मर्ढेकरांची वादग्रस्त कविता

मराठी नवकवितेचा चेहरा बदलणारे बा. सी. मर्ढेकर यांच्या 'पिपांत मेले ओल्या उंदिर' या कवितेने सौंदर्य, अश्लिलता आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य यांवर मूलभूत प्रश्न उभे केले आणि मराठी साहित्याला नवे वळण दिले.
मर्ढेकरांची वादग्रस्त कविता
Published on

महेश्वरी

डॉ. महेश केळुसकर

मराठी नवकवितेचा चेहरा बदलणारे बा. सी. मर्ढेकर यांच्या 'पिपांत मेले ओल्या उंदिर' या कवितेने सौंदर्य, अश्लिलता आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य यांवर मूलभूत प्रश्न उभे केले आणि मराठी साहित्याला नवे वळण दिले.

मराठी साहित्याच्या प्रदीर्घ इतिहासामध्ये बाळ सीताराम मर्देकर ऊर्फ बा. सी. मर्ढेकर (१९०९-१९५६) यांचं स्थान एका क्रांतिकारी युगप्रवर्तकाचं आहे. विशेषतः १९४० च्या दशकात त्यांनी मराठी कवितेत जे बदल घडवून आणले, त्यातून 'नवकविते' चा जन्म झाला. या नवकवितेचं सर्वात प्रखर, वादग्रस्त आणि तितकंच सखोल प्रतीक म्हणजे त्यांची 'पिपांत मेले ओल्या उंदिर' ही कविता होय. १९४६ मध्ये 'अभिरुची' मासिकात प्रसिद्ध झालेली ही रचना केवळ एका कवीची अभिव्यक्ती नव्हती, तर ती जुन्या रोमँटिक सौंदर्यशास्त्राचा पाया हादरवून टाकणारी एक वाङ्मयीन घटना होती.

मर्ढेकरांच्या कवितेचा अभ्यास करताना त्या काळातील सामाजिक आणि वाङ्मयीन परिस्थिती समजून घेणं आवश्यक आहे. मर्देकरांच्या आधीची मराठी कविता प्रामुख्याने निसर्गवर्णन, प्रणय आणि आध्यात्मिक भावविश्वात रमलेली होती. बालकवी, केशवसुत आणि रविकिरण मंडळाच्या प्रभावाखालील ही कविता मानवी जीवनातील क्लेश आणि कुरूपता मांडण्याऐवजी सौंदर्याच्या पारंपरिक कल्पनांना चिकटून होती. मात्र, विसाव्या शतकाच्या मध्यावर जगाने दोन महायुद्धांचा संहार पाहिला होता. औद्योगिकीकरणामुळे शहरं गजबजली होती आणि विज्ञानाने मानवाच्या हातात मोठी शक्ती दिली असली तरी मानवी मूल्यांचा ऱ्हास होत होता.

मर्ढेकरांनी या बदलत्या वास्तवाची जाणीव आपल्या कवितेत अत्यंत टोकदारपणे मांडली. त्यांच्या १९३९ मधील 'शिशिरागम' या पहिल्या संग्रहात जरी संत साहित्याचा आणि आधुनिक गीतकाव्याचा प्रभाव असला, तरी 'काही कविता' (१९४७) या संग्रहापर्यंत पोहोचताना त्यांचं काव्यविश्व पूर्णपणे बदललं होतं. त्यांनी कवितेत यंत्रयुगातील मानवाचं यांत्रिकपण, विफलता आणि अगतिकता मांडण्यासाठी अशा प्रतिमा वापरल्या ज्या पूर्वीच्या वाचकांसाठी धक्कादायक होत्या. 'पिपांत मेले ओल्या उंदिर' ही कविता याच बदलाचं केंद्रस्थान ठरली.

मर्ढेकरांची ही कविता संक्षिप्त पण आशयगर्भ आहे. मूळ कविता पुढीलप्रमाणे आहे :

पिपांत मेले ओल्या उंदिर

माना पडल्या, मुरगळल्याविण

ओठांवरती ओठ मिळाले

माना पडल्या, आसक्तीविण.

गरिब बिचारे बिळांत जगले,

पिपांत मेले उचकी देउन

दिवस सांडला घाऱ्या डोळीं

गात्रलिंग अन धुऊन घेउन

जगायची पण सक्ती आहे

मरायची पण सक्ती आहे

उदासतेला जहरी डोळे

काचेचे पण; मधाळ पोळें

ओठांवरती जमले तेंही

बेकलाइटी, बेकलाइटी!

ओठांवरती ओठ लागले

पिपांत उंदिर न्हाले! न्हाले!

या कवितेच्या वरवरच्या अर्थाकडे पाहिल्यास कवीला एखाद्या पिंपात मेलेले काही उंदीर दिसले असावेत आणि त्या दृश्यावरून त्यानं ही कविता लिहिली असावी असं वाटतं. परंतु, मर्ढेकरांसारख्या सौंदर्यशास्त्राच्या अभ्यासकासाठी हे केवळ एक दृश्य नसून ते आधुनिक मानवाच्या स्थितीचं एक दाहक रूपक आहे.

मर्ढेकरांच्या कवितेतील प्रतिमा या केवळ अलंकार नसून त्या अर्थाच्या वाहक आहेत. पिंप हे या कवितेतील सर्वात महत्त्वाचं प्रतीक आहे. ते आधुनिक बंदिस्त व्यवस्थेचं, शहराचं किंवा मानवी मर्यादेचं प्रतीक असू शकतं. ज्याप्रमाणे उंदीर पिंपात पडल्यावर बाहेर पडण्यासाठी धडपडतो आणि शेवटी थकून तिथेच प्राण सोडतो, तशीच अवस्था आधुनिक मानवाची या यंत्रवत जगात झाली आहे. काही विश्लेषकांच्या मते, 'पिंप' हे मध्यमवर्गीयांच्या लहानशा घराचं किंवा चाळीतील जीवनाचंही रूपक आहे.

उंदीर हे सामान्य मानवाचे प्रतीक आहेत. उंदीर हा प्राणी तसा दुर्लक्षित आणि उपद्रवी मानला जातो. माणसाचं अस्तित्वही या विराट विश्वात किंवा आधुनिक यंत्रणेत इतकं क्षुल्लक झालं आहे की, त्याचं मरणही कुणाच्या खिजगणतीत नसतं. 'गरीब बिचारे' असे उंदरांना संबोधून कवी मानवी अगतिकतेबद्दलची आपली करुणा व्यक्त करतो.

पारंपरिक कवितेत ही प्रतिमा शृंगार किंवा प्रेमाचं सर्वोच्च प्रतीक मानली जाते. परंतु, मर्ढेकरांनी ती मृत्यूच्या संदर्भात वापरली आहे. मेलेल्या उंदरांचे ओठ एकमेकांना लागले आहेत, पण त्यात कोणतीही 'आसक्ती' नाही. हे चुंबन नसून केवळ दोन मृत शरीरांचा झालेला यांत्रिक स्पर्श आहे. मानवी संबंधांमधील जिवंतपणा संपून तिथं जी कृत्रिमता आली आहे, त्याचं हे दर्शन आहे.

'बेकलाइट' हा प्लास्टिकचा एक प्रकार आहे, जो उष्णतारोधक म्हणून वापरला जातो. कवितेत जेव्हा कवी म्हणतो की ओठांवर जमलेलं जे काही आहे ते 'बेकलाइटी' आहे, तेव्हा तो आधुनिक जगातील कृत्रिमतेवर प्रहार करतो. मानवी संवेदना आता नैसर्गिक कृत्रिम झाल्या आहेत. राहिलेल्या नसून त्या प्लास्टिकसारख्या निर्जीव आणि

मर्ढेकर हे उच्चशिक्षित आणि जागतिक साहित्याचे अभ्यासक होते. युरोपमधील युद्ध घडामोडींचा त्यांच्या मनावर खोल परिणाम झाला असावा. ही कविता म्हणजे त्या जागतिक संहाराला दिलेली एक सुन्न प्रतिक्रिया आहे. मर्ढेकरांच्या 'कांही कविता' या संग्रहातील

कवितांवर, विशेषतः 'पिपांत मेले ओल्या उंदिर' मधील काही ओळींवर अश्लिलतेचा आरोप ठेवून १९४८ साली सरकारने त्यांच्यावर खटला भरला. हा खटला भारतीय साहित्याच्या इतिहासातील अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा एक महत्त्वाचा टप्पा मानला जातो. खटल्यात प्रामुख्यानं 'गात्रलिंग' या शब्दावर आणि ओठांवर ओठ मिळण्याच्या प्रतिमेवर आक्षेप घेण्यात आला होता. त्या काळातील सनातनी विचारवंतांना हे शब्द आणि अशा प्रकारे उंदरांच्या माध्यमातून मानवी लैंगिकतेचं किंवा मृत्यूचं चित्रण करणं संस्कृतीविरोधी वाटलं. भारतीय दंड संहिता कलम २९२ (Section 292 of IPC) अंतर्गत हा खटला चालवण्यात आला. खटल्यादरम्यान मर्देकरांना मोठा मानसिक त्रास सहन करावा लागला. कनिष्ठ न्यायालयानं त्यांना दोषी ठरवलं होतं, परंतु त्यांनी या निर्णयाविरुद्ध मुंबई उच्च न्यायालयात दाद मागितली. १९५३ मध्ये मुंबई उच्च न्यायालयाने कनिष्ठ न्यायालयाचा निकाल रद्द केला आणि मर्देकरांची निर्दोष मुक्तता केली. न्यायालयानं असं स्पष्ट केलं की, एखाद्या शब्दाचा किंवा प्रतिमेचा वापर कवीने कोणत्या संदर्भात केला आहे, हे पाहणं आवश्यक आहे. मर्ढेकरांचा हेतू कोणाचं लैंगिक उद्दीपन करण्याचा नसून मानवी जीवनातील भीषण वास्तव मांडण्याचा होता. सौंदर्यशास्त्रात (Aesthetics) कुरूपतेचं किंवा मृत्यूचं चित्रण करणं अश्लील ठरत नाही, असा एक ऐतिहासिक पायंडा या निकालानं पाडला.

या खटल्यामुळे भारतात अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या मर्यादांवर चर्चा सुरू झाली. लेखकाला आपले अनुभव मांडण्यासाठी कोणतेही शब्द वापरण्याचं स्वातंत्र्य असलं पाहिजे, हे या खटल्यानं सिद्ध केलं. मर्ढेकरांच्या निर्दोष मुक्ततेनंतर मराठी साहित्यात 'नवकविते'चा मार्ग मोकळा झाला.

मर्ढेकरांच्या कवितेचा आत्मा तिच्या तत्त्वज्ञानात आहे. कवी म्हणतो : 'जगायची पण सक्ती आहे; मरायची पण सक्ती आहे.' हे विधान अस्तित्ववादाच्या (Existentialism) जवळ जाणारं आहे. मानवाचा जन्म त्याच्या इच्छेनुसार होत नाही आणि मृत्यूही त्याच्या हातात नसतो. जीवन ही एक लादलेली 'सक्ती' आहे. आपण या जगात का आलो, याचं उत्तर कोणाकडेच नाही. गणितात शून्यानं भागण्यासारखी ही स्थिती आहे, जिला कोणतीही व्याख्या नाही.

या सक्तीच्या जीवनात माणूस 'आसक्ती' (Desire/Attachment) शोधतो. तो प्रेम करतो, संपत्ती मिळवतो, पण शेवटी या सर्व गोष्टी 'बेकलाइटी' किंवा कृत्रिम ठरतात. मृत्यूच्या क्षणी या सर्व आसक्ती संपून जातात आणि उरतं ते केवळ उंदरांसारखं केविलवाणं मरण. कवीने 'सक्ती' आणि 'आसक्ती' या शब्दांच्या ध्वनिसाधर्म्यातून जीवनातील विरोधाभास अत्यंत प्रभावीपणे मांडला आहे.

मर्ढेकरांनी मराठी कवितेच्या भाषेत मोठी क्रांती केली. त्यांनी साध्या, घरगुती शब्दांऐवजी वैज्ञानिक आणि तांत्रिक शब्दांचा वापर करून कवितेला एक नवं परिमाण दिलं. मढेकरांची ही भाषा साध्या वाचकाला सुरुवातीला दुर्बोध वाटली तरी ती त्यांच्या जाणिवांच्या प्रकटीकरणासाठी अत्यंत आवश्यक होती.

या कवितेबद्दल अनेक समीक्षकांनी आपली मतं मांडली आहेत. काही जण तिला आजच्या अनैसर्गिक जीवनशैलीचं वर्णन मानतात, तर काही जण तिला केवळ कुरूपतेचं प्रदर्शन मानतात. प्रभा गणोरकर यांच्या मते, या कवितेचा अर्थ सांगताना लोक विनाकारण ती 'दुर्बोध' किंवा 'अश्लील' ठरवतात. वास्तवात ती अत्यंत सरळ आणि सूचक कविता आहे, जी आधुनिक माणसाच्या विपरीत स्थितीचं वर्णन करते.

'पिपांत मेले ओल्या उंदिर' ही कविता मराठी साहित्यात एक मैलाचा दगड ठरली आहे. बा. सी. मर्ढेकरांनी या रचनेद्वारे केवळ एका प्रसंगाचं वर्णन केलं नाही, तर त्यांनी संपूर्ण मानवी संस्कृतीवर आणि आधुनिकतेवर प्रश्नचिन्ह उभं केलं आहे. ही कविता आपल्याला आजही अस्वस्थ करते.

ज्येष्ठ कवी आणि लेखक

maheshkeluskar@gmail.com

logo
marathi.freepressjournal.in