खुल जा सिम सिम
ज्योती कपिले
Hi friends!
कसे आहात? दिवाळी कशी साजरी केली? होय, दिवाळीची सुट्टी म्हणजे संपू नये असं वाटणारी धमाल मस्तीची सुट्टी होय! बरं, मग तुम्ही दिवाळीच्या सुट्टीत काय काय मज्जा केली? किल्ला बनवला का? मला सांगा, तुम्ही स्वतः घरासमोर किल्ला बनवता का सोसायटीतील मुलं एकत्र येऊन मिळून किल्ला बनवता? किल्ला बघणं, बनवणं.. काय मस्त माहोल असतो ना? तुम्ही खरेखुरे किल्ले बघितले आहेत का? खरे किल्ले बघितले असतील तर दिवाळीत किल्ले बनवताना बारकाईने किल्ला बनवता येतो. आताशा बऱ्याच ठिकाणी किल्ले बनविण्याची स्पर्धा असते. तिकडे भाग घेऊन तुम्ही आपलं टॅलेंट आजमावून बघू शकता. तसंच इतर मुलं कसे किल्ले बनवतात, याची छान नवीन माहिती आपल्याला कळते.
तुम्हा मुलांना व्यासपीठ देणाऱ्या एका संस्थेबद्दल, एका वाचनालयाबाबत मी आज माहिती घेऊन आली आहे. ते वाचनालय मुंबई उपनगरात वांद्रे पश्चिम परिसरात स्वामी विवेकानंद रोडवर आहे आणि नाव आहे नॅशनल लायब्ररी!
नॅशनल लायब्ररीला जिल्हा ‘अ’ दर्जाची मान्यता मिळालेली आहे. संस्था सुरू होऊन शंभरहून अधिक वर्षं झालेली आहेत. लायब्ररीत मोठ्यांसाठी मराठी, इंग्रजी, हिंदी आणि गुजराती पुस्तकं उपलब्ध आहेत. शिवाय बालविभाग सुद्धा भरपूर पुस्तकांनी समृद्ध आहे. भिंतीवर चित्रं काढलेली आहेत. परत संस्थेची पुस्तकं तुमच्या दारी म्हणजे पुस्तकांची व्हॅन, फिरते वाचनालय आहे. पण या लायब्ररीची सुरुवात कशी झाली ठाऊक आहे का? तर चार मित्रांनी एकत्र येऊन एका छोट्या पडक्या खोलीत सुरू केलेलं हे वाचनालय होतं आणि आज हे मुंबईतील एक महत्त्वाचं सांस्कृतिक केंद्र झालेलं आहे. म्हणजे बघा, सुरुवात होणं गरजेचं असतं. बाकी तुमच्या मेहनतीवर तुमचा उत्कर्ष होत असतो. कुणास ठाऊक कदाचित तुम्ही कोणी चार मित्र एकत्र येऊन काहीतरी भव्य-दिव्य नक्कीच सुरू करू शकता. तुम्हाला वाटेल की मी आज लायब्ररीबाबत का सांगत आहे, तर नॅशनल लायब्ररीने २०१६ पासून तुम्हा मुलांच्या हाती मोबाईलऐवजी पुस्तकं यावीत म्हणून ‘बालकट्टा’ सुरू केलेला आहे. दर महिन्याला एक आणि उन्हाळ्याच्या, दिवाळीच्या सुट्टीत आठ दिवसांचे शिबिर घेतले जाते. तसेच उन्हाळ्याच्या सुट्टीत मुला-मुलींसाठी दुपारी कुठलीही फी न आकारता लायब्ररीत बसून वाचायची सोय असते. मस्तच ना? शिवाय पर्यावरण दिवस, भोंडला, गरबा, ख्रिसमस, होळी अशा सणांचे खास सेलिब्रेशन असते. दिवाळीच्या सुट्टीत तर बच्चे कंपनीसाठी अनेक स्पर्धा आयोजित केल्या जातात. उदा. निबंध, चित्रकला, रांगोळी, नृत्य आणि किल्ला बनवणे आणि म्हणूनच ही सर्व माहिती तुमच्यापर्यंत पोहचवायची मला इच्छा झाली.
जर तुम्ही मुंबई परिसरात राहत असाल तर तुम्हाला या विनामूल्य स्पर्धेत सहभागी होता येईल. या बालकट्ट्याचे आयोजन संस्थेचे पदाधिकारी आणि इतर सहकारी करतात, तर संयोजन मी करते आणि या सर्व स्पर्धेचा निकाल, बक्षीस समारंभ दरवर्षी बालदिनाच्या म्हणजे १४ नोव्हेंबर रोजी स्पर्धेत पहिल्या येणाऱ्या मुलांना विविध पुरस्कार देऊन साजरा होत असतो. मुंबईत असाल तर आणि शक्य असेल तर जरूर या १४ नोव्हेंबरला नॅशनल लायब्ररीमध्ये. मुलांची सर्वांगीण प्रगती व्हावी म्हणून नॅशनल लायब्ररी खूपच आगळेवेगळे कार्यक्रम, उपक्रम राबवत असते. उदा. पोस्ट ऑफिस, अग्निशमन दल, बँक अशा विविध ठिकाणी मुलांना घेऊन जाऊन तिथली माहिती मुलांना दिली जाते. मुलांच्या अंगभूत गुणांना प्रोत्साहन देणं सोप्पं नाही, हे खरं आहे. पण नॅशनल लायब्ररी ते काम लीलया करत आहे. हे वाचून आता तुम्हाला नक्कीच नॅशनल लायब्ररीमध्ये जाण्याची इच्छा झाली असेल तर जरूर या. वांद्रे पश्चिम येथील वांद्रे तलावासमोर ही वास्तू वाचकांसाठीच तर उभी आहे. कटिबद्ध आहे.
तेव्हा वाचणाऱ्या मुलांनो, तुम्ही आपल्या आई-वडिलांसोबत, मित्रांसोबत, लहान भावंडांसोबत या वाचन मंदिरात जरूर या. तुमचं स्वागत असेल.
साहित्यिक व साहित्याच्या आस्वादक