

जगतवारी
मेधा आलकरी
अंटार्क्टिका—पृथ्वीचं दक्षिण टोक! हाडं गोठवणाऱ्या कडाक्याच्या थंडीत तिथे फक्त संशोधनच चालतं, असं आपल्याला वाटतं. पण पर्यटकांना तिथे जाता येतं का?
हो, नक्कीच! अनाघ्रात निसर्गसौंदर्याचा आस्वाद घेत निशब्द होण्यासाठी, पेंग्विनच्या मजेशीर हालचाली पाहून पोटभर हसण्यासाठी—या सातव्या खंडावर, या शुभ्रखंडावर आपण पाऊल ठेवू शकतो. जानेवारी–फेब्रुवारी हे महिने या प्रवासासाठी उत्तम; दक्षिण गोलार्धातील हे उन्हाळी दिवस. चला तर, अंटार्क्टिका प्रवासाला निघूया!
हा प्रवास खूप आधीपासून आखावा लागतो. हव्या त्या तारखांना उपलब्ध असलेली क्रूझ, आर्थिक गणित आणि प्रकृतीची तयारी—सगळंच जमवावं लागतं. बुकिंगची चढाओढ वर्षभर आधी सुरू होते. आम्ही तर जय्यत तयारीनिशी गेलो होतो. पण तिन्ही गोष्टींचा विचार न करता आलेले, आणि तरीही प्रत्येक क्षण मनापासून उपभोगणारे सहप्रवासीही भेटले. बोटीवरील सरासरी वय होतं साठ—रुपेरी केसांची मांदियाळी! त्यात पार्किन्सनचा आजार असलेली एक महिला ‘सहस्र पेंग्विन दर्शन’ साजरं करण्यासाठी एकटीच आली होती. युरोपियन प्रवाशांची ही जिद्द थक्क करणारी! एक तरुण जोडपं अर्जेन्टिना फिरायला आलं होतं; दोन रिकाम्या जागांमुळे त्यांना अंटार्क्टिका सफारीची संधी मिळाली—गरम कपड्यांचीही तयारी नसताना! काय योग असतो, नाही?
अर्जेन्टिनातील उश्वाया—जणू आपलं कन्याकुमारी—जगाच्या अंतिम टोकावरचं शहर. इथून दक्षिण समुद्रातील अंटार्क्टिका द्वीपकल्पासाठी दहा रात्री–अकरा दिवसांची आमची सफर सुरू होणार होती. संध्याकाळी चारला ‘अकॅडेमिक आयोफे’ या रशियन बनावटीच्या बोटीवर पाऊल ठेवलं आणि अंगात वेगळंच चैतन्य संचारलं. सहाच्या सुमारास दोर सुटले आणि उश्वायाच्या गर्द वनराईला निरोप दिला. पुढचे दहा दिवस—फक्त शुभ्रधवल नेत्रसुख!
‘बेगल चॅनल’मधून जलपर्यटन सुरू झालं. अंटार्क्टिका समुद्रात शिरण्याआधी ‘ड्रेक पॅसेज’ ही ६५० किमीची बिकट वाट पार करावी लागते—अटलांटिक, पॅसिफिक आणि दक्षिण समुद्राचा संगम. हवामानाचा अंदाज अशक्य; कधी तलावाइतका शांत, तर कधी उंच फेसाळत्या लाटा. ‘ड्रेक लेक’ की ‘ड्रेक शेक’—आम्ही शांततेची प्रार्थना केली आणि ती फळाला आली. दोन दिवसांचा हा प्रवास एखाद्या सरोवरासारखा शांत!
या काळात ‘वन ओशन एक्सपीडिशन’च्या तज्ज्ञ स्टाफशी ओळख झाली—फोटोग्राफर, इतिहासतज्ज्ञ, पक्षीनिरीक्षक—माहितीची खाणच. आमच्या बोटीवर ९४ प्रवासी आणि १० कर्मचारी—आटोपशीर पसारा. लहान बोटीचा मोठा फायदा म्हणजे गाइडबरोबर अधिक वेळ. शिवाय पर्यावरणस्नेही नियमांनुसार, अंटार्क्टिकावर एकावेळी फक्त शंभर जणांनाच उतरता येतं.
डेकवर उभं राहून अथांग समुद्राचं नेत्रप्राशन करताना सागरी पक्ष्यांची जलक्रीडा मन मोहून टाकत होती. अकरा फूट पंखाविस्तार असलेला अल्बेट्रॉस—न्यूझीलंडची जन्मभूमी, अंटार्क्टिका कर्मभूमी! समुद्रावरून उडत मासा चोचीत पकडणं, हलकी डुबकी मारून भक्ष्य टिपणं—थक्क करणारी कला. स्नो पेट्रल, प्रायॉन, शियर वॉटर, स्कुआ… पहाटे शुभ्र हिमनगावर विसावलेला दुर्मिळ स्नो पेट्रल पाहून पक्षीनिरीक्षकांचा आनंद ओसंडून वाहत होता.
बोटीवरचा निष्णात फोटोग्राफर लांब भिंगांतून पक्षी, पेंग्विन, हिमनग, बर्फाच्छादित सुळके कॅमेऱ्यात कैद करत असे—जणू ते जिवंतच! इतिहासतज्ज्ञाने ‘शॅकल्टन द एक्सप्लोरर’ या भाषणातून अंटार्क्टिकाचा इतिहास उलगडला. १९०९ची अयशस्वी मोहीम, १९११मध्ये अमुंडसनचा विजय, आणि १९१५मधील शॅकल्टनची धाडसी झुंज—हिमनगांत अडकलेलं ‘एन्ड्युरन्स’, लाईफबोटीतून वाचलेला जीव, आणि अखेर सुरक्षित परतलेले शूरवीर. हे ऐकताना जाणवलं—आजचा प्रवास किती सुरक्षित आणि सुलभ झाला आहे. वर्षाला सुमारे पंचेचाळीस हजार पर्यटक या शुभ्रखंडाला भेट देतात.
पुढच्या लेखात पाहूया तिथल्या पेंग्विनच्या गमतीजमती !
लेखिका: मेधा आलकरी
ई-मेल: medhaalkari@gmail.com