

विशेष
डॉ. साक्षी गुजर
प्रत्येक मुलाची फुलण्याची ओढ सारखीच असते, पण काहींची वाट मात्र वेगळी असते. ‘ऑटिझम’ म्हणजे आजार नव्हे, तर जगाला समजून घेण्याची एक निराळी पद्धत आहे. ऑटिझम जागरूकता दिनानिमित्त, त्यांच्यातील हे वेगळेपण स्वीकारून, प्रेमाने आणि योग्य मार्गदर्शनाने त्यांना स्वावलंबी बनवणे हीच आपली जबाबदारी आहे.
बालपण म्हणजे निसर्गाची सर्वांत सुंदर निर्मिती आणि मानवी आयुष्याचा पाया असतो. प्रत्येक मूल हे आपल्या परीने फुलत असते, वाढत असते. मात्र, कधी कधी निसर्गाच्या या सर्जनशील प्रवासात मेंदूच्या वाढीची लय काहीशी बदलून जाते. ज्याला आपण ‘सामान्य’ वाढ म्हणतो, त्यापेक्षा एक वेगळी आणि काहीशी अनाकलनीय वाटावी अशी वाढ मुलांमध्ये दिसून येते, ज्याला वैद्यकीय परिभाषेत ऑटिझम स्पेक्ट्रम डिसऑर्डर असे संबोधले जाते. ऑटिझम हा कोणताही आजार नसून तो एक न्यूरो डेव्हलपमेंटल विकार आहे, जो प्रामुख्याने लहान मुलांच्या वाढीच्या टप्प्यात दिसून येतो. यामध्ये मुलांच्या मेंदूची वाढ बाकी मुलांसारखी नसून ती अबनॉर्मल पद्धतीने होते. या स्थितीचा थेट परिणाम मुलांच्या आयुष्यातील तीन महत्त्वाच्या स्तंभांवर होतो, ते म्हणजे त्यांचे संवाद कौशल्य, त्यांचे वर्तन आणि त्यांचे सामाजिक संबंध.
साधारणपणे मुलाच्या वयाच्या दीड ते दोन वर्षांपासून या स्थितीची लक्षणे स्पष्टपणे दिसू लागतात. जेव्हा इतर मुले बोबडे बोल बोलू लागतात किंवा पालकांच्या डोळ्यांत बघून हसू लागतात, तेव्हा ऑटिस्टिक मूल आपल्याच एका वेगळ्या विश्वात मग्न असल्याचे जाणवते. यातील सर्वात महत्त्वाचे लक्षण म्हणजे मुलाने डोळ्यांत डोळे न मिळवणे किंवा ज्याला आपण ‘आय कॉन्टॅक्ट’ म्हणतो त्याचा अभाव असणे. ही मुले समोरच्या व्यक्तीचे इशारे समजू शकत नाहीत आणि आपल्या स्वतःच्या नावालाही प्रतिसाद देत नाहीत. सामाजिक संवाद साधणे त्यांना कठीण जाते. त्यामुळे ती इतर मुलांसोबत खेळण्याऐवजी एकटे राहणे पसंत करतात. त्यांच्या वर्तनात एक प्रकारची लयबद्धता किंवा पुनरावृत्ती असते, ज्याला ‘रिपीटेटिव्ह बिहेविअर्स’ म्हटले जाते. जसे की, एखादी वस्तू सतत गोल फिरवत राहणे, खेळण्यातील गाड्यांच्या चाकांकडे तासनतास पाहत राहणे, वस्तूंची एक विशिष्ट रांग लावत बसणे किंवा स्वतःच्या शरीराची एखादी हालचाल वारंवार करणे. त्यांच्या दैनंदिन दिनक्रमात किंवा रुटीनमध्ये झालेला छोटासा बदलही त्यांना सहन होत नाही, ज्यातून प्रचंड चिडचिड आणि हट्टीपणा निर्माण होतो. या मुलांमध्ये स्पर्शाच्या किंवा संवेदनांच्या समस्या, ज्याला ‘सेंसरी इशूज’ म्हणतात, त्याही प्रामुख्याने दिसतात. कधी त्यांना विशिष्ट आवाजाचा त्रास होतो, तर कधी विशिष्ट प्रकारचा स्पर्श त्यांना अस्वस्थ करतो.
आजच्या आधुनिक काळात ऑटिझमचे प्रमाण वाढताना दिसत आहे, पण याचे सकारात्मक कारण म्हणजे या विषयाबद्दल वाढलेली जागरूकता आणि निदानाचे प्रगत तंत्रज्ञान होय. पूर्वी ज्या मुलांकडे केवळ ‘हट्टी’ म्हणून दुर्लक्ष केले जायचे, आता त्यांना योग्य वेळेत ऑटिझमचे निदान मिळत आहे. आता केवळ लहान मुलांमध्येच नाही, तर मोठ्यांमध्येही याचे निदान होऊ लागले आहे. संशोधनानुसार, ऑटिझम होण्याचे कोणतेही एक ठराविक किंवा स्पेसिफिक कारण अद्याप समोर आलेले नाही. मात्र, त्याला आनुवंशिकता, जन्माच्या वेळी झालेली गुंतागुंत किंवा काही पर्यावरणीय घटक कारणीभूत असू शकतात, असे मानले जाते. पालकांनी हे समजून घेणे अत्यंत गरजेचे आहे की ऑटिझम ही एक स्थिती आहे, तो कोणताही संसर्गजन्य आजार नाही. त्यामुळे तो औषधांनी पूर्णपणे बरा होत नाही, पण त्यावर योग्य त्या उपचारांनी आणि थेरपीने मुलांचे आयुष्य जास्तीत जास्त सुखकर आणि स्वावलंबी बनवता येते. बदलती जीवनपद्धती आणि विभक्त कुटुंब पद्धतीमुळे मुलांना मिळणारा वेळ कमी झाला आहे, ज्यामुळे त्यांच्या सामाजिक विकासात अडथळे येत आहेत.
सध्याच्या काळात ‘व्हर्च्युअल ऑटिझम’ किंवा ‘ऑटिझम रिग्रेशन’ ही संकल्पना मोठ्या प्रमाणावर समोर येत आहे, ज्याचे प्रमुख कारण म्हणजे वाढता स्क्रीनटाइम होय. जेव्हा लहान मुलांना तासनतास मोबाईल किंवा टीव्हीसमोर ठेवले जाते, तेव्हा ते बाह्य जगाकडून मिळणाऱ्या नैसर्गिक उत्तेजनांना प्रतिसाद देण्याची क्षमता हळूहळू गमावतात. ज्या वयात मुलांनी मातीत खेळायला हवे, निसर्गाशी संवाद साधायला हवा, त्या वयात मोबाईलमधील कृत्रिम प्रकाशात मेंदूची नैसर्गिक वाढ होत नाही. मुले शिकलेल्या गोष्टी विसरू लागतात, नावाला प्रतिसाद देणे बंद करतात आणि मोबाईलमधील पात्रांसारखी रोबोटिक भाषा बोलू लागतात. यामुळे त्यांच्यातील हट्टीपणा आणि स्वतःमध्ये राहण्याचे प्रमाण वाढते. जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, एक वर्षाखालील मुलांना कोणत्याही प्रकारची स्क्रीन दाखवू नये. पाच वर्षांपर्यंतच्या मुलांसाठी केवळ एक तासाचा स्क्रीनटाइम असावा आणि तोही पालकांच्या नियंत्रणाखाली असावा. झोपण्यापूर्वी किमान एक तास आधी स्क्रीन बंद करणे मुलांच्या मेंदूच्या विकासासाठी अनिवार्य आहे, अन्यथा त्यांच्या झोपेवर आणि मानसिक वाढीवर गंभीर परिणाम होतात.
मेंदूची जास्तीत जास्त वाढ ही वयाच्या सात वर्षांपर्यंत होत असते. त्यामुळे ‘अर्ली इंटरव्हेंशन’ म्हणजेच लवकरात लवकर उपाय सुरू करणे हाच यावरील सर्वात मोठा उपाय आहे. जेव्हा पालकांना मुलामध्ये दोन वर्षांपासून काही ‘रेड फ्लेक्स’ किंवा संशयास्पद लक्षणे दिसतात, तेव्हा त्वरित डेव्हलपमेंटल पेडियाट्रिशियन किंवा सायकियाट्रिस्टचा सल्ला घेणे आवश्यक असते. ऑटिझम हे एक ‘स्पेक्ट्रम’ असल्यामुळे त्याची तीव्रता सौम्य, मध्यम आणि तीव्र अशा तीन प्रकारात मोडते. जितक्या लवकर निदान होईल आणि उपचारांना सुरुवात होईल, तितके चांगले परिणाम मुलामध्ये दिसून येतात. उपचारांमध्ये ‘ऑक्युपेशनल थेरपी’ आणि ‘सेन्सरी इंटिग्रेशन’चा मोलाचा वाटा असतो. खेळांच्या माध्यमातून मुलांच्या शारीरिक आणि मानसिक क्षमता विकसित केल्या जातात. त्यांना आयुष्यात स्वावलंबी करण्यावर अधिक भर दिला जातो. वर्तणुकीतील समस्या दूर करण्यासाठी बिहेविअरल थेरपी आणि संवादासाठी स्पीच थेरपी दिली जाते. या थेरपींच्या माध्यमातून मुलांना पुढे शाळेसाठी आणि समाजासाठी तयार केले जाते.
वाढत्या वयानुसार या मुलांना व्यावसायिक प्रशिक्षण दिले जाते, जेणेकरून ती स्वतःच्या पायावर उभी राहू शकतील. प्रत्येक मूल हे वैशिष्ट्यपूर्ण असते आणि त्याची प्रगती करण्याची गती ही वेगळी असते. पालकांनी आपल्या मुलाला आहे तसे स्वीकारणे हीच त्यांच्या प्रगतीची पहिली पायरी आहे. समाजात आजही या स्थितीबद्दल अनेक गैरसमज आहेत, पण पालकांनी खचून न जाता मुलाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे महत्त्वाचे आहे. वेळ ही सर्वात मोठी गुंतवणूक आहे; एकदा हातातून वेळ निघून गेली की ती पुन्हा येत नाही, विशेषतः मुलांच्या वाढीच्या बाबतीत. त्यामुळे लहान वयातच लक्षणांची ओळख करून घेऊन योग्य तज्ज्ञांच्या मदतीने मुलाचा प्रवास सुसह्य करणे हे पालकांचे कर्तव्य आहे. ऑटिझम हा आयुष्याचा शेवट नसून तो जगण्याचा एक वेगळा मार्ग आहे. योग्य प्रेम, संयम आणि सातत्यपूर्ण थेरपीच्या जोरावर ही मुले देखील समाजाचा एक अविभाज्य आणि यशस्वी घटक बनू शकतात. तज्ज्ञ मार्गदर्शन आणि पालकांचे अतोनात कष्ट यांच्या संगमातून या मुलांचे भविष्य नक्कीच उज्ज्वल होऊ शकते. प्रत्येक पालकाने हे लक्षात ठेवावे की, तुमचे मूल तुमच्या मदतीने आपले स्वतःचे आभाळ नक्कीच शोधू शकते.
लेखिका ऑक्युपेशनल थेरपिस्ट आहेत.