आपले अंतरंग स्वतंत्र आहे का?

आज आपण राजकीयदृष्ट्या, भौतिकदृष्ट्या स्वतंत्र असलो, तरी आपण अडकलेलो आहोत अदृश्य अशा अनेक बंधनांमध्ये. उदा. चिंता, भीती, अन्याय, व्यसनं, धर्मांधता, सामाजिक दडपणं, नैराश्य किंवा मर्यादित समजुती. ही बंधने आपले मन बंदिस्त करतात. म्हणूनच 'स्वातंत्र्य' ही संकल्पना समजून घेण्यासाठी मनाचा अभ्यास आवश्यक ठरतो. हा अभ्यासच आपल्याला स्वायत्ततेची दिशा दाखवतो.
आपले अंतरंग स्वतंत्र आहे का?
Published on

हितगुज

डॉ. शुभांगी पारकर

आज आपण राजकीयदृष्ट्या, भौतिकदृष्ट्या स्वतंत्र असलो, तरी आपण अडकलेलो आहोत अदृश्य अशा अनेक बंधनांमध्ये. उदा. चिंता, भीती, अन्याय, व्यसनं, धर्मांधता, सामाजिक दडपणं, नैराश्य किंवा मर्यादित समजुती. ही बंधने आपले मन बंदिस्त करतात. म्हणूनच 'स्वातंत्र्य' ही संकल्पना समजून घेण्यासाठी मनाचा अभ्यास आवश्यक ठरतो. हा अभ्यासच आपल्याला स्वायत्ततेची दिशा दाखवतो.

स्वातंत्र्य ही केवळ राजकीय संकल्पना नसून, ती ती मानवी अस्तित्वाचा गाभा आहे. भारताच्या स्वातंत्र्यलढ्याची कहाणी ही केवळ एका ब्रिटिश सत्तेच्या गुलामीतून मुक्त होण्याची कथा नाही, तर ती आत्मोद्धाराची, मूल्यांची, विचारस्वातंत्र्याची आणि आत्मसन्मानाची लढाई होती. म्हणूनच महात्मा गांधी म्हणाले होते, "स्वराज म्हणजे केवळ इंग्रजांचे शासन काढून टाकणे नव्हे, तर स्वमनावर, स्ववृत्तीवर नियंत्रण मिळवणे." स्वातंत्र्यलढ्याच्या ऐतिहासिक संघर्षामध्ये एका संपूर्ण राष्ट्राने स्वतःच्या मनावर विश्वास ठेवत, अन्यायाविरुद्ध उभे राहण्याची हिंमत दाखवली.

भारताचा स्वातंत्र्यदिन दरवर्षी उत्साहाने साजरा होत असताना, आपण थोडं थांबून स्वतःला विचारूया, आजच्या काळात आपल्यासाठी स्वातंत्र्य म्हणजे नेमकं काय आहे? स्वातंत्र्य फक्त मिळवायचे नसते, ते टिकवायचेही असते स्वतःच्या अंतरंगात, समाजात आणि राष्ट्राच्या जाणिवेतून.

स्वातंत्र्याबद्दल विविध राष्ट्रीय नेत्यांनी आपापले विचार मांडले आहेत. लोकमान्य टिळक यांनी स्वराज्य हा जन्मसिद्ध हक्क असल्याचे ठामपणे सांगितले, तर गांधीजींनी स्वातंत्र्याला आत्मशुद्धी आणि अहिंसेच्या मार्गाशी जोडले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केवळ राजकीय नव्हे, तर सामाजिक व आर्थिक समतेवर भर दिला. नेहरूंनी स्वातंत्र्य म्हणजे दारिद्र्य, अज्ञान आणि विषमता दूर करण्याची जबाबदारी मानली. सुभाषचंद्र बोस यांना वाटायचे की, स्वातंत्र्य ही भीक नाही, ते संघर्षातूनच मिळवावे लागते. या सर्व विचारांमधून स्पष्ट होते की खरे स्वातंत्र्य म्हणजे केवळ परकीय सत्तेपासून मुक्तता नव्हे, तर व्यक्ती आणि समाजाला आपले जीवन सन्मानाने, विवेकाने आणि जबाबदारीने जगण्याचा अधिकार मिळणे होय.

स्वायत्ततेमधील स्वातंत्र्य

खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य म्हणजे स्वायत्तता. केवळ शरीराचीच नव्हे, तर मनाची व आत्म्याचीही. ही स्व-स्वातंत्र्याची अंतःस्थ भावना अनेक विचारवंतांनी मांडलेली आहे. जर्मन मानसशास्त्रज्ञ आणि तत्त्वज्ञ एरिक फ्रॉम यांच्या मते, स्वातंत्र्य म्हणजे स्वतःचे वेगळेपण. आपण कोण आहोत, हे स्वतःच शोधून, आपलं जीवन स्वतःच्या निर्णयांनुसार जगणं, याला ते स्वातंत्र्य म्हणतात. मनोविश्लेषणाच्या जगातील सर्वात स्वतंत्र, मूळ विचारवंतांपैकी एक डेविड शापिरो यांनीही 'स्वायत्तता' (autonomy) या संकल्पनेतून आपल्या निर्णयांसाठी दुसऱ्यांवर अवलंबून न राहता, स्वतःची ओळख जपून, आपले खरे रूप जगासमोर मांडणे म्हणजे स्वातंत्र्य असे स्पष्ट केले आहे. मरे बोवेन या मानसोपचारतज्ज्ञांनीही 'अंधानुकरण न करता स्वतःचे विचार आणि भावना यांना समजून घेत स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणे (differentiation of self)' असे सांगत स्वातंत्र्य ही संकल्पना स्पष्ट केली आहे. इमॅन्युएल कान्ट या थोर तत्त्वज्ञांनी 'स्वायत्तते' चे जे परिपक्व रूप मांडले, ते म्हणजे व्यक्तीने केवळ आपल्या इच्छा-आकांक्षांच्या अधीन न राहता, नैतिक नियमांच्या अधीन राहून, कर्तव्याची जाणीव ठेवून जगणे म्हणजे खरी स्वायत्तता. म्हणजे स्वतःच्या वर्तनामागील हेतू 'मला काय हवे आहे' यावर नव्हे, तर 'काय योग्य आहे' यावर आधारित असणे. या स्वरूपाची स्वायत्तता ही एक अशी नैतिक उंची आहे जिथे माणूस स्वतःचाच नियमकर्ता बनतो - विवेकाच्या प्रकाशात, जबाबदारीच्या मार्गाने चालणारा. नैतिक स्वायत्ततेपासून ते 'इच्छाशक्ती हेच व्यक्तिमत्त्व' या विचारांपर्यंत सर्वांचा परीघ एकच आहे.

स्वातंत्र्य आणि निवडीचा अधिकार

स्वातंत्र्य ही केवळ राजकीय किंवा सामाजिक संकल्पना नाही. ती माणसाच्या अंतर्मनात वसलेली असते. आपले विचार, भावना व्यक्त करण्याची आणि निर्णय घेण्याची मोकळीक हीच खरी मानसिक स्वातंत्र्याची सर्वोच्च पायरी असते. मानसशास्त्रात 'कॉग्निटिव्ह डिसोनन्स 'ही संकल्पना आहे. त्यानुसार एखाद्याला निवड करण्याचे स्वातंत्र्य दिले गेले आणि त्याने घेतलेला निर्णय त्याच्या आधीच्या मूल्यांशी विसंगत ठरला, तर त्याच्या अंतर्मनात तणाव निर्माण होतो. खरे स्वातंत्र्य केवळ निवडीचे नसते, तर त्या निवडीमुळे मनात निर्माण होणाऱ्या द्वंद्वांना सामोरे जाण्याच्या तयारीमध्ये असते.

स्वातंत्र्य म्हणजे निवड करण्याचा अधिकार आहे हे खरे, परंतु केली जाणारी निवड ही केवळ इच्छा किंवा उपभोगाच्या आधारे नसावी. कारण स्वातंत्र्य म्हणजे स्वैरपणा नव्हे. आपल्या कृती जर दुसऱ्या व्यक्तीची प्रतिष्ठा, शारीरिक किंवा मानसिक शांतता याला इजा पोहोचवत असेल, उदा. लैंगिक छळ, हिंसाचार किवा अवमानकारक भाषा, तर ती स्वातंत्र्याची अभिव्यक्ती नव्हे. याउलट तो स्वातंत्र्याचा धोकादायक गैरवापर ठरतो. कोणताही समाज अशा वर्तनाला 'व्यक्तिस्वातंत्र्य' म्हणून मान्यता देऊ शकत नाही. खरे स्वातंत्र्य हे नेहमीच आपल्या हक्कांसोबतच दुसऱ्याच्या सुरक्षिततेचेही भान राखते.

स्वातंत्र्य म्हणजे नवनिर्माणाची संधी

ओशो म्हणतात, "आपण आयुष्यभर काहीतरी झुगारण्यासाठी झगडतो. उदा. बंधन, दुःख, व्यवस्था. पण जेव्हा त्यातून मुक्त होतो, तेव्हा पुढे काय करायचे हे कळत नाही." स्वातंत्र्य केवळ नकारासाठी नसते; ती एक संधी असते - काही सुंदर घडवण्याची, स्वतःला ओळखण्याची. जर आपण मुक्ततेनंतर काही साकारले नाही, तर मुक्ततेची ती स्थिती एक पोकळी निर्माण करते आणि उदासीकडे घेऊन जाते.

मुक्त मन आणि स्वातंत्र्य

आपण स्वातंत्र्याचा विचार बऱ्याचदा बाह्य गोष्टींशी जोडतो. उदा. राजकारण, निवडणूक, विकास इत्यादी. पण इतिहास वेगळे काही सांगतो. सॉक्रेटिस, बोथियस, थॉमस मोर, महात्मा गांधी, नेल्सन मंडेला...या सर्व अशा व्यक्ती होत्या ज्यांना शरीराने तुरुंगात डांबले गेले तरी पण त्यांची मने त्यांना कैद करणाऱ्यांपेक्षाही अधिक मुक्त होती. का? कारण खरे स्वातंत्र्य हे 'मनःस्थिती' मध्ये आहे. व्हिक्टर फ्रँकल हे नाझी छळछावणीतून बचावलेले मानसशास्त्रज्ञ आणि तत्त्वचिंतक. त्यांच्या मते, माणसाकडून सर्व काही हिरावून घेतले जाऊ शकते, फक्त एक गोष्ट सोडून, ती म्हणजे कोणत्याही प्रसंगाकडे पाहण्याची आपली भूमिका. व्यक्तीचा स्वतःचा दृष्टिकोन कोणी हिरावून घेऊ शकत नाही. हाच खऱ्या स्वातंत्र्याचा गाभा आहे. यामुळेच वरील सर्व व्यक्तींचा दुःख अनुभवण्याचा दृष्टिकोनच बदलून गेला.

वैयक्तिक स्वातंत्र्य

वैयक्तिक स्वातंत्र्य (personal autonomy) हे मोठ्या प्रमाणात व्यक्तीला तिच्या बालपणात आलेले अनुभव, सभोवतालचे सांस्कृतिक वातावरण आणि आयुष्यातील विविध टप्प्यांवर घडलेल्या घटनांवर अवलंबून असते. बालपणीचा पालनपोषणाचा अनुभव, पालकांची वागणूक, व्यक्तिमत्त्वाची वैशिष्ट्यं, आत्मभान, आत्म-कार्यक्षमता आणि नियंत्रणाची जाणीव हे सर्व घटक त्या त्या व्यक्तीला स्वतःचे जीवन किती स्वतंत्रपणे जगता येईल यावर प्रभाव टाकतात. ज्यांना स्वतःच्या गरजा, उद्दिष्टे आणि भावना यांचे भान असते, ते अधिक विचारपूर्वक निर्णय घेऊ शकतात. आत्म-कार्यक्षमता अधिक असलेल्या व्यक्तींमध्ये आपल्यामध्ये यश मिळवण्याची क्षमता आहे, असा विश्वास असतो. याउलट, मानसिक समस्यांमुळे आणि आजारांमुळे ही क्षमता कमी होऊ शकते आणि त्यामुळे स्वतंत्रपणे निर्णय घेणे कठीण जाते. त्यामुळे वैयक्तिक स्वातंत्र्य हा एक समग्र आणि वैयक्तिक प्रवास असतो, जो विविध अंतर्गत आणि बाह्य घटकांवर अवलंबून असतो. वैयक्तिक स्वातंत्र्य हे नैतिक आणि मानसिक शिस्तीच्या पायावर उभे असते.

स्टॉइक तत्त्वज्ञान

स्टॉइक (Stoic) तत्त्वज्ञान ही एक प्राचीन विचारधारा आजच्या काळात पुन्हा चर्चेत आली आहे. या तत्त्वज्ञानाचे महान विचारवंत मार्कस ऑरेलियस आणि सेनेका असे सांगतात की, खरे स्वातंत्र्य हे बाह्य घडामोडींवर नव्हे, तर आपल्या मनावर नियंत्रण मिळवण्यात आहे. बाह्य घडामोडींवर आपण काय प्रतिक्रिया देतो, त्यावर अवलंबून आहे. आत्मसंयम हेच खरे स्वातंत्र्याचे मूळ आहे. शेवटी, स्वातंत्र्य ही एक भावना आहे. आनंदासारखी, भीतीसारखी, प्रेमासारखी. म्हणूनच, जेव्हा तुम्ही मुक्ततेचा तो झंकार अनुभवता, तेव्हा थांबा आणि तो अनुभव जपा. तो तुमच्यातील सर्जनशीलतेचा, जबाबदारीचा आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुमच्या मानवी असण्याचा भाग आहे.

आधुनिक मानसशास्त्रही हेच सांगते की, अडथळ्यांच्या अस्तित्वातही कृती करण्याचा निर्णय म्हणजेच स्वातंत्र्य. स्वातंत्र्य पुन्हा मिळवायचे असेल, तर धैर्याने कृती करावी लागते. प्रभावी कृती करण्याची क्षमता म्हणजे स्वातंत्र्य. निष्क्रियतेचा किंवा असहाय्यतेचा विरोध म्हणजे स्वातंत्र्य. 'मी ही स्थिती हाताळू शकतो-शकते', हे धैर्यच आपल्याला ही क्षमता मिळवून देते. या धैर्याची सुरुवात होते आत्मविश्वासाने. आत्मविश्वास 'प्रभुत्वाच्या अनुभवां' तून घडतो. हे असे क्षण असतात जिथे आपण भीतीवर मात करून कृती करतो, संघर्ष करतो आणि त्यातून शिकतो.

माणूसपणाची मूलभूत गरज

स्वातंत्र्य ही व्यक्ती आणि समाज यांची एक मूलभूत आणि अत्यावश्यक गरज आहे. माणूस म्हणून जगण्याचा खरा अर्थही या मुक्ततेत दडलेला आहे. स्वातंत्र्य नसलेले आयुष्य संजीवक नसणार, ते एखाद्या यंत्रासारखे चालणार. स्वातंत्र्याचा दुसरा महत्त्वाचा पैलू म्हणजे व्यक्तिस्वातंत्र्य. जिथे व्यक्तीला आपल्या भावना मुक्तपणे व्यक्त करता येतात, स्वतःच्या छंदांना आणि सर्जनशीलतेला वाव देता येतो, तिथेच मानसिक आरोग्य फुलते. बाबासाहेब आंबेडकर सांगतात, "जोवर तुम्ही सामाजिक मुक्तता मिळवत नाही, तोपर्यंत कायद्याने जे काही स्वातंत्र्य तुम्हाला दिले आहे, ते तुम्ही प्राप्त करू शकत नाही." (So long as you do not achieve social liberty, whatever freedom is provided by the law is of no avail to you.) म्हणजेच सामाजिक स्वातंत्र्याशिवाय, इतर सर्व प्रकारचे स्वातंत्र्य केवळ कागदावरच उरते. स्वातंत्र्याचे खरे मूल्य तेव्हाच सिद्ध होते, जेव्हा ते समाजातील शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचते. जर एखाद्या व्यक्तीला आपले अनुभव आणि भावना कुठल्याही दडपणाविना व्यक्त करता आल्या, तर ती व्यक्ती 'स्व'शी अधिक जोडली जाते, तिच्या अंतःकरणात गूढ शांती नांदायला लागते.

शेवटी, स्वातंत्र्य ही केवळ बंधनांपासून सुटण्याची नव्हे, तर 'कशासाठी जगायचे?' या प्रश्नाला उत्तर शोधण्याची मूलभूत संधी आहे. थेट अनुभवता येणारी एक उत्कट जाणीव आहे. मुक्तीची खरी परीक्षा आहे. जिथे आपला बाह्य शत्रू नसतो, तिथे अंतर्यामी शांततेचा शोध सुरू होतो. अशा प्रकारे, स्वातंत्र्य म्हणजे केवळ साखळदंड गळून पडणे नव्हे, तर तो एक आत्मिक जागर आहे.. स्वतःच्या मनाचा, विचारांचा आणि अस्तित्वाचा...

डिजिटल युगातील आभासी स्वातंत्र्य

आजच्या डिजिटल जगात 'आपण स्वतंत्र आहोत', असेच प्रत्येकाला वाटते. पण प्रत्यक्षात अनेक गोष्टी आपले विचार आणि निवडी नकळतपणे नियंत्रित करत असतात. उदाहरणार्थ, मोबाईल आणि सोशल मीडियावर आपल्याला जाहिराती, पोस्ट, व्हिडीओ असे जे काही दिसत असते ते सगळे आपली आवड लक्षात घेऊन दाखवले जाते. पण ही आवड आपली स्वतःची असतेच असे नाही, ती तयारही केली जाते. याला 'अल्गोरिदम' म्हणतात. आपला डेटा गोळा करून आपल्याला काय दाखवायचे हे ठरवले जाते. तसेच, बाजारात अनेक वस्तू दिसतात, पण त्या वस्तू ही आपली खरी गरज असते का? की फक्त आकर्षक जाहिरातींनी आपल्याला तसे वाटत आहे? खूप वेळा आपले पर्याय हे आपल्याला दिसणाऱ्या-दाखवल्या जाणाऱ्या गोष्टींनी आणि आपल्या आर्थिक परिस्थितीने ठरवलेले असतात. त्यामुळे 'स्वातंत्र्य आहे' असे वाटले तरी आपल्या निवडी पूर्णपणे आपल्याच हातात असतात असे नाही.

आधुनिक जगात स्वातंत्र्य ही एक बहुपेडी संकल्पना आहे. ती राजकीय, आर्थिक, वैयक्तिक आणि सांस्कृतिक अशा विविध आयामांमध्ये व्यक्त होते. राजकीय स्वातंत्र्यामुळे मताधिकार, अभिव्यक्तीचा अधिकार आणि नेत्यांना जाब विचारण्याचा, विरोध करण्याचा अधिकार प्राप्त होतो. आर्थिक स्वातंत्र्य हे संधीची उपलब्धता, मालमत्ता हक्क आणि भ्रष्टाचारापासून मुक्तता यावर आधारलेले आहे. वैयक्तिक स्वातंत्र्य म्हणजे आपली जीवनशैली, श्रद्धा जपण्याची आणि आपले निर्णय आपण घेण्याची मुभा. सांस्कृतिक स्वातंत्र्य म्हणजे आपल्या परंपरा, भाषा, कला जपण्याचा व आपली ओळख अभिमानाने व्यक्त करण्याचा अधिकार, जो सामाजिक विविधतेला मान्यता देतो आणि व्यक्तीची अस्मिता घट्ट करतो. स्वातंत्र्याची रूपे वेगवेगळी असली तरी त्याचे प्रत्येक रूप अत्यंत मौल्यवान आहे.

तुमचे स्वातंत्र्य तिथेच थांबते जिथून दुसऱ्याच्या सुरक्षिततेची आणि आत्मसन्मानाची सुरुवात होते, ही सीमारेषा आपण कधीच विसरता काम नये.

मनोचिकित्सक व वैद्यकीय महाविद्यालयात अधिष्ठाता.

logo
marathi.freepressjournal.in