

जगतवारी
मेधा आलकरी
अंटार्क्टिकाच्या बर्फाळ सागरात भेटणारे सील आणि व्हेल हे केवळ जलचर नाहीत, तर निसर्गाने घडवलेले विलक्षण चमत्कार आहेत. त्यांच्या शरीररचनेपासून मातृत्व, शिकार आणि जलक्रीडांपर्यंतचा हा अनुभव म्हणजे जलचरांच्या अद्भुत जलव्याचा प्रत्यक्ष साक्षात्कार.
अंटार्क्टिकामधील बेटांवर उतरलो की, यथेच्छ सूर्यस्नान करत असलेले, एकमेकांना चिकटून पहुडलेले मातकट रंगाचे सील जमिनीच्या किंवा खडकांच्या रंगात इतके बेमालूमपणे मिसळून जात की, त्यांचं अस्तित्त्व लक्षातच येत नसे. गोड, गोजिरे, बडबडे पेंग्विन आणि हे ओंगळवाणे सील हा एक विरोधाभासच होता. मात्र बोटीवर एका रात्री सील प्राण्यांवरील माहितीपट बघितला आणि त्याच्याबद्दलचं कुतुहूल जागृत झालं. रूपात डाव्या असलेल्या सीलच्या दोन गोष्टी मला खूपच भावल्या. एक, मादीमध्ये असलेलं अगाध मातृत्त्व आणि दुसरं पाण्याखाली शंभर मिनिटं राहू शकण्याची क्षमता. त्यांच्या शरीरात असलेल्या चरबीच्या गोदामातून ते सतत ऊर्जा आणि उष्णता घेत असतात. त्यांचे मागील पाय पॅडलसारखे लांब, बारीक आणि चपटे असतात. चेहरा शरीराच्या तुलनेत छोटा आणि गंमत म्हणजे त्यावर कानच नसतात. फक्त कर्णछिद्रं ! मान चांगली जाडजूड असते आणि मणके एकमेकांशी सैलसर जोडलेले असल्यामुळे हे अवाढव्य गुळगुळीत शरीर, पाण्यामध्ये मात्र माशासारखं लवचिक आणि चपळ असतं. समुद्राच्या लाटांचा प्रचंड वेग आणि जलप्रवाह रोखत ते सहजपणे वाट काढू शकतात. सीलच्या नाकपुड्या विभागलेल्या असल्यामुळे त्यांना त्या स्वेच्छेनं मिटून घेता येतात. पुढचे पाय कमजोर असल्यामुळे मात्र समुद्रात ‘दादा’ असलेला सील जमिनीवर अगदी ‘साधा’ असतो. त्याला धड चालताही येत नाही, पळणं तर खूप दूरची गोष्ट. शरीर जमिनीवर घासत आणि पार्श्वभाग डावी उजवीकडे डोलवत ते पुढे सरकतात. छोटंसं अंतर ते लोळतच पार करतात; नाहीतर किड्यांसारखे वळवळतात. फ्लिपरच्या मदतीनं शरीराचं कुबड काढून, आपला भार त्यावर तोलून शरीराला पुढे फेकण्याची त्यांची लकब खूपच न्यारी. त्यांच्या पार्श्वभागातील बळकट स्नायूंमुळे पोहोण्यात पटाईत असलेल्या सीलची समुद्रात दांडगाई चालते. एखाद्या तीरासारखा पाण्याला कापत तो अन्नभक्षणार्थ समुद्रात खोल डुबकी मारू शकतो. सीलच्या पूर्ण विकसित मोठ्या डोळ्यांची भिंगही मोठी असल्यामुळे त्यांच्या डोळ्यात प्रकाश अधिक जातो. त्यामुळेच अगदी खोल समुद्रातही त्यांना स्वच्छ दिसत असतं.
सीलमध्येही स्वभावाच्या नाना छटा आहेत. काही किनाऱ्यावर एकत्र विसावणारे, काही गप्पिष्ट, तर काही एकलकोंडे असतात. क्रॅबइटर, लेपर्ड, एलिफन्ट आणि वेडेल या त्यांच्या जाती आम्हाला जवळून पाहता आल्या. गंमत म्हणजे क्रॅबइटर, क्रॅब म्हणजे खेकडे न खाता क्रील नावाचे अगदी छोटे मासे मटकावतो. एलिफंट सीलला नाकापाशी असलेली छोटी सोंड त्याच नाव सार्थ करते आणि अंगावर बिबट्यासारखे चट्टे असलेला लेपर्ड हा शिकारी सीलही लगेच ओळखू येतो. दोस्ती कितीही पक्की असली तरी समुद्रात शिकारीला जाताना सील आप्पलपोट्यासारखा एकटाच जातो. तिथे भागीदारी मंजूर नाही !
क्रॅबइटर बर्फावर राहणंच पसंत करतो. आणि हो, हा सदाच ‘एकटा जीव सदाशिव!’ बर्फामधील एखादी भेग दातांच्या साहाय्यानं तासून मोठ्या केलेल्या छिद्रातून डोकं वर काढून श्वास घेणारे वेडले सील वेडेच म्हणायचे; कारण या तासकामात त्यांच्या दातांना खूप इजा पोहोचते. पाण्यातून सात फूट वर उडी घेऊन, बर्फाच्या तरंगत्या तुकड्यावर आपलं अवजड शरीर उतरवण्यासाठी त्याला एक उतरंड लागते. तीही तो दाताने तासून तयार करतो. दातांना असा ‘ओव्हरटाईम’ करायला लागल्यामुळे कधी ते तुटतात, कधी फोड येऊन त्यात भरलेला पू त्यांच्या जीवावर बेततो. किनाऱ्यावर चुपचाप पडून राहिलेल्या वेडले सीलला मित्र दिसले की गडी खुश ! एकत्र पाण्याखाली गेले की, शिट्या काय मारतात, गुरगुरतात काय, घोंगावणाऱ्या वाऱ्यासारख्या आवाजात गप्पाही छाटतात. एलिफंट सीलच्या सोंडेतून निघालेला आवाज घशात घुमल्यामुळे दरारा निर्माण करतो; त्यामुळे प्रत्यक्ष मारामारीची वेळ त्याच्यावर कमीच येते. मारामारीत लेपर्ड सील सर्वात पुढे. शिकारीचं विलक्षण कौशल्य असलेल्या या लेपर्ड सीलचे जबडे आणि दात हे मुख्यतः मांस फाडून खाण्यासाठी असतात. क्रील माशांवर यथेच्छ ताव मारला तरी त्याचा डोळा असतो क्रॅबइटर सीलच्या नवजात पिलांवर आणि पेंग्विनांवर!
सीलच्या वरच्या ओठावर, डोळ्यांवर आणि नाकावर असलेल्या मिशा म्हणजे त्यांचे अँटीना ! छोट्या माशाची शेपटी हलून एक बारीकसा तरंग उठला की, टिपलाच या नत्थुलालच्या मिशांनी. भक्ष्यचा पाठलाग करताना तर माग काढण्यासाठी त्या नाकासमोर ताठ उभ्या राहतात. माशांच्या मागावर मिशा !
नर आणि मादी सीलना इंग्रजीत अनुक्रमे ‘बुल’ आणि ‘काऊ’ का म्हणतात हे एक कोडंच आहे. पाण्यात डुबकी मारण्याआधी दीर्घ श्वास भरून तो पुरवून पुरवून वापरणं हे मनुष्याचं गणित. सील मात्र उच्छवास टाकून शरीर हलकं करतात आणि खाली गेल्यावर पाण्यातला प्राणवायू न वापरता चक्क त्यांच्या रक्तातला प्राणवायू वापरतात. भक्ष्य पकडताना तोंड उघडलं की, जीभ आणि पडजीभ घशाचा मार्ग बंद करून टाकते. हा घास तोंडात धरून ठेवायचा, समुद्राचं खारं पाणी दातांच्या फटीतून वाहून जाऊ द्यायचं आणि मग तो मटकवायचा. काय अजब शरीर दिलंय देवानं त्याला! सीलचे सपाट फ्लिपर स्कुबा डायव्हरच्या फ्लिपरचे प्रेरणास्रोत आहेत म्हणे. सील मादीमधील मातृत्व खूप विशाल असतं. तिचं स्वतःचं पिल्लू दगावलं तर ती अनाथ पिल्लांना जवळ करून त्यांना स्तनपान करते. मादी सीलच्या दुधात चाळीस ते पन्नास टक्के स्निग्धता असते. हे पौष्टिक दूध प्यायल्यानं पिल्लाचं वजन दररोज जन्मवजनापेक्षा पंचवीस टक्क्यांनी वाढतं. गुटगुटीत बाळाची आई मात्र झपाट्याने वाळते, कारण त्या दरम्यान ती अन्नभक्षण करीत नाही. अजब मातृत्व ! (मला आपल्या बाळंतिणींचा तुपात घोळलेला आहार आठवला.) वेडले सीलची माता पंधरा दिवस आपला पूर्ण वेळ पिल्लाला देऊन त्याचं लालन पालन करते. आणि मग एके दिवशी ‘कामावर जाऊन येते हं बाळा’ म्हणत अन्नाच्या शोधार्थ समुद्रात जाते. त्या पुढील दहा दिवस ती त्याला पोहोण्याचे धडे देते. सहा- सात आठवड्यांनंतर मात्र ‘तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार’ म्हणत त्याला स्वतःपासून वेगळं करते. या सगळ्या कालावधीत पिल्लांचा सांभाळ करण्यात नर सील काहीही जबाबदारी न घेता नामानिराळे राहतात. जबाबदार पेंग्विन पित्याची सर सीलच्या नखातंही नाही.
जंगलसफारीला निघालो आणि व्याघ्रदर्शन झालं नाही तर मन कसं खट्टू होतं ना? समुद्रसफारीत व्हेल माशाची कोलांटीउडी बघायला मिळाली नाही की, ते असंच चुकचुकत राहतं. अंटार्क्टिका सागरसफारीत मात्र त्यांच्या या कोलांट्या-वेलांट्या उड्या आणि नमुनेदार फुत्कार विपुल प्रमाणात बघायला मिळतात. व्हेल म्हणजे देवमासा हा सस्तन प्राणी असल्यामुळे त्याला श्वास घेण्यासाठी पाण्याबाहेर डोकं काढावं लागतं. त्याला डोक्यावर वेगळी श्वसनकेंद्र आहेत. श्वासोच्छवासाची प्रक्रिया होताना याच्या नाकातून बाहेर पडणारी हवा पाण्याच्या फवाऱ्याबरोबर वर उडते आणि त्याचा फुत्कार ऐकू येतो. खरं तर ही बाष्पीभवन होत असलेली वाफ असते. आपल्याला पाणी उडतंय असं वाटतं. हे वेगळंच ‘ऑडिओ- व्हिज्युअल’ श्वसन! लांबवर दिसणारे हे फुत्कार ऐकण्याचा आणि त्याची कोलांटीउडी जवळून पाहण्याचा बहारदार अनुभव आम्ही घेतला. देवमाशाने मुसंडी मारली, शेपटीचं टोक वर आलं आणि त्यातून पागोळ्यांसारखे पाण्याचे थेंब ओघळू लागले.
हे देवमासे प्रजोत्पादनासाठी गरम तापमानाच्या समुद्रात स्थलांतर करतात तेव्हा सहा महिने अन्न भक्षण न करता अंगात साठवलेल्या चरबीचा उपयोग करतात. ‘घर पान्यामंदी’ असलेल्या व्हेलच्या पिल्लांचा जन्म पाण्यातच होतो. हे हम्पबॅक व्हेल नर मादीला भुलवण्यासाठी गातात म्हणे. मादी ठेंगणी-ठुसकी असते. पंधरा मीटर लांबीच्या या व्हेलकुमारीचं वजन तब्बल चाळीस टन असलं तरी ते तिच्या डौलदार जलक्रीडांच्या आड येत नाही.
‘सेई’ हा त्यांच्या जातीतला एक विरळा जीव पाहिला. हा आळशीनंदन भक्ष्य पकडण्याचे कष्ट न घेता पृष्ठभागावर आ वासून पोहत राहतो. त्याचे दात केसाळ असतात. मासे विनासायासच त्याच्या दातात येऊन अडकतात. ते पाहून आम्ही उद्गारलो, “बच्चू,‘व्हेल’ डन!”
बोटीवर काही धाडसी उपक्रमही होते. पहिला कायाकविहार. एकट्यानं किंवा दुकट्यानं वल्हवायची ही केळीच्या आकाराची नाव हिमनगांच्या चिंचोळ्या पोकळ्यांमधूनही वाट काढू शकते. हिमनगांचं किंवा जलचरांचं दर्शन त्यामुळे अगदी जवळून घेता येतं. दुसऱ्या उपक्रमात पोहोण्याच्या कपड्यांवर अंटार्क्टिकाच्या अतिथंड पाण्यात डुबकी मारायची आणि तिसऱ्यात बर्फ खोदून तयार केलेल्या खड्ड्यात स्लीपिंग बॅगमध्ये रात्र काढायची. हा सगळा ‘जिगरबाजोंका खेल’! आम्ही फक्त टाळ्या वाजवण्यासाठी.
पुढच्या लेखात पाहू अंटार्क्टिकाचं अनाघ्रात निसर्गसौंदर्य !
लेखिका आणि ट्रॅव्हलर
medhaalkari@gmail.com