खमंग बेक्ड पदार्थांची दुनिया

बेक्ड पदार्थ हे केवळ अन्न नसून आठवणी आणि भावना जागवणारे माध्यम आहेत. चुलीवरील पारंपरिक भाकरीपासून ते मॉडर्न केक, पेस्ट्री आणि पिझ्झापर्यंतचा प्रवास हा बदलत्या खाद्यसंस्कृतीची एक रंजक कहाणी सांगतो.
खमंग बेक्ड पदार्थांची दुनिया
खमंग बेक्ड पदार्थांची दुनिया
Published on

प्रासादिक म्हणे

प्रसाद कुळकर्णी

बेक्ड पदार्थ हे केवळ अन्न नसून आठवणी आणि भावना जागवणारे माध्यम आहेत. चुलीवरील पारंपरिक भाकरीपासून ते मॉडर्न केक, पेस्ट्री आणि पिझ्झापर्यंतचा प्रवास हा बदलत्या खाद्यसंस्कृतीची एक रंजक कहाणी सांगतो.

स्वयंपाकघरातून येणारा एखादा मंद, मोहक सुगंध मनाला क्षणात भूतकाळात घेऊन जातो. तव्यावर भाजलेल्या पोळीचा वास असो, चुलीवर फुलणाऱ्या भाकरीचा असो किंवा ओव्हनमधून नुकत्याच बाहेर आलेल्या केकचा. खाद्यपदार्थांचा सुगंध हा केवळ भुकेशी जोडलेला नसतो, तो आठवणी, संस्कार आणि भावनांशीही जोडलेला असतो. याच अनुभवविश्वात ‘बेकिंग’ या प्रक्रियेला एक वेगळं स्थान आहे.

आजच्या काळात केक, ब्रेड, बिस्किटं, पेस्ट्री, पिझ्झा, कुकीज अशा असंख्य बेक्ड पदार्थांनी आपल्या खाद्यसंस्कृतीत ठाम स्थान निर्माण केलं आहे. वाढदिवसाचा केक, सकाळच्या नाश्त्याचा ब्रेड, चहाबरोबरची बिस्किटं किंवा संध्याकाळच्या गप्पांमधील गरम पेस्ट्री, हे पदार्थ आता आपल्या दैनंदिन जीवनाचा भाग झाले आहेत.

भारतीय स्वयंपाकघरात ‘बेकिंग’ हा शब्द तुलनेने नवा असला तरी भाजून पदार्थ तयार करण्याची परंपरा अत्यंत जुनी आहे. तंदूरमध्ये तयार होणारे नान, कुलचा, रोटी यांसारखे पदार्थ त्याचे उत्तम उदाहरण आहेत.

महाराष्ट्रातही भाकरी, पोळी, थालीपीठ यांसारख्या पदार्थांमध्ये धान्य, पीठ आणि उष्णतेचा सुंदर मेळ दिसतो. हे पदार्थ आधुनिक अर्थाने ओव्हनमध्ये बेक केले जात नसले, तरी त्यांच्या निर्मितीमागील मूलभूत कल्पना, पीठाला नियंत्रित उष्णतेने खाद्यरूप देणं बेकिंगच्या संकल्पनेशी जोडलेली आहे.

पूर्वी केकच्या ॲल्युमिनियम पात्रात केकचं मिश्रण ओतून आणि ते पात्र गॅसवर ठेवून केक बनवला जात होता. केकपात्राच्या खाली असलेल्या ॲल्युमिनियमच्या डिशसदृश पात्रात वाळू ठेवली जात असे, ज्यामुळे केक छान भाजला अर्थात बेक होत असे.

भारतात पाश्चात्त्य बेकिंगच्या प्रभावातून ब्रेड, केक, बिस्किटे व पेस्ट्री यांचा प्रवेश झाला. भारतीयांनी यात वेलची, केशर, गूळ आणि खवा यांसारखे पारंपरिक घटक वापरून त्यांना भारतीय चव दिली. या बेक्ड पदार्थांमध्ये साध्या पिठापासून बनणारा ब्रेड अत्यंत महत्त्वाचा असून, पांढरा, ब्राऊन, मल्टीग्रेन व सावरडो अशा विविध रूपांत तो लोकप्रिय झाला आहे. ब्रेडची खरी गंमत त्याच्या साधेपणात आहे. पीठ, पाणी, यीस्ट आणि मीठ यांसारख्या साध्या घटकांपासून तयार होणारा पदार्थ योग्य पद्धतीने मळला, फुलवला आणि बेक केला की त्याचं रूप पूर्णपणे बदलतं. बाहेरून किंचित खरपूस आणि आतून मऊ असा ब्रेड अनेक पदार्थांचा आधार बनतो. आता केक म्हटलं की सर्वप्रथम आठवते ती लहानपणी इंग्रजीच्या पुस्तकात असलेली कविता.

Pat-a-cake, pat-a-cake baker's man

Bake me a cake as fast as you can

Pat it and prick it and mark it with "T"

Put it in the oven for baby and me.

आणि नंतर आठवतो तो वाढदिवस. परंतु केकचं जग त्यापेक्षा खूप मोठं आहे. साध्या स्पॉंज केकपासून चॉकलेट केक, फळांचा केक, चीज केक, कप केक, प्लम केक अशा असंख्य प्रकारांनी केकच्या विश्वाचा विस्तार केला आहे.

पूर्वी घरातील समारंभांसाठी तयार होणारा साधा केक आणि आजच्या आकर्षक डिझाइनचे केक यांच्यात मोठा फरक दिसतो. तरीही त्यामागील भावना तीच आहे, एखादा विशेष क्षण गोड करणं. घरच्या घरी आई किंवा आजीने केलेला साधा केक अनेकदा महागड्या केकपेक्षा अधिक आठवणीत राहतो, कारण त्यात घरचा सुगंध, प्रेम आणि आपलेपणा मिसळलेला असतो. भारतीय घरांमध्ये चहा आणि बिस्किटं यांचं नातं जवळजवळ अतूट आहे. सकाळची सुरुवात असो किंवा संध्याकाळची निवांत वेळ, चहाच्या कपासोबत बिस्किटांची प्लेट सहज दिसते.

शहरी खाद्यसंस्कृतीत पेस्ट्री आणि मफिन, कपकेक अत्यंत लोकप्रिय झाले आहेत. पेस्ट्री आपल्या आकर्षक सजावटीमुळे व विविध क्रीम, चवींमुळे तरुण पिढीला आकर्षित करते, तर मफिन व कपकेक हे केकचे लहान स्वरूप असून त्यांच्या विविध प्रकारांमुळे आणि सोयीस्कर आकारांमुळे ते पार्टी व समारंभांमध्ये आवडीने वापरले जातात.

बेक्ड पदार्थांमध्ये पिझ्झा हा जागतिकीकरणाचा एक उत्तम नमुना आहे. मूळतः इटालियन खाद्यपदार्थ असलेला पिझ्झा आज जगभरात वेगवेगळ्या रूपांत खाल्ला जातो. भारतात त्याला मिळालेल्या स्थानिक रूपामुळे खाद्यसंस्कृतीतील सर्जनशीलता दिसून येते. पनीर, तंदुरी भाज्या, मसालेदार सॉस, भारतीय चटण्या अशा घटकांनी पिझ्झाला भारतीय स्पर्श दिला आहे. एखादा पदार्थ एका देशातून दुसऱ्या देशात जातो तेव्हा तो जसाच्या तसा राहत नाही; स्थानिक चवी आणि सवयी त्याला नवं रूप देतात. पिझ्झा हे त्याचं उत्तम उदाहरण आहे.

आज बाजारात तयार बेक्ड पदार्थांची कमतरता नाही. तरीही घरच्या ओव्हनमध्ये तयार होणाऱ्या पदार्थाची मजा काही औरच असते. पदार्थ तयार करण्यापूर्वी साहित्य जमवणं, पीठ तयार करणं, मिश्रण ढवळणं, ओव्हन गरम करणं आणि शेवटी घरभर दरवळणारा सुगंध, हा संपूर्ण अनुभवच आनंद देणारा असतो.

विशेषतः सण, वाढदिवस आणि कौटुंबिक समारंभांमध्ये घरगुती बेकिंगचा अनुभव अधिक जिव्हाळ्याचा ठरतो. आज बेकिंगला लोकप्रियता मिळण्यामागे सोशल मीडियाचाही मोठा वाटा आहे. सुंदर केक, आकर्षक ब्रेड, सजवलेल्या कुकीज आणि घरगुती बेकिंगचे व्हिडीओ पाहून अनेकांना स्वतः प्रयोग करण्याची प्रेरणा मिळते. अनेक घरगुती बेकर्सनी आपल्या कौशल्याला व्यवसायाचं रूप दिलं आहे. त्यामुळे स्वयंपाकघर हे काहींसाठी छोट्या उद्योजकतेचं केंद्र बनलं आहे.

बेक्ड पदार्थ हे केवळ मैदा, साखर, लोणी आणि उष्णता यांचे मिश्रण नसून त्यामागे मानवी कल्पकता व प्रयोगांचा विलक्षण इतिहास आहे. चुलीपासून ओव्हनपर्यंत आणि भाकरीपासून आकर्षक केकपर्यंत झालेला हा प्रवास जागतिक खाद्यसंस्कृतींच्या देवाणघेवाणीतून घडला आहे. ओव्हनमधून बाहेर पडणाऱ्या गरम पदार्थांचा सुगंध बदलत्या खाद्यपरंपरेची जाणीव करून देतो. अन्न हे केवळ पोट भरण्यासाठी नसून आठवणी घडवणारे, नाती जोडणारे आणि संस्कृती जिवंत ठेवणारे माध्यम आहे. त्यामुळेच, बेक्ड पदार्थांच्या सुवासात आधुनिकता स्वीकारत असतानाही स्वतःच्या मुळांशी जोडलेल्या खाद्यसंस्कृतीची सुंदर कहाणी दडलेली आहे.

लेखक, निवेदक, कवी

kprasad1959@gmail.com

logo
marathi.freepressjournal.in