
मनोगत
सई तांबे
शाळेचा पहिला दिवस जसा मुलांचा असतो, तसा तो पालकांसाठीही असतो. पालक म्हणून असलेल्या आपल्या अपेक्षा, आपल्या इच्छा, आपला त्रागा आणि याचं मुलांच्या मनावर येणारं दडपण या सगळ्याचा शाळेचं नवीन वर्ष सुरू होताना नवा विचार करायला हवा. आपल्या अपेक्षा आणि मुलांची गती यांची सांगड घालायला हवी.
नुकत्याच परीक्षा संपल्या होत्या. मुलं जरा कुठे मोकळी होत होती आणि पालकांच्या गटावर वेगवेगळ्या शिबिरांच्या जाहिराती, माहिती यायला सुरुवात झाली. शाळेने आयोजित केलेले ‘समर कॅम्प’, ‘डे केअर सेंटर’ने वेगळे पैसे घेऊन त्याच वेळात ठेवलेल्या ‘आर्ट अँड क्राफ्ट ॲक्टिव्हिटी’ हे सर्व आधीच पोस्ट झालं होतं. शाळा संपल्यावर नवीन वर्ष सुरू होण्याआधी मुलांनी काय काय शिकावं याच्या याद्या तयार होत होत्या. “तुझा मित्र या क्लासला जाणार आहे तर तू पण जा की, २० दिवस फुटबॉलला गेलास तर तुझीच ताकद वाढेल ना?” असे वरून प्रेमळ पण आतून ठाम आग्रह घरोघरी होताना दिसत होते. पाचवीपासून ‘सेमी इंग्रजी’ होणार म्हणून घाईने लावलेले स्पोकन इंग्रजीचे क्लास, फोनेटिक्सचे क्लास यांच्या चर्चा सुद्धा पालक भेटल्यावर होत होत्या. एकंदरच आपल्या मुलाला नवीन काहीतरी शिकायला मिळावं, नवीन अनुभव मिळावा, असं प्रत्येक आई-बाबांना वाटत होतं. त्यात अगदी माझा पण नंबर लागतो.
पण आज या सगळ्याकडे वेगळ्या दृष्टिकोनातून पाहताना मला वाटतं की, मुलांनी सतत काहीतरी शिकावं, नवीन अनुभवावं, या स्पर्धेत आपण पालकच उतरलोय की काय? आपल्या मुलाला-मुलीला वेगळे अनुभव मिळावेत, त्यांनी नवीन खेळ, कौशल्यं शिकावीत असं वाटणं अयोग्य नाही. पण हे करताना त्याने इतर चार मुलांपेक्षा चांगलं करावं, उत्तम गुण मिळवावेत किंवा उत्तम सादरीकरण करावं, चार मुलांमध्ये माझा मुलगा/ मुलगी उठून दिसावेत, त्यांनी सतत चांगलं आणि समाजमान्य पद्धतीने वागावं, आई-वडील व घरातील मोठ्यांचा आदर करावा, जास्त हट्ट करू नये... हेही आपलं आपणच ठरवून टाकलंय का? या ‘रॅट रेस’मध्ये आपण आपल्या मुलाला-मुलीला पण हाताला धरून फरफटवतोय का?
हे सारं शाळेचा पहिला दिवस सुरू होण्याआधी शोधायला हवं. त्यासाठी स्वत:त डोकावायला हवं.
आपल्या मुला-मुलीकडून आपल्या किती म्हणजे किती अपेक्षा आहेत, याची यादी करायची म्हटली तर कागद संपतील, पण आपल्याला अजून एखादी गोष्ट लिहावीशी वाटेल. पालक म्हणून मला कुठलाही त्रास होऊ नये, उलट अभिमान वाटावा, या मुळाशी या सगळ्या अपेक्षा एकवटलेल्या मला दिसतात. उदाहरणच द्यायचं झालं, तर मी ऑफिसला जाणारी आई आहे, मला लवकर उठून ऑफिसला ठरावीक वेळेत पोहोचायला ट्रेन पकडावी लागते, म्हणून मग माझ्या मुलाने लवकर झोपावं, सकाळी लवकर उठावं, वेळेत सगळं आटपून, कुठलेही हट्ट न करता माझ्या वेळेत तयार राहावं म्हणजे मी त्याला सोडून माझी ठरलेली ट्रेन पकडू शकते, असं मला वाटतं. असं वाटण्यात गैर काहीच नाही. पण आपण त्याचा अट्टाहास करतोय का? आपल्या अपेक्षांमध्ये आपण आपल्या मुला-मुलीचं वय, त्यांचा स्वभाव, त्यांची आवडनिवड, त्यांचा आनंद या सर्व बाजू विचारात घेतो का? आपल्या वेळेवर ट्रेन पकडायच्या गरजेइतकं महत्त्व आपण त्यांनाही देतोय का? फार कमीवेळा पालक म्हणून आपण तितका विचार करतो. सकाळी मुलामुळे मला उशीर व्हायला लागला की माझा पारा चढायला लागतो. ती चिडचिड मुलावर काढली जाते. ‘लवकर आवर’ ही वारंवार केली जाणारी विनंती हळूहळू, ‘तुला साधं इतकं पण जमत नाही का?’ या वाक्यात बदलते. तुझ्यामुळे मला कसा उशीर झाला हे त्याला ऐकवलं जातं. राग व्यक्त केला जातो.
मी माझ्या आजूबाजूला अशा अनेक आया, बाबा, आजी-आजोबा पाहिलेत, जे मूल त्यांच्या मनाप्रमाणे वागलं नाही की अस्वस्थ होतात. पाहुण्यांसमोर, एखाद्या कार्यक्रमात मुलाने त्यांचं ऐकलं नाही की, ते परत परत मुलांच्या मागे लागतात, त्यांना टोमणे मारतात, त्यांच्या तक्रारी सांगायला सुरुवात करतात. किंवा ‘तू इतके मार्क मिळवलेस तर तुला अमूक घेईन’ किंवा ‘आज तू नीट वागलास तर तुला चॉकलेट मिळेल’, असा सशर्त फॉर्म्यूला खूप ठिकाणी पाहायला मिळतो. त्यातून मुलं सुद्धा बार्गेनिंग करायला शिकतात.
आज आपण ज्या धकाधकीच्या, धावपळीच्या काळात पालकत्व निभावतोय तो काळ खरंच कठीण आहे. ऑफिसचं काम व्हाॅट्सॲपमधून केव्हाही आपल्यापर्यंत पोहोचण्याचा, खऱ्या-खोट्या बातम्या आणि वेगवेगळ्या प्रकारचा कन्टेंट आपल्यावर आदळत राहण्याचा हा काळ आहे. आपल्यापुढे स्वत:ला टिकवण्याची, सिद्ध करत राहण्याची, घरातली व बाहेरची कामं पार पाडण्याची वेगवेगळी आव्हानं आहेत आणि या सगळ्यात आपल्याला आपल्या मुलांनाही वेळ द्यायचा आहे. त्यांना चांगल्याप्रकारे वाढवायचं आहे. त्यामुळे मी सगळा दोष पालकांचा आहे, असं अजिबात म्हणणार नाही किंवा जे प्रत्यक्ष कृतीत आणणं शक्य नाही, अशा अवास्तव अपेक्षा स्वत:कडून वा इतर पालकांकडूनही करणार नाही. पण आपल्या मानगुटीवर असणारा प्रचंड अपेक्षांचा बोजा आपण ज्याप्रकारे नकळतपणे मुलांच्या कोवळ्या मानेवर टाकतोय, ते मात्र आपल्याला सजगपणे थांबवलं पाहिजे. काही छोट्या गोष्टी लक्षात ठेवल्या किंवा करून पाहिल्या तरी यात बदल घडेल, असं मला वाटतं. मी करत असलेल्या किंवा मला भावलेल्या गोष्टींची यादी मी देतेय. कदाचित तुम्ही त्यात भर घालू शकाल.
g मुलाकडून अपेक्षा करताना किंवा त्याच्या वागण्यामुळे माझी चिडचिड होत असेल तर मी स्वत:ला दोन मिनिटं पॉझ घ्यायला सांगते आणि स्वत: मी त्याच्या वयाची होते तेव्हा कशी होते, हे आठवायचा प्रयत्न करते. मला काय आवडत होतं, कशाचा राग येत होता, हे आठवते. खूप वेळा हा छोटा पॉझ मला लक्षात आणून देतो की, मी नकळतपणे अजून छोट्या असणाऱ्या माझ्या मुलाकडून मोठ्या व्यक्तीप्रमाणे वागायच्या अपेक्षा करतेय. हे असं जाणवणं मला स्वत:ला शांत करायला मदत करतं.
g ज्या गोष्टी त्याच्याशी संबंधित आहेत, तिथे शक्य असेल तर मी त्याला त्याची मतं, त्याची आवड विचारते. माझी सोय आणि बाकी गोष्टी लक्षात घेऊन शक्य असेल तिथे ते पाळते. काहीवेळा ‘त्याचे नाही- माझे पण नाही’, असा मध्यम मार्ग आम्ही बोलून ठरवतो. त्यामुळे एकमेकांवर होणारी चिडचिड थोडी कमी होते.
g मी आजकाल त्याच्या आमच्याकडून काय अपेक्षा आहेत हे पण त्याला विचारते. त्याची मतं, इच्छा, भावना, त्याचं म्हणणं हे सगळं माझ्यासाठी महत्त्वाचं आहे, ते मला समजून घ्यायचं आहे, हे त्याच्यापर्यंत पोहोचावं असं मला वाटतं.
g मला त्याच्या काही गोष्टी, त्याचं वागणं, त्याचे विचार पटले नाहीत, आमची भांडणं झाली, रुसवे-फुगवे झाले तरी दोघेही शांत झाल्यावर मला काय आवडलं नाही, ते त्याला शांतपणे सांगायचा प्रयत्न करते. ते दरवेळी जमतंच असं नाही किंवा मला काय वाटलं, का वाईट वाटलं हे सांगून, यावर तू विचार कर, असे म्हणून तो विषय तिथे संपवते.
g सुरुवातीला काही गोष्टींचा मला मनात त्रास व्हायचा. आपला मुलगा असं का वागला, त्याला हे का आवडत नाही, त्याला यात का मज्जा येत नाही? या विचारांनी काहीवेळा मी अस्वस्थ व्हायचे. पण हळूहळू माझ्या लक्षात आलं की, माझा मुलगा म्हणून मी त्याची एक प्रतिमा मनात तयार केली आहे. मला एखादी गोष्ट लहानपणी खूप आवडायची म्हणून ती त्याला आवडावी, त्यालाही त्यात मज्जा यावी, अशी अपेक्षा मी तयार केलीय. तो माझा मुलगा असला तरी तो माझ्याहून वेगळा आहे. मी त्याच्या या वेगळेपणाला समजून घेण्यासाठी हळूहळू स्वत:ला तयार केलं. काहीही जज न करता त्याच्या वेगळेपणाकडे पाहण्याचा प्रयत्न मी करत आहे.
शाळेच्या नवीन वर्षासोबत मी माझ्या मुलाच्या मानेवरचं अपेक्षांचं ओझं थोडं तरी कमी करायचा प्रयत्न करणार आहे. त्यामुळे फक्त त्यालाच नाही तर मलाही थोडं हलकं आणि मोकळं वाटणार आहे. मला खात्री आहे, पालक म्हणून तुम्ही सुद्धा माझ्या सोबत असाल!
सजग पालक व समाजकार्य विषयातील प्रशिक्षक.