

नवलनगरी
सोनाली कोलरकर-सोनार
खांद्याला दुखापत न होता सहज फिरता यावं म्हणून सुरू झालेला बॅगपॅकचा प्रवास आज आपल्या जगण्याचा एक अत्यंत आवश्यक आणि बहुपयोगी भाग बनला आहे.
बॅगपॅक हा आता अत्यंत आवश्यक प्रकार. शाळेपासून कोणत्याही वयाच्या व्यक्तीला सामान ठेवायला या बॅगपॅकची गरज असते. कंपासपेटी पासून मोबाईल, पाण्याची बाटली ठेवण्यापार्येंत सगळ्या गोष्टींसाठी वेगळे कप्पे असणारी ही बॅगपॅक मोठी बहुपयोगी! हिचा शोध कसा लागला असेल याची ही रंजक कहाणी!
1908 साल! सोलून निघालेले आणि दुखावलेले खांदे ,पाठ , मान घेऊन वैतागलेला ओले बेर्गन ट्रेक वरून परतला. ओले हा नॉर्वेजियन शिकारी आणि डोंगर दऱ्या फिरणारा अवलिया! या वेळी मात्र तो जड सामान वाहून नेऊन पुरता थकला आणि त्याने एक चांगली पिशवी तयार करण्याचा चंगच बांधला. घरी आल्याबरोबर त्याने जुनीपरच्या लाकडाला पाठीच्या आकारात कापून त्यावर मऊ कापडी बॅग बांधून एकदम झकास बॅग तयार केली. ओले ने तयार केलेली या पहिल्या बॅगपॅक ने एकदम क्रांतीच केली. फिरस्त्या लोकांमध्ये ही बॅगपॅक चांगली लोकप्रिय झाली आणि त्याचे पेटंट घेऊन जवळपास 20-25 वर्षे या बॅग लोकांनी वापरल्या.
ओले च्या आधी देखील पार १८ व्या शतकात अमेरिकन आर्मी साठी मेटल फ्रेम असलेली एक बॅगपॅक तयार करण्याचा प्रयत्न न्यूयॉर्क, अमेरिकेच्या हेन्री मेरियम, या सध्या सैनिकाने केला होता.त्याला नॅपसॅक म्हणायचे. पण तिचं वजन इतक जास्त होत की ती आर्मीला देखील जडच झाली म्हणायची !
ओले नंतर मात्र बॅगपॅकच्या डिझाईन मध्ये झपाट्याने अनेकांनी बदल केला.
१९२० च्या आसपास भटकंती आवडणाऱ्या सिएटल, अमेरिकेच्याच लॉईड नेल्सनने त्याच्या अलास्काच्या ट्रीप मध्ये बघितले की तिथले मूळ रहिवासी सील माश्याच्या कातड्याची हलकी बॅग वापरताहेत. ती पाहून त्याने घरी परत आल्यावर बॅगपॅकच्या डिझाईन वर अनेक प्रयोग केले आणि मग तयार झाली 'ट्रॅपर बॅग' ! असं म्हणतात की या बॅगपॅकचे हे जगातील पहिले व्यावसायिक 'मास प्रोडक्शन' ! त्यानंतरही बॅगपॅक वापरणार्यांना अनेक प्रश्न पडत ! या बॅग्सला तोपर्येंत झिप नव्हती. त्यामुळे सामान बॅगमधून पडून जायचे.कोलोरॅडो ( अमेरिका) च्या हायकर आणि रॉक क्लाइंबर गेरी कनिंगहॅमने साहसी पर्यटन करणार्यांच्या गरजा लक्षात ठेवून खास झिप लावलेली पहिली बॅगपॅक तयार केली. 'कॉर्ड लॉक बॅगपॅक' ही तरुणाईमध्ये विशेष प्रसिद्ध झाली। 'गॅरी' ही बॅगपॅक तयार करणारी कंपनी आजही प्रसिद्ध आहे।
१९५० ते ५२ च्या काळात अके नॉर्दिन या स्वीडिश हरहुन्नरी अवलियाने कॅनव्हास बॅगपॅक तयार केली. हेतू हाच होता की या बॅगपॅक वजनाने हलक्या असाव्यात जेणेकरून वापरायला सोपे होईल. हा प्रयोग करायला नॉर्दिनने आपल्या आईचे शिलाई मशीन वापरले आणि स्वतः शिवून हलक्या बॅगपॅक तयार करण्याचा प्रयत्न केला. 'फ़ॉलरावन कांकन' ही त्याची कंपनी प्रसिद्ध झाली आणि कॅनव्हास बॅग्स पण लोकप्रिय झाल्या।
डुलुथ, मिनीसोटा अमेरिकेच्या डिक आणि नीना केटली यांनी तर खूपच छान युक्ती वापरली. कचर्यातून कला निर्माण करण्याचा प्रयत्न होता त्यांचा! त्यांनी दुसर्या महायुद्धात तयार झालेल्या कचर्यातून बॅगपॅक तयार केली. याला खांद्याला भार होवू नये म्हणून पॅड आणि कमरेजवळ पण पट्टा तयार केला. त्यामुळे वजन विभागले गेले आणि बॅगपॅक जरा हलकी झाली. डिक आणि निना ने बरीच भटकंती केली। इंग्लंड ,कॅलिफोर्निया असा प्रवास करत नेवाडा ला डिक आणि निना स्थिरावले आणि त्यांच्या बॅगपॅकचा प्रवास असा सर्वत्र झाला।
१९६७ साली कोलोरॅडो, अमेरिकीके च्या ग्रेग लोवेने या सगळ्या नव्या जुन्या बॅगपॅकच्या डिझाईनचा अभ्यास केला आणि मग आपण आत्ता वापरतो तशी बॅगपॅक तयार केली. ग्रेगला 'आधुनिक बॅगपॅकचा जनक' म्हटले तर वावगे ठरू नये!
साहसी प्रवासासाठी उपयुक्त ठरेल , पाठीवर वजन असले की हात मोकळे राहतील आणि डोंगर चढाई करणे सोपे होईल या उद्देशाने तयार करण्यात आलेली बॅगपॅक आता अभ्यासाचा डोंगर चढायला देखील उपयुक्त ठरली की नाही?
मग काय, भरा बॅगपॅक आणि निघा मजा करायला!
पर्यावरण शिक्षक, प्रकाशक-संपादक
sonalikolarkarsonar@gmail.com