

काव्यकट्टा
एकनाथ आव्हाड
शंभर मीटरची शर्यत सोडून एका स्पर्धकाला मदतीचा हात देणाऱ्या आयुषची ही गोष्ट!
आयुष तू धावण्याच्या स्पर्धेत भाग घेतोयस का रे?” क्रीडा शिक्षक भागवत सरांनी आयुषला विचारलं.
“नको सर. मला नाही घ्यायचाय भाग. भीती वाटते मला स्पर्धेची. आयुष पट्कन बोलून गेला.
“भीती? स्पर्धेची भीती? म्हणजे?”
“म्हणजे सर, स्पर्धेत हरण्याची?”
“अरे मी तुला मधल्या सुट्टीत मैदानावर धावताना पाहिलंय. चपळपणा आहे तुझ्या धावण्यात. म्हणून मला वाटतं, तू धावण्याच्या स्पर्धेत भाग घ्यायला हवा आणि हे बघ, अरे स्पर्धा म्हटलं, की कोणीतरी जिंकणार, कोणीतरी हरणार हे ओघानं आलंच. स्पर्धेत जिंकण्यासाठी आपण प्रामाणिक प्रयत्न करत राहायचं; एवढंच आपल्या हातात. पण, तरीही आपण स्पर्धेत जर हरलोच, तरी या स्पर्धेतून नकळत आपण बऱ्याच गोष्टी शिकत जातो. मुख्य म्हणजे ती हार पचवण्याची खिलाडूवृत्ती आपल्यात या स्पर्धांमुळे निर्माण होते. ती खिलाडूवृत्ती आपल्या पुढील आयुष्यात उपयोगी पडते. म्हणून तुला सांगतो, यावेळी धावण्याच्या स्पर्धेत तू भाग घे. ऐकशील ना तुझ्या सरांचं.”
शेवटी हो-नाही करता करता आयुषनं शंभर मीटर धावण्याच्या स्पर्धेत आपला सहभाग नोंदवला. भागवत सरांना आनंद झाला.
खरंतर, फेब्रुवारी महिना हा क्रीडास्पर्धांनी आणि बालकोत्सवांनी संपूर्णपणे व्यापलेला असतो. खेळाचं मैदान मुलांनी फुलून गेलेलं असतं. खडी-खडी लांब उडी, बटाटा शर्यत, शंभर मीटर धावणं, लंगड दौड… एक ना दोन. केवढ्यातरी स्पर्धा असतात. शाळेचं भव्य पटांगण मुलांच्या स्पर्धांनी गजबजून गेलेलं असतं.
तर दुसरीकडे सांस्कृतिक कार्यक्रमांचं शाळेत पेवच फुटलेलं असतं. बालकोत्सवाची तयारी कितीतरी दिवस आधीच सुरू झालेली असते. गाण्याच्या सरावात ताल स्वराला जाण्यासाठी धडपडणारे सूर वातावरणात उमटत असतात. मुला-मुलींचे नृत्यातील पदन्यास आणि अभिनयातील जोश पाहून यंदाचा बालकोत्सव खासच होणार याची नांदी झाल्याची जाणीव होते.
आयुषच्या डोक्यात भागवत सरांचं एक वाक्य ठाण मांडून बसलं होतं… ‘स्पर्धेत जिंकण्यासाठी आपण आपले प्रामाणिक प्रयत्न करत राहायचे.’ आयुषनं आता खऱ्या अर्थानं स्पर्धेच्या तयारीला सुरुवात केली. तो सकाळी लवकर उठून घराजवळील मैदानावर धावण्याचा सराव करू लागला.
भागवत सरांकडून त्यानं आणखी माहिती मिळवली. चिप्स, बर्गर, पिझ्झा, केक या गोष्टी खाण्यापेक्षा घरचं जेवण व्यवस्थित जेवायचं. फळं खायची. मैदानी सरावासोबत आपला आहारसुद्धा महत्त्वाचा असतो, हेही त्याला कळून चुकलं.
अखेर स्पर्धेचा दिवस उजाडला. शंभर मीटर धावण्याच्या स्पर्धेत आयुषचा सहभाग होता. आयुषची तयारी तर जोरदार होती आणि मुख्य म्हणजे भागवत सरांचा त्याच्यावर विश्वास होता की, आयुष ही स्पर्धा जिंकणारच आणि आपण सरांच्या विश्वासाला पात्र ठरायचं अशी आयुषमध्ये जिद्ददेखील निर्माण झाली होती.
धावण्यासाठी रांगेत पाच मुलं होती. पंचांनी रेडी... स्टेडी... गो... असं म्हटल्याबरोबर जो तो आपलं सर्व बळ एकवटून धावत सुटला. सर्वच जण थोडं अंतर धावले असतील आणि तेवढ्यात… तेवढ्यात पाच जणांमधला एक मुलगा धावता धावता जमिनीवर पट्कन आदळला. आयुषनं मागे वळून त्या मुलाला पाहिलं. त्याला काय वाटलं कुणास ठाऊक, त्या मुलाचं विव्हळणं ऐकून तो पुढे पळण्याऐवजी मागे जमिनीवर पडलेल्या मुलाकडे तो धावत आला. त्या मुलाला त्यानं उठवलं, त्याला आधार दिला. त्या मुलाला चालता येई ना. म्हणून दोन्ही हातांनी त्या मुलाला उचलून स्वत:च्या पाठीवर घेऊन तो भागवत सरांकडे त्याला घेऊन आला.
भागवत सरांनी त्या मुलावर प्राथमिक उपचार केले. त्याच्या घरी फोन लावून त्याच्या पालकांना बोलावून घेतलं.
आयुष खूप अस्वस्थ होता. तो भागवत सरांना म्हणाला, “सर मी नाही स्पर्धा जिंकू शकलो. मला क्षमा करा.” सरांनी मायेनं त्याच्या डोक्यावर हात फिरवला. सर म्हणाले, “तू मैदानी स्पर्धा जिंकला नसशील; पण तू अनेकांची मनं जिंकली आहेस” आणि तिथे उपस्थित असणाऱ्या पंचांच्या आणि स्पर्धकांच्या टाळ्यांनी मैदान गजबजून गेलं.
ज्येष्ठ बाल साहित्यिक
ekank@hotmail.com