बिलियर्डचे चेंडू...

माणूस म्हणजे एखादा चेंडू आहे का, की त्याने कसंही घरंगळत जावं? माणसाला विचार स्वातंत्र्य आहे म्हणजे नेमकं काय? एखाद्या गोष्टीवर कोणती प्रतिक्रिया द्यावी, हे जर व्यक्तीच्या हातात असेल तर मग कायम एखादी व्यक्ती विशिष्ट पद्धतीनेच का व्यक्त होते? हे समजून घ्यायचं असेल तर आपल्यातील बालक, पालक आणि चालक यांना ओळखत चालकाला अधिक सक्षम करायला हवं.
बिलियर्डचे चेंडू...
Published on

मनाचे अभंग

डॉ.रुपेश पाटकर

माणूस म्हणजे एखादा चेंडू आहे का, की त्याने कसंही घरंगळत जावं? माणसाला विचार स्वातंत्र्य आहे म्हणजे नेमकं काय? एखाद्या गोष्टीवर कोणती प्रतिक्रिया द्यावी, हे जर व्यक्तीच्या हातात असेल तर मग कायम एखादी व्यक्ती विशिष्ट पद्धतीनेच का व्यक्त होते? हे समजून घ्यायचं असेल तर आपल्यातील बालक, पालक आणि चालक यांना ओळखत चालकाला अधिक सक्षम करायला हवं.

तुम्हाला बिलियर्डचा खेळ माहीत आहे का? मी तो प्रत्यक्षात कधीच पाहिला नाहीए. सिनेमात फक्त पाहिलाय. त्यात कॅरम बोर्डसारख्या बोर्डावर अनेक गुळगुळीत चेंडू ठेवलेले असतात आणि खेळणारी मंडळी एका बारीक काठीच्या टोकाने एका चेंडूला ढकलतात. तो चेंडू मग दुसऱ्या चेंडूंना ढकलतो. हे वर्णन मला आज का आठवतेय माहीत आहे का? कारण माझा एक क्लाएंट आज मला हे सांगून गेला की, “माणूस हा बिलियर्ड खेळातील चेंडूसारखा असतो. कुठं जायचं? कोणत्या गतीने जायचं? हे त्या चेंडूंसारखं त्याच्या हातात नसतं. ते त्याच्यावर आपटणाऱ्या दुसऱ्या चेंडूवर अवलंबून असतं. नव्हे, मुळात काठीने पहिला चेंडू किती जोराने, कोणत्या दिशेत ढकलला, यावर अवलंबून असतं. चेंडूने फक्त धक्के बसतील तसं गडगडत जावं, बस.”

त्याने आपली तुलना बिलियर्ड चेंडूशी करताच मला डॉ. व्हिक्टर फ्रँकल आठवले. डॉ. फ्रँकल हे मनोविकारतज्ज्ञ होते, पण त्यांनी आयुष्याची तब्बल चार वर्षं नाझी जर्मनीच्या छळछावण्यांमध्ये एक युद्धकैदी म्हणून घालवली होती. या काळात त्यांची गरोदर पत्नी, भाऊ-भावजय, आई-वडील मारले गेले. त्यांना ज्या छळछावण्यात ठेवण्यात आलं होतं, तिथून जिवंत परत जाण्याची अजिबात शक्यता नव्हती. त्यांना जेव्हा तिथे नेण्यात आलं तेव्हा त्यांच्या सोबतच्या काम करू न शकणाऱ्या माणसांना गॅसचेंबरमध्ये घालून ठार करण्यात आलं. अपुरं अन्न, कडाक्याची थंडी, विश्रांती जवळपास नाहीच, अशा स्थितीत एक दिवस आपण देखील कामासाठी निरुपयोगी ठरू आणि गॅसचेंबरमध्ये पाठवले जाऊ, हेच भविष्य स्पष्ट दिसत होतं. अशा परिस्थितीत त्यांच्या सोबतचे अनेक कैदी हताश होऊन आत्महत्या करीत. पण त्या निराश परिस्थितीत डॉ. फ्रँकल मात्र तग धरून राहिले. अशा परिस्थितीतून गेलेला हा माणूस म्हणतो, की माणसाकडून सारं काही हिरावून घेतलं तरी एक गोष्ट त्याच्याकडून हिरावून घेतली जाऊ शकत नाही आणि ती म्हणजे कोणत्याही प्रसंगाला कोणती भावनिक प्रतिक्रिया द्यावी याचं स्वातंत्र्य! तुमच्या मनात तुम्ही काय विचार करता हे कोणीही ठरवू शकत नाही. छळछावणीतील त्या भयाण दिवसात डॉ. फ्रँकल कोणता विचार करत होते, माहीत आहे का? ते विचार करत होते, एका भाषणाचा! कोणतं भाषण? तर ‘छळछावणीतील छळाचा तेथील कैद्यांच्या मानसिकतेवर होणारा परिणाम!’ मी जेव्हा हे वाचलं तेव्हा मला या माणसाची कमाल वाटली. ते जो विचार करत होते, तो त्यावेळी अशक्यकोटीतला होता. नाझी फौजा हरल्याशिवाय ते शक्य नव्हतं आणि नाझींचा पराजय होईल, असं तेव्हा कोणालाच वाटत नव्हतं. अशी परिस्थिती असतानाही ते एक दिवस हरतील, तोपर्यंत आपण जिवंत राहू, आपली सुटका होईल आणि त्यानंतर आपल्याला छळछावणीतील अनुभवांवर बोलायला बोलावतील, तेव्हा आपण कसं भाषण द्यावं, कोणते मुद्दे मांडावेत याचा विचार ते करत होते. वजनदार लोखंडी पाईप उचलून नेताना, पाईपलाइनसाठी खोदाई करताना एका बाजूला त्यांचं शरीर श्रमत होते आणि दुसरीकडे डोक्यात भविष्यातील भाषणाचं चित्र हा माणूस रंगवत होता. त्यांनी जगाला सांगितलं की, माणूस प्रत्येक क्षण अर्थपूर्ण बनवू शकतो, अगदी आपल्याला सर्वात होपलेस वाटणारा क्षणदेखील! त्यांनी अर्थपूर्ण जगण्याची शिकवण देणाऱ्या ‘लोगो थेरपी’ नावाच्या उपचार पद्धतीचा सिद्धांत मांडला.

‘ट्रांझक्शनल ॲनॅलिसीस’ या उपचार पद्धतीवर पुस्तकं लिहून तिचा प्रसार करणारे डॉ. थॉमस हॅरिस स्पष्टच म्हणतात, “बिलियर्डचा चेंडू आणि माणूस यात मूलभूत फरक आहे. चेंडू निर्जीव आहे. त्याला जसं ढकललं जातं, तसा तो सरकत राहतो. पण माणसाचं तसं नाही. माणसाला मेंदू आहे. तो विचार करतो. त्याच्या विचारांचं देखील एक वैशिष्ट्य आहे, ते म्हणजे तो केवळ होऊन गेलेल्या गोष्टींचाच विचार करतो असं नाही, तर अजून न घडलेल्या भविष्यातील शक्यतांचा देखील तो विचार करतो.”

डॉ. हॅरिस यांचा हा मुद्दा बारकाईने समजून घ्यायला हवा. जेव्हा एखादी व्यक्ती विशिष्ट पद्धतीने वागताना दिसते तेव्हा आपण तिच्या वागण्याचं कारण शोधू लागतो आणि आपण म्हणतो की, तिच्यावर अमुक संस्कार झाले किंवा तिचं बालपण अमुक वातावरणात गेलं म्हणून ती तशी वागते. म्हणजे तिच्या आजच्या भल्याबुऱ्या वागण्याला तिच्यावर बालपणात झालेले संस्कार जबाबदार आहेत. इथे डॉ. हॅरिस असा प्रश्न उपस्थित करतात की, असं जर स्वीकारलं तर मग माणसाच्या कोणत्याही कृत्याला तो माणूस स्वतः जबाबदार नाही, असंच म्हणावं लागेल. हे खरं आहे का? माणसाचं आजचं वागणं, त्याच्यावर भूतकाळात झालेल्या संस्कारांवरच केवळ अवलंबून आहे का? या प्रश्नाचे उत्तर ‘होय’ असेल तर माणूस म्हणजे बिलियर्डचा चेंडू ठरेल. डॉ. हॅरिस यावर अधिक विचार करण्यासाठी आणखी एक प्रश्न उपस्थित करतात. एकाच प्रकारचं बालपण मिळालेल्या सगळ्या व्यक्ती एकाच तऱ्हेनं वागत नाहीत, त्यामागचं कारण काय? त्याचं कारण माणसाकडे असलेली विचार करण्याची क्षमता. भविष्यातील संभावनांचा, शक्यतांचा विचार करणं, आपल्या कृत्याच्या परिणामांचा विचार करणं. त्यामुळे माणूस हा असहाय्यपणे धक्के खात गडगडत जाणारा बिलियर्डचा चेंडू नाही.

“मग माणसं बदलत का नाहीत? वर्षानुवर्ष एकाच तऱ्हेनं ती का वागत राहतात?” माझ्या दुसऱ्या एका क्लायंटने विचारलं होतं.

“कारण माणसांना कसं बदलायचं हे माहीत नसतं, म्हणून ती बदलत नाहीत!", मी सांगितलं. एखाद्या व्यक्तीकडून कोणत्याही घटनेला त्याचा ठरलेला असा विशिष्ट प्रतिसादच का येतो? दरवेळी नव्या उमेदीनं नवी नोकरी धरणारे श्रीमान शूमेकर काही महिन्यांतच नोकरीचा तडकाफडकी राजीनामा का देतात? यापुढे बायकोशी वाद घालायचा नाही, असं कौटुंबिक सल्ला केंद्रात ठरवून निघालेल्या विक्रांतचं दुसऱ्याच दिवशी त्याच्याही नजरेत क्षुल्लक असणाऱ्या कारणावरून बायकोशी टोकाचं भांडण का होतं? याचं स्पष्ट कारण आपल्या मनातील बालकात (Child) आणि पालकात (Parent) रेकॉर्ड झालेल्या गोष्टी तशाच प्रकारच्या प्रसंगात पुन्हा वाजायला लागतात, हे आहे. हे जर जाणीवपूर्वक बदलायचं असेल तर आपल्यातला चालक (Adult) मजबूत करायला हवा. त्याने आपल्यातला बालक (Child) आणि पालक (Parent) यामध्ये काय दडलं आहे हे शोधायला हवं आणि आजच्या वास्तवावर तपासायला हवं. त्यासाठी आपला संवाद तपासायला हवा. आपण जे दुसऱ्याशी बोललो, दुसऱ्याला जो प्रतिसाद दिला, तो आपल्यातील कोणाचा होता, पालकाचा, चालकाचा की बालकाचा? आपल्यातील चालकाने त्या परिस्थितीत कोणता प्रतिसाद दिला असता? याचा सतत अभ्यास करणं म्हणजे आपल्या चालकाला बलवान करणं.

स्वतःमधील पालक-चालक-बालक यांना तपासण्यासोबतच हेदेखील लक्षात घ्यायला हवं, की समोरच्या व्यक्तीत देखील बालक (Child) आणि पालक (Parent) यांचं रेकॉर्डिंग आहे. समोरची व्यक्ती आपल्याशी बोलत असताना तिच्यातील पालक (Parent) बोलतोय, की तिचा चालक (Adult) बोलतोय, की बालक (Child) बोलतोय, हे लक्षात घेणं गरजेचं आहे आणि तो बालक, चालक, पालक आपल्यातल्या बालक, पालक, चालक यापैकी कोणाशी बोलत आहे हेदेखील लक्षात घ्यायला हवं.

श्रीमती रोझा यांच्याबाबतीत घडलेल्या एका प्रसंगातून आपण हे समजून घेऊ. रोझा सकाळी कपड्याच्या दुकानात गेल्या होत्या. त्यांना त्यांच्या भाचीच्या लग्नात घालण्यासाठी नवा ड्रेस हवा होता. दुकानातील सेल्समनने त्यांना अनेक ड्रेस दाखवले. त्या ते बघत असताना त्याने आणखी काही ड्रेस काढले आणि त्यातील आकाशी रंगाचा ड्रेस दाखवत तो म्हणाला, “हा नवीन स्टॉक आला आहे. तुम्हाला हा आकाशी ड्रेस भारी दिसला असता, पण थोडा महाग आहे. तुमच्या बजेटमध्ये बसेल का?”

“भाचीचं लग्न पुन्हा पुन्हा थोडंच होणार आहे. हाच ड्रेस द्या!” असं म्हणत रोझा यांनी सेल्समनने सांगितलेला तो महाग ड्रेस खरेदी केला.

खरं म्हणजे त्यांना दुसरा चॉकलेटी रंगाचा ड्रेस आवडला होता. पण त्यांनी आपल्याला आवडलेला ड्रेस खरेदी न करता, सेल्समनने सांगितलेला खरेदी केला. वरवर पाहता रोझाबाई आणि सेल्समन यांच्यातील संवाद दोन चालकांमधला (Adult मधला) वाटतो. पण प्रत्यक्षात तो तसा नाहिए. त्या सेल्समनमधल्या पालकाने (Parent ने) रोझाबाईंमधल्या बालकाला (Child ला) उचकावलं आहे आणि त्यांच्यातील बालकाने सेल्समनने सांगितलेला ड्रेस खरेदी केला आहे.

मी जेव्हा अशा तऱ्हेच्या संभाषणांविषयी पहिल्यांदा वाचलं तेव्हा माझ्या लक्षात आलं, की रोझाबाई एकट्याच अशा नाहीत, मीदेखील कित्येक प्रसंगी असा वागलेलो आहे.

हे टाळायचं असेल तर आपल्यातील चालकाला (Adult ला) सक्षम, कणखर केलं पाहिजे. रोझाबाईंचा चालक मजबूत असता तर त्या म्हणाल्या असत्या, “तुम्ही दाखवलेला ड्रेस छान आहे. पण मला मात्र हा चॉकलेटी रंगाचा ड्रेसच घ्यायचा आहे!”

मनोचिकित्सक व लेखक.

logo
marathi.freepressjournal.in