवेगळा असतो. शुभ्र धवल रंग असलेल्या हिमनगांमध्ये आत बुडबुडे असतात. निळसर रंग त्यांची घनता दर्शवतो. काळसर हिरवा रंग असलेल्या हिमनगांचा संबंध हिमनदीच्या तळापासून वेगळे झालेल्या हिमनगांशी असतो, तर पट्टेदार हिमनग मातीच्या अवशेषांनी बनलेला असतो. हिमनगाचं तरंगणारं टोक त्याचा आठवा भाग दर्शवतं हे आपल्याला टायटॅनिकच्या दुर्घटनेपासून पक्कं ठाऊक आहे. पाण्याच्या पृष्ठभागाखालील भाग बोटीला घासला गेल्याचा अनिष्टसूचक आवाज कप्तानाच्या काळजाचा ठोका चुकवतो.

हिमनगांच्या आकारची विविधता पाहिली आणि मनात आपसूकच बोल उमटले- ये कौन चित्रकार है.. पाण्याच्या अविरत माऱ्यामुळे एका हिमनगाचा आकार कोरलेल्या खांबांच्या राजवाड्यासारखा झाला होता. छोट्या रबरी बोटी त्या राजवाड्यातून फिरू शकत होत्या. पुढे तर प्रजासत्ताकदिनाच्या परेडमध्ये ओळीने येणाऱ्या चित्ररथांची आठवण व्हावी असे एकामागोमाग एक, एकाहून एक सुंदर हिमनग येत राहिले. डोळ्याचं पारणं फिटलं.

उश्वाया सोडल्यापासून चवथ्या दिवशीच्या पहाटे आम्ही सारे हटकून डेकवर जमलो होतो. प्रसिद्ध ‘लिमेयर चॅनल’ या सामुद्रधुनीतून पार होताना निसर्गसौंदर्याचा अप्रतिम देखावा नजरेस पडणार होता. सहा किलोमीटर लांबीचा हा बर्फाळ समुद्राचा अरुंद पट्टा. दोन्ही बाजूस रायफलधारी शिपायांसारखे उंच उभे कडे, बर्फाच्छादित शिखरं, हिमनद्यांची शुभ्र चादर, काचपाणी वाटावं इतका शांत-नीरव समुद्र, त्यात पडणारं पर्वतांचं प्रतिबिंब, हिमनगांवर विसावलेले जलचर… हे सर्व म्हणजे मनावर गारुड टाकणारं दृश्य! ते सारं कॅमेऱ्यात कैद करण्याची आमची केविलवाणी धडपड काही थांबत नव्हती. या पट्ट्याला ‘कोडॅक गॅप’ म्हणतात ते काही उगाच नाही. कप्तानाची कुशलता मात्र इथे पणाला लागते. विखरून पडलेले छोटे मोठे हिमनग आणि बर्फाचे तरंगते तुकडे यामुळे झालेल्या ‘बर्फीक जॅम’मधून बोट सहीसलामत बाहेर काढणं हे निष्णात कप्तानासाठीसुद्धा एक मोठं आव्हान असतं. बाहेरच्या सृष्टिसौंदर्यावरून नजर उचलून एकदाच मी ती कप्तानाच्या चेहऱ्यावर नेली. आत्मविश्वासाचं तेज ओसंडून वाहणारा; परंतु निर्विकार चेहरा! नजर समोर खिळलेली. जहाजाच्या लांबीरुंदीचा आणि त्या अरुंद सामुद्रधुनीच्या मोजमापाचा अचूक अंदाज! शांत समुद्रात अचल पर्वताचं प्रतिबिंब दिसावं तसं, कप्तानाच्या शांत चेहऱ्यावर त्याच्या निश्चल मनाचं प्रतिबिंब दिसत होतं. ‘भय’सागर पार करवून देणाऱ्या त्या ’चक्र’धारी सारथ्याला मी मनोभावे नमस्कार केला.

अंटार्क्टिकामध्ये वेगवेगळ्या देशांची पथकं संशोधनासाठी वर्षभर कार्यरत असतात. त्यांच्यापुढील सर्वात मोठं आव्हान म्हणजे विपरीत हवामान! त्या देशांच्या यादीत आपल्या भारताचं एक पथक आहे ही आपल्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे. तिथे जाण्याचा योग नव्हता; परंतु आम्ही अर्जेंटिनाच्या रिसर्च सेंटरला भेट दिली होती. अर्जेन्टिनींना भारतीयांबद्दल खूप प्रेम आहे. बारा महिने या बेटावर राहायचं आव्हान ते कसं पेलत असतील, हिवाळ्यात पारा घसरल्यावर, सूर्यप्रकाश लुप्त झाल्यावर त्यांची शारीरिक आणि मानसिक स्थिती कशी राहत असेल आणि हे इथे राहून नक्की कसलं संशोधन करतात? अशा अनेक प्रश्नांची भाऊगर्दी माझ्या मनात झाली होती. त्यांच्याशी अनौपचारिक गप्पा मारताना माझ्या अनेक शंकाकुशंकांचं निरसन झालं. उन्हाळ्यात सत्तरच्या आसपास आणि हिवाळ्यात जेमतेम वीस-बावीस कर्मचारी केंद्रावर राहतात. संशोधकांना टोकाच्या हवामानाचा अभ्यास करता येतो आणि आपल्यात त्याच्याशी जमवून घ्यायची क्षमता आहे की नाही हेही पडताळून पाहता येतं. बायोलॉजिस्ट पेंग्विन आणि सीलच्या जीवनपद्धतीचा अभ्यास करतात, जिऑलॉजिस्ट पर्वतांवर चढून, तंबूत मुक्काम ठोकून तिथल्या भूगर्भाचा आढावा घेतात. अंटार्क्टिका भूगर्भात प्रचंड खनिजसंपत्ती आहे, कोळसा, तेल आणि गॅस यांचाही भरपूर साठा आहे. मात्र ‘माद्रिद ट्रीटी’नुसार २०४८ सालापर्यंत खाणकामास सक्त मनाई आहे. आणि ही बंदी उठवली गेली तरी अंटार्क्टिकाच्या अतिथंड तापमानामुळे आणि अस्थिर, सरकणाऱ्या बर्फाच्या जाड थरांमुळे हे कार्य खूप कष्टप्रद आणि खर्चिक होईल. जियोलॉजिस्ट तेथील शेवाळं गोळा करून त्या वनस्पतींच्या प्रजातींचाही अभ्यास करतात. ग्लासीओलॉजिस्ट (असे कुणी लॉजिस्ट माझ्या शब्दकोशात नव्हतेच!) ग्लेशीयरची खोली, त्याचा आकृतिबंध मोजतात. त्याकरता त्यांना ग्लेशीयरवर ट्रेकिंग करीत जावं लागतं.

मार्चमध्ये बहुतांश संशोधक परत जातात, पुरवठादार सामानाची बेगमी करून उश्वायाचा किनारा गाठतात. आणि हो, वर्षभर जमवलेला कचराही बरोबर घेऊन जातात. समुद्रात फेकून प्रदूषण करण्याचा बेजबाबदारपणा त्यांच्या हातून घडत नाही; शिवाय तो कायद्यानं गुन्हा आहे. हिवाळा आला की, समुद्रात तयार झालेल्या बर्फाच्या फरशीवरून आरामात चालत जात येतं. बर्फावर चालू शकेल अशी चारचाकी मोटरबाइक किंवा स्नोमोबिलही असते दिमतीला. कधी कधी बर्फातून बुलडोझर फिरवावा लागतो. त्याचा वेग ताशी सहा किमी इतकाच ठेवावा लागतो.

या विपरीत परिस्थितीत मनोबल उंच ठेवणं कसं काय जमतं तुम्हाला? मी तिथल्या संशोधिकेला विचारलं.

“अगं, निसर्ग इतकी लोभसवाणी रूपं दाखवतो ना, की मन त्या पूर्ण चंद्रापाशीच रेंगाळत राहतं. सूर्याने तर बुडीच मारलेली असते. अगदी मामुली संधिप्रकाश थोडावेळ पसरतो. रात्री अरोरा ऑस्ट्रॅलिसची, त्या हिरव्या- लाल दक्षिणरंगांची उधळण होते. चांदण्यात हिमशिखरं छान निळी -जांभळी दिसू लागतात. अजून काय हवं?” ते निसर्गवेडं खंबीर मन पाहून मी थक्क झाले.

मनाने कमकुवत असलेल्या व्यक्ती या गच्च अंधाराच्या कधीही न संपणाऱ्या काळरात्रीचा सामना करू शकत नाहीत. त्यांचं मनोबल खच्ची होऊन मानसिक समस्या उद्भवतात. तेथील धैर्यधरांना एक कडक सॅल्यूट ठोकून मी बोटीवर चढले. केबिनमधील मऊ गादीवर आणि जाड पांघरुणात मला काही केल्या शांत झोप लागत नव्हती. कूस बदलता बदलता, कधी तो गच्च अंधार अंगावर येई; तर कधी दक्षिणरंगांची बरसात !

परतीच्या प्रवासात आम्हाला ‘ड्रेक शेक’ ने आपला झटका दाखवला. तीस फूट उंच उसळणाऱ्या लाटा घेऊन तो ड्रेक राक्षस बोटीवर आदळत होता. आमचा कुशल कप्तान लाटांवर स्वार होऊन बोटीचा तोल व्यवस्थित सांभाळत होता. आम्हाला मात्र कठड्याच्या मदतीशिवाय उभंही राहता येत नव्हतं. केबिनच्या गोल खिडक्यांमधून हे तांडव पाहत असताना मनात रामरक्षा स्तोत्राचं पठण चालू होतं. पहाटे उठून डेकवर आलो तो समुद्र शांत झोपलेल्या बाळासारखा निरागस दिसत होता. दूरवर उश्वायाची हिरवाई दिसू लागली होती. अंगावरील शाल घट्ट लपेटून घेत मी मागील दहा दिवसांच्या आठवणीत रमून गेले. शुभ्र शिल्पांनी नटलेल्या या महासागराची, या द्वीपकल्पाची सफर खरंच एकमेकाद्वितीय!

लेखिका आणि ट्रॅव्हलर

medhaalkari@gmail.com

logo
marathi.freepressjournal.in